Saturday, October 15, 2016

उत्तरप्रदेशची पहिली मतचाचणी

UP poll के लिए चित्र परिणाम

सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ भाजपा उठवणार असल्याचा गाजावाजा मागला आठवडाभर चालू आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ येथील रामलिला समारंभाची सांगता करायला होकार दिल्यानंतर, या राजकीय विरोधला मोठीच धार चढली होती. पण त्या समारंभात भाषण करताना मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच नव्हेतर एकूणच राजकीय भाषणाचा चाट दिली. त्यामुळे कितीसा फ़रक पडणार होता? लगेच दुसर्‍या दिवशी उत्तरप्रदेश विधानसभेच्या मतदानाचा अंदाज घेणारी पहिली चाचणी ‘आजतक’ या वाहिनीने सादर केली ती खुप बोलकी आहे. अर्थात त्यातले सगळे आकडे नेमके आहेत असे मानायचे कारण नाही. अशा चाचण्या घेणारे आणि त्यातून जिंकायच्या जागा काढणारे; यांच्या आकलनावर अंदाजाचे तारू उभे असते. थोडी गल्लत झाली, तरी ते तारू बुडते. जसे मागल्या लोकसभा मतदानात झालेले होते. कोणीही मोदींसह एनडीए आघाडीला बहुमत द्यायला तयार नव्हता. पण मोदींनी एकट्या भाजपाला बहूमत मिळवून दिले आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या आघाडीला तर ३४० जागा मिळून गेल्या. याचे कारण मतांची जी टक्केवारी नमुना चाचणीतून हाती येते; त्यातून जिंकायच्या जागा शोधून काढणे, हे यातले खरे कौशल्य असते. तिथेच बहुतेक राजकीय अभ्यासकांची गोची होऊन जाते. त्यांना आपल्या पुर्वग्रहाला झुगारून आकडे काढता आले नाहीत, तर गफ़लत होऊन जाते. ‘आजतक’च्या चाचणीत तोच फ़रक पडला आहे. कारण त्यांना मागच्या विधानसभांचा किंवा शेवटच्या लोकसभा निकालांचा नेमका संदर्भ तिथे जोडता आलेला नाही. दहा वर्षापूर्वी मायावतीच्या बसपाने विधानसभेत स्वबळावर बहुमताचा पल्ला गाठला होता, तर मागल्या खेपेस मुलयमच्या समाजवादी पक्षाने एकाट्याने बहुमत गाठले. पण अडीच वर्षांत भाजपाने एकट्याने ८० पैकी ७१ लोकसभेच्या जागा जिंकल्या. मग हे काय गौडबंगाल असते?

कुठल्या पक्षाला किती टक्के मते मिळू शकतील, हे चाचणीतून निश्चीत करता येते. पण त्या पक्षांना मिळणार्‍या जागा निश्चीत करताना, विविध कसोट्या लावाव्या लागतात. त्यातली पहिली कसोटी, किती मुख्य स्पर्धक मैदानात आहेत. त्यापैकी किती पक्ष परस्परांना तुल्यबळ वा टक्कर देणारे आहेत? तसे दोनच पक्ष असतील, तर ज्याला ४० टक्क्याच्या पुढे मते आहेत, त्याला बहुमत मिळताना दिसते. पण तुल्यबळ तीन स्पर्धक असतील तर ३० टक्क्यांच्या पुढे मजल मारणार्‍या पक्षाचे बहूमत सोपे होऊन जाते. मागल्या दोन विधानसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशने त्याचाच साक्षात्कार घडवला आहे. दहा वर्षापुर्वी २००७ सालात मायावतींचे पारडे जड असल्याचे सर्व चाचण्या दाखवत होत्या. पण कोणीही त्यांना एकहाती बहूमत मिळण्याचा अंदाज करू शकला नव्हता. म्हणूनच चाचण्यांचे आकडे सादर करताना मायावतींना सत्तेत यायला कुठल्या पक्षाची मदत घ्यावी लागेल, याचीच चर्चा रंगत होती. मात्र निकाल लागले त्या दिवशी मायावती स्वबळावर मुख्यमंत्री होत असल्याचे स्पष्ट झाले. मग सर्वांनी मुलायमची व समाजवादी पक्षाची खिल्ली उडवण्यात धन्यता मानली. पण किती किंचित फ़रकाने समाजवादी सत्ता गमवून बसले आणि किती थोड्या फ़रकाने मायावती मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्या; त्याचा खुलासा कोणीही केला नाही. मग पाच वर्षांनी त्याचीच पुनरावृत्ती झाली. २०१२ च्या विधानसभा निवडणूकीत सर्वच्या सर्व माध्यमे राहुल गांधी यांची पाठ थोपटण्यात गर्क होती. पण कोणी तीन महिने सलग प्रचारयात्रा घेऊन फ़िरणार्‍या अखिलेश यादवकडे ढुंकून बघितले नव्हते. मग चाचण्यांमध्ये समाजवादी पक्षाचे पारडे जड असल्याचे दिसू लागले. पण कोणी मुलायमना बहूमत द्यायला राजी नव्हता. कोणाची कुबडी घेऊन मुलायम सरकार स्थापन करतील, याची चर्चा होत राहिली. अखेर स्पष्ट बहूमत मिळून मुलायमनी आपल्या लाडक्या पुत्राला तरूण वयात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री बनवले.

दोन्ही प्रसंगी जागांचे होशोब मांडून कुठला पक्ष संपला वा जिंकला, ह्याचा उहापोह झाला. पण कोणीही कुणाची किती मते घटली व त्यामुळे किती मोठा फ़रक जागांच्या आकड्यांवर पडला, त्याची चिकित्सा केली नाही. २००७ सालात मायावतींनी मुलायमपेक्षा केवळ पाच टक्के अधिक मते मिळवली होती. पण जागा मात्र मुलायमच्या अडीच पटीने जिंकल्या होत्या. उलट स्थिती पाच वर्षांनी आली. २०१२ सालात समाजवादी पक्षाने आपल्या मतांमध्ये केवळ चार टक्के वाढ करून घेतली आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष कुठल्या कुठे फ़ेकला गेला. अवघी चार टक्के मते कमी झाली. पण २०६ आमदारांवरून मायावतींचा पक्ष ९१ इतका खाली घसरला. ही तिरंगी चौरंगी लढतीची किमया असते. तुल्यबळ पक्षांची दोनचार टक्के मते इकडची तिकडे झाली, तरी राजाचा रंक होतो आणि विरोधक सत्तेत येऊन बसतो. म्हणुनच आज कोण किती मते मिळवतो, त्यापेक्षा किती मते वाढवतो वा गमावतो, याला महत्व आहे. उत्तरप्रदशात मागल्या तीन दशकात चौरंगी लढतीतून वेगवेगळी समिकरणे पुढे आणत गेला आहे. एकहाती सतत जिंकणारा कॉग्रेस पक्ष त्यातून रसातळाला जात असताना, मायावती व भाजपा असे नवे दोन राजकीय प्रवाह पुढे येत गेले. त्यात रामजन्मभूमी या विषयामुळे भाजपा स्वबळाने सत्तेत आला होता. पण आपसातील हाणामार्‍यांनी त्याला मागे टाकले. त्याला शह देताना सपा-बसपा एकत्र आले. परंतु त्यांच्यातही वाद होऊन ते दोघे पुढल्या काळात मुख्य स्पर्धक होत गेले. त्यात भाजपा तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला. गेल्या लोकसभेपर्यंत भाजपा त्यातून डोके वर काढू शकला नव्हता. पण मोदी लाटेने भाजपाला मुख्य स्पर्धक म्हणून पुढे आणले आणि ‘आजतक’च्या ताज्या चाचणीतही त्याचेच प्रतिबिंब पडले आहे. आजही भाजपा सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष आहे. पण त्याला बहूमत मिळणार नाही, असे ही चाचणी म्हणते. त्यात किती तथ्य आहे?

उत्तरप्रदेशचे आजवरचे निकाल हा संदर्भ घेतला, तर कुठल्याही एका स्पर्धकाला स्पष्ट बहूमत देण्याचा पायंडा तिथल्या मतदाराने पाडला आहे. त्यात आता तीन स्पर्धक उरले आहेत. कॉग्रेस पुरती नामशेष झाली आहे. राहुल गांधींनी किती पायपीट केली, तरी मतदार त्यांना दहा टक्केही मते द्यायला राजी नाहीत. उरले तीन पक्ष! त्यात भाजपाला ३१ टक्के तर बसलापा २८ टक्के आणि समजवादी पक्षाला २५ टक्के मते मिळत आहेत. त्याचा स्पष्ट अर्थ असा, की ३१ टक्केवाला भाजपा यंदा स्वबळावर सत्ता काबीज करणार आहे. त्याच्या तुलनेत सपा व बसपा तुल्यबळ आहेत. पण शेवटची बाजी मारायला लागणारी टक्केवारी त्यांच्यापाशी नाही. खरोखर अशी तिरंगी लढत झाली आणि त्यात भाजपाने ३० टक्केहून अधिक मते मिळवली; तर भाजपा किमान २५० आमदार निवडून आणू शकेल. ४१ टक्के मते भाजपाने लोकसभेसाठी झालेल्या मतदानातून मिळवली होती. तेव्हा ३४० विधानसभा क्षेत्रात भाजपाला मताधिक्य होते. म्हणजेच त्या टक्केवारीत सात आठ टक्के घट झाली, तरी भाजपाला बहूमताचा पल्ला गाठण्यात कुठलीही अडचण येऊ शकत नाही. दुसरी बाब म्हणजे ही चाचणी अर्धी सर्जिकल स्ट्राईकपुर्वी आणि अर्धी नंतर झालेली आहे. म्हणजेच मोदी यांच्या पाकविषयक धोरणाचा संपुर्ण प्रभाव त्या चाचणीवर पडलेला नाही. तो पडला तर दोनतीन टक्के मते वाढू शकतात. ३५ टक्के मते भाजपा मिळवू शकला आणि त्याच्याशी मायावती-मुलायमनी चांगली टक्कर दिली; तर भाजपा उत्तरप्रदेश विधानसभेत ३०० आमदारांचा पल्ला गाठू शकेल. याचे कारण असे आहे, की आजकाल बहुतांश राज्याचा मतदार एका पक्षाला पुर्ण कौल देतो आणि नालायक वाटला तर पुढल्या खेपेस हाकलून लावतो. ‘आजतक’ची मतचाचणी भाजपाला बहूमत देणारी आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राईकनंतर विरोधकांना कशामुळे पोटशूळ उठला आहे, त्याचे वेगळे कारण सांगण्याची गरज नसावी.

2 comments: