Monday, October 3, 2016

त्यात कसला पराक्रम?

award wapsi के लिए चित्र परिणाम

पहिल्या दिवसाचा जोश उतरला आणि हळुहळू राजकारण सुरू झाले आहे. प्रथमच जिहादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले गेल्याने, दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सेनेचे कोडकौतुक झाले. अशावेळी वेगळा सूर लावणे अव्यवहार्य असते. म्हणूनच अनेकजण मनात असूनही मोदी विरोधातला शब्द बोलू शकले नव्हते. केजरीवाल किंवा राहुल गांधी यांनी मोदींचे नावही न घेता भारतीय सेनेची पाठ थोपटली. पण त्याकडे झालेले दुर्लक्ष ओळखून राहुल सावरले आणि उत्तरप्रदेशात प्रचार मोहिमेत एका जागी त्यांनी मोदींनी चांगले काम केल्याची उपरोधिक पावती दिली. म्हणजे अडीच वर्षात केलेले पहिले चांगले काम, असे त्यांचे शब्द होते. मात्र ज्यांना देशहितापेक्षाही राजकीय शत्रुत्व मोठे वाटते, त्यांनी कौतुक करण्याचा विषयच येत नव्हता. फ़क्त लोकांच्या क्षोभाला सामोरे जाण्याची हिंमत नसल्याने, असे विघ्नसंतुष्ट गप्प होते. पहिला भर ओसरल्यावर अशा लोकांनी त्यात मोदींचा पराक्रम काय, असा सवाल विचारायला सुरूवात केली. तसा सवाल करण्यात गैर काहीच नाही. मोदी असो किंवा मनमोहन सरकार असो, ते सांगतील त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचे काहीच कारण नाही. म्हणूनच मतभिन्नता गैर नाही. पण गैरसमज पसवरवणे गैरलागू असते. अफ़वा किंवा थापा संपुर्ण खोट्या नसतात. त्यातले खोटे खर्‍याच्या वेस्टनात बांधून सादर केलेले असते. म्हणूनच मोदींचा पराक्रम कोणता, हा सवालही तसाच खर्‍याच्या आधारे केलेला खोटा प्रचार आहे. त्याचा समाचार घेणे अगत्याचे आहे. किंबहूना त्या निमीत्ताने भारतीय कारवाईचा पुरूषार्थ अधिक स्पष्ट होऊन जातो. मोदींना कमी लेखण्यासाठी वा जाहिरातबाज ठरवण्यासाठी, यापुर्वीही अशा कारवाया झाल्या व मनमोहन सरकारच्या काळातही झाल्याचे हवाले दिले गेले आहेत. प्रत्यक्ष त्या काळात काय घडले होते?

आज ज्यांना भारतीय सेनेच्या कर्तबगारीची गुणवत्ता आठवते आहे, त्यांनीच त्या काळात भारतीय सेनादलांना खच्ची करण्याचा कोणता डाव खेळला होता, त्याकडेही बघणे अगत्याचे आहे. मग आजची व मागची सेना, यातला फ़रक लक्षात येऊ शकतो. सैनिक आपल्या जीवावर उदार होऊन लढत असतो. त्यात आपण मारले जाणेही शक्य असल्याचे त्याला पक्के ठाऊक असते. पण देशातल्या जनतेसाठी देशासाठी काही उदात्त कर्तव्य करतोय, अशीच त्याची प्रेरणा असते. त्याची ती धारणा कायम रहाणे अगत्याचे असते. तरच त्याच्या हाती असलेले शस्त्र भेदक व प्रभावी ठरू शकत असते. सैन्याचे मनोधैर्य त्याचे सर्वात मोठे हत्यार असते. उलट त्याच्या हाती कितीही मोठे भेदक शस्त्र असताना मनोधैर्य खच्ची झालेले असेल, तर सैनिक लढू शकत नाही. म्हणूनच सैन्याला खच्ची करण्यावर शत्रू भर देत असतो. त्यासाठी शत्रू तुमच्या देशाचे व सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्याला प्राथमिक लढाई मानत असतो. ते काम कोणी घातपाती वा शत्रूसैनिक करीत नाहीत. ती कामगिरी आपल्यत वावरणार्‍या शत्रूच्या हस्तकांना पार पाडावी लागत असते. ते हस्तक अतिशय मोक्याच्या जागा धरून असतात किंवा मोक्याच्या जागी बसलेल्यांनाच शत्रू त्याचे हस्तक म्हणून निवडत व नेमत असतो. त्यात बुद्धीजिवी, प्राध्यापक, कलावंत, पत्रकार, अधिकारी अशा विविध पेशातील मंडळीची निवड होत असते. त्यांनी आपली बुद्धी समाजाच्या बुद्धीभेदासाठी पणाला लावावी, अशी कामगिरी त्यांच्यावर सोपवलेली असते. अतिशय सौम्य मार्गाने, शब्दातून, प्रतिमातून सामान्य समाजाचे व पर्यायाने देशाचे मनोधैर्य खच्ची करत जाण्याची कामगिरी ही मंडळी शत्रूसाठी पार पाडत असतात. तुम्हाला आपले अस्तित्व, आपली संस्कृती, चालिरिती, यांची तुम्हाला लाज वाटू लागते, तितके तुम्ही त्यांच्या बचावाला लढायची हिंमत गमावून बसत असता. तुमचा पराक्रम अभिमान पोखरून काढण्यातून हे काम साध्य होत असते.

शांततेचा काळ म्हणजे दोन शत्रू देशातील अघोषित युद्धच असते. त्या काळात अशा हस्तकांचा खुप फ़ायदा होत असतो. पण युद्धाची पाळी येत नाही, तोपर्यंतच अशा हस्तकांचा उपयोग असतो. प्रत्यक्ष युद्धासाठी अशा हस्तकांवर विसंबून लढता येत नाही. कारण ते घातपाती असतात, योद्धे नसतात. पाकिस्तानची तिथेच खरी फ़सगत झाली आहे. मागल्या दोन दशकात पाकिस्तानने खर्‍या सेनेपेक्षा त्यांचे हेरखाते, भारतातील त्यांचे हस्तक आणि जिहादी लढवय्ये; यांच्यावरच विसंबून रहाणे पसंत केले. त्यातून भारताला लढण्यापर्यंत येऊ द्यायचे नाही आणि उचापती करून हैराण करून सोडायचे, हीच पाकची रणनिती झाली. त्यासाठी पाकला अशा हस्तकांनी बहुमोल मदत केली, यात शंका नाही. किंबहूना म्हणून तर आज जी आत घुसून भारताने कारवाई केली, ती क्षमता मनमोहन सरकारच्या काळातही वापरता आली असती. पण तितकी हिंमत ते सरकार दाखवू शकले नाही. पर्यायाने भारतीय सेनेलाही तशी हिंमत करता आली नाही. त्यासाठी राजकीय नेतृत्वाला भयभीत करण्याची मोलाची कामगिरी पाकचे इथले हस्तक पार पाडत होते. आजही तेच चालू होते. पण त्यांना झुगारणारा नेता पंतप्रधानपदी बसलाय, हे ओळखून पाकने उचापती कमी करायला हव्या होत्या. कारण भारतीय सेनेला अंगावर घेण्याची पाकची कुवत नाही आणि मोदींना रोखण्याची कुवत इथल्या पाक हस्तकांपाशी नव्हती. इथेच पाकचे सर्व समिकरण फ़सत गेले. सत्ता मोदींच्या हाती आल्यानंतर लष्कराला घातपाताला वेसण घालण्याचे सर्वाधिकार दिले गेले आणि चित्र पालटले होते. मात्र पाकला वा त्यांच्या इथल्या हस्तकांना हा बदल ओळखून सावध होता आले नाही. हे हस्तक कसे काम करतात आणि त्यातून काय परिणाम साधला जातो, तेही म्हणूनच समजून घेण्याची गरज आहे. तरच पाक कुठे फ़सला व हरला तेही लक्षात येऊ शकेल.

परवाच्या सीमापार कारवाईत पाकचे दोन सैनिक मारले गेल्याची कबुली त्यांच्या बाजूने आलेली आहेच. पण त्याच्याही आधी भारतीय सेना प्रवक्त्याने त्याची माहिती दिलेलीच होती. हे सैनिक जिहादी तळावरचे नाहीत. तर अशी काही घुसखोरी झाल्याचा सुगावा लागताच तिथे आलेले पाकसेनेचे कमांडो होते. दोन ट्रक भरून हे पाक कमांडो घटनास्थळी पोहोचले. पण त्यांना भारतीय घुसखोरांना रोखता आले नाही, की जखमीही करता आले नाही. उलट त्यांचे दोन कमांडो मारले गेले आणि नऊ जखमी झाले. याचा अर्थ काय होतो? पाकचे कमांडो वा सैनिकही आता लढण्याच्या सज्जतेमध्ये राहिलेले नाहीत. समोरून हल्ला झाला आणि आपल्या हद्दीत हल्ला झाला, तरी त्यांना बचावही करता आलेला नाही. हा त्यांच्या हिंमतीचा अभाव नसून लढण्याच्या सज्जतेत रहाण्याची त्यांची सवय गेलेली आहे. दुसरी चुक पाकसेनेने लढायची सज्जता राखण्यापेक्षा घातपाती, जिहादी, परकीय हस्तक आणि शत्रूची कमजोरी, ह्यांनाच आपले बळ मानलेले आहे. प्रत्यक्ष सैन्याने लढायचे, ही कल्पनाच पाकिस्तान विसरून गेला आहे. त्यामुळे युद्धाचा, लढाईचा प्रसंग आला आणि त्यांना सपाटून मार खावा लागला आहे. त्यांनी भारतातील आपले हस्तक व जिहादी पोसण्यापेक्षा त्यांच्या सेनेला बलवान बनवले असते आणि त्यावर विसंबून राहिले असते, तर ही नामूष्की पाकवर आली नसती. म्हणून मनमोहन सरकार असताना भारतीय सेनेला पराक्रम करून दाखवता आला नव्हता. कारण राजकीय नेतृत्व नेभळट होते. आजचे नेतृत्व धाडसी आहे. उलट पाकसेना लढायचे विसरून गेली असून कुरापत म्हणजेच लढाई, असा भ्रम तिने करून घेतला आहे. मागली दहापंधरा वर्षे पाकचे इथले हस्तक त्यांची लढाई भारतातून कसे लढवत होते, त्याचा उहपोह आणि विश्लेषण म्हणूनच अगत्याचे ठरावे. पुढल्या काही लेखातून त्याचाच गोषवारा देण्याचा प्रयत्न करणार आहे.

2 comments:

  1. बरोबर भाऊ असे हस्तक हुडकून हुडकून ठेचायला हवेत

    ReplyDelete
  2. Modi nni teh aadhich herley astil..halu halu yetil bedya ghalaila.

    ReplyDelete