Friday, October 28, 2016

शिकारी खुद यहॉ, शिकार हो गया

anurag kashyap ADHM के लिए चित्र परिणाम

सहानुभूती हे सर्वात प्रभावी हत्यार असते. सहसा भोंदू माणसे त्याचा हत्याराप्रमाणे वापर करीत असतात. आपण अहिंसक आहोत किंवा आपण संयमी आहोत असे नाटक रंगवणारे लोक मोठ्या चतुराईने आपल्या भोवती सहानुभूतीचे कवच उभे करतात. मग सहजगत्या त्याचाच हत्याराप्रमाणे वापर करू लागतात. याचे ताजे उदाहरण म्हणून आपण पाकप्रेमी कलाकारांकडे बघू शकतो. आधी त्यांनी कलेला सीमा नसल्याचे दावे करून भारतीय जनभावनेला पायदळी तुडवण्याचा खेळ केला. जेव्हा प्रक्षुब्ध प्रतिक्रीया उमटू लागली, तेव्हा कलाकार हे सर्वात सॉफ़्ट टार्गेट म्हणजे सोपी शिकार असल्याचे नवे नाटक सुरू केले. आम्ही दुबळे आहोत म्हणून आम्हालाच लक्ष्य केले जाते, असा त्याचा अर्थ होतो. पण खरेच हे लोक इतके दुबळे किंवा सोपी शिकार असतात काय? ज्यांना सहजगत्या देशाचा गृहमंत्री तात्काळ भेट देतो आणि त्यांच्या समस्येत राज्याचा मुख्यमंत्री विनाविलंब हस्तक्षेप करायला सवड काढतो, त्यांना दुबळे म्हणायचे? मग समर्थ कोण आहेत, या देशात? सामान्य माणसे ज्यांचा देशाभिमान जाज्वल्य असतो, त्यांना सबळ वा मस्तवाल म्हणायचे काय? शब्दांचा कसा गोलमाल चालतो बघा. सामान्य माणसाच्या जीवनाला सतावत असलेली कुठलीही भीषण समस्या सोडवायला देशाचा गृहमंत्री वा मुख्यमंत्री इतक्या तत्परतेने पुढे येणार नाही. पण कलाकारांच्या हाकेला तात्काळ प्रतिसाद मिळतो, कारण तेच खरे सबळ दांडगे आहेत. त्यांची शिकार सोपी नाही तर सर्वात अवघड गोष्ट आहे. सामान्य माणसाची शिकार सर्वात सोपी असते. सामान्य माणूसच कशाला, या देशात सर्वात सोपी शिकार वा दुबळे लक्ष्य राजकारणी असतात. जितका मोठ्या पदावरचा राजकारणी, तितकी सोपी शिकार ही आजही वस्तुस्थिती आहे आणि त्यातले मस्तवाल शिकारी, हे़च तथाकथित कलाक्षेत्रातले म्होरके असतात.

आठदहा दिवसांपुर्वी अनुराग कश्यप नावाच्या निर्माता दिग्दर्शकाने काय मुक्ताफ़ळे उधळली होती? पाकिस्तानी कलाकारांना संधी दिली म्हणून करण जोहर दोषी असेल, तर लाहोरला गेल्याबद्दल मोदींनी अजून माफ़ी मागितली आहे काय? चित्रपट कलाकारांना लक्ष्य केले जाते, कारण आम्ही सर्वात दुबळी शिकार आहोत, असेच कश्यप म्हणाला होता ना? ह्या माणसाने कुठलेही कारण नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दोषारोप केले, तेव्हा मोदी नावाचा पंतप्रधान दांडगा असतो काय? असता, तर अशा कोणा ऐर्‍यागैर्‍याला सहजगत्या पंतप्रधानावर शिंतोडे उडवता आले असते काय? कश्यपच कशाला? दोन महिन्यापुर्वी कॉमेडी नाईट्सवाला कपिल शर्मा याने महापालिका अधिकार्‍यावर राग काढताना, थेट पंतप्रधानांना धारेवर धरले होते. कुठे आहेत अच्छ दिन? आम्हाला तर महापालिकेला लाच द्यावी लागते, असे बोल कुणाचे होते? मोदी वा देशाचा पंतप्रधान महापालिकेचा कारभार हाकतो काय? पुढे प्रकरण चिघळले तर कपिल शर्मानेच बेकायदा बांधकाम करून पर्यावरणाचेही नुकसान केले असल्याचे उघडकीस आले. पण आरंभी कोणी सहजगत्या पंतप्रधानांवर ताशेरे झाडले होते? कोणीही कुठलेही निमीत्त शोधतो आणि पंतप्रधानांवर शरसंधान करतो. दिल्ली नजिकच्या दादरी या उत्तरप्रदेशच्या गावात अखलाख महंमद नावाच्या व्यक्तीची जमावाने हत्या केली. कोणावर दोषारोप सुरू झाले होते? उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे सरकार आहे. तरी थेट नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात असहिष्णुता बोकाळली असल्याचा आरडाओरडा कोणी सुरू केला होता? ह्याच तथाकथित कलाकारांनी ना? कुठलाही पुरावा किंवा साक्ष काढल्याशिवाय देशाच्या पंतप्रधानाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे दुबळे असतात? आणि अशा कांगावखोरांच्या आरोपाचे फ़टके बिनतक्रार सहन करणारा मात्र दांडगा असतो, अशी एक नवी भाषा देशात सध्या वापरात आलेली आहे.

नरेंद्र मोदीच कशाला? कुठलाही राजकारणी नेता वा पक्ष घ्या. त्याच्यावर कोणीही उठून कसलेली बेताल आरोप करीत असतो. राहुल गांधी, राज ठाकरे, अमित शहा, शिवराजसिंग चौहान, सोनिया गांधी असे कोणीही घ्या. त्यांच्यावर सनसनाटी आरोप सातत्याने होत असतात. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे वा कलबुर्गी यांच्या हत्या झाल्या. त्यातही संघावर किंवा कुणा हिंदूत्ववादी संघटनेवर बिनपुराव्याचे आरोप करताना कोण पुढे होते? यापैकीच अनेकांनी असहिष्णुता आल्याचा आरोप करीत नाटक रंगवलेले नव्हते काय? नेहरू विद्यापीठात पोलिसी कारवाई झाल्यावर पहिले लक्ष्य कोण झाले होते? राजकारणी होते आणि त्यातले शरसंधान करणारे शिकारी कोण होते? तथाकथित कलाकारच होते ना? आज करण जोहर सोबत नाचणारे महेश भट वा तत्सम लोक गुजरात दंगलीपासून कोणाची सोपी शिकार करत होते? ह्याला कांगावा म्हणतात. कारण हेच शिकारी आहेत आणि सतत दुबळ्या लोकांना शोधून त्यांची मिळेल तिथे शिकार करत असतात. त्यातले सर्वात दुबळे लक्ष्य राजकीय नेते आणि पक्ष झालेले आहेत. कोणीही उठावे आणि नेत्यांची राजकारण्यांची शिकार करावी; अशी आजची स्थिती आहे. उरीच्या हल्ल्यानंतर राज ठाकरे किंवा मनसे यांनी पाकिस्तानी कलाकारांना निघून जाण्याचा इशारा दिला, तर त्यांच्यावर गुंडागर्दीचा आरोप करणारे शिकार असतात की शिकारी असतात? मनसेने चारदोन दगड फ़ेकले तर गुंडागर्दी असते आणि नेहरू विद्यापीठात धिंगाणा चालतो, त्याला काय म्हणतात? ते अविष्कार स्वातंत्र्य असते. देशाचे तुकडे करण्याची भाषा स्वातंत्र्याचा अविष्कार असतो आणि देशप्रेमापोटी शत्रूदेशाच्या नागरिकांना इशारा दिला, मग गुंडागर्दी होते. मनसेची असते ती हुल्लडबाजी आणि डाव्यांच्या पोरांनी हुल्लडबाजी केली तर ती निदर्शने असतात. कोण शिकार आणि कोण शिकारी आहे?

नेहरू विद्यापीठात कुलगुरूला कित्येक तास कोंडून ठेवणारे विद्यार्थी व त्यांची संघटना क्रांतिकारक असते आणि तसेच काही राज ठाकरेंच्या मनसेने केल्यास त्यावर पोलिसांचे दंडूके चालवायची मागणी होणार. पण तेच पोलिस मग कुलगुरूला सोडवायला नेहरू विद्यापीठाच्या आवारात कशाला शिरत नाहीत? तिथे तमाम दुबळ्यांची वस्ती आहे. चुकून पोलिसांनी कायदा वापरला, तर कुणा दुबळ्याची शिकार होऊन जाईल ना? याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. एकूणच बुद्धीवाद वा कलाकारी म्हणजे एक भोंदूगिरी होऊन बसली आहे. सलमानखान याच्यावर गाडी बेफ़ाम चालवून माणसे मारल्याचा आरोप झाला, तेव्हा किती हरिचे लाल कलाकार त्याच्याविरुद्ध सत्य बोलायला उभे राहिले होते? त्याने कुणा फ़ुटपाथवासीचा बळी घेतला, तो दांडगा कोणी शिकारी होता आणि सलमान दुबळी शिकार होता काय? हे शब्द बोलणार्‍या शहाण्यांनी कधी अशा बळी पडलेल्या वा कुत्र्याच्या मौतीने मेलेल्यांच्या वेदनांचा विचार तरी केला आहे काय? तेव्हा हे तमाम कलाप्रेमी सृजनशील लोक मुग गिळुन गप्प बसणार आणि पाकिस्तानी कलाकारांचा विषय आल्यावर यांना कंठ फ़ुटत असतो. सलमानच्या गाडीखाली चिरडून मेले त्यांच्यासाठी देशाच्या गृहमंत्र्याने वा कुणा मुख्यमंत्र्याने तात्काळ हस्तक्षेप केला होता काय? कसा करणार? आपण सामान्य माणसे दुबळी शिकार असतो आणि सामान्य माणसाला व त्याच्या भावनांना पायदळी तुडवण्याचा अधिकार कलाकार शिकार्‍यांना असतो. त्या अधिकारात कोणी बाधा आणली मग हे क्रुर शिकारी टाहो फ़ोडतात. त्यांची कोणी शिकार करतो आहे. ते दुबळे आहेत आणि म्हणून त्यांची शिकार होतेय. काय जमाना आला आहे ना? कुठल्याशा चित्रपत गीताचे बोल आठवतात, ‘शिकारी खुद यहॉ शिकार हो गया!’

(२७/१०/२०१६)

2 comments: