Saturday, October 29, 2016

सावताची गुरू‘कृपा’



प्रामाणिकपणे सांगायचे तर दिवाळी उरकूनच मी घरी मुंबईत दिवाळीसाठी येऊन पोहोचलो. कारण आजकाल माझ्यासाठी पुण्यात जाणे हीच दिवाळी होऊन बसली आहे. पुण्यात बरेच मित्र सवंगडी तयार झालेत आणि त्यातले काही फ़ेसबुकातून येऊन भिडलेले. त्यातला गुरू सावंत एक! योगायोगाने पक्का मालवणी आणि त्यातही पुन्हा ‘सावंतवाडीचो’! मग काय दोनतीनदा भेटीगाठी झाल्या आणि आपोआप गाडी मासेमच्छीकडे वळली. मालवणी माणसाची नाती माश्याच्या काट्याइतकी बोचरी आणि त्याच्या चवी इतकीच लज्जतदार असतात. ही नाती जपण्या जोपासण्यासाठी तशीच गृहिणी घरात असावी लागते. गुरू तसा नशिबवान! त्याच्या घरात साक्षात सुग्रणींचा वास आहे. (इथे वास याचा अर्थ वस्ती असा घ्यावा. नाहीतरी आम्ही मालवणी लोक माश्याचा वास अधिक प्रिय असलेले लोक!) योगायोग असा की ओळखी नंतर काही काळातच गुरूला आपल्या गृहिणीच्या कुशलतेचा व्यापारी साक्षत्कार झाला आणि त्याने तिच्या पाकशास्त्राचा उपयोग करण्याचे मनावर घेतले. त्यातून पुण्यात एक चविष्ट मालवणी मासे मिळण्याची सोय झाली. त्याच्या या प्रयोगाचा पहिला साक्षीदार मीच होतो. त्याने हा उद्योग आरंभला आणि मलाही त्याबद्दल विचारले होते. प्रतिसाद त्याला मिळालेलाच होता. पण मी पुण्यात पोहोचलो आणि पहिल्याच संध्याकाळी गुरू मासळीचे जेवण घेऊन हजर झाला. सुरमई, बांगडा वगैरे गोष्टी नेहमीच्याच होत्या. पण त्यातला तिरफ़ळाचा स्वाद कुठल्या कुठे घेऊन गेला. तेव्हापासून माझ्या पुण्यात जाण्याची दिवाळी होऊन गेली. कारण एक तर बाहेर कुठून तरी खायचे म्हणजे वैताग. अशा विपरीत स्थितीत अस्सल मालवणी चवीचे माशाचे पदार्थ मिळाल्यावर दिवाळी नाही तर काय म्हणायचे? दिवाळी म्हणजे आनंदाचा सोहळा! तो यापेक्षा वेगळा कसा असेल?

गुरूची गृहिणी म्हणजे स्मिताच्या भरवशावर गुरूने हा उद्योग करायचे ठरवले आणि आरंभही केला. पण तिच्या हातचे पदार्थ चाखल्यावर मला एकदम अर्धशतक मागे गेल्यासारखे वाटले. बालपणी आई, मावश्या किंवा आजीच्या हातचे पदार्थ खाल्ले, तेव्हा बाजारात तयार मसाले मिळत नव्हते आणि आजच्यासारखे चमचमित पदार्थ ही तेव्हाची पद्धत नव्हती. सकस आणि पौष्टीक जेवण, हा मागच्या पिढीचा दंडक होता. त्यामुळे तेव्हाच्या खाल्लेल्या माशांची चव बदलली नसली, तरी मसाले आणि बनवण्याच्या पद्धतीमुळे अनेक माश्यांची चव बदलून गेली आहे. तारलीला सुटणारे तेल आणि खेकड्याच्या डेंग्यातली पोकळी भरून राहिलेला सुक्या खोबर्‍याचा रस; यांची अजब रसायने आज दुरापास्त झाली आहेत. शहरातल्या कुठल्या घरातही आज ती चव मिळेनाशी झाली आहे. अगदीच तळ कोकणातल्या कुठल्या आडगावात गेल्यास तशी ओरिजीनल चव चाखायला मिळते. तव्यावर भाजलेल्या ओल्या खोबर्‍यासह तांबड्या मिरचीचे केलेले वाटण, आता दुर्मिळ झाले आहे. त्या चवी फ़क्त आठवायच्या अशा निराश मानसिकतेने अस्वस्थ असलेल्या मला, अकस्मात गुरूच्या या उद्योगाने नवी संजिवनी दिली. पहिल्यांदा हौसेने गुरू हे पदार्थ घेऊन आला तेव्हाच मी त्याला वडीलकीचा सल्ला दिल्यासारखे धंदा कसा चाललाय म्हणून विचारले. तोही खुश दिसत होता. पण काही लोकांना चव आवडली नसल्याचे त्यानेच सांगितले. तेव्हा गुरूला एकच वॉर्निंग दिली. ज्यांना तुझ्या माश्यांची चव आवडणार नाही, त्यांच्याकडे पाठ फ़िरव. पण गृहलक्ष्मीच्या हातची चव बदलायची नाही. कारण ही अस्सल मालवणी कोकणी चव आहे. ज्यांना ती कळणार नसेल, त्यांची गिर्‍हायकी विसरून जा. वेळ लागेल, पण ज्यांना खरे मालवणी मासे खायचे आहेत, त्यांच्यासाठी ह्यात तसूभर बदल होऊन चालणार नाही.


                                                 (खुबे म्हणजे मोठ्या तिसर्‍या)

त्यानंतर मागल्या ऑगस्ट महिन्यातली गोष्ट आहे. सातार्‍याहून पुण्याला येणार होतो आणि तेव्हाही मला मासे खाऊ घालण्याची गुरूला घाई झालेली होती. म्हणजे झाले असे, की त्याने एकेदिवशी फ़ेसबुकवर खुब्यांचे सुके केल्याचा फ़ोटो त्याने टाकला होता. सवयीनुसार मी त्याला तिथेच फ़ेसबुकवर शिव्या घातल्या. ‘साले खातात आणि इतरांच्या तोंडाला पाणी आणून सतावतात’. गुरूच्या मनात तो अपराधगंड राहिला आणि मी पुण्यात कधी येतोय म्हणून सारखे विचारत राहिला. त्या दिवशी संध्याकाळी पुण्यात पोहोचतोय म्हटल्यावर गड्याने खुबे, तारल्या, खेकडे, सुरमई असा जामानिमाच सज्ज करून आणला. दोन दिवस माझी दिवाळी झाली. अर्थात फ़्रीजच्या कृपेने! त्या रात्री माझ्या ओसाड घरात गुरू आणि मी एकत्र जेवलो. मग तो निसटला आणि रात्री उशिरा मी पुन्हा मांदेलीचे कालवण आणि भात खाल्ला. अपरात्र झाली होती. पण तेव्हाच गुरूला फ़ोन करायचा मोह आवरत नव्हता तरीही थांबलो आणि सकाळी उठल्या उठल्या फ़ोन लावला. म्हटले फ़ोन बायकोकडे दे. तिला म्हटले मांदेलीच्या कालवणात काय घातले होते? बिचारी गडबडली. सर्व सांगत होती, पण मुख्य गोष्ट तिलाही सुचत नव्हती. त्या कालवणात घातलेले हळदीचे हिरवे पान कालवणाची चव पुरती बदलून टाकणारे होते. त्याबद्दल विचारले तर स्मिता (गुरूची पत्नी) आणखीनच गोंधळली. तिला विचारले पुण्यातल्या चाळीत हळदीचे पान कुठून आणलेस? तिने उत्तर दिले दारातच कुंडीत हळद लावलीय. कुठल्याही पॉश हॉटेलात गेलात तरी हा स्वाद आणि हीच चव मिळणार नाही. माश्याच्या कालवणातले हळदीचे हिरवे पान त्याचा स्वाद, मसाल्याच्याही थोबाडात मारणारा असतो. यावेळी अडिच महिन्यांनी पुण्यात पोहोचलो आणि गुरू अन्य दोन मित्रांसह जेवणाचा बेत करूनच आलेला. माझ्यासाठी खास सुक्या मासळीचा बेत होता.

सुक्या बांगड्याची आमटी अधिक सुक्या सुंगटाची मसालेदार भाजी! हा गुरूचा नवा बेत आहे. ‘गरीबकी थाली’ म्हणून त्याला त्याचे मार्केटींग करायचे आहे. त्याची पत्नी स्मिता व धाकटी वहिनी अजिता, ह्या दोघी सुग्रणी आहेत. ज्यांनी अस्सल मालवणी घरातले मासे खाल्लेत किंवा जे कोणी अशा चवींना दिर्घकाळ वंचित राहिलेत, त्यांनाच माझी दिवाळी म्हणजे काय झाले; त्याचा अंदाज येऊ शकतो. प्रत्येक माशाची चव वेगळी असते आणि त्यातले मसालेही जातीपातीनुसार बदलतात. त्यात पुन्हा प्रत्येक घरातील सुग्रणीची छाप त्या चवीवर पडतेच. स्मिता आणि अजिता या दोन मुलींनी माझ्यासारख्या सत्तरीतल्या म्हातार्‍याला पन्नास वर्षे मागे नेऊन सोडले. या दोघीहीही खुप म्हातार्‍या होईपर्यंत त्यांना दिर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशा अस्सल मालवणी चवीचे परंपारीक मासे निदान दोनतीन पिढ्यांना खायला मिळोत अशी या दिवाळीची तमाम मासेखाऊंना शुभेच्छा! ज्यांनी कुठल्या तरी बाजारू हॉटेलात आचारी वा शेफ़च्या हातचे मासे मालवणी म्हणून खाल्ले असतील, त्यांना या दोन मुलींच्या हाताची चव कधीच कळणार नाही. पण ज्यांना खरोखरीचे मालवणी मासे व त्यातली विविधता चाखायची आहे, त्यांच्यासाठी गुरू‘कृपा’ साध्य करून घ्यावी. गृहिणीची खासियत तिच्या पाकशास्त्रात असते आणि सुदैवी मुलीच हाताची चव घेऊन जन्माला येतात. अजिता व स्मिता या मुलींना ते वरदान लाभले आहे. ही खरीतर देवाने गुरू सावंतावर केलेली कृपा आहे. त्याचा कृपाप्रसाद माझ्याही वाट्याला फ़ेसबुकमुळे आला. गुरूशी संपर्क साधून कोणालाही ह्या आनंदाची चव चाखता येईल. कारण त्याचे कुठे हॉटेल नाही, की भटारखाना नाही. खरेच घरगुती जेवण. या दोन मुलींना एकच सांगेन, उद्या व्यवसायात कितीही मोठे व्हा, किंवा हॉटेल काढा. पण त्यात तुमच्या हाताचा स्पर्श असल्याशिवाय माश्याला चव येत नाही, हे विसरू नका पोरींनो!

गुरू सावंत  (७०२८० ७८४३३ - ८००७७ ७८४३३)

4 comments:

  1. Very nice change in the topic bhau. Subject is as delicious as the actual preparation. Sawants need special pat on their back for this venture - not for anything but for keeping tradition of malvani food alive with their actual tastes. Bravo

    ReplyDelete
  2. भाऊ तोंड खवळलय ... कोंबडी अवडत असेल तर सांगलीला एकदा आवश्य या अथवा दौरा असल्यास सांगा अस्सल देशी कोंबडी किंवा खास आटपाडीचे बोकड करुयात

    ReplyDelete