Monday, October 17, 2016

अमित शहा नको, केजरीवाल व्हा!

shivsena shiwajipark के लिए चित्र परिणाम

मुंबईत तुलनेने भारताच्या एक टक्का लोकसंख्या आहे आणि तिथे आपले बस्तान पक्के करायचे असेल, तर शिवसेनेने केजरीवालचा आदर्श समोर ठेवावा. तर भाजपाला चोख उत्तर देता येईल. अर्थात ते भाजपाला चोख उत्तर नसेल तर दिल्ली गमावणार्‍या भाजपा नेत्यांचा आदर्श बाळगणार्‍या किरीट सोमय्या वा आशिष शेलार यांना धडा शिकवता येईल. सध्या जे नाटक मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या निमीत्ताने रंगलेले आहे, त्यात शिवसेनेला आपले बस्तान पक्के करण्याची चिंता आहे. केजरीवाल यांच्यावर ती पाळी गेल्या लोकसभेनंतर आलेली होती. सहा महिने आधी मिळवलेल्या दिल्लीतील मर्यादित यशानंतर केजरीवाल यांना एकदम पंतप्रधानकीची स्वप्ने पडू लागली होती. त्यांनी जो उतावळेपणा केला, तो त्यांचा एकट्याचा मुर्खपणा नव्हता. त्यासाठी त्यांना माध्यमातील काही अतिशहाण्यांनी भरीस घातले होते. भारतीयांना बदल हवा आहे आणि तो चमत्कार केजरीवालच घडवू शकतात, असे त्यांच्या डोक्यात भरवणार्‍यांनी दिल्लीवर लाथ मारायला केजरीवालना भाग पाडले होते. पण त्यात फ़टका बसल्यावर केजरीवाल एक धडा शिकले, की हाती असलेले गमावण्यात अर्थ नसतो. म्हणूनच त्यांनी पुढल्या काळात आपले अत्यंत विश्वासू सहकारी सोडून गेले तरी पर्वा केली नाही. पण दिल्लीतले बस्तान पक्के करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. ज्या दिल्लीत त्यांनी ७० पैकी २८ जागा जिंकल्या होत्या, तिथे लोकसभेत त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. पण त्या अनुभवातून शिकलेले केजरीवाल मग पुन्हा दिल्ली मिळवायला कटीबद्ध झाले आणि त्यांनी दिल्लीबाहेर कुठेही न लढण्याचा ठाम निर्णय घेतला. सगळी शक्ती दिल्लीत पणाला लावली. त्यांचे काम वा आव्हान सोपे नव्हते. पण दिल्ली विधानसभेचे निकाल लागले, तेव्हा अमित शहाच नव्हेतर सर्वांनाच तोंडात बोट घालावे लागले होते.

आज काहीशी तशीच स्थिती मुंबई महाराष्ट्रात आहे. लोकसभा जिंकली आणि पाठोपाठ विधानसभेत मोठे यश मिळवले, म्हणून भाजपाच्या काही नेत्यांना उतावळेपणाची बाधा झालेली आहे. त्यांना अवघी मुंबई आपल्याच खिशात असल्याची स्वप्ने पडत आहेत. पण तशीच स्वप्ने दिल्लीतही रंगवली गेलेली होती. कुठल्याही अन्य पक्षातून येणार्‍याचे भाजपा दिल्लीत बाहू पसरून स्वागत करत होता. उलट केजरीवाल यांनी तोंड बंद ठेवले आणि एकेका मतदारसंघात आपली संघटना नव्याने मजबूत केली. चार महिने त्यांनी विधानसभेच्या प्रत्येक मतदाराला दोनतीनदा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता भेटेल, अशी तयारी केली आणि चमत्कार घडला. आधीच्या २८ जागांवरून त्यांनी ७० पैकी ६७ आमदार निवडून येण्यापर्यंत झेप घेतली. पण समजा केजरीवाल अशी रणनिती राबवण्यापेक्षा भाजपाला शिव्याशाप देत रमले असते, किंवा प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसले असते, तर तितक्या जागा त्यांना जिंकता आल्या असत्या काय? ते काम त्यांनी दिल्लीकर भाजपा नेत्यांवर सोपवले. भाजपाचे दिल्लीतील नेते नित्यनेमाने आम आदमी पक्षाची निंदानालस्ती करण्यात रममाण झालेले होते. रोज कसला तरी आरोप किंवा कुणा नव्या फ़ुटीराचे पक्षात स्वागत करण्यात भाजपा नेते गुंतले होते. आपली शक्ती वाढवण्यापेक्षा दुसर्‍याला फ़ोडण्यात भाजपा गर्क होता. तर जाणार्‍याकडे वळून बघण्यापेक्षा केजरीवाल आपल्या मतदाराला जपून ठेवण्यासाठी शक्ती खर्ची घालत होते. लोक मतदान करतात आणि त्याच मतांनी उमेदवार निवडून येत असतात. एकमेकांची निंदानालस्ती करण्याने जमावाचे मनोरंजन नक्की होते. पण साध्य काहीच होत नाही. आज मुंबई महाराष्ट्रातील भाजपा नेते तेच काम करीत असतील, तर शिवसेनेने त्यांना शुभेच्छा देऊन आपला मतदार जमा करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी केजरीवाल हा आदर्श आहे.

