Friday, October 28, 2016

तोडपाण्याच्या दंतकथा

MNS KJo के लिए चित्र परिणाम

शनिवारी करण जोहर आणि राज ठाकरे यांना समोरासमोर आणून मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी पेचप्रसंगातून वाट काढली. त्यामुळे अर्थातच जोहरच्या वादग्रस्त झालेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यानंतर येत असलेल्या प्रतिक्रीयाही नेहमीच्या आहेत. ज्यांना राज ठाकरे आवडत नाही, त्यांना अर्थातच त्याला मिळणारे श्रेयही आवडणे शक्य नाही. म्हणून मग त्यात खोट शोधण्याला पर्याय नसतो. सहाजिकच तोडपाण्याचा आरोप झाला. आता यातही काही नाविन्य राहिलेले नाही. पण गंमत अशी की उरीच्या हल्ल्यानंतर पाक कलाकारांना भारत सोडून जाण्याचा पहिला इशारा राज व मनसेनेच दिलेला होता. तेव्हा कोणी मायका लाल पुढे आलेला नव्हता. अनेकांच्या मनात तसे असले तरी त्यांच्या राजकीय बांधिलकीचा जो पक्ष असेल, त्याच्या भूमिकेनुसार त्यांना संयम किंवा मौन धारण करावे लागलेले होते. त्यामुळेच राज ठाकरे याच्या भूमिकेला मिळालेले यश किंवा त्याच्या समोर नतमस्तक झालेले बॉलिवुड बघणे, अशा राज विरोधकांना सहन होणार नव्हते. मग ते नाकारायचे तर त्यात खोट काढली पाहिजे. अशावेळी सोपी खोट वा आरोप तोडपाण्याचा असतो. मुद्दा इतकाच, की कुठल्याही वादात मध्यस्थी होत असते अन्यथा प्रकरण विकोपास जात असते. त्याचे परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागत असतात. त्याची किंचितही झळ ज्यांना लागत नाही वा लागू नये याची जे लोक काळजी घेतात; असेच लोक त्यावर तावातावाने बोलत असतात. म्हणूनच राज ठाकरेंनी तोडपाणी केल्याचा आरोप स्वाभाविक आहे. त्याखेरीज अन्य काही आरोप करणेही शक्य नाही. पण मग अशी तोडपाणी करण्यात पुढाकार घेणार्‍या मुख्यमंत्र्याला काय म्हणायचे? हे तोडपाणी झाले असा आरोप करणारे वेगळ्या भाषेत देवेंद्र फ़डणवीस ‘खुनकी दलाली’ करीत असल्याचाच आक्षेप घेत नाहीत काय?

राज ठाकरे यांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली होती आणि त्यासाठी अर्थातच हुल्लडबाजी करावी लागणार होती. तसे झाल्यास त्यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणार होता. आधीच मनसेचे काही लोक अटकेत आहेत. म्हणजेच करण जोहर वा बॉलिवुड बाजूला पडून सरकार व मनसे यांच्यात जुंपली असती. त्यात जे काही बरेवाईट होईल, त्याचे खापर मुख्यमंत्री व राज ठाकरे यांच्याच माथी आले असते. म्हणून फ़डणवीसांनी त्यात हस्तक्षेप करण्यात पुढाकार घेतला आणि मधला मार्ग मान्य करण्यास मनसेला भाग पाडले. पण दरम्यान कलेला भौगोलिक सीमा नसतात, असा दावा करणार्‍यांनाही शरणगत व्हावे लागले आहे. यापुढे पाक कलाकारांना घेणार नसल्याची घोषणा करावी लागली आहे. राजनी इतका अट्टाहास केला नसता, तर हे तरी शक्य होते काय? कारण मनसे वगळता कुठल्याही राजकीय पक्षाने पाक कलाकारांना बहिष्कृत करण्यासाठी असा हट्ट धरलेला नव्हता. पहिल्याच प्रयत्नात पाक कलाकारांनी निघून जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्यावर बहुतांश पाक कलाकार मायदेशी निघून गेले होते. तरी त्यांचे इथले दलाल त्यांना भारतात कलाविष्कार करण्याचा अधिकार असल्याचे दावे करीत होते. त्याविषयी कोणी राजकीय भूमिका घेतली होती काय? तिथेही राज ठाकरे एकाकी होता. पण त्याने जनभावनेचा आवाज उठवला होता. त्यामुळेच पक्षाची संघटनात्मक शक्ती कमी असली तरी बॉलिवुडला मान झुकवावी लागली असती. बाकीच्या पक्षांचे आमदार खासदार अधिक असून कोणी जनभावनेला प्रतिसाद देत नव्हता. तो आवाज एकट्याने उठवला होता. मग त्याचे श्रेय मान्य करण्यात कंजुषी कशाला? तेव्हा मग तोडपाण्याचे आरोप करण्यासारखा कद्रुपणा असू शकत नाही. खरे तर आपल्या नाकर्तेपणाचे ते दुखणेच असते. नशीब म्हणायचे, की महात्मा गांधींच्या कालखंडात सोशल मीडिया नव्हता.

