लखनौ येथे मंगळवारी विजयादशमी साजरी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले. त्यांचा लोकसभा मतदारसंघ उत्तरप्रदेशात आहे आणि म्हणूनच त्यांनी तिथे एखाद्या समारंभात सहभागी होण्यावर काहुर माजवण्याचे काही कारण नाही. पंतप्रधान हा संपुर्ण देशाचे प्रतिनिधीत्व करीत असतो. म्हणूनच देशाच्या कुठल्याही भागात त्याने समारंभांना हजर रहाण्यावरून गदारोळ व्हायचे कारण नाही. पण मोदी हे व्यक्तीमत्वच विरोधकांनी इतके वादग्रस्त करून टाकलेले आहे, की मोदींनी काहीही करावे, मग ते आक्षेपर्ह कसे आहे, तेच सिद्ध करण्याची पाळी विरोधकांवर येऊन पडलेली आहे. सहाजिकच मोदी लखनौला जाणार, तर त्यांनी सीमेवर शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला का जाऊ नये; असे प्रश्न विचारले गेले. यापुर्वी मोदी तसे सांत्वन करायला गेलेले आहेतच. किंबहूना मागल्या दोन दिवाळीत त्यांनी आपल्या कुटुंबाकडे पाठ फ़िरवून सैनिकांच्या छावण्यांवरच दिवाळी साजरी केलेली होती. सियाचेन व कारगिल अशा दोन अत्यंत प्रतिकुल निसर्गात आपल्या देशाची सुरक्षा करण्यात गर्क असलेल्या जवानांची किती लोकांना दिवाळीत आठवण असते? पण पंतप्रधानांनी मागल्या दोन्ही दिवाळ्या त्यांच्या सोबत व्यतित केल्या होत्या. म्हणूनच आज सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर देखावा म्हणून मोदींनी कुणा सैनिकाच्या कुटुंबियाला भेटण्याचे काही प्रयोजन असू शकत नाही. पण असे प्रश्न विचारले जातातच. समजा तिकडे मोदी गेले असते, तर नवाच काही आक्षेप घेतला गेला असता. किंबहूना त्यातही मोदी मतांच्या अपेक्षेनेच गेल्याचा आरोप होऊ शकला असता. त्यामुळे लखनौच्या रामलिलेला हजेरी लावण्यावर झालेले आरोप गंभीरपणे घेण्य़ाची गरज नाही. त्यापेक्षा तिथल्या भाषणात मोदींनी जी जटायुची गोष्ट सांगितली, तिचा उहापोह करणे संयुक्तीक ठरेल.
सर्जिकल स्ट्राईक झाल्यापासून त्यावर आपल्या देशात मोठे राजकारण रंगले आहे. जणू उत्तरप्रदेश वा अन्य ठिकाणच्या विधानसभेत मते मिळवण्यासाठीच पंतप्रधानांनी ही लष्करी कारवाई केली, इतकाच आरोप व्हायचा बाकी आहे. कदाचित थोड्याच दिवसात तसाही आरोप होऊ शकेल. कारण मुंबईवर कसाब ओळीने हल्ला केला, तोही भारतातल्या हिंदूत्ववादी गुप्तचर संस्थांनी मुद्दाम घडवून आणलेला हल्ला होता, इथपर्यंत आरोप यापुर्वी झाले आहेत. मग मोदींना गुंतवण्यासाठी ताळतंत्र ठेवूनच कोणी आरोप करील, अशी अपेक्षा बाळगण्यात आता अर्थ उरलेला नाही. शिवाय सर्जिकल स्ट्राईक झाल्यापासून त्यावर बोलण्याचा मोह टाळलेला एकमेव राजकीय नेता मोदीच आहेत. त्यामुळेच लखनौला येऊन ते त्यावरच बोलतील, ही विरोधकांची अपेक्षा होती. आपल्या मनातलेच बघण्याची सवय झाली, की जगही तशाच नजरेने सर्व विश्व बघते, अशी समजूत असल्याचा तो परिणाम आहे. गुजरातची दंगल देशव्यापी नव्हतेर जागतिक पातळीवर नेवून मुस्लिम मतांची बेगमी करण्याची सवय ज्यांना लागली आहे, ती इतक्या लौकर संपणारी नाही. मग त्यांनी मोदींच्या प्रत्येक हालचालीत मतांचेच हिशोब मांडले तर नवल नाही. त्यामुळेच मोदींच्या लखनौला जाण्यात राजकारण शोधण्याची दोन दिवस स्पर्धा झाली. पण अशा सर्वच विरोधकांची मोदींनी साफ़ निराशा केली. कारण त्यांनी आपल्या अल्पशा भाषणात कुठेही राजकारणाचा संदर्भ येऊ दिला नाही. उलट रामलिलेचा समारंभ असल्याचा धागा धरून, त्यांनी आजच्या भारताच्या गरजा व समस्या यांचा रामकथेशी संबंध जोडला. ज्या दहशतवादी संकटाचा सामना देशाला करावा लागतो आहे, त्यांचाही थेट रामायणातल्या कथेशी संबंध जोडला. त्यात सर्जिकल स्ट्राईकचा ओझरता उल्लेख आला. पण त्यात कुठे राजकारण शोधायला मोदींनी विरोधकांना जागा ठेवली नाही.
भारतीय समाज अजूनही भावुक आहे आणि श्रद्धाळू आहे. त्यामुळेच त्याला प्रवचने किर्तने आवडतात. त्यातून ज्या प्रतिकात्मक कथा आलेल्या आहेत, त्या प्रतिमांचा वापर विविध गोष्टी पटवून देताना सहज करता येतो. मोदींनी दहशतवादाला रावण बनवले आणि त्याचा बंदोबस्त करणारा पहिला लढवय्या कोण होता, असा सवाल समोरच्या श्रोत्यांना केला. त्याचे उत्तरही त्यांनीच दिले. सीतेचे अपहरण करून रामायणाच्या युद्धाची सुरूवात होते. मायावी राक्षस असलेला रावण साधूचे रुप धारण करून वनवासी सीतेचे अपहरण करतो. गयावया करून तिला लक्ष्मणरेषा ओलांडायला लावतो. मग तिला उचलून आकाशमार्गे घेऊन जाऊ लागतो. अशावेळी रावणाला रोखणारा पहिला प्रतिकार जटायु नावाचा पक्षी करतो. रावण त्याचे पंख छाटून निघून जातो. ही कथा आहे. पण युद्धात प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडायची असते. रावणाच्या निर्दालनाला जटायुने आपल्या इवल्या शक्तीनिशी आरंभ केला, हे प्रतिक मोदींनी सहजगत्या कथन केले. प्रत्येक नागरिकाने त्यात आपला हिस्सा उचलला, तर रावणाचे निर्दालन अवघड नाही, हेच त्यांना सांगायचे होते. या जटायुच्या कथेतला सूचक अर्थ काय आहे? राजकीय अर्थ काय आहे? सर्जिकल स्ट्राईक हा त्यातला जटायु आहे काय? कारण रामायणातल्या युद्धाचा आरंभ जटायुने केला. त्यामुळे रावणाला रोखणे वा सीतेला वाचवणे शक्य झाले नव्हते. त्यासाठी मोठे युद्ध करावे लागले आणि पुढले अनेक दिवस त्याची सज्जता करावी लागली. जमवाजमव करण्याला काही काळ खर्ची पडला. अनेक घटना मध्यंतरी घडून गेल्या. आताही सर्जिकल स्ट्राईक हा शेवट नाही, तर आरंभ आहे आणि खरी लढाई बाकी आहे, असेच मोदींना सांगायचे आहे काय? निदान पाकिस्तानची उडालेली तारांबळ बघता, यापुढेच खरे युद्ध व्हायचे असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याच संदर्भाने जटायुचे प्रतिक विचारात घेतले पाहिजे.
अजून पाकिस्तानचे नाक पुरते ठेचलेले नाही, तर किरकोळ गोष्टींचे श्रेय कशाला घ्यायचे? त्यावरून कशाला भांडायचे, असेच मोदींना सुचवायचे आहे. म्हणूनच जटायुची गोष्ट, हे मोदींच्या भाषणाचे राजकीय सार आहे. म्हणूनच त्यांनी राजकीय भाषण केले असे कोणी म्हणू शकत नाही. पण व्यवहारी पातळीवर बघितले तर आगामी युद्धात आपापली जबाबदारी उचलायला सिद्ध व्हा, असेच मोदींनी सांगितले आहे. त्यात आपल्याला विरोधकांची साथ मिळण्याची अपेक्षा करता येत नाही. विरोधी पक्ष आपापले राजकीय मतलब शोधून घटना बघतात. त्यांच्यावर विसंबून पाकिस्तानशी लढणे शक्य नाही. त्यांना बाजूला ठेवून पाकिस्तानला धडा शिकवावा लागेल आणि त्या लढाईत सामान्य जनतेने जटायुप्रमाणे आपापली भूमिका पार पाडायला पुढे यावे. म्हणजेच पाकिस्तानी रावणाला धडा शिकवायला सामान्य जनतेतल्या जटायुंचीं सरकारला साथ आपल्याला हवी आहे. कारण मोदी देशातल्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन ही लढाई लढू शकत नाहीत, हेच त्यातून प्रतित करण्यात आले आहे. म्हणून ते राजकीय भाषण होते. त्यातला संदेश सामान्य माणसाला कळतो. कारण सामान्य माणसांची बुद्धी कुशाग्र नसते. त्याला प्रतिके व त्यातून व्यक्त होणार्या भावना उमजतात. बुद्धीमान वर्गाची बुद्धी असामान्य असल्याने, त्यांना भिंग घेऊन अशा प्रतिकातले अर्थ शोधूनही सापडत नसतात. मग त्यांना मोदीनी रामलिलेच्या कथेत्तून केलेले राजकारण हुडकून काढायला किती वर्षे लागतील? भाषण संपताच विविध वाहिन्यांवर मोठे मोठे विद्वान चिकित्सा करीत होते. पण त्यापैकी कोणालाही जटायुची गोष्ट वा त्यातले राजकारण उलगडून सांगता आले नाही. इथेच मोदी हे राजकीय अभ्यासकांना रहस्यमय कोडे कशाला भासते, त्याचा उलगडा होऊ शकतो. कारण त्यांच्या ठाशीव व्याख्येतले राजकारण मोदी खेळत नाहीत.
छान भाऊ
ReplyDelete