Friday, October 28, 2016

लंबी रेस का घोडा

akhilesh cartoon के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशात सत्ताधारी पक्षामध्ये माजलेली बेबंदशाही अपरिहार्य होती. तिची सुरूवातच त्या पक्षाच्या साडेचार वर्षापुर्वीच्या यशात सामावलेली होती. तेव्हा मायावती सत्तेत होत्या आणि त्यांच्या एकखांबी तंबूचा कंटाळा आलेल्या मतदाराने जवळचा पर्याय म्हणून समाजवादी पक्षाला बहूमत बहाल केलेले होते. तेव्हा त्याला प्रचंड विजय मानून अनेकांनी मुलायम व त्यांचे सुपुत्र अखिलेश यांची पाठ थोपटली होती. पण जिंकलेल्या हरलेल्या जागांपेक्षा मिळालेल्या मतांकडे कोणी ढुंकून बघितले नाही. जी स्थिती मुलायम मायावती यांच्या पक्षाची होती, तीच तिसर्‍या चौथ्या क्रमांकावर फ़ेकल्या गेलेल्या भाजपा व कॉग्रेस पक्षाची होती. तशीच काहीशी सैरभैर मानसिकता विश्लेषण करणार्‍या उथळ पत्रकारांची होती. चौरंगी लढाईत जागा कमीअधिक होत असल्या, तरी कुठलाही पक्ष निर्णायक रितीने पराभूत झालेला नसतो, की संपलेला नसतो. त्याची प्रचिती अडीच वर्षांनी लोकसभा मतदानात आलेली होती. विधानसभेत २० टक्केपेक्षा कमी मते मिळवणार्‍या भाजपाला मोदींसारखा नेता मिळाला आणि त्यांची मते दुप्पट होऊन त्यांनी ८० पैकी ७१ जागा जिंकल्या. म्हणून अन्य दोन प्रमुख असे पक्ष संपलेले नव्हते. मुलायमना ५ जागा मिळाल्या होत्या आणि मायावती एकही जागा जिंकू शकलेल्या नव्हत्या. पण त्या दोघांनी मिळवलेली मते लक्षणिय होती. हे मतांच्या टक्केवारीचे गणित समजून घेतले, तरच मतदानाच्या निकालांचे खरे वास्तविक विश्लेषण करता येत असते. मुलायम तिथेच चुकले आणि त्यांनी साडेचार वर्षापुर्वी आपल्या लाडक्या पुत्राच्या हाती सत्तासुत्रे सोपवून राजकारणाचा विचका केलाच. पण कुटुंबातल्या बेबनावालाही खतपाणी घातले. त्या कौटुंबिक बेबंदशाहीचीच किंमत आज त्यांना राजकारणा़त चुकवावी लागते आहे. गेल्या दोन दशकात उभ्या केलेल्या पक्षाच्या चिंधड्या उघड्या डोळ्यांनी बघण्य़ाचे दुर्दैव त्यांच्या नशिबी आलेले आहे.

दोन भावांतील वितुष्ट पराकोटीला गेले आहे आणि दोन बायकांच्या सापत्नभावाने समाजवादी पक्षाला ग्रासलेले आहे. ज्या विचारधारेच्या आधाराने मुलायम मोठे झाले, त्याच लोहियावादाचे प्रणेते डॉ. राममनोहर लोहियांनी ‘भाईभतीजावाद’ असा शब्द राजकारणात प्रचलित केला होता. तेव्हा प्रबळ असलेल्या कॉग्रेसी राजकारणात घराणेशाही बोकाळू लागली होती. तिची हेटाळणी करण्यासाठीच लोहियांनी हा शब्द वापरात आणला होता. आज त्यांच्याच प्रतिमेला पुष्पहार घालून समारंभ सुरू करणार्‍या प्रत्येक पक्षाला, आज नेमक्या त्याच भाईभतीजावादाने पोखरून काढले आहे. मुलायमनंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून दबा धरून बसलेल्या शिवपाल यादवना त्यात वंचित ठेवण्यासाठी तिसरा भाऊ रामगोपाल यादवने, पुतण्याला पुढे करून सख्ख्या भावाचा पतंग कापला होता. तेव्हा मुलायमनी त्याला साथ दिली होती. आज तोच पुत्र शिरजोर होऊन चुलत्याला हाताशी धरून मुलायमना जुमानत नाही. आज मुलायमनी आपले वजन शिवपालच्या पारड्यात टाकले असताना डोईजड झालेला पुत्र अखिलेश पक्षाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला सिद्ध झाला आहे. त्याचा अर्थही मुलायमना लावता आलेला नाही. गोष्ट सरळ आहे. लौकरच विधानसभा निवडणूका होत आहेत आणि त्यात आपल्यालाच मुख्यंमंत्री करण्याची हमी नसेल, तर अखिलेश पक्षाचे तारू बुडाले तरी बेहत्तर अशा हट्टाला पेटलेला आहे. आपल्याकडे सत्ता नसेल तर पक्षाकडे सत्ता असून काय लाभ; अशी त्याची मानसिकता आहेच. पण पक्षाची सत्ता आपल्या हितशत्रूंकडे गेली, तर अधिकच त्रास दिला जाईल. त्यापेक्षा सरळ शत्रुकडे सत्ता गेली तरी उत्तम, असे अखिलेशचे गणित आहे. तो कोणालाही दाद देण्याच्या मनस्थितीत नसेल, तर त्याला विश्वासात घेण्याला पर्याय नव्हता. पित्यालाही यापेक्षा वेगळे काही शक्य नव्हते. पण मुलायम अजून हे ओळखू शकले नाहीत, तिथे गडबड झाली.

गेला महिनाभर पक्षांतर्गत ह्या लाथाळ्या चालू आहेत आणि मुलायमचा शब्द अखेरचा, असे सांगत प्रत्येकजण मुलायमच्या प्रत्येक निर्णयाला पायदळी तुडवत मनमानी करतो आहे. आधी अखिलेशनी शिवपालची महत्वाची खाती काढून घेतली, तर त्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याचा पवित्रा मुलायमनी घेतला. पण दोघांना अखेरीस माघार घेऊन तडजोड करावी लागली. त्यातूनच पित्याने धडा घेतला असता, तर आजची कडेलोटाची स्थिती आलीच नसती. पोराला पंख फ़ुटले आहेत आणि त्याला आता पित्याच्या पंखाखाली रहाण्याची गरज उरलेली नसल्याचे तोच कृतीतून दाखवून देतो आहे. उलट जे मुलायमना घोड्यावर बसवून आपले डाव खेळत आहेत, त्यांच्यात स्वबळावर आपले हेतू साध्य करण्याचीही कुवत नाही. म्हणूनच मुलायमनी आपली प्रतिष्ठा व शक्ती अखिलेश विरोधकांच्या डावपेचात पणाला लावण्याचे काही कारण नव्हते. हे महिनाभर आधी स्पष्ट झाले होते. त्यानंतर मुलायमनी शिवपाल आदी लोकांना वेसण घातली असती, तर अखिलेशला कडेलोटावर उभे करण्याचा प्रसंग आला नसता, की त्याने पक्षाला कडेलोटावर आणुन ठेवण्याची पाळी आली नसती. जेव्हा अशी स्थिती येते, तेव्हा तिचे लाभ उठवायला पक्षाबाहेरची राजकीय गिधाडे आभाळात घिरट्या घालत असतात. आताही तेच झाले आहे. अखिलेश आपल्याला समाजवादी पक्षाचा मुडदा पाडून देणार, अशा समजूतीने अनेक मुलायमशत्रू सज्ज आहेत आणि मुलायमपुत्रच त्यांना मेजवानी देण्यास सज्ज झाला आहे. कुठूनही आता पित्याशी वैर आलेच आहे, तर हरण्यासारखे अखिलेशपाशी काहीही रहिलेले नाही. मग त्याने घाबरावे कुणाला व कशाला? म्हणतात ना, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही? अखिलेशची मानसिकता नेमकी तशीच आहे. पित्याकडून अधिक काही मिळण्यासारखे राहिलेले नाही आणि पुन्हा सत्ता मिळण्याची चिन्हेही नाहीत. मग त्याने मान खाली घालून अपमान कशाला गिळावा?

लढून पदरात पडलेला पराभवही सन्माननीय मानला जातो. उलट शरणागती पत्करून मिळवलेले राज्यही लज्जस्पद समजले जाते. प्राथमिक मतचाचणीत समाजवादी पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला असताना, त्या पक्षात माजलेली बेबंदशाही आत्मविनाशाकडे घेऊन जाणारी आहे. त्यात आपण स्वाभिमानाने लढलो, असे चित्र अखिलेश निर्माण करू शकला, तरी राजकारणात त्याची प्रभावी व्यक्ती म्हणून प्रतिमा उभी राहू शकते. आज त्याच मार्गाने हा मुलगा निघालेला आहे. त्याला समाजवादी पक्षात असलेल्या तरूणवर्गाचा पाठींबा मिळालेला आहे. तर जुन्या पिढीतल्या कालबाह्य नेत्यांच्या बळावर मुलायमना पक्षावर निर्विवाद हुकूमत राखणे अशक्य झाले आहे. मुलायमना एक बाजू निवडणे भाग आहे आणि त्यांनी कालबाह्य सहकार्‍यांच्या व भावाच्या नादी लागून चुकीची निवड केली आहे. आगामी राजकारणात त्यांचा वारसा वयाने पुढे गेलेले बंधू चालवू शकणार नाहीत. अखिलेशच्या स्वयंभू होण्यातून मुलायमचीच पताका पुढे फ़डकणार आहे. जे धाडस पित्याच्या संमतीशिवाय अखिलेशने करून दाखवले, त्याचे कौतुक मुलायम करू शकले असते. आज त्यांच्या पाठीशी जमा झालेला गोतावळा दिर्घकाळ विरोधात वा अन्य पक्षात जाऊन माघारी आलेला आहे. त्यापैकी कोणी स्वबळावर काहीही चमक दाखवू शकलेला नाही. उलट अखिलेश पुर्णपणे स्वयंभू नसेल, पण प्रतिकुल काळामध्ये पक्षाला उभारी देण्यापासून साडेचार वर्षे सत्तेची धुरा संभाळून दाखवू शकलेला तरूण नेता आहे. मुलायमनी त्यालाच अंगावर घेऊन मोठी चुक केली आहे. नजिकच्या लढाईत अखिलेश यश वा सत्ता मिळवू शकणारही नाही. पण उतरप्रदेशच्या समाजवादी राजकारणातला तो लंबी रेसका घोडा नक्कीच आहे. त्यात हताश कॉग्रेसी, नव्या पिढीतले समाजवादी व मुलायमचे अन्य राज्यातले जुने सहकारी; यांच्या मदतीने अखिलेश नवा ‘मुलायम’ साकार करू शकेल, असे नक्कीच म्हणता येईल.

(२४/१०/२०१६)

2 comments:

  1. मुलायम ला हे सर्व करण्यास भाग पाडत आहे ती त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता हि आहे

    ReplyDelete
  2. छानच भाऊ सुंदर

    ReplyDelete