Saturday, October 1, 2016

घरभेदी शहाण्यांचे मुखवटे



तुमची भिती ही कुठल्याही गुंडाचे खरे सामर्थ्य असते. जोवर तुम्ही भयभीत असता, तोपर्यंत तुमच्या भितीमुळे तुमच्यावर गुंड राज्य करू शकतो. ज्याक्षणी तुमची भिती संपते आणि कसल्याही परिणामांना तुम्ही सिद्ध होता, तिथे गुंडाचा थरकाप होऊन जातो. गुंडाच्या हातातले शस्त्र नव्हे इतकी तुमची भिती भेदक असते. म्हणून असे गुंड तुमच्या मनात भिती दहशत निर्माण करत असतात. मुंबईच्या एका लोकल ट्रेनमध्ये अपरात्री एका गुंडाने मतिमंद मुलीवर राजरोस बलात्कार केला. त्याच गाडीत असलेले पाच प्रवासी ते बघत राहिले. त्यांनी त्यात हस्तक्षेप करण्याचाही प्रयत्न केला होता. पण त्यांनी हटकले तेव्हा तो गुंड म्हणाला, एकेकाला धावत्या गाडीतून फ़ेकून देईन. मग हे लोक गर्भगळीत होऊन निमूट प्रसंग बघत राहिले. पाचजणांपुढे एक किरकोळ शरीरयष्टीचा गुंड भारी पडला, तेव्हा त्याच्या हाती शस्त्रही नव्हते. मग या पाचजणांनी त्याला रोखण्याचा किंवा त्याच्यावरच हल्ला करण्याचा प्रयासही कशाला केला नाही? तर त्यांच्या मनातली भिती, त्याचे मोठे हत्यार होते. आपण त्याच्यासारखे गुंड नाही किंवा हाणामारी करू शकत नाही, ही सामान्य माणसाच्या मनातली धारणाच गुन्हेगाराची खरी शक्ती असते. तेच सर्व बाबतीतले सत्य असते. एकदोन गुन्हे करायचे आणि जामिन मिळवून लोकांना दहशत घालत फ़िरायचे, ही गुन्हेगारीची शैली असते. पाकिस्तान त्यापेक्षा काहीही वेगळे करत आलेला नाही. पण त्याच्या त्या गुंडगिरीला घाबरणारे आपणच खरे गुन्हेगार नाही काय? लालबहादूर शास्त्री वा इंदिरा गांधी यांनी त्याची गुंडगिरी मोडून काढली होती आणि वाजपेयी यांनी पाकच्या अण्वस्त्रांना भिक न घालता कारगिलचे युद्ध यशस्वी करून दाखवले होते. पण तितकेही धाडस कोणामध्ये होऊ नये, यासाठी मग पाकिस्तानने त्यांची बुद्धी खर्ची घातली. त्यातून आजचे आपले बुद्धीमंत तयार झालेले असावेत.

मागल्या दहाबारा दिवसात युद्ध भारताला कसे परवडणार नाही, हे सतत सांगण्यात भारतीय शहाणे आपली बुद्धी खर्ची घालत आहेत आणि पलिकडून पाकिस्तानी नेते व सेनाधिकारी अण्वस्त्रांची धमकी देत राहिले आहेत. अशावेळी वाटाघाटी व बोलणी हाच मार्ग असल्याचे भारतीयांना पटवून देणे, ही पाकिस्तानचे बळ वाढवणारी कामगिरी आहे. तेच काम पाकिस्तानचे इथले मित्र करीत आहेत. काही वर्षापुर्वी अण्णा हजारे यांचे रामलिला उपोषण यशस्वी झाल्यावर पाकिस्तानचे काही पत्रकार इथे आलेले होते. त्यांना घेऊन पाकमित्र जतिन देसाई नावाचे पत्रकार राळेगण सिद्धीला पोहोचले. त्यांनी अण्णांना पाकिस्तानातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी तिथेही जाण्याचे सुचवले होते. कोणाला हा पोरकटपणा वाटेल. पण तसे अजिबात नाही. पाकिस्तानने त्यात मोठी गुंतवणूक केलेली आहे. भारताशी लढण्यापेक्षा घातपाती व दहशतवादी पाठवणे जसे स्वस्तातला सौदा आहे, तसाच भारतात पाकिस्तानची तळी उचलून भारताची हिंमत खच्ची करणारे बुद्धीमंत हाताशी धरणे; हा स्वस्तातला सौदा असतो. पाकिस्तानने मागल्या दोन दशकात त्यात मोठी गुंतवणूक केलेली आहे. अशा बुद्धीमंतांना जगात कुठेही फ़िरायला, मौजमजा करायला पैसा पुरवणे, किंवा मेजवान्या देऊन खुश राखणे; हा युद्धापेक्षा खुपच नगण्य खर्च असतो. पाक हेरखात्याने त्यातच गुंतवणूक केलेली आहे. दोन वर्षापुर्वी अकस्मात वेदप्रताप वैदिक नावाचे प्रकरण गाजत होते. काय होते आठवते कुणाला? हा माणूस एका सेमिनारसाठी पाकिस्तानला गेला आणि थेट तोयबाचा म्होरक्या सईद हाफ़ीजला भेटलेला होता. त्याच्याशी झालेल्या गप्पा किंवा छायाचित्रे उघडकीस आली आणि वैदिक प्रकरण गाजत होते. पण त्यापेक्षा महत्वाची बाब म्हणजे त्यातून कोण असे पाकनिष्ठ पत्रकार बुद्धीमंत भारतात आहेत, त्यांचे मुखवटे उचकटून काढले गेले.

पाकिस्तानचे तीन माजी हेरप्रमुख संचालक असलेल्या एका संस्थेने खास बैठक बोलावलेली होती. त्याला हजर रहाण्यासाठी हे पथक गेलेले होते. त्यात असलेल्या वैदिक नामक गृहस्थाने थेट हाफ़ीजला गाठले होते. त्याचा थांगपत्ता पथकातील इतरांना लागला नाही. मग त्याविषयी खुलासे देताना त्यांची तारांबळ उडालेली होती. बरखा दत्त, दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वरदराजन, सलमान खुर्शीद, सुधींद्र कुलकर्णी, मणिशंकर अय्यर अशी त्यातली काही नावे आहेत. ही संस्था आयएसआय चालवते आणि विभागिय शांततेसाठी तिचे प्रयत्न चालू असतात. त्यात एक संचालक अय्यर आहेत आणि एक चिनी अधिकारी आहेत. बाकीचे सर्व पाकचे माजी हेरगिरी करणारे लोक त्यात समाविष्ट आहेत. ज्या हेरसंस्थेच्या नावाने आज जगभर जिहादी दहशतवादाचा हलकल्लोळ चालू आहे, त्यांनी शांतता परिषद भरवावी, हाच मुळात विनोद नाही काय? अशा संस्थेने बैठक घ्यायची आणि यात सहभागी होणारे भारतीय मायदेशी येऊन भारताला सतत शांततेचे पाठ देणार; यातला विरोधाभास लक्षात येतो काय? आयएसआय भारतात जिहादी हल्ले करणार आणि त्याच हल्लेखोरांचा बंदोबस्त भारताने करायचा म्हटला, की त्याच्या विरोधात भारतीय जनमत निर्माण करण्याचे काम उपरोक्त मंडळी करणार. यातला व्यवहार लक्षात येतो काय? जेव्हा केव्हा भारतात दहशतवादी हल्ला होतो, तेव्हा मेणबत्त्या पेटवण्य़ाला प्राधान्य देऊन युद्ध नको असे जनमानसात ठसवण्याचे कर्तव्य पार पाडण्यात तीच बरखा, पाडगावकर किंवा सुधींद्र कुलकर्णी नसतात काय? मग हे लोक कोणासाठी काम करतात, हे वेगळे सांगायला हवे काय? दोन देशात शांतता व मैत्री असावी, तर यांनी काय करायला हवे? त्यांचे जे कोणी आयएसआयमध्ये ‘जीवलग’ आहेत, त्यांना घातपाती जिहादपासून परावृत्त करणे शक्य नाही काय? पण त्यांनी हे कधीतरी केले आहे काय?

जे उत्पात घडवतात, त्यांच्या बोलवित्या धन्याशी यांची उठबस असते. मात्र अशा उत्पाताच्या विरोधात हत्यार उपसण्याची तयारी सुरू झाली, मग त्यात मोडता घालण्यास हीच मंडळी पुढे असणार. त्यांना शांततेशी वा मैत्रीशी कुठलेही कर्तव्य नसते. त्यांना पाक नागरिक वा भारतीय नागरिक यांच्याशी घेणेदेणे नाही. त्यांच्यासाठी धन्याच्या मीठाला जागणे अगत्याचे असते. युद्धशास्त्र वा हेरगिरीच्या भाषेत अशा लोकांना ‘डीप असेट’ म्हणतात. म्हणजे शत्रूच्या गोटात मोक्याच्या जागी बसलेल्यांचे सहकार्य असेल, तर शत्रूला आतून पोखरता येते. शस्त्रास्त्रांवर खर्च करण्यापेक्षा अशा लोकांवर गुंतवणूक केली, तर लढाई कमी खर्चत जिंकता येते. कारण शत्रूसेना कितीही बलदंड असो, तिला विश्वासघाताने मारणे सोपे असते. कालपरवा उरीमध्ये तेच चार जिहादी आमनेसामने लढायला उभे राहिले असते, तर त्यांचा भारतीयांनी खुर्दा उडवला असता. पण गाफ़ील पकडून त्यांनी १८ सैनिकांचा बळी घेतला. आतले घरभेदी मदतीला असतील, तर मोठ्या फ़ौजेलाही किरकोळ तुकडी नामोहरम करू शकते. मात्र त्यासाठी मोक्याच्या जागी बसलेले ‘डिप असेट’ हाताशी धरायला हवेत. मागल्या काही वर्षात पाकिस्तानने त्यांच्या भूमीत नुसते जिहादी तयार केलेले नाही. तर भारतात महत्वाच्या व्यक्तींना आपले ‘डिप असेट’ बनवून पोखरले आहे. इथली नाजूक माहिती काढणे व मोक्याच्या क्षणी अवसानघातकी प्रचार करणे, असे त्यांचे काम असते. मागल्या दहाबारा दिवसात अशा कित्येक लोकांचे चेहरे आपण वर्तमानपत्राच्या लिखाणातून वा वाहिन्यांवरील चर्चेतून बघितले आहेत. समोरच्या जिहादीपेक्षा अशा घरभेदी लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. त्यांनी आजवर काय केले, त्याची उजळणी केल्यास भारताला दहशतवादाचे बळी कशाला व्हावे लागले, त्याचा अंदाज येऊ शकेल. कारण युद्धातले नुकसान कमी असते. अशा घरभेद्यांमुळे होणारे नुकसान मोठे असते.

6 comments:

  1. भाऊ आज मेधा पाटकर यांनी म्हटले आहे की आपण हल्ला करून चूक केली, यावर आपले काय म्हणणे आहे

    ReplyDelete
  2. अशा घरभेद्यांची भारताला मोठी परंपरा आहे . ईतिहासात नुसते डोकावून जरी पाहिले तरी जयचंद,सुर्याजी पिसाळ अशी मालीका आपल्याला सापडेल . ज्या देशात जगातील सर्वात जास्त साधुसंत जन्माला आले त्या देशात आशी बांडगुळे जन्माला यावीत हे खरोखरच दुर्दैवी आहे . परकीया विरुध्ध surgical strike करण्यासाठी सेना समर्थ आहे पण या घरभेद्यांची surgery करण्याचे काम हे बुद्धीजिवी , media व राजकारण्याचे आहे पण तेच जर घरभेदी होऊन बसले तर - - - -तर आता सामान्य जनतेची फार मोठी भुमिका आहे, उडदा माजी काळे गोरे असले तरि लोकांना चांगल्या व वा
    इटात फरक करावाच लागेल कारण हे बुद्धीजीवी तुमचा बुद्धीभेद करण्यात फार पटाईत आहेत . एक गाणे आठवते " मांझी जब नांव डुबोये , उसे कोन बचाये " ही नाव बुडू नये यासाठी आपण सर्वांना प्रयत्न करावे लागतील.

    ReplyDelete
  3. आता मोदी सरकारने ह्या घरभेदयांचे surgical strike करायला हवी..हि पाक गुंतवणूक पुढच्या पिढीला नक्कीच अपायकारक आहे..

    ReplyDelete