मागल्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेला मुंबईत स्वबळावर मिळालेले यश तिच्यावर मतदाराने दाखवलेला विश्वास आहे. मात्र जितका खराखुरा सेनेचा निष्ठावान मतदार आहे, तितक सगळा बाहेर काढला गेला, अशी हमी शिवसेनाही देऊ शकणार नाही. तो सगळा बाहेर पडला वा काढला गेला असता, तर याहीपेक्षा अधिक मोठे यश शिवसेनेला मिळू शकले असते. आताही सेनेला प्रत्येक टोमणा किंवा आरोपाला उत्तर देत वेळ दवडण्याचे कारण नाही. कालपरवाच जळगावमध्ये भाजपाच्या दोन गटांमध्ये झालेली हाणामारी त्या पक्षाला कुठे घेऊन चालली आहे, त्याची प्रचिती आणून देते आहे. कारण निदान भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना मोदींना मतदाराने कशाला इतक्या पाठबळाने निवडून दिले; त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. इतकी वर्षे कॉग्रेसने मस्ती केली, तशी आपल्याला जनतेने दिलेली संधी असल्याची समजूत करून हे लोक वावरत आहेत. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन सेनेने आपले मुंबईतील बस्तान अधिक पक्के करण्यावर लक्ष केंद्रीत केले, तर महापालिकांचे निकालच अनेकांना उत्तर देऊ शकतील. त्यासाठी आदर्श केजरीवाल आहे. त्या पद्धतीने काम केले तर मुंबई एकहाती जिंकणे शिवसेनेला शक्य आहे. कारण मागल्या पन्नास वर्षात सेनेचा भक्कम संघटनात्मक पाया मुंबई परिसरात तयार झाला आहे. मात्र तो पाया आहे म्हणून तुम्ही निवडून येत नसता. त्याचा पुरता वापर करण्याची मेहनत घ्यावी लागते. मतदानाच्या दिवशी आपला एक एक मतदार बाहेर पडेल अशी व्यवस्था उभारण्यात यश असते. तितकी संघटनात्मक ताकद भाजपाकडे नाही, याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. सवाल सेनेने आपली शक्ती ओळखण्याचा व पणाला लावण्याचा आहे. त्याऐवजी तोंडपाटिलकी करण्यात वेळ खर्ची घातला, मग इवलेसे तोंड करण्याला पर्याय उरत नाही.

गेल्या खेपेस विधानसभेला वरसोवा किंवा अशाच कुठल्या जागी सेनेच्या उमेदवाराचा अर्ज रद्द झाला. तर तिथे पर्यायी डमी उमेदवारही नव्हता. याला सज्जता म्हणता येत नाही. तेव्हाही तोंडाची वाफ़ दवडण्यापेक्षा ती सज्जता केली असती, तर भाजपाला एक आमदार सहज मिळवता आला नसता. म्हणूनच आगामी पालिका मतदानात बाजी मारायची असेल, तर सेनेने आपल्या तमाम वाचाळवीरांच्या मुसक्या बांधाव्यात. ज्यांना इतकीच खुमखुमी असेल त्यांना दोनचार प्रभागांची बांधणी करण्याच्या कामी जुंपावे. ज्यांना असे काम जमत नाही, तेच अधिक बकवास करीत असतात. भाजपाच्या अशाच वाचाळवीरांनी दिल्लीत पक्षाला तोंडघशी पाडलेले होते आणि बिहार सुद्धा त्यामुळेच गमावलेला होता. त्याचीच बेगमी किरीट सोमय्या व आशिष शेलार सारखी मंडळी मुंबईत करत असतील, तर त्यात व्यत्यय आणण्याची सेनेला गरज नाही. मोदी आणि भाजपा यात सामान्य मतदार फ़रक करतो. मोदी पंतप्रधान म्हणून हवे, तर त्यासाठी मुंबई पालिकेत भाजपाला सत्ता देण्याची गरज नसते, हे सामान्य मतदाराला कळते. तेच भाजपाच्या नेत्यांना समजावण्याची त्या मतदाराला संधी देण्याची कामगिरी शिवसेनेला पार पाडायची आहे. अर्थात ती जबाबदारी सेनेचे नेतृत्व ओळखू शकले तरची गोष्ट आहे. केजरीवाल ते ओळखू शकले, म्हणून लोकसभेच्या पराभवानंतरही दणदणित यश मिळवू शकले. भाजपाच्या किरीट-परीटांना सामान्य मतदाराने योग्य उत्तर दिले. ते आजच होणे आवश्यक आहे आणि भाजपाच्या हितासाठीही अगत्याचे आहे. अन्यथा असे दिवाळखोर मोदींना पुढल्या लोकसभा निवडणूका अवघड करून टाकण्याचा धोका आहे. थोडक्यात शिवसेनेने मोदींसाठी हे काम कर्तव्य भावनेने पार पाडण्याची काळजी घ्यावी. शिवसेना मुंबई ठाण्यात जिंकली, तर मोदींनाही सेनेची महत्ता समजू शकेल. ती बोलून दाखवण्याची गरज उरलेली नसेल.

2 comments: