Sunday, October 2, 2016

कसं बोललात मेधाताई?

medha patkar kejriwal के लिए चित्र परिणाम

गांधीजयंतीच्या निमीत्ताने अनेक गांधीवाद्यांना नव्याने गांधी आठवला आहे. अर्थात त्यांचा गांधी त्यांना सोयीस्कर प्रसंगी आठवतो. अन्यथा त्यांचा गांधी नथूराम गोडसेपासून सुरू होतो आणि नथूरामपर्यंत येऊन संपतो. नथूरामच्या कथानकापलिकडला गांधी आजकालच्या गांधीवाद्यांना अजिबात ठाऊक नसतो. तसे नसते तर अन्य प्रसंगीही त्यांना गांधी आठवला असता. आताही बघा, पाकिस्तानला भारताने धडा शिकवला, तेव्हा नर्मदाताई उर्फ़ मेधाताई पाटकरांना अकस्मात गांधी आठवला आहे. सुडबुद्धीने हिंसात्मक मार्गाने बदला घेण्याने काय साधणार, अशी उपरती मेधाताईंना झाली आहे. या उप‘रती’चा पाकिस्तानचा उप‘मर्द’ होण्याशी किती संबंध आहे, हे त्यांचा तोतया महात्माच जाणो. पण दिर्घकाळ मौनात गेलेल्या मेधाताई बोलू लागल्या, म्हणून त्यांचे अभिनंदन करणे भाग आहे. पोतडीतून त्यांनी गांधी बाहेर काढलाच आहे, तर भारतीयांना ठाऊक असलेला व मेधाताई विसरून गेलेला गांधीही, त्यांना नव्याने सांगणे भाग होऊन जाते. अहिंसा, सत्याग्रह किंवा नथूराम इतका गांधी छोटा वा किरकोळ नाही. त्या महात्म्याने अनेक गोष्टी करून व सांगून ठेवल्यात. त्यातला एक भाग स्वदेशी-परदेशी नावाचा आहे. या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीबाबाने जगावर राज्य करणार्‍या श्रीमंत सत्तेला आव्हान दिले होते आणि त्यासाठी स्वदेशीची कास धरली होती. परदेशी उद्योग व्यापाराला आव्हान देण्यासाठी भारतीय कुटीरोद्योग उभे करण्याला चालना देऊन ब्रिटीश सत्ता गदगदा हलवली होती. आज त्याच्याच नावाचे भांडवल करणार्‍या मेधाताईंना आपले आंदोलन स्वदेशी पैशावर चालवण्याइतकी तरी शक्ती शिल्लक राहिली आहे काय? स्वदेशी आंदोलन सुरू करणार्‍याचा नामजप करताना आंदोलनासाठीच वाडगा घेऊन परदेशी फ़िरताना मेधाताई कुठल्या सत्याचा आग्रह धरत असतात? गांधी इतका सोयीचा विषय असतो काय?

गांधी म्हणजे अहिंसा असा भंपक प्रचार करणार्‍या मेधाताईंसारख्यांनीच गांधी या नावाविषयी लोकांमध्ये संभ्रम तयार केला आणि त्याविषयी जनसामान्यांमध्ये घृणा निर्माण केली. कारण यांना गांधी उमजला नाही, की त्याने कथन केलेली अहिंसेची व्याप्ती कधी समजली नाही. गांधींनी अहिंसेची केलेली व्याख्या नामर्दाची नाही किंवा नव्हती. दुबळ्याने आपल्या दुबळेपणाला झाकण्यासाठी घेतलेले वस्त्र, अशी गांधींच्य़ अहिंसा नाही. ज्याच्यापाशी कितीही हिंसा करण्याची शक्ती व कुवत आहे. पण  तरीही त्याने मनावर संयम राखून हिंसेच्या मार्गाने जाण्याचा मोह टाळण्याला गांधींनी अहिंसा म्हटलेले आहे. जी व्याख्या इंदिराजींना नेमकी उमजलेली होती. म्हणूनच त्यांनी मर्दुमकी गाजवून पाकिस्तानला धडा शिकवला आणि विनाविलंब सिमला करार करून अहिंसेचा मार्ग पाकिस्तानला शिकवला होता. तेव्हा इंदिराजींनी युद्धविराम केला नसता, तर उरलेला पश्चीम पाकिस्तान आज शिल्लक दिसला नसता. हिंसेनेच पाकला धडा शिकवायचा असता, तर बांगलामुक्तीचे युद्ध पाकिस्तानला संपवूनच आटोपता आले असते. कारण प्रतिकार करण्याइतकेही बळ पाकिस्तानच्या अंगी तेव्हा राहिले नव्हते. पण बांगला मुक्ती होताच, इंदिराजींनी एकतर्फ़ी युद्धविराम घोषित केला आणि पाकलाही त्याच पद्धतीने शस्त्र ठेवायला भाग पाडले. तेव्हा त्या भागातले भारताचे सेनापती जनरल कॅन्डेथ चिडलेले होते. कारण त्यांना पाकिस्तान पुरता नेस्तनाबुत करायचा होता. तर इंदिराजींनी त्यांना सक्तीने निवृत्त केले, पण युद्धविराम केला होता. याला गांधीजींची अहिंसा म्हणतात. हिंसेची परमावधी करण्याची क्षमता सिद्ध केली आणि मग सहानुभूतीचेही अप्रतीम प्रदर्शन घडवले. आजच्या मोदी सरकारनेही तेच केले आहे. पण त्यातला संयम, अहिंसा व हिंसा करण्याची क्षमता, हे बघण्याची दृष्टी व बुद्धी तर हवी ना?

उरीच्या घटनेनंतरच नव्हेतर पठणकोट, मुंबई वा अनेक घटनांनंतर तोच मार्ग पत्करायला हवा होता. तर पाकिस्तान पुढल्या हिंसक घटना घडवू शकला नसता. मोदीच कशाला, त्यांच्या आधीचे अनेक पंतप्रधान तसा निर्णय घेऊ शकले असते आणि हजारो निरपराधांना पाकच्या जिहादी हिंसेपासून वाचवू शकले असते. आताही उरीनंतर मोदी सरकारने आपल्या हिंसक क्षमतेची साक्ष दिली आहे. पण लगेच हिंसेचा मार्ग आपला नाही, याचीही जगाला ग्वाही दिलेली आहे. पाक हद्दीत बसून हिंसक उचापती करणार्‍यांन धडा शिकवणे इतकाच आपला हेतू आहे आणि पाकिस्तानशी युद्धाची वा लढायची आपल्याला खुमखुमी नाही, असे खुद्द लेफ़्टनंट जनरल रणबीर सिंग यांनीच आपल्या पत्रकार परिषदेत पहिल्या दिवशी सांगून टाकले आहे. मेधाताईना त्यापैकी काही कळते काय? मोदी असोत की रणबीरसिंग नावाचे सेनाधिकारी असोत, त्यांनी गांधीवादाचीच कास धरली आहे. पण ते लक्षात येण्यासाठी गांधी समजला पाहिजे. नुसता गांधीच्या नावाचा धंदा करणार्‍या दांभिक भिक्षुकांना ते कसे उमजावे? त्यांच्यासाठी गांधी हा विचार नसून धंद्यातले भांडवल आहे. म्हणून मग अहिंसेचा मार्ग गांधींनी दाखवल्याची भंपक प्रवचने दिली जातात. त्यातले अडचणीचे शब्द वाक्ये लपवली जातात. यापेक्षा मेधाताईंकडून कसली अपेक्षा करणार? कारण मुडद्यांवर व्यापार करणार्‍यांचा धंदाच अहिंसेच्या मुखवट्याने चालवला जात असतो ना? गांधी नावाच्या महात्म्याची आणखी एक गोष्ट आहे, ती प्रायश्चित्ताची! मेधाताई वा त्यांच्यासारख्या गांधीवाद्यांनी ती गोष्ट कधी ऐकली आहे काय? आपल्या लढे वा सत्याग्रह आंदोलनात कोणाकडूनही चुक झाली, तर सहकारी वा अनुयायांच्या पापाचे प्रायश्चीत्त घेण्यासाठी हा महात्मा जगप्रसिद्ध होता. त्याचे कुठले अनुकरण या मेधाताईंनी केले आहे काय? नक्षलवाद्यांच्या हिंसेला पाठीशी घालत मुक्ताफ़ळे उधळणार्‍या अशा लोकांना, गांधी तेव्हा कसा आठवत नाही?

अडीच वर्षापुर्वी आपले व्रतस्थ नाटक सोडून मेधाताई आम आदमी पक्षातर्फ़े मुंबईतून लोकसभेच्या निवडणूकीत उतरल्या होत्या. केजरीवालही दिल्लीहून आपला लवाजमा घेऊन इथे त्यांच्या प्रचाराला आलेले होते. आपण कधीकाळी केजरीवाल व त्यांच्या गोतावळ्यात सहभागी होतो, हे आज मेधाताईंना स्मरते काय? आज तेच केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या निकटवर्तियांवर कित्येक भयंकर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी दोन अतिशय जवळच्या म्हणजे मंत्र्यांना़च केजरीवाल यांनी बडतर्फ़ केले आहे. त्यातल्या एकावर महिलांचे शोषण व दुसर्‍यावर खंडणीखोरीचा आरोप आहे. त्याला बाकीचे सोडा, केजरीवाल यांनीच कृतीने दुजोरा दिलेला आहे. कधीकाळी आपण त्याच आम आदमी पक्षात होतो व त्यांच्याच इर्दगिर्द वावरलो, याची थोडी लाजलज्जा मेधाताईंना कधी वाटली आहे काय? मागल्या तीन महिन्यात मेधाताईंच्या या सहकार्‍यांच्या अब्रुचे जाहिर धिंडवडे निघाले आहेत. तेव्हा मेधाताईंनी एकदा तरी तोंड उघडले होते काय? तेव्हा त्यांना मौनी गांधी आठवतो. आपल्याच सवंगड्यांच्या पापकर्माकडे उघड्या डोळ्य़ांनी बघून गप्प बसण्यासाठी महात्मा गांधींनी मौनाचे व्रत धारण केल्याचे कोणी ऐकले आहे काय? पण मेधाताई मात्र असेच सोयीने मौन धारण करतात आणि त्याच पापावर पांघरूण पडले, मग त्यांना अकस्मात गांधी नावाचा महात्मा आठवतो. इतरांना गांधी शिकवण्यापेक्षा मेधाताईंनी आधी स्वत:च गांधी वाचावा, समजून घ्यावा, अभ्यासावा. मासळी बाजारात मोठा मासा जसा तुकड्यावर विकला जातो, तसा गांधी नावाचा विचार बाजारात विकायला दुकान मांडू नये. आधी दिल्लीच्या मंत्र्यांच्या पापाचे प्रायश्चित्त घेण्याइतके सौजन्य दाखवा, मगच गांधीबाबाचे नाव घ्या. मुन्नाभाईचा गांधी आणि सामान्य भारतीयांचा गांधी यात जमिन अस्मानाचा फ़रक आहे मेधाताई!

4 comments:

  1. छान सुंदर भाऊ

    ReplyDelete
  2. या बेअक्कल बाईला गांधी कळला नाही हेच खरं आहे.
    १९४७ ला पाक आक्रमकांविरोधात सैन्य कारवाईला गांधींचा विरोध नव्हता. तेंव्हाही गांधींना अहिंसा आठवली नव्हती.
    पाकिस्तानचे पाणी अडवायलाही या बाईचा विरोध आहे. त्याच पाण्यावर आपण गोली ७० वर्षे जिहादी अतिरेकी पोसत आहोत. आणखी किती काळ हा तमाशा चालवायचा असा साधा प्रश्ण या बाईला पडत नाही.
    भारताने पाकच्या अतिरेकी छावण्यांवर हल्ला केलाय, नागरी वस्त्यांवर नव्हे, ही साधी गोष्ट मेधाच्या लक्षात रहात नाही.
    पाकला अहिंसा शिकवायला हिला पाठवलं पाहिजे. तिथले जिहादी त्यांच्या पद्धतीने स्वागत करतील.
    अल्ला तिच्या आत्म्याला लवकरच शांति देवो.

    ReplyDelete
  3. भाऊ खूपच सडेतोड लेख आहे हा..

    ReplyDelete