Monday, October 10, 2016

सीमोल्लंघन: देश बदल रहा है

Image result for pakistan modi cartoon

कुठल्याही गोष्टीला सीमा असतात. तशाच जागतिक वा परराष्ट्र संबंधांनाही मर्यादा असतात. शेजारी देश म्हणून तुमच्या किती कुरापती सहन करायच्या, यालाही सीमा असते. पण पाकिस्तानला हे समजावणे अशक्य आहे आणि म्हणूनच त्याला समजणार्‍या भाषेत संवाद साधण्याची गरज आहे. हेच सत्य असते आणि आहे. पण काही लोकांना सत्यापेक्षा कल्पनेचा आकर्षण असते. म्हणूनच ते कल्पनेच्या आहारी जाऊन वास्तवाला नकार देत असतात. भारताचे दिर्घकालीन धोरण व कारभार अशाच लोकांच्या हाती असल्याने, पाकिस्तानी जिहाद वा दहशतवाद हा काट्याचा नायटा होत गेला. त्यातच भारतासोबतच पाकिस्तानही अणस्त्र सज्ज झाल्यावर, अणूयुद्ध नको म्हणणार्‍या आपल्यातल्याच लोकांनी भारताला अधिकच लुळेपांगळे करून टाकले. पाकने कुरापती काढाव्यात आणि त्यांना सेनेमार्फ़त धडा शिकवायची वेळ आली, मग आपलेच काही शहाणे अणुयुद्ध भडकेल म्हणून अडवणूक करीत राहिले. ही भारताच्या चांगुलपणाची साक्ष होती, तशीच नेभळटपणाचीही ग्वाही होती. त्यामुळे पाकने अण्वस्त्र हा बागुलबुवा करून टाकला होता. जणू भारत अणुयुद्धाला घाबरतो, म्हणून त्याने कुरापती सहन कराव्यात; हेच पाकिस्तानचे धोरण बनून गेले होते. त्यामुळे भारताची स्थिती आतून कडी घातलेल्या मुर्खासारखी झालेली होती. दाराची कडी आतून उघडली की सहज मुक्त होणे शक्य असते. पण तसे करण्यापेक्षा धावा वाचवा, असा टाहो फ़ोडण्याचा प्रकार चालू होता. पलिकडून पाकिस्तान त्याची गंमत बघत धमक्या देत होता. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी दाराची आतली कडी काढून दार उघडण्याची हिंमत केली. ज्याला जग आता सर्जिकल स्ट्राईक म्हणून ओळखते. थोडक्यात पलिकडून घातपाती इथे येणार असतील आणि पाक त्यांना रोखणार नसेल, तर त्यांच्या हद्दीत जाऊन बंदोबस्त करणे. जी सीमा भारताने आपल्यालाच घालून घेतली होती, त्याचे सीमोल्लंघन ही नवी मोदीनिती आहे.

