Saturday, October 29, 2016

हा खेळ सावल्यांचा

espionage के लिए चित्र परिणाम

काही दिवसांपुर्वी भारतातील पाक वकिलातीमध्ये काम करत असलेल्या एक अधिकार्‍याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. तेव्हा पहिले स्मरण झाले ते माजी पाक अध्यक्ष लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ़ यांचे! वाजपेयींच्या कारकिर्दीत त्यांनी पंतप्रधान नवाज शरीफ़ यांना पदच्युत करून पाकिस्तानची सत्ता हाती घेतली होती. तिथे लष्करी राजवट लावली होती. मग आग्रा येथील शिखर परिषदेसाठी मुशर्रफ़ आले असताना, इंग्रजीतला उथळ पत्रकार राजदीप सरदेसाई याने त्यांची खास मुलाखत घेतली होती. त्यात हेरगिरीचा विषय आला होता. एका राष्ट्राध्यक्षाला विचारू नये असा वरकरणी आक्रमक वाटणारा प्रश्न राजदीपने विचारला होता. तर त्याला गप्प करताना मुशर्रफ़ यांनी त्याचे अज्ञान उघडे पाडले होते. राजदीपने पाक हेरखाते आयएसआयचा विषय काढला. तर मुशर्रफ़ म्हणाले, अशा विषयात बोलायचे नसते. भारतातल्या दूतावासामध्ये पाक अधिकारी जे काम करतात, तेच जगातल्या कुठल्याही देशातील दुतावासामध्ये भारतीय अधिकारीही करीत असतात. त्यामुळे याबद्दल जाहिरपणे बोलण्यात अर्थ नसतो. परक्या देशात दुतावास फ़क्त मैत्रीसाठी नसतो, तर तिथे आपल्या देशाचे हितसंबंध जपण्याच्या कारवाया करण्यासाठीच असे दुतावास स्थापलेले असतात. तिथे बहुतांश गुप्तचरांचाच वावर असतो. दिडदोन कोटी लोकसंख्येच्या अफ़गाणिस्तानात भारताला सात आठ वकिलाती कशाला हव्यात? तिथे असे कोणते राजनैतिक काम भारतीय अधिकारी करीत असतात? तर तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय हेरांचा वावर आहे आणि ते पाकविरोधी कारवायाच करीत असतात. असेच मुशर्रफ़ यांना म्हणायचे होते. ही बाब लक्षात घेतली तर नवीदिल्लीतील दूतावासामध्ये पाक हेर काय करीत होता, असा प्रश्न आपल्याला पडणार नाही. भारतविरोधी कारवाया हेच त्याचे काम असते आणि त्यासाठी भारतातले फ़ितूर गोळा करणे, ह्यासाठीच तो धडपडत असणार ना?

अर्थात यासाठीच मग भारतीय हेरखात्यालाही जागरुक रहावे लागत असते. इथे अनेक देशांचे मुत्सद्दी काम करत असतात. त्यांना राजनैतिक सवलत मिळालेली असते. इथले कायदे त्यांना खटल्यात ओढू शकत नाहीत. म्हणूनच त्याचा आडोसा घेऊन अशी मंडळी त्यांच्या देशाला लाभदायक ठरू शकतील वा त्यांच्या मित्रदेशाला फ़ायद्याचे ठरतील; अशा कारवाया करण्यात मग्न असतात. महमुद अख्तर नावाचा जो हेर दिल्लीत पकडला गेला, तो हेच काम करत असणार, यात शंकाच नाही. किंबहूना त्यासाठीच तर त्याची नेमणूक झालेली होती. त्याच्यावर भारतीय हेरांची पाळत नसेल, असे अजिबात नाही. पण तो अलिकडेच भारतात आला होता आणि जे उद्योग करीत होता, त्याच्याही आधीपासून असे हेरगिरीचे जाळे पाकने विणलेले असणार. म्हणून तर भारतात येऊन तीन वर्षे झाली, इतक्यात अख्तरने आधारकार्डही मिळवले होते. त्याचा अर्थ त्याच्या हाताशी हस्तकांचे पक्के जाळे उपलब्ध होते. त्याच्या भारतात येण्याआधीपासून ते सज्ज असावे. पण त्याला जाळ्यात ओढण्यासाठी व त्याच्या भोवतीचे फ़ितूर पकडण्यासाठी अख्तरला आत्मविश्वासाने काही उचापती करू देण्याची गरज असते. जितका त्याचा आत्मविश्वास अधिक, तितका तो बेधडक उचापती करणे शक्य होते. परिणामी त्याच्याभोवती असलेल्या अधिकाधिक हस्तकांचे चेहरे समोर येणे शक्य होते. अशा एका मोक्याच्या व्यक्तीच्या भोवती अनेक साखळयांमध्ये फ़ितूर हस्तक काम करीत असतात. त्यांचे जाळे उलगडून झाल्यावरच धरपकड होत असते. दिड वर्षे अख्तर उचापती करीत होता, याचा अर्थ त्याच्यावर तितका काळ पाळत ठेवलेली होती. पुरेशी माहिती हाती आल्यावरच त्याला उचलण्यात आलेले असणार. हे काम अर्थातच पोलिसांचे नाही तर भारतीय गुप्तचर खात्याचे आहे. त्यांनी सर्व सज्जता केली आणि पोलिसांना शिकार जाळ्यात ओढून दिलेली आहे.

यातला मोक्याचा माणूस महमुद अख्तर होता आणि तोच पकडला गेला आहे. पण त्यातली गंमत समजून घेतली पहिजे. दिल्लीच्या एका उद्यानात अन्य दोघांशी याची भेट ठरली होती आणि तिथेच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने आपली ओळख भारतीय नावाने व ओळखपत्राने करून दिलेली होती. म्हणजे अख्तर किती गाफ़ील होता, ते समजू शकते. आपल्याला पाकचा हेर म्हणून हटकण्यात आले, अशी त्याच्या मनात तीळमात्रही शंका नव्हती. तसे असते तर त्याने तात्काळ राजनैतिक सवलतीचा आधार घेऊन पोलिसांना गप्प केले असते. पण सापळ्यात अडकलोय याचाही थांगपत्ता नसलेला अख्तर चौकशीत उघडा पडला आणि आता कुठलाही अन्य मार्ग नसल्याचे लक्षात आल्यावर, त्याने आपली खरी ओळख पोलिसांना सांगितली. त्याला अटक करणे शक्य नव्हते. म्हणूनच त्याची तडकाफ़डकी भारतातून हाकालपट्टी करण्याचा आदेश जारी झाला. पण ताब्यात घेतला जाताना अख्तर किती गाफ़ील होता, त्याचा अंदाज येतो. याचा अर्थ असा, की दिर्घकाळ त्याच्यावर पाळत ठेवून त्याचे धागेदोरे व सगेसोयरे हुडकून काढलेले आहेत, त्याचाही त्याला पत्ता नव्हता. आपण पुरते फ़सल्याची कल्पना आल्यावर त्याने पळवाट शोधली. पण तशी पळवाट त्याच्या टोळीतील अन्य भारतीय हस्तकांना उपलब्ध नाही अख्तरला इथे अडकवून ठेवण्यात काही हशील नाही. त्यापेक्षा जाणिवपुर्वक वा अजाणतेपणी त्याचे हस्तक झालेले मात्र फ़सले आहेत. त्यांच्याकडून किती खोलवर हे जाळे विणलेले आहेत, त्याचा तपशील उपलब्ध होणार आहे. त्यात कोण कोण उजळमाथ्याने समाजात वावरणारे लोक आहेत आणि देशाशी दगाफ़टका करणारे आहेत; त्याचीही माहिती भारतीय यंत्रणांच्या हाती लागणार आहे. किंबहूना यापैकी अनेकांच्या कुंडल्या एव्हाना तपासयंत्रणांना मिळालेल्याही असतील.

हेरगिरीचे जाळे खुप खोलवर विणलेले असते. वरकरणी हिमनगाचे टोक दिसत असते. त्यातल्या खालच्या स्तरावर किंवा नकळत शत्रू देशासाठी काम करणार्‍यांना काय करतोय याचाही पत्ता नसतो. अनेकदा असे लोक तत्वासाठी, विचारसरणीसाठी काही करत असतात. अशा खुळ्यांना आपल्या जाळ्यात ओढून देशाशी गद्दारी करायला वापरण्याचाच खेळ गुप्तहेर करीत असतात. आज भारत-पाक संबंध बिघडले असतानाही पाकमैत्री वा कलेच्या स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकणार्‍या अनेकांना अशाच जाळ्यात ओढलेले असू शकते. त्यांना अशा कामात ओढणारे किंवा प्रोत्साहन देणारे खरे शत्रूचे हस्तक असतात. त्यांना संघटित व सुसुत्रपणे कामाला लावण्याचे कर्तव्य अख्तरसारखा कोणी पार पाडत असतो. पाकला जी माहिती हवी किंवा भारताच्या दुबळ्या बाजू कळायला हव्यात, त्यात मदत करू शकणार्‍यांची यादी तयार करणे वा त्यांना आपल्या घोळक्यात ओढणे; अशी कामे अख्तरचे हस्तक परस्पर करीत असतात. अशापैकी अनेकांचे धागेदोरे एव्हाना तपास यंत्रणांना मिळालेले असू शकतात. तितकी पुरेशी माहिती मिळत नाही, तोवर अख्तरला गाफ़ील ठेवून मोकाट फ़िरायला दिले जात असते. ज्याअर्थी अख्तरला ताब्यात घेऊन पाकला पाठवून देण्याचा आदेश जारी झालेला आहे, त्याअर्थी त्याच्या भोवतीच्या अनेकांच्या कुंडल्या आधीच तपास यंत्रणांनी तयार ठेवलेल्या आहेत. त्यांच्या कारवायांवर आता बारकाईने नजर ठेवलेली असेल. योग्य वेळ येईल, तेव्हा त्यापैकी एकेकाचा गाशा गुंडाळला जाईल. कदाचित त्यापैकी अनेकांची परस्पर विल्हेवाटही लावली जाईल. कारण गुप्तचरांच्या कामाचा गाजावाजा होत नाही, की त्याविषयीची माहिती पत्रकार परिषद घेऊन सादर केली जात नाही. तो सगळा सावल्यांचा खेळ असतो. सावल्या दिसतात. पण कशाची सावली आहे, त्याचा थांगपत्ता सामान्य माणसाला लागू शकत नाही.

3 comments:

  1. Bhau, Baluchistan madhil sadya paristhiti, tethil janmat ani pakistanla shingavar ghenya itpat tyanchi tayari ahe ka yavar jara prakash taknara lekh prasiddha karava hi vinanti.

    ReplyDelete
  2. भाऊराव,

    माझं या घटनेविषयी आकलन थोडं वेगळं आहे. महमूद अख्तर हे एक आमिष होतं. भारतीय गद्दारांना टिपण्यासाठी भारतीय गुप्तचर संस्थांनी त्याला मुद्दाम मोकळीक दिली होती. इंग्रजीत याला हनीपॉट म्हणतात. अगदी आधारपत्रसुद्धा त्याला भारतीय गुप्तचरांनीच काढून दिलेलं असणार.

    आता प्रश्न असा आहे की, याचं अस्तित्व जर भारतहितैषी आहे तर त्याची हाकलपट्टी कशासाठी? त्याची उपयुक्तता संपली, असा एक तर्क लढवता येईल. महमूद अख्तर हे एक आमिष आहे अशी कुणकुण पाकिस्तानी हेरसंस्थेस लागली असणार. आणि अशी कुणकुण पाकिस्तानला लागली आहे हे तथ्य भारतीय हेरांना ज्ञात झालेले असणार.

    मात्र हा जरी निकामी झालेला असला तरी त्याला पकडायची वा हाकलायची काहीच गरज नव्हती. जरी हाकलायचं झालं तरी गुपचूपपणे करता आलं असतं. मग एव्हढा गाजावाजा कशासाठी? खरंतर अशा अमिषांना उलट पाकिस्तानवर हेरगिरी करायच्या कामाला लावण्यात येतं. किंबहुना भारतीय हेरांनी तशा कामाला त्याला जुंपला होताच. हा दुहेरी हस्तक म्हणजे डबल एजंट आहे.

    या डबल एजंटाची भारताप्रती असलेली उपयुक्तता संपल्यावर त्याला तोंडघशी पाडण्यात आलंय. तर मग एक अधिक गंभीर प्रश्न उभा राहतो. भारतोपयोगी महमूद अख्तरला निकामी कोणी केला? कोणत्या भारतीय गद्दाराने पाकिस्तान्यांना टिप दिली? वरपांगी त्याला उघडं पाडण्यात भारतीय गुप्तचरांचं कर्तृत्व दिसंत असलं तरी पडद्यामागे वेगळ्याच हालचाली झाल्या आहेत एव्हढं निश्चित.

    तुम्ही म्हणता तसा हा सावल्यांचा खेळ आहे. यांतली हारजीतही सावल्यांप्रमाणेच फसवी आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete