Tuesday, October 11, 2016

द्राविडी प्राणायाम

jaya cartoon के लिए चित्र परिणाम

सर्जिकल स्ट्राईक आणि पाकिस्तानी दहशतवाद यामुळे माध्यमांचे देशांतर्गत अनेक विषयांवरील लक्ष सध्या उडालेले आहे. अन्यथा तामिळनाडूचे राजकारण ही आपल्या देशातील चोविस तास चालणारी ब्रेकिंग न्युज झाली असती. कारण खरोखरच आज त्या राज्याचा कारभार कोण चालवतो आहे, त्यावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता उपचारासाठी अपोलो इस्पितळात दाखल आहेत, इतकीच एक बातमी मागल्या दोन आठवड्यात सामान्य माणसाला मिळु शकलेली आहे. पण त्यांच्यावर कसले उपचार चालू आहेत आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये किती सुधारणा होते आहे, त्याविषयी कमालीची गुप्तता राखली जात आहे. याविषयी प्रथम त्यांचे कडवे विरोधक द्रमुकचे अध्यक्ष करूणानिधी यांनी आवाज उठवला होता. तेव्हा अर्थातच फ़ारसे दिवस झालेले नव्हते. चारपाच दिवस त्या इस्पितळात होत्या आणि करुणानिधींनी तशी मागणी केल्याने गदारोळ झाला. पण आता दोन आठवडे उलटल्यावर त्याचे रहस्य आणखीच गडद होत चालले आहे. डॉक्टर्स उपचार चालू व तब्येत सुधारते असे सांगत आहेत. पण भेटायला गेलेल्या कोणालाही जयललितांना भेटू देत नाहीत, ही समस्या आहे. किंबहूना त्यामुळेच रहस्य गडद झालेले आहे. राज्यपाल व केंद्रिय मंत्री इस्पितळात जाऊन आले. पण त्यापैकी कोणीही आपण प्रत्यक्षात जयललितांना भेटल्याचे म्हटलेले नाही. म्हणून मग त्या खरेच शुद्धीवर आहेत काय? की त्याच्या नावाने भलतेच कोणी राज्य करीत आहेत, असा प्रश्न निर्माण होतो. कारण जयललिता केवळ नामवंत व्यक्ती नाहीत, तर घटनात्मक पदावर आहेत आणि त्यांच्या हाती एका मोठ्या राज्याचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तो अधिकार त्याच वापरत आहेत, की त्यांच्या नावाने भलतेच कोणी निर्णय घेत आहेत, अशी शंका घेतली जाण्यात गैर काहीच नाही.

त्यांच्या निकटवर्तियांनी कितीही खुलासे केले, तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. म्हणूनच जयललिता समर्थक वा त्यांच्या गोतावळ्याच्या बाहेरच्या कोणाला तरी त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली, तर हे रहस्य दूर होऊ शकेल. अर्थात तामिळनाडुत अशी स्थिती प्रथमच आलेली नाही. आज ज्या शंका इतरेजन विचारत आहेत, तशा शंका खुद्द जयललितांनाही तीस वर्षापुर्वी विचारण्याची पाळी, अशाच रहस्यामुळे आलेली होती. अम्मा उर्फ़ जयललिता राजकारणात एमजीआर यांचे बोट धरून आल्या. मुख्यमंत्री असताना तेव्हाच्या सुपरस्टार एमजीआर यांनी आपल्या या पडद्यावरील नायिकेला वारस म्हणून राजकारणात आणले होते. पक्षाच्या प्रचारप्रमुख म्हणून जयललिता अण्णाद्रमुक पक्षात दाखल झाल्या. त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व देण्यात आले. रीतसर मिरवणूक काढून या नायिकेला पक्ष कार्यालयात आणले गेले होते. अर्थात ही आपली राजकीय वारस असल्याची ती घोषणाच होती. पण त्यानंतर अल्पावधीतच एमजीआर यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना इस्पितळात उपचारार्थ दाखल करावे लागले होते. आजाराचे गांभिर्य किती, त्याची कोणाला कल्पना नव्हती. पण तेव्हाही त्यांच्या निकटवर्तिय मानल्या जाणार्‍या टोळक्याने इस्पितळात अन्य कोणाला घुसू दिलेले नव्हते. एमजीआर यांची पत्नी जानकी यांचाही मुक्काम पतीच्या रुग्णशय्येपाशी होता. बाहेर फ़ारशी खबर येत नव्हती आणि ते कोमात गेल्याचे म्हटले जात होते. त्यांना भेटण्याचा आटापिटा जयललितांनी केला होता. पण त्यांना जवळपास फ़िरकू दिले गेले नाही आणि धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे जीवाला धोका असल्याची तक्रार जयललितांनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याकडेही केलेली होती. पण कोणी त्यांना दाद दिली नाही आणि अखेरीस एमजीआर यांचा अवतार आटोपला. तर त्यांच्या अंत्ययात्रेत पार्थिव देहाच्याही जवळ अम्मा जाऊ शकल्या नव्हत्या. त्यांना धक्के मारून पिटाळले गेले होते.

आज तीस वर्षानंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ घातली आहे. कारण अम्माचे चहाते भक्त देवाकडे आराधना करीत आहेत आणि राज्याचा कारभार करण्यासाठी वा पक्षाची धुरा संभाळण्यासाठी अम्मांनी कोणाला वारसही नेमलेले नाही. आता योगायोग बघा. शशिकला नावाची अम्मांची एक जुनी मैत्रिण आहे. तिच्या मुलाला दत्तक घेतल्याप्रमाणे अम्मांनी त्याचे आजवर लाड केले. या शशिकला त्यांच्या सोबत नेहमी दिसत राहिल्या होत्या. जणू शशिकलाचा सुपुत्र हाच अम्मांचा भावी वारस आहे, अशीच काही वर्षापुर्वी लोकांची समजूत होती. कारण या मुलाच्या लग्नासाठी अम्मांनी कोट्यवधी रुपये खर्चून मोठा भव्यदिव्य समारंभ योजला होता. पण चारपाच वर्षापुर्वी काहीतरी बिनसले आणि एका रात्री अकस्मात अम्मांनी या शशिकला व त्यांच्या कुटुंबियांना घरातून हाकलून दिलेले होते. त्यांना पक्षातील सर्व पदांवरूनही काढून टाकल्याची घोषणा केलेली होती. पण नंतर काहीतरी समझोता झाला आणि बाकी कुटुंबाला दूर ठेवून अम्मांनी शशिकला यांना पुन्हा जवळ घेतले होते. म्हणून आज शशिकला अण्णाद्रमुकच्या राज्यसभेतील खासदार आहेत. पण त्या पक्षात नाहीत. काही महिन्यांपुर्वीच त्यांची पुन्हा पक्षातून हाकालपट्टी झाली आणि आपल्या जीवाला तामिळनाडूत धोका असल्याची तक्रार त्यांनी केंद्राकडे केलेली होती. सध्या अम्माच्या प्रकृतीविषयी जे रहस्य गडद झाले आहे, त्याविषयी शशिकला यांनी नवीच मागणी पुढे केली आहे. त्यांनी केंद्राला याबाबत सीबीआयची चौकशी करण्याचा आग्रह धरला आहे. याला जास्त महत्व आहे. कारण शशिकला अम्माच्या गोतावळ्यापैकी एक असून, सध्या बाहेर फ़ेकल्या गेलेल्या आहेत. पण म्हणूनच आत दरबारी पद्धतीने कोणते डाव खेळले जातात, याची त्यांनाच पुर्ण कल्पना आहे. त्यांनाही अम्माच्या प्रकृतीविषयी लपवाछपवीची शंका असेल, तर ती दुर्लक्षित करता येत नाही.

लोकशाही किती खालच्या पातळीवर आली आहे, त्याचा हा नमूना आहे. एका मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री इस्पितळात उपचारासाठी रुग्णशय्येवर पडला आहे आणि सामान्य जनतेलाच त्याविषयी अंधारात ठेवले जात आहे. त्याविषयी माहिती देण्याची कोणाची तयारी नाही. कोणीतरी त्यासाठी कोर्टातही धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. राज्यपालही इस्पितळात जाऊन आले आणि त्यांनी कसली खातरजमा करून घेतली, हे कळायला वाव नाही. एकूणच या लोकशाही देशात काय घडते आहे, त्याचा थांगपत्ता कोणाला नाही. सर्जिकल स्ट्राईकचा तपशील व पुरावे मागितले जात आहेत. पण इस्पितळात उपचार घेणार्‍या एका मुख्यमंत्र्याच्या प्रकृतीविषयी चर्चाही करण्याची राजकीय म्होरक्यांना गरज वाटलेली नाही. जयललिता यांची प्रकृती गंभीर असेल, तर पक्षातच राजकीय हाणामारीला आरंभ होईल, अशी त्यामागची भिती असेल काय? कारण अम्मांनी कधी कोणाला आपला वारस म्हणून नेमलेले नाही, की कुणाला दुय्यम नेतृत्वाची जबाबदारी दिलेली नाही. म्हणूनच हा रहस्याचा गुंता वाढत चालला आहे. दोन आठवडे उलटून गेल्यावर मुख्यमंत्री कोणाला बघता आलेला नाही, की कारभार कोण हाकतो, त्याचा पत्ता नाही. मग अशा स्थितीत घटनात्मक यंत्रणेने काय करावे? कोणी याचे मार्गदर्शन करीत नाही. विविध पक्ष व त्यांचे नेतेही आपापल्या राजकीय सोयीनुसार त्याविषयी आपल्या प्रतिक्रीया देत आहेत. लोकशाहीची यापेक्षा मोठी शोकांतिका नसेल. मुळात सोपा सरळ प्रश्न इतकाच, की प्रकृती चांगली वा गंभीर कशीही असो, त्यात लपवावे असे काय आहे? राजकारण सोडल्यास काय असू शकेल? व्यक्तीकेंद्री पक्षांची यापेक्षा दुसरी कुठली शोकांतिका असू शकते? पण दुर्दैवाने तीच भारतीय लोकशाहीचीही शोकांतिकाच ठरणार आहे. सगळा द्राविडी प्राणायामच ना?

============================

रणधीर पटवर्धन प्रोजेक्ट कन्सलटंट तांत्रिक चुक आहे लेखात, राज्यसभेच्या खासदार व जयललिता यांची पुर्वीची जवळची मैत्रिण या दोन स्वतंत्र व्यक्ति आहे, त्या दोघींचेही नाव शशिकला आहे त्यामुळे गोंधळ झाला असावा

you are right  चुक दाखवल्याबद्दल आभार
भाऊ तोरसेकर   

6 comments:

  1. आत्यंतिक व्यक्तीस्तोमामुळे ही अशी अवस्था आहे त्यामुळे तामिळनाडू मध्ये कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचे सरकार येऊ शकत नाही

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    मोदीजीके मनमे तो लड्डू फुटते होंगे अब! जयललितांचं अस्तित्व आपसूक दूर होत असेल तर मोदी निश्चितंच फिल्डिंग लावून बसले असणार. राज्यसभेत उगीच गडबड नको व्हायला.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर,आपण कोठे गायब आहात ? खुप दिवसांत दर्शन नाही.

      Delete
  3. Mala dat shanka ahe tichya jivant asnyabaddal. Barganing, adjustments chalu ahetsa vatta. Bai kadhich geleli ahe.

    ReplyDelete
  4. जयललिता केव्हाच गेली आहे , स्विस बँकेच्या खाते ट्रान्सफर झाले की घोषणा होईल

    ReplyDelete