नियंत्रण रेषा किंवा दोन देशांना विभागणारी सीमा ओलांडायची नाही, हा सर्वमान्य नियम आहे. पण मग पलिकडल्या घडामोडींचा बंदोबस्त पलिकडल्या सत्तेने करायचा असतो. त्यांच्याने होत नसेल, तर आपल्याला करावा लागणार, ही बाब उघड होती. जागतिक नियम कायद्यातही तशी मुभा आहे. पण आपल्याच सभ्यतेच्या बेडीत अडकून पडल्याने भारत एकतर्फ़ी सभ्यता पाळत होता. मोदींनी ती सीमा ओलांडली आहे. सीमेवरील चकमकी नव्या नाहीत. अधूनमधून दोन्हीकडल्या सेनादलांनी त्या ओलांडल्या आहेत. पण ते कोणी कधी मान्य केले नाही. भारत सरकारने कधी कबुल केले नसेल. पण संधी मिळाली वा असह्य झाले, तेव्हा भारतीय सेनेनेही ते काम केलेले आहे. यावेळी प्रथमच त्यांच्या मागे भारत सरकार ठामपणे उभे राहिले. किंबहूना हल्ला आला म्हणून परतून लावण्यासाठी जाऊ नका. संधी असेल तर कुरापत होण्याची शक्यताही उधळून लावा. बेलाशक सीमापार जा, अशी मुभा सरकारने दिली आणि भारतीय सेनेने सीमोल्लंघन केले. उरीच्या घटनेनंतरच त्याची स्पष्ट घोषणा भारतीय सेनेच्या कारवाईप्रमुखांनी केलेली होती. उरीचा हिशोब चुकता केला जाईल. पण आमच्या सोयीने व आमच्या निवडीने, असेच लेफ़्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी साफ़ म्हटलेले होते. त्यानुसार ही कारवाई झाली आणि मार खाऊनही पाकला असे काही झाले, त्याचा इन्कार करावा लागतो आहे. त्यात नवे काहीच नाही. ओसामाला असाच पाक हद्दीत घुसून अमेरिकन कमांडोंनी मारला व उचलून नेला होता. पण अमेरिकेने त्याची घोषणा केल्यवरही पाकला कबुल करायला वेळच लागला होता. कारण नामर्दांना नाचक्की कबुल करण्याचीही हिंमत नसते. मग भारतीय कमांडोंनी पाक हद्दीतील जिहादी छावण्या उध्वस्त केल्याचे पाकसेना व सरकार मान्य कसे करणार? म्हणून त्यांनी प्रतिहल्ला झाल्याचेच नाकारले आहे. त्याची दोन कारणे आहेत.

Image result for pakistan modi cartoon

भारतीय सेनादलाचे अधिकारी रणबीरसिंग यांनी घोषणा केली तरी नेमक्या जागा जाहिर केल्या नव्हत्या. त्याच दिवशी पाकिस्तानच्या सेनेकडून आलेला खुलासा नेमक्या त्याच जागांची नावे सांगणारा होता. अशा चार जागी भारताकडून गोळीबार झाल्याचे व त्यात दोन पाक सैनिक मारले गेल्याचे सांगण्यात आले होते. भारताने आत घुसून हल्ला केला नसेल, तर त्यात दोन पाक सैनिक मारले कसे गेले? दोनतीन मैलावरून झालेल्या गोळीबारात सैनिक मरत नसतात. म्हणजेच पहिल्याच दिवशी पाकने हल्ला झाल्याचे मान्य केले होते. पण सीमापार घुसून ह्ल्ला झाल्याचे मान्य करणे नामर्दी ठरली असती. म्हणून तर इन्काराचे नाटक आरंभापासून सुरू झाले. दुसरी गोष्ट पाकिस्तानच्या कुठल्याही सैनिकी तळावर भारताने हल्ला केलेला नाही, तर जिहादी छावण्यांवर हल्ला केलेला होता. त्याची कबुली द्यायची तर दहशतवाद आपण माजवतो, हे कबुल करण्याची पाकिस्तानवर नामुष्की आली असती. त्यामुळेच सोपी पळवाट हल्ला नाकारण्याची होती. आणखी एक गोष्ट अशी, की भारताने असा आत घुसून हल्ला केलेलाच नसेल, तर पाकने इतक्या बैठका व खलबते करण्याची गरज काय? पंतप्रधान, लष्करप्रमुख, गुप्तचरप्रमुख यांच्या बैठकांची रणधुमाळी कशाला चालू आहे? युद्धाची सज्जता करण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा कशाला चालला आहे? पाकिस्तानच्या या घबराटीला सीमापार झालेला एकमेव हल्ला कारण नाही. ही केवळ सुरूवात आहे आणि यानंतर असेच एकामागून एक प्रतिहल्ले होण्याच्या भयाने पाकला ग्रासलेले आहे. म्हणून एकीकडे हल्ला नाकारला जातानाच, पाकचे विविध नेते भारताकडून कुरापती काढल्या जातात, अशा तक्रारी जगातल्या कुठल्याही व्यासपीठावर जाऊन करीत आहेत. त्याचे एकमेव कारण भारताने आजवरच्या थंड धोरणाची सीमा ओलांडून केलेले सीमोल्लंघन हेच आहे.

किती छावण्या भारताने उध्वस्त केल्या, किंवा भारतीय कमांडोंनी किती जिहादी मारले; याला पाकच्या लेखी फ़ारसे महत्व नाही. भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यामुळे पाकिस्तान विचलीत झाला आहे. असा भारत वा असा भारताचा पवित्रा पाकिस्तानला घाबरवून सोडणारा आहे. कारण अण्वस्त्र हे दाखवण्याचे खेळणे असून, त्याचा कुठल्याही युद्धात बेधडक वापर केला जाऊ शकत नाही, हे पाकिस्तानही पक्के ओळखून आहे. सहाजिकच त्याची हुलकावणी चालली नाही, तर केव्हाही युद्धाला सज्ज असायला हवे. तीच पाकिस्तानची दुबळी बाजू आहे. पाकिस्तान भासवते तितके त्यांचे सैन्य सज्ज नाही. देशांतर्गत बलुची, सिंधी, पख्तुनी बंडखोरांना चिरडून काढणे; किंवा सीमापार घुसून भारतीय हद्दीत घातपाती हल्ले करण्यापलिकडे, पाकची सज्जता आमनेसामने लढायची अजिबात नाही. म्हणुनच तशी खुल्लमखुल्ला युद्ध होण्याची स्थिती पाकिस्तानला परवडणारी नाही. पण भारताने घुसून कारवाईचा पवित्रा घेतल्यावर प्रकरण चिघळले, तर खरीखुरी लढाई भडकू शकते. तसेच झाले तर आपला टिकाव लागणार नाही. हे पकिस्तान ओळखून आहे. कारण त्याचे सैनिक लढाई विसरून गेले आहेत आणि हाताशी असलेले जिहादी मरायला सज्ज असले, तरी त्यांना खर्‍या युद्धाचा गंध नाही. त्यामुळे भारताने युद्ध पुकारले, तर अल्पावधीतच उरलासुरला पाकिस्तान पराभूत होऊन जाईल, अशा भितीने पाक सेनापती व राजकीय नेत्यांना पछाडले आहे. कारण अण्वस्त्र हाती असले तरी चिनसह अमेरिका ते वापरू देणार नाहीत आणि भारतीय सेनेसमोर टिकाव लागणार नाही. म्हणूनच कसेही करून युद्धाची वेळ येऊ नये, अशी कसरत पाकिस्तानला करावी लागत आहे. ते आताच मान्य केले तर पाकिस्तानला पुन्हा शिरजोर होण्याची संधी मिळेल, हे ओळखून मोदी आपला डाव खेळत आहेत. पाकला मारण्यापेक्षा त्याला भयभीत करणे ही मोदीनिती आहे.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकस्मात बलुचीस्थान येथील नागरिकांवर पाकसेना अत्याचार करते, हे सांगून त्यांच्या हक्कांसाठी आपण सहानिभूतीने सहाय्य करू अशी भाषा वापरली होती. त्याचा सरळ अर्थ पाक काश्मिरात ढवळाढवळ करणार असेल, तर भारतही बलुचीस्थानात हस्तक्षेप करील, असाच होता. किबहूना त्यालाच परागंदा निर्वासित असलेल्या जगभरच्या बलुचींनी प्रतिसाद दिला आणि पाकिस्तानचे पित्त खवळले. त्यालाच उत्तर देण्यासाठी त्यांनी जिहादचे हत्यार उपसले. उरी येथील भारतीय तळावर हल्ला करून १९ जवान मारले. तेव्हा मोदींनी बलिदान वाया जाणार नाही, अशी भाषा वापरली होती. त्याचा अंदाज पाकिस्तानला आला नाही. त्याचा अर्थ निव्वळ प्रतिहल्ला असा नव्हता. जगातून पाकची कोंडी आणि सोबतीला जबरदस्त प्रतिहल्ला, अशी तयारी केलेली होती. पाकिस्तान त्यामुळेच संपुर्ण गाफ़ील होता. म्हणूनच उरीनंतर जगभर काहुर माजले आणि पाकिस्तानची बोबडी वळली. राष्ट्रसंघापासून सार्कपर्यंत पाकिस्तान एकाकी पडत गेला. तेही कमी म्हणून की काय, भारतीय कमांडोंनी हद्द ओलांडून जिहादी छावण्या उडवल्या. यापुर्वी पाकिस्तानला अशा अनुभवातून कधी जावे लागले नव्हते आणि जावे लागले, तेव्हा पुढल्या टप्प्यात युद्ध पेटले होते. म्हणजेच आजची मोदीनिती भारत-पाक युद्धाच्या दिशेने वाटचाल करते आहे आणि त्यात अन्य कोणी हस्तक्षेप करू नये, इतकीही सज्जता झालेली आहे. हे पाक मुत्सद्दी मंडळींनाही उमजले आहे. पाकसेनेलाही कळले आहे. त्यातूनच त्यांची पाचावर धारण बसली आहे. याचे एकमेव कारण पाकची सैनिकी व युद्ध सज्जता उघडी पाडण्याची भिती त्यांना सतावते आहे. त्यांनी दिर्घकाळ योजलेली रणनितीच उध्वस्त झाली आहे. भारताला भयभीत करून लढण्यापासून परावृत्त ठेवणे, हीच पाकिस्तानची रणनिती होती. पण भारत तर युद्धाला सज्ज होतो आहे. मग पुढे काय करायचे?

