Monday, October 31, 2016

सण, उत्सव, सोहळे
हिच्या चेहर्‍यावर दिसते, ती असते दिवाळी

(फ़ोटो सौजन्य, प्रशांत अरणके)

पृथ्वीतलावर माणूस हाच एक सजीव असा आहे, जो निसर्गालाही आपले नियम लावायला सज्ज असतो. म्हणूनच माणूस निसर्गाचे नियम शोधून त्याला आव्हानही देण्य़ाच्या सतत प्रयत्नात असतो. बाकीच्या सजीवांप्रमाणे मानवाने आपले निसर्गदत्त कर्तव्य मानले नाही. त्याने आपल्या अटीवर जगण्याची कायम धावपळ केलेली आहे. त्यातूनच मग माणसाच्या नव्या गरजा निर्माण झाल्या आणि त्याला सतत कामात गुंतून पडावे लागले. अशा कामातून थोडी विश्रांती मिळवण्यासाठी मग माणसाला सण उत्सव सोहळे अशा गोष्टी विरंगुळ्यासाठी शोधाव्या लागल्या. दिवाळी किंवा अन्य उत्सव त्यातूनच आलेले आहेत. शेकडो वर्षाच्या परंपरा लाभलेल्या अशा उत्सवांच्या दंतकथा तयार झाल्या. पण त्यातला एकमेव मूळ हेतू विरंगुळा असाच असतो. प्रत्येक माणूस आपापल्या कुवतीनुसार व शक्तीनुसार हे सोहळे साजरे करतो. कितीही अडचणीत वा कामात गुंतलेला माणूसही अशा सोहळ्यांपासून दूर राहू शकत नाही. यातली गंमत अशी असते, की दिवस आधीपासून ठरलेला असतो आणि तो अधिकाधिक आनंदी बनवण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयास करीत असतो. आनंद ही अशी गोष्ट असते, की माणसाला एकट्याने तिची चव चाखता येत नाही. त्यातली मजाच निघून जाते. म्हणून मग अनेकांनी एकत्र येऊन आनंद वाटून घेण्याकडे कल असतो. दिवाळी असाच एक सण आहे. तो दिवस उजाडतो आणि आपण तो दिवस आनंदी रहाण्याचा प्रयास करतो. जवळच्या लोकांना आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. खरे सांगायचे तर आनंदी होण्यापेक्षाही काहीकाळ नेहमीच्या विवंचना व व्यग्रतेतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा तो प्रयास असतो. त्यामुळेच सगळा आटापिटा नेहमीच्या अनुभवापासून पळण्याचा असतो. रोजचे जगणे आणि सणासुदीचे जगणे यात जास्तीत जास्त फ़रक पाडण्याला सण म्हणतात.

फ़राळ, फ़टाके, नवी वस्त्रेप्रावरणे ह्या गोष्टी तशा दुय्यम असतात. त्यापेक्षा त्यांचा उपभोग घेणारा महत्वाचा असतो. म्हणूनच मग असे प्रसंग स्मरणिय व्हावेत, अशीही धडपड होत असते. दिवाळीसाठी चार पैसे बाजूला करून चांगली खरेदी होत असते. दिर्घकाळ वापरल्या जाणार्‍या वस्तू वा सुविधांवर याचवेळी पैसा उडवला जातो. सहाजिकच तशी लालूच तुम्हाला दाखवून बाजार सजत असतो. या दिवाळीला काय वेगळे कराल? ते तुम्हाला सुचवून आपापला माल लोकांच्या गळी मारणारे बाजार त्यामुळेच उभे राहिले. खरे तर अशा वस्तु वा माल ही तुमची गरज नसतेही. पण ती वस्तु वा सुविधा म्हणजेच तुमचा आनंद; असा गदारोळ केला जातो आणि नकळत सामान्य माणूसही त्यात आनंद शोधू लागतो. त्यातून एक मोठी बाजारपेठ तयार होत असते. मात्र अशा गडबडीत आपण आपला व्यक्तीगत आनंद कुठे हरवून बसलो, त्याचेही अनेकांना स्मरण उरत नाही. यंदाच्या दिवाळीत अमूक खरेदी करायची वा असा खर्च करायचा, हे स्वप्न बघण्यात जी मजा असते. ती अशा बाजारपेठेत हरवून जाते. खरेदी वा कुठल्याही गोष्टीविषयी असलेले आकर्षण, ती आपलीशी करण्यात दडलेले असते. जोपर्यंत ते आपल्या हाती वा आवाक्यात आलेले नसते, तोपर्यंतच त्या गोष्टीची महत्ता असते. आपल्या कल्पनेत तिचा उपयोग वा मालकीविषयीची जे चित्र रंगलेले असते, ते साध्य झाल्यावर त्यातली मजा कुठल्या कुठे लुप्त होऊन जाते. अनेक वर्षे कोणी नवे घर घेण्याचे वा आपल्या मालकीची गाडी घेण्याचे स्वप्न रंगवत असतो. पण जेव्हा हे पुर्ण होते, तिथे तेच स्वप्न संपलेले असते. सहाजिकच ते मिळवण्याविषयीचे आकर्षण संपते आणि त्यातला आनंद अल्पावधीच गायब होऊन जातो. मग ती वस्तु त्या मुहूर्त वा दिवाळीची भेट होऊन जाते. तिच्याकडे बघायचे आणि त्या सणाच्या स्मृतींमध्ये रमायचे, इतकेच त्याचे महत्व उरते.

आनंद ही बाब व्यक्तीगत आणि सामुहिक असते. पण ती कुठल्या वस्तु वा सुविधेमध्ये नसते. तर परस्परांना आनंदी बघण्यात असते. एखादी सुग्रण भरपूर मेहनत घेऊन चांगले पदार्थ बनवते आणि जेव्हा त्याची चव चाखणारा समाधानाचा ढेकर देतो, त्यातला तिचा आनंद अवर्णनीय असतो. एका क्षणात आपले कष्ट विसरून तीच गृहीणी त्यातले कौशल्य कथन करण्यात रमून जाते. इतरांच्या समाधानात मिळणारा तो आनंद कुठल्या बाजारात वा दुकानात विकत मिळू शकत नाही. इतके कष्ट उपसूनही त्या गृहीणीला थकवा येत नाही. त्याला सण म्हणतात. रोजच्या कमातून वेळ काढून फ़राळाचे चार पदार्थ बनवणार्‍या त्या थकलेल्या गृहीणीच्या चेहर्‍यावरचे समाधान हा सण असतो. त्याच्या जागी कुठल्या महागड्या दुकानातून आणलेले खाद्यपदार्थ वा मिठाईचे खोके आनंद देऊ शकत नाहीत. त्याची किंमत पैशात असते. आनंदाचे तसे मूल्यमापन होऊ शकत नाही. आजकाल शेकड्यांनी भेटवस्तु, मूल्यवान वस्तु खरेदी करून दिवाळी निमीत्त वाटल्या जातात. त्या देण्याघेण्यातले समाधान कितपत खरे असते? एकाला आपल्या औदार्याचे समाधान मिळते, तर दुसर्‍याला फ़ुकटात काही पदरात पडल्याचा आनंद मिळत असेल. पण त्या दोघांना एकाच पद्धतीचा आनंद मिळतो असे नाही. जो आनंद देण्याबरोबर घेण्यातही दडलेला असतो, त्याला सणासुदी म्हणतात. दुर्दैवाने आजकाल लोकांना त्याचा पुरता विसर पडला आहे. म्हणूनच दिवाळी वा अन्य कुठलाही सण-उत्सव बाजारी होऊन गेला आहे. त्यात आपल्याला आनंदाचे क्षण शोधायचीही सवड उरलेली नाही. आपल्यासाठी ते काम बाजारातील हुशार व्यापारी करीत असतात आणि आपण त्यांच्याकडून आनंद खरेदी केल्याच्या भ्रमात खुश असतो. मात्र कशासाठी व कुठला आनंद प्राप्त झाला, त्याचा खुलासाही आपण करू शकणार नाही, अशी केविलवाणी स्थिती झाली आहे.

त्यापेक्षा अतिशय गरीब वा सामान्य घरातली दिवाळी अधिक आनंदमय असते. ज्यांचा संसारच पाठीवर असतो, अशा भटक्या कुटुंबांची दिवाळी किंवा अन्य सण अधिक सुखद असतात. त्यांना घरच नसते तर त्याची सजावट करण्याचा प्रश्नच येत नाही. सुगंधी उटणे वा मोती साबणाने अंधोळी करण्यासाठी पाण्याचा नळ हजर नसतो. अशीही हजारो कुटुंबे दिवाळी साजरी करताना बघयला मिळतात. कधी तिथे थोडे डोकावून बघावे. त्यांच्या ताटात गोडधोड पदार्थ नसतील वा अंगावर नवनवे सुंदर कपडे नसतील. पण आज दिवाळी आहे, इतकाच त्यांचा आनंद असतो. जुनेच धुवून स्वच्छ केलेले कपडे परिधान केलेल्या अशा लोकांच्या मुखड्यावरचा आनंद खरी दिवाळी दाखवतो. कारण हाताशी वा खिशात काहीही नसताना अशी माणसे आनंदी रहाण्याचा प्रयास करतात. तेव्हा ते रोजची दुखणी वा वेदना यातना विसरून तो दिवस जगू बघत असतात. त्याला खरा विरंगुळा म्हणतात. अपेक्षाभंग, त्रुटी, अपुरेपणा वा विवंचना यापासून काही काळाची मुक्तता म्हणजे नवी उर्जा जमवणे असते. आनंद हा नव्या उर्जेचा जनक असतो. त्यासाठीच उत्सवाचे निमीत्त असते. त्यातून नव्या समस्या प्रसंगांना सामोरे जाण्याची आकांक्षा जागवली जावी, इतकीच अपेक्षा असते. रोजच्या जीवनात लागलेली धाप कमी होऊन ताजेपणाने जगण्य़ाला सामोरे जाण्यासाठी जमवलेली पुंजी म्हणजे आनंद असतो. दिवाळीसारखा उत्सव नवी उर्जा जमवण्यासाठी असतो. समस्या, अडचणी वा विवंचना प्रत्येकाच्या वेगळ्या असतील, तर प्रत्येकाचा विरंगुळाही वेगळाच असणार ना? त्याचे सवंगडी व सहकारी सुद्धा वेगवेगळे असणार आणि त्यांच्या एकत्रित आनंदाचे समिकरणही वेगळेच असणार. ते तयार मालाच्या बाजारात मिळत नाही. ते आपण, आपले व आपल्याच सग्यासोबत्यांच्या सहमतीने तयार करू शकतो. आपल्या घरातला मनातला अंधार बाजारातले दिवे संपवू शकत नाहीत.

1 comment: