उत्तरप्रदेश विधानसभेचे निमीत्त करून देशात नव्याने कॉग्रेसचे बस्तान बसवण्याची महत्वाकांक्षा कॉग्रेसने बाळगली होती. किंबहूना त्यासाठीच नरेंद्र मोदी यांना लोकसभा जिंकून देणारा रणनितीकार, अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर याला कॉग्रेसने कोट्यवधी रुपयांची किंमत मोजून वर्षभर आधीच सेवेत दाखल करून घेतले होते. त्याने प्रचंड अभ्यास करून काही उपाय व पर्याय समोर मांडले होते. पण त्याला कोणी कॉग्रेस नेत्याने वा श्रेष्ठींनी भिक घातली नाही. राहुल वा प्रियंकाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची त्याची कल्पना खरेच वादळी ठरली असती. पण गांधी घराण्यातली व्यक्ती फ़क्त पंतप्रधान व्हायलाच जन्म घेते, अशी ठाम समजूत आहे. त्यामुळे कॉग्रेसने ती रणनिती फ़ेटाळून लावली आणि निवृत्त झालेल्या पराभूत शीला दिक्षीत यांना उत्तरप्रदेशचे नेतृत्व करायला पुढे आणले. अर्थात त्या नामधारी आणि प्रचाराचा प्रमुख चेहरा राहुल गांधी, अशी नवी रणनिती तयार झाली. त्यासाठी नव्या कल्पनाही राबवल्या गेल्या. चौपाल म्हणजे चावडीसारख्या चर्चा ही कल्पना चांगली होती. त्यासाठी मोठ्या मैदानात खाटा टाकून राहुलनी भाषणे देण्याचा खेळ सुरू झाला. पहिल्या दिवसापासून सभा संपताच लोकांनी खाटा पळवून नेण्यामुळेच ह्या सभा गाजू लागल्या. एकूण प्रकार इतका हास्यास्पद झाला, की एकदोन दिवसानंतर वाहिन्याही तसे घडलेल्या बातम्या दाखवायच्या बंद झाल्या. अशा राहुल गांधींनी आता देशाला कॉग्रेसमुक्त भारत करण्याचा निर्धार केलेला आहेच. पण पुरोगामी म्हणवणार्या पक्षांचे तेवढ्याने समाधान होताना दिसत नाही. म्हणून की काय, भारताला पुरोगामी मुक्त देश बनवण्याची जबाबदारीही अन्य पक्षांनी राहुलवर सोपवली आहे. अन्यथा सर्जिकल स्ट्राईकचे निमीत्त करून, हे बाकीचे मोदीविरोधी पक्ष राहुलच्या समर्थनाला कशासाठी धावले असते? राहुल काय करू शकतात, त्याची प्रचिती एका मतचाचणीत आताच आलेली आहे.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकीसाठी सर्वात पहिली प्रचार मोहिम राहुल यांनी सुरू केली. बाकीच्या पक्षांनी अजून त्यात हात घातलेला नाही. असे असताना कॉग्रेसची त्या राज्यातील स्थिती काय आहे? इंडियाटुडे वृत्तसमुहाने गेला महिनाभर लोकांचे मत आजमावून बघितले आणि बुधवारी त्याचे निष्कर्ष जाहिर केले. चाचणीचा काळ बघितला, तर राहुलच्या किसानयात्रेच्याच काळात हे लोकमत आजमावलेले आहे. राहुलनी इतकी रणधुमाळी माजवली असताना, त्यांच्या पक्षाला केवळ ६ टक्के मते व ८-१२ जागा मिळण्याची शक्यता या चाचणीने व्यक्त केली आहे. भाजपाला ३१ टक्के तर मायवतींच्या बसपाला २८ टक्के मते मिळत आहेत. समाजवादी पक्षाला २५ टक्के मते दिसत आहेत. मात्र या तिन्ही पक्षांनी आपली प्रचारमोहिम अजून आरंभलेली सुद्धा नाही. कुठल्याही प्रचाराशिवाय अन्य पक्षांना कॉग्रेसच्या चारपाचपट मते मिळत आहेत. उलट राहुलच्या धुवांधार प्रचाराने मागल्या वेळी कॉग्रेसला मिळालेल्या मतांमध्येही घट होताना दिसते आहे. इतके मोठे राजकीय कर्तृत्व कॉग्रेसच कशाला, देशातल्या अन्य कुठल्याही पक्षाच्या नेत्याला आजवर दाखवता आलेले नाही. मोदी विरोधातल्या बहुतांश राजकीय पक्षांनी आता राहुलचे नेतृत्व पत्करले असेल, तर त्यांचे भवितव्य काय असेल? याच किसान यात्रेच्या दरम्यान सर्जिकल स्ट्राईक झाला, त्यानंतर राहुलनी आयुष्यात प्रथमच मोदींची पाठ थोपटणारे विधान केले. अडिच वर्षात मोदींनी केलेले एकमेव चांगले काम, असे वक्तव्य राहुलनीच केलेले होते. मात्र दोन दिवस उलटले आणि अकस्मात त्यांनी त्याच पंतप्रधान मोदींना जवानांच्या रक्ताची दलाली करणारे म्हणून शिव्याशाप देण्यास आरंभ केला. तेव्हा अनेक कॉग्रेस नेतेही गडबडून गेले होते. पण नंतर तमाम पुरोगामी पक्षही राहुलच्या सुरात सुर मिसळून बोलू लागले. मग त्यांची अवस्था कॉग्रेसपेक्षा वेगळी होईल काय?
राहुल यांचे शब्द कमालीचे आक्षेपार्ह होते आणि बहुतांश जाणत्यांनी त्यावर आक्षेप घेतला. पण मोदी विरोधाने भारावून गेलेल्या पुरोगामी पक्षांना मोदींचे यश मान्य करणे म्हणजे आत्महत्या वाटते. म्हणून मग आधी ‘खुनकी दलाली’ अशी भाषा वापरणार्या कॉग्रेसने, भाजपा सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ उठवत असल्याचा नवा पवित्रा घेतला. असले शब्दाचे खेळ वा कसरत बौद्धीक क्षेत्रात चालून जातात. सामान्य जनता शब्दप्रभू नसते. म्हणूनच राहुलच्या शब्दांनी जवान व सेनादलाचे आजी माजी सैनिक घायाळ होऊन गेले. तर त्यांच्या दुखण्यावर फ़ुंकर घालण्यात शहाणपणा होता. पण तसे केल्यास पुन्हा मोदी खरे ठरण्याच्या भयापोटी बहुतांश पुरोगामी मंडळी राहुलचा बचाव करण्यात बुद्धी पणाला लावत चालली आहेत. एकप्रकारे त्यांनी आता आपले नेतृत्व राहुलच्या हाती सोपवलेले दिसते आहे. ‘राहुल गांधी आगे बढो’, अशी घोषणा देणे तेवढे बाकी आहे. सर्जिकल स्ट्राईकशी संबंधित कुठले तरी पोस्टर भाजपाच्या लोकांनी लावण्यातून हा वाद सुरू झाला. पण तो एका राज्यापुरता विषय होता. त्याचा देशव्यापी उहापोह होण्याचे कारण नव्हते. पण उतावळेपणातून मोदी विरोधकांनी तसे केले आणि त्यांचीच प्रतिमा त्यातून भरकटून गेली आहे. अशा वर्तन व वक्तव्यातून काय निष्पन्न होऊ शकते, त्याची प्रचिती तात्काळ आलेली आहे. राहुल गांधी आपली बेताल वक्तव्ये आणि वागण्यातून कॉग्रेसचा उरलासुरला पायाच खणून काढत आहेत. पुरोगाम्यांनी त्याच राहुलचे नेतृत्व स्विकारले, तर भाजपाला रानच मोकळे होऊन जाईल. पण द्वेष तिरस्काराने वेडेपिसे झालेल्या लोकांची बुद्धी काम करीत नसते. तशीच काहीशी पुरोगाम्यांची स्थिती झाली आहे. अन्यथा त्यांनी राहुलच्या बेताल विधानांचा कडक शब्दात निषेध करून, मोदींना मिळणारी सहानुभूती हिरावून घेतली असती. पण त्यांना शहाणपण कोणी शिकवायचे, राहुलने?
मागल्या लोकसभेत मोदींना मोठे यश मिळवून देण्यात सर्वाधिक मोठा हातभार राहुल गांधींनी लावला. कॉग्रेस नेत्यांच्या प्रत्येक बेताल विधान वक्तव्यांनी मोदींना मोठे प्रोत्साहन मिळत गेले. सहानुभूती मिळण्याची एकामागून एक कारणे राहुलनीच मोदींना पुरवली. म्हणून भाजपाची मते वाढत गेली आणि कॉग्रेसची अपुर्व अशी घसरण होत गेली. आधीच्या लोकसभेत पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये राहुलनी जवळपास निम्मे घसरण घडवून आणली आणि आता इंडियाटुडेचा ताजा चाचणी निष्कर्ष सांगतो, की येत्या विधानसभा निवडणूकीत राहुल देशातील मोठ्या राज्यात कॉग्रेसचा नवा निचांक प्रस्थापित करणार आहेत. अशा माणसाच्या पाठीशी ठामपणे उभे राहूल कॉग्रेस आजच्या दुर्दशेला पोहोचली आहे. मग त्याच्याच एका बेताल विधानामागे ठामपणे उभे राहुल पुरोगाम्यांचे काय होईल? सामान्य माणसाच्या तिरस्काराचे तुम्ही कारण होता, तेव्हा तुम्ही अकारण आपल्याला मिळू शकणारी मते गमावत असता. तुम्ही मतदाराला दुखावत असता. बंगालमध्ये डाव्यांची धुळधाण उडाली, त्याचे अन्य काही कारण आहे काय? नविन पटनाईक यापासून मैलोगणती दुर आहेत. मोदी विरोधात राहूनही त्यांना सत्ता व मते मिळत आहेत. त्यासाठी मोदींवर बिनबुडाचे आरोप करावे लागलेले नाहीत. ममता, जयललिता यांनाही राहुलच्या नेतृत्वाशिवाय भाजपाला पराभूत करणे शक्य झाले आहे. म्हणून तर आपल्या परीने मुलायम मायावती अशा राहुलवादी पुरोगाम्यांपासून अलिप्त रहातात. जे इतकी काळजी घेतील, त्यांना टिकून रहाता येईल. पण बाकीच्या राहुलवादी पुरोगाम्यांना भवितव्य नसेल. कॉग्रेस संपवताना राहुलच्या खात्यात अन्य काही पुरोगामी पक्षही नेस्तनाबुत केल्याचे पुण्य जमा होईल. थोडे दिवस प्रतिक्षा करू. लौकरच नेहरू विद्यापीठ आदि परिसरातून आपल्याला ‘राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है’, अशा डाव्यांच्या घोषणा ऐकाव्या लागणार आहेत.
भाऊ,मेल्यानंतर स्वर्गात पुण्यजादा असेल तर जागा मिळते असे म्हणतात हे खरे असेल तर राहुल गांधी स्वर्गात जागा मिळवणार हे नक्की या देशद्रोही लोकांना संपवतायत महान काम करतायत
ReplyDeleteहे राहुलवादी पुरोगामी मोदीचा एवढा तिरस्कार करतात कि त्याची तुलना फक्त हिटलर ने ज्युंच्या केलेल्या तिरस्काराशीच होउ शकेल ! तरी हे शहाने मोदीलाच हिटलर म्हणतात . गालिब जिंदगीभर यही भुल करता रहा , धुल चेहरेपर थी और आईना साफ करता रहा !
ReplyDeleteहिटलर सच्चा देशभक्त होता ही तुलना अौरंगजेब हिन्दू होऊ शकते
Deleteत्यांना औरंगजेब म्हणून घ्यायला आवडेल , त्यांना तेच हवे आहे , त्यामुळेच हे लोक सतत पाकिस्तान ची बाजु घेतात . ट्रुंपने नुकतीच हिंदू ची स्तुती केली बघुयात यांचे पोट किती दुखते ते !
Deleteमाझ्याकडून अडकित्ता भेट
Deleteस्वातंत्र्य पूर्व काळात काँग्रेस ही एक चळवळ होती आणि त्यात सर्व तत्कालीन नेते सहभागी झाले होते मात्र स्वातंत्र्या नंतर त्याचे धूर्त पणे एका राजकीय पक्षात रूपांतर करण्यात आले आणि स्वातंत्र्या प्राप्तीचे श्रेय केवळ एका घराण्याला देण्यात आले आणि तत्कालीन खऱ्या स्वातंत्र्य योद्ध्यांचे योगदान नाकारण्यात आले. या लबाडीवर गेली पासष्ठ वर्षे या घराण्याने देशाची सत्ता उपभोगली मात्र आता या घराणेशाहीचे वारसदार आता कमालीचे अकर्तृत्वानं असल्याने आणि हे घराणे म्हणजेच काँग्रेस असे समीकरण असल्याने आता देशाची काँग्रेस मुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे
ReplyDeleteभाऊ तुमच्या "अमित शहा नावाचे रहस्य" या लेखाची आठवण या निमित्ताने झाली. उ.प्र. मधील चकित कारण-या लोकसभा निकालाबाबत आपण भाष्य केले होते. अर्थात नंतर शहा यांच्या अन्यत्र कार्यपद्धतीवर आपण टीकाहि केली आहे हा भाग अलाहिदा. पण त्याच जुन्या लेखात उ.प्र. लोकसभेसाठी ग्राउंडलेव्हल जे काम झाले होते त्याचा आपण लेखा जोखा मांडला होतात. सध्या या बद्दल तिथे काय घडामोडी जमिनी पातळीवर सुरु आहेत याचा वेध घेणेदेखील रंजक ठरेल.
ReplyDelete