Tuesday, October 11, 2016

यह तो सिर्फ़ झांकी है

Image result for pak cartoons

सर्जिकल स्ट्राईक या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा एकच माणूस मौन धारण करून आहे. अगदी त्यांच्या पक्षासह बाकी सर्व पक्ष व संबंधितांनी आपापली विद्वत्ता पाजळून झाली आहे. पण अतिशय शांतपणे ही परिस्थिती हाताळणारा हा माणूस, त्याविषयी गप्प आहे. तर निदान त्याच्या मौनाचा तरी उलगडा त्यांच्या विरोधकांनी करून घ्यायला नको काय? ज्यांना मोदींचा राजकीय पराभव करायचा आहे, त्यांनी मुळात मोदी समजून घेतला पाहिजे. अशा मोक्याच्या क्षणी हा माणूस गप्प कशाला राहातो, हे रहस्य महत्वाचे असते. त्याचे उत्तर बाकीच्या गदारोळात सापडत नाही. नेमक्या व मोजक्या बातम्या अभ्यासल्या, तर काही उलगडा होऊ शकतो. पहिली बाब म्हणजे इतके होऊनही यात गुंतलेले आणि ज्यांना अशा कारवाईची थोडी जाण आहे, त्यांनी कारवाई संपली नसल्याचा इशारा वारंवार दिलेला आहे. अशा कारवाया म्हणजे युद्ध नसते की संपले. हा निव्वळ आरंभही असू शकतो. त्यातून परस्परांना संकेत व इशारे दिले जात असतात. सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानला दिलेला इशारा आहे. म्हणजेच पुढे काहीतरी भयंकर वाढून ठेवले आहे, हे पाकिस्तानी सेनेला व मुत्सद्दी वर्गाला कळते आहे. म्हणून तर एका बाजूला प्रतिहल्ल्याचा पाकिस्तान इन्कार करतो आहे आणि दुसरीकडे त्याची युद्ध होऊच नये, म्हणून तारांबळ उडालेली आहे. खास प्रतिनिधी अमेरिकेला धाडून भारतावर बोलण्यासाठी दबाव आणायची धडपड त्याचाच एक भाग आहे. जर हल्ला झाला नाही किंवा विषय संपला असता, तर पाकिस्तानने अशी धडपड करण्याचे कारण नव्हते. पण त्यांना नेमके समजले आहे, की भारताने केले ती निव्वळ झांकी आहे. पुरा तमाशा बाकी आहे. त्यासाठीच पाक गडबडला आहे. पण इतके शहाणपण मोदी विरोधकांपाशी असते, तर गुजरातचा हा मुख्यमंत्री देशाचा पंतप्रधान कशाला झाला असता?

आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले असे आता बडबडणार्‍यांना, त्या शब्दाचा अर्थही समजलेला नाही. म्हणूनच लष्कराचे आजीमाजी अधिकारी काय सांगत आहेत, त्याकडेही ढुंकून बघण्याची यापैकी कोणाला गरज वाटलेली नाही. पाकिस्तानला धडा शिकवणे म्हणजे त्याची हिंमत खच्ची करणे असते. हे कार्य एखादा प्रतिहल्ला किंवा सर्जिकल स्ट्राईक करून पुर्ण होत नाही. असे अनेक हल्ले करावे लागणार आहेत आणि योग्य वेळ साधून पाकिस्तानची खुमखुमी जिरवावी लागणार आहे. म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी झाला तो प्रकार पहिला आहे आणि शेवटचा नक्कीच नाही. तर त्याला रंगीत तालीम म्हणता येईल. त्यातून पाकिस्तानची सज्जता तपासली गेली, तशीच आपली कुवतही जाणून घेतली गेली आहे. अशा अनुभवातून अधिकाधिक धाडसी कारवाया करायच्या योजना आखल्या जात असतात. त्या दृष्टीने बघितले तर आगामी दोनतीन महिन्यात पाक विरोधात युद्ध म्हणता येणार नाही, अशी कठोर व भेदक कारवाई होऊ शकणार आहे. त्याची व्युहरचना सध्या चालू आहे. त्यात पंतप्रधानाने तोंड उघडले तर पाकिस्तान अधिक सावध होण्याचा धोका आहे. इथल्या मुर्खांना आपली कुवत सिद्ध करून दाखवण्यापेक्षा, पाकिस्तानला बेसावध गाठण्याला कारवाईत प्राधान्य असते. अर्थात तसे काही पाऊल उचलले तर त्याचा राजकीय लाभ मोदी व भाजपाला मिळणारच आहे. आजची कारवाई भाजपाला तितकासा लाभ तीन महिन्यांनी देऊ शकली नसती. पण डिसेंबर महिन्यात अशा कारवाया लागोपाठ होत राहिल्या, तर काय होईल? फ़ेब्रुवारी मार्च महिन्यातल्या विधानसभेत त्याचा लाभ कोणाला मिळेल? तो मिळू नये म्हणून विरोधक त्या कारवाया रोखून धरू शकणार आहेत काय? नसेल तर आज गदारोळ करून काय मिळवले? कारण अजून हा विषय संपलेला नाही आणि कारवाईही संपलेली नाही.

पण इतक्यातच राजकीय लाभाचा विषय अवेळी उकरून काढला गेला आणि भाजपाचा मार्ग सोपा करून टाकलेला आहे. नोव्हेंबर डिसेंबर झाला, मग काश्मिरी खोर्‍यात बर्फ़ पडू लागतो. त्यानंतर भारतीय हद्दीत घुसणे अशक्य होऊन जाते. म्हणूनच ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात घुसखोरीचे प्रमाण वाढते. तेव्हा घुसखोरी केली, मग नंतर त्यांच्याकडून काश्मिरात उच्छाद माजवून घेता येतो, ही पाकची जुनीच पद्धत राहिली आहे. यावेळी अशा घुसखोरीला पायबंद घातला गेला आहे. जोडीला आधीच येऊन बसलेल्यांना हुडकून मारले जात आहे. त्यामुळे सीमा काटेकोर झालेल्या आहेत. नोव्हेंबर डिसेंबरनंतर घुसखोरी अशक्य होईल. म्हणजे काश्मिरात जिहादी कमी असतील. पण त्याचवेळी सर्जिकल स्ट्राईकच्या अनुभवामुळे भारतीय कमांडो वा सैनिकी तुकड्या पलिकडे घुसखोरी सहज करू शकतील. कारण त्या काळात पलिकडेही बर्फ़ाचे साम्राज्य असेल आणि जिहादींच्या छावण्याही ओस पडलेल्या असतील. त्या आणखी आत सुरक्षित प्रदेशात गेलेल्या असतील. म्हणजेच भारताने कारवाई करायची तर खोलवर मुसंडी मारून करता येऊ शकेल. त्याला प्रतिसाद देण्यासाठी सीमेच्या संपुर्ण लांबीवर पाकिस्तानलाही कमांडोच तैनात करावे लागतील. सामान्य सैनिक किंवा जिहादी आणि कमांडो; यात मोठा फ़रक असतो. भारताने संपुर्ण सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर दहाबारा जागी एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक करायचे योजले, तर पाकिस्तानी सेनेची सार्वत्रिक तारांबळ उडू शकते. ताजा अनुभव बघता पाकिस्तानकडे तितकी सज्जता नाही. म्हणजेच युद्ध केल्याशिवाय पाकला नुसत्या अशा धाडी घालून नामोहरम करणे शक्य आहे. कशावरून तशीच काही योजना भारताने शिजवलेली नाही? त्यासाठीच छाती फ़ुगवून जनतेपुढे येण्याचा मोह मोदींनी टाळला, असे ठामपणे नाकारता येईल काय? जेव्हा तशी मोठी कारवाई होईल, तेव्हा जनमत कुठे झुकेल?

अशा कारवाया ज्या काळात होतील, त्यानंतर महिनाभर तरी त्याचा गाजावाजा होत रहाणार. नेमका तोच काळ पाच विधानसभांच्या प्रचाराचा असणार. त्यावेळी मोदी प्रचारासाठी फ़िरत असतील आणि तेव्हा त्यांनी पाकविरोधी कारवाईबद्दल बोलू नये; असे बंधन कोणी घालू शकणार आहे काय? किंबहूना नोव्हेंबर डिसेंबर याच काळात मोठ्या धाडसी कारवायांची मोहिम राबवली गेली, तर मोदींनी प्रचारात त्याचा उल्लेख करण्याची तरी गरज भासणार आहे काय? उलट मोदी विरोधकच त्यासाठी हातभार लावतील. कारण तेव्हाचे नवे हल्ले ताजे असतील आणि त्याचीच माध्यमातून चर्चा चालेल. त्यात श्रेय मोदींचे वा भाजपाचे नाही; असे ओरडून विरोधकच सांगत असतील. पण जनमानसात काय प्रतिमा असतील? आपण पाकिस्तानला चोख उत्तर देऊ शकतो, धडा शिकवू शकतो, असे मोदींना बोलण्याची तरी गरज असेल काय? कृतीच त्यांच्यावतीने बोलणार आहे. किंबहूना हा धुर्त माणूस म्हणूनच आज सर्जिकल स्ट्राईकविषयी मौन पाळून आहे. कारण त्याला एकाचवेळी पाकला धडा शिकवायचा आहे, पण त्याचवेळी आपल्या देशांतर्गत विरोधकांनाची चितपट करायचे आहे. मात्र त्यासाठी संधीसाधूपणाचा आरोप मोदींवर होऊ शकणार नाही. कारण मागल्या आठवड्यात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण विरोधक आधीच करून बसले आहेत. त्यांनीच मोदींच्या हाती कोलित दिले आहे. मणिशंकर अय्यर यांनी ‘वो चायवाला’ असा हेटाळणीयुक्त उल्लेख केला आणि मोदींनी त्याचाच लोकसभा प्रचारात किती चतुराईने वापर करून घेतला, हे आपण विसरलो काय? इतका सावध माणूस आजकाल चालू असलेल्या गदारोळातही मौन धारण करतो, त्यात काही रहस्य म्हणूनच दडले आहे. त्याचा अर्थ झाला तो प्रतिहल्ला काहीच नाही. यापेक्षा मोठे काही होऊ घातले आहे. म्हणून म्हणतो, यह तो सिर्फ़ झांकी है!

9 comments:

  1. Legend of india ...
    Proud to him ...

    Hats off modiji...
    We appriciate ....

    ReplyDelete
  2. अतिशय मार्मिक विवेचन आंधळ्या मोदी विरोधामुळे तमाम सेकयुलॅरिस्टांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे

    ReplyDelete
  3. विश्र्लेषण चांगलेच आहे. भारतीतातील तथाकथित राजकीय पक्षांनी थोडेसे तरी देशप्रेम लक्षात घेऊन वागावे असे वाटते. कायमच राजकीय विरोध दर्शविला पाहीजे असे नाही. देशाची सुरक्षा त्या पेक्षा जास्त महत्त्वाची आहे.

    ReplyDelete
  4. आणखीन एक व्यक्ती मौन धरून आहे या संपूर्ण घडामोडींबद्दल जे पाकिस्तानसाठी जास्त धोकादायक ठरू शकतं, ती व्यक्ती म्हणजे ' अजीत डोवाल '

    ReplyDelete