महात्मा गांधींनी आपल्या कारकिर्दीत अनेक आंदोलने लढे घोषित केले आणि मागेही घेतले होते. मग त्यांनाही तोडपाणी करणारेच म्हणायला हवे ना? कुठल्याही लढे वा आंदोलनात संघर्ष हा शेवटचा टप्पा असतो. त्यापुर्वी तडजोड होऊ शकली तर मार्ग शोधले जात असतात. प्रत्येक भूमिका ही लढण्यासाठीच असते, त्याला राजकारण नव्हेतर जिहाद म्हणतात. त्यात समोरच्याला खतम करण्याचे उद्दीष्ट असते. आंदोलनात समोरच्याला खतम करण्याचे ध्येय कधीच नसते. आपली भूमिका शक्य तितकी प्रभावीपणे मान्य करायला भाग पाडण्याला आंदोलन वा चळवळ म्हणतात. करण जोहरचा चित्रपट प्रदर्शित होण्यात कुठली कायदेशीर अडचण नव्हती. म्हणूनच त्याला विरोध हा तात्विक होता. पाक कलाकारांचा भारतात काम करण्याच्या अधिकाराला भौगोलिक सीमा आडव्या येऊ शकत नाहीत, अशी भूमिका जोहर इत्यादिंकडून पुढे आणली गेली होती. तो पवित्रा मोडून काढण्याला महत्व होते. एका चित्रपटाच्या गुंडाळून ठेवण्याने ते साध्य झाले नसते. किंवा आंदोलन पुढे नेऊनही साध्य झाले नसते. फ़ार काय झाले असते? मनसेच्या काही शेकडा कार्यकर्ते नेत्यांवर अटकेचे संकट आले असते. खटल्यांचे झंझट त्यांच्या मागे लागले असते. तेव्हा त्यांच्या मदतीला (आज तोडपाण्याचे आरोप करणार्‍यांपैकी) किती देशभक्त उभे रहाणार होते? एकही हरीचा लाल त्यासाठी पुढे आला नसता. पण आरोप करायला मात्र हिरीरीने अनेक देशप्रेमी सरसावलेले आहेत. मुद्दा आंदोलनाने मोठा होण्याचा नसून साधले काय असा आहे. जे काही झाले त्यात कुठल्याही अतिरेकाशिवाय बॉलिवुडमध्ये फ़ुट पडली आहे. निदान काही लोक पाकविरुद्ध बोलण्यास पुढे आले आहेत. शिवाय यापुढे पाक कलाकारांना प्रतिबंध घालण्याचे त्यांनीच जाहिर केले आहे. हाणामारीने असे किती साध्य झाले असते? राजच्या हटवादाने बॉलिवुडला शरणागत केले, हा मुद्दा आहे.

सरकारने पाक चित्रपटावर बंदी घातली नव्हती. म्हणूनच सरकारला संरक्षण देणेही भाग होते. शिवाय हेच मनात असले तरी सरकारला कलाक्षेत्राची नाराजी नको होती. ते काम राजच्याच याच हट्टाने साध्य करून दिलेले आहे. ही बंदी सरकारने वा कायद्याने घातलेली नव्हती, तर लोकभावना पाकविरोधी आहे, हे त्याच हट्टाने सिद्ध केले. तेही कोणाला मान्य नसेल तर मग तोडपाणी या विषयाचा वेगळ्या बाबतीतही विचार करावा लागेल. इतके जवान मारले गेल्यावर पाकला एकाकी पाडण्याच्या भूमिकेसाठी सरकारने तरी कोणती पावले उचलली आहेत? सिंधू खोर्‍याचे पाणी तोडणे असो किंवा पाकला लाडका देश म्हणून मिळणार्‍या सवलती असोत. याबद्दल चर्चा करून नरेंद्र मोदी थांबले, तर त्यालाही तोडपाणीच म्हणायचे काय? आजही पाकशी व्यापार चालू आहे. त्याला काय म्हणायचे? एका निकषावर आरोप एका बाजूने करता येत नसतात. त्याचेच प्रतिबिंब दुसर्‍याही बाजूवर पडत असते. जो आरोप राजवर केला जात आहे, तसाच आरोप अनेक बाबतीत इतरांवर होऊ शकतो. म्हणून जे समोर सत्य आहे ते प्रामाणिकपणे स्विकारण्याची दानत असायला हवी. ती नसेल तर पाकिस्तानी नेतृत्व आणि तुमच्यात फ़रक उरत नाही. लोकभावना पाकविरोधी होती आणि राज ठाकरेंनी त्याचा राजकीय लाभ उठवला, हा आरोप व्हायला हरकत नाही. पण मग तोच लाभ उठवायला इतर पक्षांना कोणी रोखलेले नव्हते. पण आपल्या तात्विक व वैचारीक मुखवट्यांना जपून, अशा ठोस भूमिका घेता येत नसतात. त्याने फ़ारसे बिघडत नाही. पण म्हणून दुसर्‍यांवर असे तोडपाण्याचे आरोप करण्याने तुमचे अधिकच वस्त्रहरण होत असते. जसे आज बॉलिवुडच्या अनेक स्वातंत्र्यवादी म्होरक्यांचे झाले आहे. कालपर्यंत प्रतिभेला भौगोलिक सीमा नसल्याचे त्यांचेच दावे सोडून त्यांना शरण यावे लागले आहे. तो राजच्या विजयापेक्षा अशा भंपक लोकांचा पराभव अधिक आहे.

(२४/१०/२०१६)

1 comment: