Saturday, October 8, 2016

विरोधी पक्षातले फ़िदायिनतीन दिवसांपुर्वी राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशात प्रचार मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रथमच कौतुक केले होते. तेही उपरोधिक शब्दातले होते. पण त्यालाही पर्याय नव्हता. देशभर आणि जगात मोदी सरकारची सर्जिकल स्ट्राईकसाठी पाठ थोपटली जात होती. खरे तर आधीच राहुलनी भारतीय सेनादलाचे कौतुक केलेले होते. परंतु  भारत सरकारला श्रेय देण्याचे टाळले होते. शेवटी जगभर मोदींची पाठ थोपटली जाते बघून मागे राहू नये, म्हणून राहुलनेही मोदींचे कौतुक उपरोधिक शब्दात उरकले. अडिच वर्षात पहिले चांगले काम मोदींनी केले, अशीही पुस्ती त्यासाठी जोडली. खरोखरच त्याची गरज होती काय? यापुर्वी असेच सर्जिकल स्ट्राईक होत असतील आणि राहुलच्या युपीए सरकारनेही तसे केलेले असतील, तर तेव्हाही कॉग्रेससह राहुलनी मोदींची पाठ थोपटण्याचे काहीही कारण नव्हते. सेनादलाकडून तशी घोषणा होताच तशा घोषणेलाच आव्हान द्यायला हवे होते. अशा घोषणा करायच्या नसतात, असे तरी सांगायला हवे होते आणि तेव्हाच आपण कसे तशा कारवायांविषयी मौन राखले होते, त्याचाही दाखला द्यायला हवा होता. पण कॉग्रेस किंवा राहुलनी तसे काही केले नाही. तर जगाने मोदींची पाठ थोपटली तशीच यांनीही मोदींचे कौतुक केले. दोनतीन दिवसांनी त्यांना अकस्मात स्वप्न पडले, की मोदींनी नवे काहीच केलेले नाही. सर्जिकल स्ट्राईक ही नेहमीचीच गोष्ट आहे. आपणही तसे प्रतिहल्ले केलेले आहेत. मग मोदी कशाला स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत? अर्थात मोदींनी स्वत:ची पाठ अजिबात थोपटून घेतलेली नाही. त्यांनी ती घोषणा केलेली नाही, की त्याविषयी कुठेही जाहिर वाच्यताही केलेली नाही. मोदींचे कौतुक जगाने आणि कॉग्रेससह राहुलने केलेले होते. तेव्हा श्रेयाचाच विषय असेल, तर मोदींना त्या प्रतिहल्ल्याचे श्रेय देण्य़ाचे पाप खुद्द राहुलनी केलेले आहे. मात्र जाब मोदींकडे मागत आहेत.

दुसरी गोष्ट कॉग्रेसच्या जमान्यातील सर्जिकल स्ट्राईकची. २०१२ ते २०१४ या कालखंडात लष्करी कारवाईचे प्रमुख लेफ़्टनंट जनरल विनोद भाटिया होते. त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. असा कुठलाही सर्जिकल स्ट्राईक यापुर्वी झालेला नाही. यापुर्वी व्हायच्या त्या किरकोळीतल्या घटना होत्या, पाककडून हद्द ओलांडून सैनिकांचे पथक इकडे आले किंवा आमच्याकडून पथक तिकडे गेले. ते किरकोळ प्रकार होते. स्थानिक पातळीवर सेनाधिकार्‍यांनी परस्पर केलेल्या कारवाया होत्या. ज्याचा सरकारच्या धोरणात्मक बाबींची संबंध येत नाही. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय योजनाबद्ध रितीने आखलेली व राबवलेली कृती होय. त्यात परकीय हद्दीत जाऊन प्रतिहल्ला करायचा असल्याने, राजनैतिक करारांचा भंग होण्याची शक्यता असते. म्हणून राजकीय पातळीवर त्याचे निर्णय घेतले जातात. तेव्हाच इतकी मोठी व्यापक व नियोजनबद्ध कारवाई होऊ शकते. तशी यापुर्वी झालेली नाही, अशी माहिती भाटियांनी दिली आहे. आता युपीएच्या कालखंडात लष्करी अधिकार्‍यांनाही बाजूला ठेवून शरद पवार, चिदंबरम, राहुल गांधी व आनंद शर्मा अशा कारवाया करीत असतील, तर गोष्ट वेगळी! राहुलची गोष्ट वेगळी होती. ते पंतप्रधानांना बाजूला ठेवून विधेयके वा विविध टेंडरेही देतघेत होतेच की. म्हणूनच सेनेलाही बाजुला ठेवून राहुलनीच अशा सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाया केलेल्या असू शकतात. मात्र त्याही काळात सेनेतर्फ़े अशा काही कारवाया झालेल्या नव्हत्या. कारण झाल्याच असत्या, तर भाटियांनी इतका समोर येऊन इन्कार केला नसता. सेनाधिकार्‍यांना अंधारात ठेवून संरक्षण खरेदीच्या व्यवहारात राहुल सोनियांनी कितीतरी कारवाया केलेल्या होत्याच की! बहुधा कॉग्रेसी भाषेत त्यालाच सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. त्याची माहिती सेनाधिकार्‍यांनाच नसावी. अन्यथा इतकी अब्रु चव्हाट्यावर कशाला आली असती?

पण त्याचीही दुसरी बाजू आहे. आज देशातले वातावरण काय आहे? पाकला धडा शिकवला म्हणून रस्त्यावरचा गावखेड्यातला सामान्य भारतीय कमालीचा सुखावला आहे. भारतीय सेनादलात काम करणारे आजीमाजी सैनिक खुश आहेत. ते मोठ्या अभिमानाने पंतप्रधान मोदींना श्रेय देत आहेत. अशावेळी त्याच्या विरोधात बडबडणे म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणे नाही काय? जगातल्या कुठल्याही सामन्यात वा क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केले, म्हणजे देशभर सण उत्सव साजरा केला जातो. त्याचे कारण पाकिस्तानचे नाक कापलेले बघण्याने भारतातला अगदी उपाशी सामान्य माणूसही सुखावतो. आपल्या खिशातले पैसे खर्चून तो फ़टाके उडवतो. मिठाई वाटतो. त्यातल्या आनंदाची थोडीतरी कल्पना कॉग्रेसच्या नेत्यांना किंवा मोदी विरोधकांना आहे काय? तो आनंद क्रिकेटसारख्या खेळात पाकला धडा शिकवून मिळत असेल, तर खर्‍याखुर्‍या लष्करी कारवाईत पाकला धडा शिकवल्याने सामान्य भारतीय किती सुखावला, त्याच नुसता अंदाज पुरेसा आहे. अशा विजयानंतर मायदेशी येणार्‍या भारतीय संघावर किंवा त्याच्या कर्णधारावर भारतीय पुष्पवृष्टी करतात. हे आजवर अनेकदा झालेले आहे. २०-२० च्या पहिल्या स्पर्धेत पाकला पराभूत करून मायदेशी आलेल्या धोनीच्या संघाची मिरवणूक शरद पवारांनीच काढली होती ना? त्यानंतर धोनीचे कौतुक सुरू झाले ना? मग निदान पवारांना कारवाईतल्या नेता संघनायकाला मिळणारी लोकप्रियता कळायला नको काय? कपिल देव किंवा धोनीच्या त्या विजयाच्या वेळी भारतीय जितका भारावलेला होता त्याच्या अनेकपटीने तो भारतीय आज सुखावला असेल, तर त्याच्या आनंदात विरजण घालणार्‍याला तो लाथाच मारणार ना? तेव्हा धोनीला शिव्या घालणारे आणि आज मोदींवर आरोपांची बरसात एकाच लायकीचे असतात, ते लोकांच्या मनातून तितकेच उतरत असतात.

गावस्कर किंवा कपिल देव यांनी धोनीच्या त्या यशाला टाळ्या वाजवूनच पाठींबा दिला होता ना? तेव्हा धोनीच्या संघाची मिरवणूक निघाली आणि वानखेडे स्टेडीयमवर त्यांचा जाहिर सत्कार झाला. त्यापासून सचिन तेंडूलकर दूर होता. त्याविषयी विचारले असताना सचिन म्हणाला होता, आजचा दिवस धोनीच्या टीमचा आहे. त्यांचीच वहावा व्हायला हवी. म्हणूनच तिथे जायचे टाळले. कपील, सचिन वा गावस्करनी धोनीच्या नावाने बोटे मोडली होती काय? धोनीचे कसले कौतुक? आम्हीही अनेक स्पर्धा व सामने जिंकलेले आहेत. असे त्यापैकी एकाने तरी म्हटलेले कोणी ऐकले आहे काय? कारण ते सभ्य माणसाचा खेळ करून जंटलमन झाले. त्याच खेळाच्या प्रशासनात राहून नाव कमावणारे शरद पवार मात्र, त्यातली जंटलमनगिरी शिकले नाहीत. अन्यथा त्यांना २५ वर्षे जुन्या संरक्षणमंत्री असतानाच्या कारवाया आठवल्याच नसत्या. त्यांनीही दिलखुलासपणे मोदींची पाठ थोपटली असती. ह्या लोकांना एका अर्थाने फ़िदायीन म्हणायला हवे. फ़िदायीन म्हणजे आत्मघातकी जिहादी. शत्रूला वा विरोधकाला जीवे मारण्यासाठी स्वत:च मरणाला मिठी मारणारा, असा जिहादी फ़िदायीन असतो. काही प्रसंगी तो स्वत:ला मारून घेतो आणि त्याचा अपेक्षित शत्रू मात्र मारला जात नाही. सुखरूप रहातो. आज सर्जिकल स्ट्राईकच्या निमीत्ताने जे घाणेरडे राजकारण खेळले जात आहे, ते फ़िदायीन पद्धतीचे आहे. मोदींच्या विरोधात ही मंडळी आत्मघाती कारवाया करण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. त्यात आपलाच सर्वनाश होईल त्याचीही त्यांना फ़िकीर उरलेली नाही. राहुलनी संसदेतली कॉग्रेस त्यातून नामशेष केली आहेच. आता जी काही कॉग्रेस संघटना किंवा जनमानसातील त्या पक्षाची प्रतिमा शिल्लक उरली आहे, तिचाही गळा घोटण्यासाठी राहुल अहोरात्र झटत आहेत. याला अस्सल फ़िदायीन नाही तर काय म्हणायचे?

6 comments:

 1. भाऊ तुच्याच शब्दात कमेंट ( आपल्याच चुकांतून शिकेल ती काँग्रेस कुठली ) :) :)

  ReplyDelete
 2. चला, पाककडून फिदायीनगीरी तर शिकले.
  ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला.

  ReplyDelete
 3. व्वा भाऊ मस्तच मोदी-धोनी

  ReplyDelete
 4. जोड्या जुळल्या १)मोदी-धोनी २)शरद-शाहीद३)केजरीवाल-बिलवाल

  ReplyDelete
 5. माफ करा भाऊ वरील फोटो fb वर शेअर करतोय

  ReplyDelete