Friday, October 28, 2016

कोट्यवधीच्या मल्टीप्लेक्स रहस्य

ADHM के लिए चित्र परिणाम

अलिकडे सर्वच हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या आधी बहुतेक वाहिन्यांवर त्यातील कलाकारांच्या गप्पाटप्पा दाखवल्या जात असतात. मग असे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर दोन दिवस उलटण्यापुर्वीच त्यांनी किती कोटींचा धंदा केला, त्याचे मोठमोठे डोळे दिपवणारे आकडे वाहिन्यांच्या बातम्यातून झळकवले जात असतात. दोनतीनशे कोटी रुपयांचा गल्ला गोळा करणार्‍या या चित्रपटांचे कौतुक फ़ार झाले आहे. अमिर खान, शहारुख खान किंवा सलमान खान अशा मोजक्याच अभिनेत्यांचे चित्रपट कोट्यवधीचा धंदा करतात. पण तितक्याच गतीने पडद्यावर झळकणार्‍या अक्षयकुमार वा अजय देवगण किंवा बाकी कुणा अभिनेत्यांचे चित्रपट तसे तीनचारशे कोटी रुपयांचा धंदा करताना आपल्याला ऐकायला मिळत नाही. हे काय रहस्य आहे? अशी काय मोठी किमया ठरलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या चित्रपटात वा कथानकात असते, की त्यांनी कोट्यवधीचा गल्ला जमवावा. इतरांना तशी लॉटरी कधीच लागू नये? कुछ तो गोलमाल है! हे रहस्य चित्रपट प्रेक्षकांच्या गर्दीचे आहे, की अन्य काही जादू त्यात दडलेली आहे? आताही करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटाच्या निमीत्ताने ह्याचा शोध घेतला जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण या चित्रपटाच्या प्रदर्शनाला मोठ्या पटगृहंनी नकार दिला, तेव्हा जोहर वा त्याची गॅंग गडबडलेली नव्हती. पण जेव्हा मनसेने त्याच्या चित्रपटाच्या मल्टीप्लेक्स पटगृहातल्या प्रदर्शनात गडबड करण्याचा इशारा दिला, तेव्हा ही मंडळी धाडकन कोसळली आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन संरक्षण मागितले आणि दुसर्‍याच दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे सांगतील, त्या अटीवर तडजोड केलेली आहे. तितकी शरणागती त्यांनी मोठा थिएटरमध्ये प्रदर्शनात प्रतिबंध आल्यावर पत्करलेली नव्हती. मग हे मल्टीप्लेक्स काय रहस्य आहे?

मल्टीप्लेक्स पटगृहात प्रचंड महागडी तिकीटे असतात. सामान्य पटगृहातील तिकीटाच्या अनेकपटीने महाग तिकीटे मल्टिप्लेक्समध्ये असतात. अशा मल्टीप्लेक्स पटगृहात दोन वर्षापुर्वी मराठी चित्रपट लावण्याची सक्ती सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी केली. तेव्हा मोठा कल्लोळ माजला होता. दिवसातला एकही खेळ मराठी चित्रपटाला देण्यास नाकारणार्‍या याच मल्टीप्लेक्स थिएटरात पाच-पाच खेळ अशा खर्चिक चित्रपटाचे होत असतात. तेही हाऊसफ़ुल्ल असतात. आठवड्याभरातच तिथे कोट्यवधीचा गल्ला हे चित्रपट जमा करतात असा दावा आहे. खरोखरच इतक्या महागड्या मल्टीप्लेक्समध्ये लोक इतकी गर्दी करून सलमान वा शाहरुखचे चित्रपट बघायला जातात काय? खरोखरच तिथे या चित्रपटांवर दौलतजादा करायला पैसेवाल्यांची अशी झुंबड उडत असते काय? सातत्याने तिथे हाऊसफ़ुल्ल गर्दी असते काय? कारण अनेकदा असे चित्रपट सामान्य पटगृहात गर्दी खेचत नसतात आणि त्याच चित्रपटांनी मल्टीप्लेक्समध्ये करोडो रुपये जमा केल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो. ही तफ़ावत आहे की काही गल्लत आहे? कारण चित्रपट बघायला जाणारा प्रेक्षक रोखीत पैसे मोजत असतो आणि तो पैसे मोजणारा कोण, त्याची नोंद कुठेच होत नसते. त्यामुळे थिएटर मोकळे आणि बाहेर हाऊसफ़ुल्लचा फ़लक लावून, काळा पैसा पांढरा करण्याची काही चलाखी इथे होत असावी काय? कुछ तो गोलमाल है भाई! हे तथाकथित ठराविक निर्माते व त्यांचे अभिनेते मल्टीप्लेक्सच्या प्रदर्शनाविषयी हळवे कशाला असतात? हे म्हणूनच शोधण्याची गरज आहे. कारण करण जोहर मनसेच्या मल्टीप्लेक्सच्या धमकीनंतर वठणीवर आलेला आहे. तावडे यांच्याही मराठी चित्रपट दाखवण्याच्या सक्तीवर मल्टीप्लेक्सच नाराज होते. हा काही तरी वेगळा मामला आहे. त्याचा छडा कोणीतरी लावला पाहिजे.

मल्टीप्लेक्स हा अतिश्रीमंतांसाठीचा मामला मानला जातो. तिथे खर्चिक तिकीटे असतात आणि तिथेच भरपूर गल्ला गोळा होतो, असेही भासवले जाते. खरोखर तिथे इतकी कमाई होते, की सर्व निव्वळ देखावा आहे? कारण जे चित्रपट असा गल्ला गोळा करतात, त्यात अशी कुठलीही खास कथा नसते, की काही खास कलात्मकता नसते. मग हा कुठला प्रेक्षक आहे, जो इतक्या मोठ्या संख्येने महागडी तिकीटे घेऊन यांचा गल्ला भरायला झुंबड करतो? रोजच्या रोज तिथे हाऊसफ़ुल्लचे फ़लक लागतात, ते खेळ प्रत्यक्षात किती गर्दीत होत असतात, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. कारण दिवसेदिवस या ठराविक लोकांचे चित्रपट जो गल्ला गोळा करत आहेत, ते आकडे शंकास्पद बनत चालले आहेत. काही मार्गाने रोखीतला पैसा पांढरा करून घेण्याची खेळी यातून चालते काय? त्यासाठी चित्रपटांचे माध्यम वापरले जाते काय? मग त्यातले पैसेच असे निर्माते अन्य मार्गाने आपल्या बोलवित्या धन्याचे आदेश मानून पाकिस्तानी कलाकारांना पुरवण्याचा उद्योग करतात काय? काही प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. अनेक वर्षापासून हिंदी चित्रपटातील दाऊदचे साम्राज्य लपून राहिलेले नाही. मध्यंतरी त्याचा खुप गवगवा झाला होता. अलिकडे त्याबद्दल फ़ारसे बोलले जात नाही. पण बॉलिवुड अणि माफ़ियांचे संबंध नवे नाहीत. त्यांनी काळ्यापैशाचा सफ़ेद पैसा बनवण्यासाठी हा नवा हायवे उभा केलेला नसेल ना? अन्यथा ठराविक अभिनेत्यांचेच चित्रपट कोट्यावधीचा गल्ला गोळा करण्यामागे कुठले तर्कशास्त्र सापडत नाही. सध्याच्या स्थितीत करण जोहरच्या चित्रपटाचे सामान्य पटगृहातील प्रदर्शन रोखले गेल्यावरची अलिप्तता आणि मल्टीप्लेक्सच्या इशार्‍यानंतरची धावपळ; चकीत करून सोडणारी आहे. म्हणूनच सरकारने तपासयंत्रणा कामाला लावू्न, मल्टीप्लेक्समध्ये गोळा होणार्‍या कोट्यवधी रुपयांचे रहस्य उलगडण्याची गरज आहे.

कुठला वर्ग अशा चित्रपटांसाठी गर्दी करतो? खरोखरच अशी गर्दी होते काय? त्यात आगावू तिकीटविक्री किती होते? प्रत्येक खेळाला किती लोक उपस्थित असतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याने काही थक्क करून सोडणार्‍या गोष्टी उजेडात येऊ शकतील. पाक कलाकारांचे समर्थक आणि मल्टीप्लेक्स यांच्यात काही विशेष नातेगोते आहेत काय? कारण दाऊद पाकिस्तानात दडी मारून बसला आहे आणि त्याचा जुनाच संबंध बॉलिवुडशी आहे. आता त्याने पाकिस्तानी कलाकारांना त्यातूनच भारताच्या माथी मारण्याचा काही खेळ चालविला आहे काय? अशाही प्रश्नांची उत्तरे त्यातून हाती लागू शकतील. मल्टीप्लेक्स मोठ्या शहरात, महानगरातच आहेत. बाकी पटगृहे देशभर पसरलेली आहेत, लहान शहरांमध्ये आहेत. अशा पटगृहात सिनेमा प्रदर्शित होत नसल्याची चिंता करण जोहरच्य्या गॅंगला नव्हती. यामागे मल्टिप्लेक्स हे रहस्य आहे. त्यामुळे जोहरचा चित्रपट प्रदर्शित होण्यापेक्षा अशा रहस्याचा भेद होण्याला जास्त महत्व आहे. सैराट चित्रपटानेही शंभर कोटीचा गल्ला जमवला म्हणतात. मग हेच मल्टीप्लेक्स मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी उदासिन कशाला होते? सामान्य पटगृहातून जमा होणारा गल्ला व मल्टीप्लेक्समध्ये या कोट्याधीश चित्रपटांचा जमा होणारा गल्ला; यांचे प्रमाणही शंकास्पद असू शकेल. ती शंका खरी असेल, तर हे कलाकार वा त्यांची कलाकृती, सांस्कृतिक असण्यापेक्षा संस्कृतीच्या मुखाट्यातली गुन्हेगारी असू शकते. मनसे व करण जोहर यांच्यात मध्यस्थी करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याही विषयात गंभीरपणे लक्ष घालावे. तपास यंत्रणांना थोडा मागोवा घ्यायला लावावे. त्यांचा गल्ला खरा असेल, तर बिघडत नाही. पण दाखवला जातो तितका तो खरा नसेल, तर देशावरील तेही एक संकट ठरू शकते. म्हणूनच मल्टीप्लेक्स आणि त्यात जमा होणारा गल्ला, यांचा शोध व्हायला हवा आहे.

(२४/१०/२०१६)

3 comments:

  1. शंका रास्त आहे

    ReplyDelete
  2. छान भाऊ,शोध घ्यायलाच हवा

    ReplyDelete
  3. भाऊ, आपण उपस्थित केकेला हा पैलु कोणाच्या आतापर्यंत लक्ष्यात आला असेल असे वाटत नाही.आपले विचार खरोखर लक्षणीय असतात, अभिनन्दन. सर्व यंत्रणांनी खरेच लक्ष घातले तर नक्कीच काहीतरी सत्य बाहेर येईल

    ReplyDelete