कुठल्याही मोठ्या कामात, योजनेत वा मोहिमेत, संकट ओढवले तर पर्यायी योजना सज्ज राखलेली असते. ज्याला बी प्लान वा सी प्लान असे म्हणतात. पाककडे असा कुठलाही पर्याय नाही. जिहाद हेच त्यांचे मागल्या तीन दशकातले धोरण व युद्धनिती होऊन गेलेली होती. सहाजिकच त्याला सैनिकांची वा सज्जतेची गरज नव्हती. जे धर्मवेडे तरूण मिळतील, त्यांना जिहादी बनवायचे आणि अफ़गाण वा भारतीय हद्दीत घुसवून उचापती करायच्या; हेच युद्धतंत्र होऊन गेलेले होते. त्याला कोणी उत्तर देऊ बघेल, तर त्याला अण्वस्त्रांची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचे, हे धोरण झालेले होते. जोवर त्याला आव्हान देणारे नेतृत्व भारतात नव्हते, तोपर्यंत ही बनवेगिरी चालून गेली. पण भारताची सत्ता मोदींच्या हाती आली आणि सुरक्षेची सुत्रे अजित डोवाल यांच्याकडे गेली. तिथून स्थिती बदलत गेली होती. त्याची गंधवार्ता पाकला नव्हती. त्याचाच फ़टका आता त्याला बसतो आहे. कारण युद्ध दार ठोठावते आहे आणि त्यासाठी कुठलेही सैनिक वा सज्जता हाताशी नाही. त्यातच दुखावलेल्या पाक समाजघटकांना भारताने चिथावण्या देऊन उठवले आहे. अशा चक्रव्युहात पाकिस्तान फ़सला आहे. पाकिस्तानचा हा दुबळेपणा अभ्यासूनच मोदी-डोवाल यांनी आपल्या भूमिकांमध्ये आमुलाग्र बदल केला. दोन वर्षे गळ्यात गळे घातल्यावर आता अकस्मात आपला रुद्रावतार पाकिस्तानला दाखवला आहे. शरीफ़च्या आईला  कौतुकाने शाल भेट पाठवणारे मोदी किंवा शरीफ़ खानदानाच्या घरातील लग्नाला अगत्याने हजेरी लावणारे मोदी, इतके कठोर होऊ शकतात? हे पाकला स्वप्नातही वाटले नव्हते. म्हणूनच स्वातंत्र्यदिनाच्या बलुची उल्लेखानंतर पाकिस्तान बिथरला होता. इतक्यात उरीनंतर हद्द पार करून कारवाई झाली, तर पाकची किती गाळण उडालेली असेल? लालमहालात घुसलेले शिवराय त्यावेळी शाहिस्तेखानाला कसे भासले असतील?

भारतातील कांही लोकांना अजून मोदी पंतप्रधानपदी बसलेले मान्य करता आलेले नाहीत. मग मोदींनी परराष्ट्र धोरणात इतकी मोठी मजल मारल्याने, त्यांना इतक्या सहजासहजी कसे मान्य व्हावे? त्यामुळेच देशहिताला तिलांजली देऊनही मोदी विरोधाची परामावधीही चालू आहे. पण याक्षणी तरी प्रथमच भारतीय सेना पंतप्रधानांवर खुश आहे. कारण दिर्घकाळ सेनेला तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागला आहे. पाकच्या पोकळ धमक्यांना वचकून असलेल्या सरकारने, आपल्या सेनेला पराक्रमाची संधी नाकारली होती. मोदींनी तो मार्ग मोकळा केल्याने सेनेलाही आवेश आला आहे आणि पाकला धडा शिकवण्याचे मनसुबे रचले जात आहेत. अवघ्या जगालाही थोडा अंदाज आला आहे आणि जगालाही तेच हवे आहे. म्हणून जग एकजुटीने भारताच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि अमेरिकन संसदेतही भारताला हवे तसे पाकविरोधी विधेयक सादर झाले आहे. दोन वर्ष अखंड परदेशवार्‍या करून ज्या शुभेच्छा मोदींनी गोळा केल्या, त्याचाही लाभ होतो आहे. अशा सर्वबाजूंनी तयारी केल्यावरच मोदींनी पाकला सरळ आव्हान दिलेले आहे. ते तसेच कायम राहिले तर पाकचे नामोनिशाण जगाच्या नकाशावरून पुसले जाईल, हे पाक नेत्यांनाही समजते. म्हणूनच युद्धात पडण्यापेक्षा शांततेची प्रार्थना पाकसेनाही करते आहे. पण आपणच शूर आहोत आणि भारताला पाणी पाजू शकतो, हा देखावा त्यांनी सतत भुकेल्या अज्ञानी पाक जनतेपुढे उभा केला असल्याने, भारतापुढे नतमस्तक होणेही त्यांना परवडणारे नाही. तसे केल्यास तेच पाकनेते व पाकसेनेला लोक रस्त्यात दिसतील तिथे जोड्याने मारायला कमी करणार नाहीत. विश्वचषक स्पर्धेत पहिल्याच फ़ेरीत बाद झालेल्या पाक क्रिकेटपटूंना काही महिने मायदेशी फ़िरकण्याची हिंमत झाली नव्हती. पाकसेना व पाकनेत्यांची स्थिती त्यापेक्षा वेगळी असणार नाही. कारण मोदींच्या धोरणात्मक सीमोल्लंघनाने पाकनेते आपणच रचलेल्या भुलभुलैयाच्या चक्रव्युहात फ़सलेले आहेत.

(बेळगाव तरूण भारत   ९/१०.२०१६)

2 comments:

  1. जबरदस्त भाऊ मस्तच

    ReplyDelete
  2. विजयादशमीच्या शुभेच्छा.

    ReplyDelete