Sunday, October 9, 2016

कॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग

g20 china modi के लिए चित्र परिणाम

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अशी ख्याती असलेले डॉ. कुमार सप्तर्षी यांनी एका लेखात पुरोगामी म्हणजे कोण त्याची व्याख्या सांगितली होती. जो पुढे बघतो किंवा भविष्याकडे बघतो आणि भूतकाळात गुंतून पडलेला नसतो, अशा व्यक्तीला पुरोगामी म्हणतात, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्याच व्याख्येत ते किंवा त्यांच्या गोतावळ्यातले कोणी बसत नसावेत. कारण त्यांना अजूनही गांधीहत्येच्या भूतकाळातून बाहेर पडता आलेले नाही. सहाजिकच आज एकविसाव्या शतकात काय घडते आहे आणि राजकारण समाजकारण कुठल्या जागी जाऊन पोहोचले आहे; त्याचा थांगपत्ता त्यांना लागू शकलेला नाही. मग त्यांना आजच्या कालखंडातील घटनांचा उहापोह करता येत नाही, की नव्या युगाच्या मोजपाट्ट्याही ठाऊक नाहीत. असे लोक ‘मोदी’ नावाच्या नव्या घटने कडे बघत असतात, तेव्हा त्यांना २००२ च्या गुजरात दंगलीच्या पुढे सरकता येत नाही, की २०१४-१६ सालात पोहोचता येत नाही. मात्र ते २००२ पर्यंत येतात, तोवर मोदी २०१४ सालात पोहोचलेले असतात आणि हे कसेबसे घामाघुम होत, २०१४ सालात पोहोचले तर मोदी २०१६-१७ मध्ये पोहोचलेले असतात. अजून अशा अनेकांना मोदी लोकसभा जिंकून पंतप्रधान झालेत, याचीच जाणिव झालेली नाही. तर २०१६ मध्ये मोदी जागतिक नेता म्हणून मान्यता पावलेत, त्याचा पत्ता कसा लागू शकेल? मोदी त्यांच्यासाठी थांबलेले नाहीत आणि आपली पुढली घोडदौड किंवा वाटचाल जोमाने करीत आहेत. म्हणूनच आता मोदींचे काय चालले आहे, किंवा त्यांचे नवे उद्दीष्ट काय आहे, ते सप्तर्षी सारख्या पुरोगाम्यांना उमजायला किमान २०१९ साल उजाडावे लागेल. ते उद्दीष्ट कॉग्रेसमुक्त भारत असे नाही. आता ती जबाबदारी राहुल गांधींनी उचलली आहे. २०१९ मध्ये कॉग्रेस पुर्णत: नामशेष झालेली असेल. मोदींचे पुढले उद्दीष्ट आहे जिहादमुक्त जग!

बहूमत मिळाल्यानंतर त्या माणसाने घाईगर्दीने आपला शपथविधी उरकून सत्ता हाती घेण्य़ाची उतावीळ दाखवली नाही. १६ मे रोजी निकाल स्पष्ट झाले आणि २६ मेपर्यंत मोदी सरकारची जुळवाजुळव करीत होते. त्यांनी आपल्या शपथविधीला सार्क देशाच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना अगत्याने आमंत्रित केले. तितक्याच अगत्याने त्या सर्वांनी मोदींना प्रतिसादही दिला. ही नव्या भारताची सुरूवात होती. पण पुरोगाम्यांना तो नुसता देखावा वाटला. दिल्लीच्या राजकारणाची तोंडओळख नसलेला मोदी परदेशी संबंधांचे काय करणार; अशी खिल्ली उडवली जात होती. पण त्या राष्ट्रप्रमुखांच्या आमंत्रणामध्ये अगत्यापेक्षा मुत्सद्देगिरी अधिक होती. त्या भव्य समारंभातून दक्षिण आशियात मोठा भाऊ भारत असल्याचे दाखवून देण्याचा तो प्रयास होता. त्यानंतर मोदी सदोदित संधी मिळेल तितक्या परदेशवार्‍या करून आले. त्यातून भारत बदलला आहे, हेच त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते. आजवर ज्या नजरेने भारताकडे बघत आलात, ती नजर बदला, हाच त्यातला संकेत होता. तो बदल जसजसा जगाला उमजत गेला, तसतसा जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. दोन वर्षे उलटल्यावर आज त्याचे परिणाम दिसत आहेत. पाकिस्तान जगासमोर एकाकी पडला आहे आणि सार्क देश एकजुटीने भारताच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण त्याचवेळी चिनला जागतिक मंचावर कोंडीत पकडण्याचे डावपेचही मोदींनी यशस्वी केले आहेत. त्यानंतरच त्यांनी पाकिस्तानी हद्दीत जाऊन लष्कराला कारवाई करण्याची मुभा दिली आणि त्याची जगासमोर वाच्यता केली. त्याचा अर्थ लावताना भले भले राजकीय विश्लेषक गोंधळून गेले आहेत. पण त्याचा साधासरळ अर्थ इतकाच आहे, की जगाला भेडसावणार्‍या जिहादची पैदास पाकिस्तानात होते आणि त्याला पायबंद घालण्यासाठी सर्वांना भारताच्या पाठीशी एकदिलाने उभे रहावे लागेल. थोडक्यात जिहादमुक्त भारत, हे मोदींचे पुढे मिशन आहे.

आजवर जगाने पाकिस्तानला अनेक दोष दिले आहेत आणि अनेक निर्बंधही लागू केले आहेत. पण पाकला अंगावर घेण्यापर्यंत कोणी मजल मारलेली नाही. अमेरिकेने ओसमाची पाकमध्ये घुसून हत्या केली. पण विषय तिथेच संपतो. आपल्या राजकीय अगतिकतेमुळे अमेरिका पाकच्या जिहादीवृत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकत नाही. तेच अनेक देशांचे दुखणे आहे. कोणीतरी त्यांच्यासाठी पाकिस्तानची नांगी ठेचावी, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. पण तो कोण, त्याचे उत्तर जगाला आजपर्यंत सापडले नव्हते. मोदींनी प्रतिहल्ल्याची कारवाई करून युद्धाला सज्ज होत, भारतच जगाची ही अपेक्षा स्वबळावर पुर्ण करू शकतो, असा विश्वास आज निर्माण केलेला आहे. म्हणून तर सार्क परिषदेवर बहिष्कार घालायला सदस्य देश पुढे सरसावले आणि पाकिस्तान तिथे एकाकी पडला. दुसरीकडे भारताने सर्जिकल हल्ला केल्यावर सर्वच्यासर्व जग भारताच्या समर्थनाला उभे राहिले. नेहमीप्रमाणे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने युद्ध नको किंवा संयम पाळा, असले आगांतुक सल्ले कोणीही दिलेले नाहीत. याचा अर्थ अशारितीने पाकिस्तानच्या मुसक्या बांधल्या जाणार असतील, तर प्रत्येक देश भारताच्या पाठीशी उभा राहिल, असे आश्वासनच त्यातून दिले गेलेले आहे. किंबहूना जगाला भेडसावणारा जिहादी दहशतवाद पाकिस्तानच आहे आणि त्याच्या मुसक्या बांधायला भारताने पुढाकार घ्यावा, असाच संकेत अवघ्या जगाने दिला आहे. आजवर पाकने कुरापत काढावी आणि अमेरिका वा अन्य कुणा बड्या शक्तीकडे भारताने पाकला इशारा देण्यासाठी मनधरणी करावी, यालाच परदेश धोरण मानले जात होते. सत्ता हाती आल्यावर मोदींनी अडीच वर्षात त्यात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. पण त्यांचे देशांतर्गत पुरोगामी विरोधक मात्र अजून कॉग्रेसमुक्त भारताच्या घोषणेत अडकून पडलेले आहेत. आजचा मोदी त्यांना बघताही आलेला नाही.

म्हणूनच भारताने पाक हद्दीत घुसून केलेली कारवाई किंवा त्यानंतरची जागतिक प्रतिक्रीया बघूनही त्याचा अर्थ अनेक जाणत्या नेत्यांना किंवा विश्लेषकांना लावता आलेला नाही. जग बदलले तरी इथले विश्लेषक अभ्यासक मात्र पाचसात वर्षे जुन्या मोजपट्ट्या घेऊन स्थितीचे आकलन करायला धडपडत आहेत. मग मोदींना कुठे विरोध करावा किंवा कसा विरोध करावा, याचीही तारांबळ उडाली आहे. मग कॉग्रेसवाले पुर्वीही अशाच प्रतिहल्ला कारवाया झाल्याचे सांगत आहेत, तर कोणी कारवाई झाल्याचे पुरावे कुठे आहेत, अशा खुळचट सवाल विचारत आहेत. पण या दरम्यान हल्ला होऊनही पाकला तोंड दाखवायला वा रडायला जागा उरलेली नाही. हे त्यातल्या कुणालाही बघता आलेले नाही. फ़ार कशाला आजवर सतत अण्वस्त्रांच्या दिल्या जाणार्‍या धमक्या कुठल्या कुठे विरघळल्या असून, साध्या लढाईच्या भितीने पाकिस्तान गर्भगळित झाला आहे. कारण आता युद्धही छेडले जाऊ शकते आणि त्यात टिकाव लागणार नाही, अशा भितीने पाकला पछाडले आहे. परिणामी पाकसेनाच नव्हेतर जिहादच्या धमक्या देणारे तथाकथित अल्लाचे बंदेही भयभीत झाले आहेत. त्यांनी कधी भारताकडून असे उत्तर दिले जाईल, अशी अपेक्षाही केलेली नव्हती. कारण सत्ता बदलली तरी मोदी संयमाने वागून दाखवत होते. पण ती निव्वळ बनवेगिरी होती. पाकला कळणार्‍या दहशतीच्या भाषेतच उत्तर देण्याची जमवाजमव सुरू होती. एकदा ती सज्जता झाली आणि मोदींनी जिहादमुक्त जग हे मिशन आता हाती घेतले. ते थांबण्याची शक्यता नाही, ही कल्पना पाकला चिंताक्रांत करते आहे. फ़क्त तितकी हिंमत जगाला दाखवून देण्य़ाची व जगाला विश्वासात घेण्याची गरज होती. त्यात दोन वर्षे खर्ची पडली. जग जुन्या जमान्यातून बाहेर आले. पण पाकिस्तानला आणि भारतातल्या पुरोगाम्यांना भूतकाळातून बाहेर येताना त्रास होतो आहे.

4 comments:

  1. बरोबर भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. भाऊ...सरकारने पेन्शन कमी केली यावर कांहीतरी लिहा

    ReplyDelete
    Replies
    1. खोटी बातमी आहे ती
      नेहमीप्रमाणे

      Delete
  3. अतिशय चपखल विश्र्लेषण. राजकारणात नुसताच गोंधळ घातला म्हणजे फुडार्यांसाठी आवश्यक पात्रता असे जे समजतात त्यांनी हे जरूर अभ्यासावे.

    ReplyDelete