Tuesday, October 11, 2016

नावडत्यांची लढाई


Image result for hillary trump
आणखी पाच आठवड्यांनी अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक व्हायची आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रंप आणि डेमॉक्रेटीक पक्षाच्या हिलरी क्लिंटन; यांच्यात ही अटीतटीची लढाई होऊ घातली आहे. यापुर्वीही अशाच अटीतटीच्या निवडणूका झाल्या. पण त्यात दोन्ही बाजूंनी लोकप्रिय किंवा प्रतिष्ठीत उमेदवार रिंगणात होते. त्यांनी आपापली गुणवत्ता वा कौशल्य सांगून लोकांकडे मते मिळवण्याला प्रचारात प्राध्यान्य दिलेले होते. एकमेकांवर आरोप करणे किंवा एकाने दुसर्‍याच्या त्रुटी दाखवणे स्वाभाविक असते. पण स्पर्धेत उतरलेल्या दोन उमेदवारांनी आपल्यापेक्षा दुसरा किती भयंकर धोका आहे; असे सांगून मते मागण्याची पाळी अमेरिकेत यापुर्वी कधी आलेली नव्हती. लोकांना प्रामाणिकपणे विचारले, की यातला उत्तम उमेदवार कोण, तर त्याचे उत्तर जवळपास बहुतांश अमेरिकनांना देता येणार नाही. कारण प्रत्येकात मोठमोठे दोष व त्रुटी आहेत. सहाजिकच दोघेही राष्ट्राध्यक्ष व्हायला किती नालायक आहेत, याची जंत्री त्यांनीच आपल्या मतदारांपुढे मांडलेली आहे. पण लोकांनाही मोठ्या प्रमाणात चांगला उमेदवार समोर नाही, असे वाटत आहे. पण तिसरा पर्याय उपलब्ध नाही. म्हणजेच नावडते असले, तरी त्याच दोन नाकर्त्यांमधून अमेरिकनांना एक अध्यक्ष निवडावा लागणार आहे. एका संपन्न लोकशाही देशाचे यापेक्षा मोठे दुर्दैव नसेल. याची अनेक कारणे आहेत. तिथे प्रायमरीज म्हणजे आपापल्या पक्षातून उमेदवारी मिळवण्याची स्पर्धा चालते आणि त्यात शेवटपर्यंत टिकून रहाणार्‍यालाच उमेदवारी मिळत असते. डेमॉक्रेटीक पक्षाची उमेदवारी माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नीला मिळालेली आहे. आठ वर्षापुर्वीच त्या स्पर्धेत उतरल्या होत्या. पण त्यांनी तशी इच्छा जाहिर केल्यानंतर अकस्मात बराक ओबामा हा कृष्णवर्णिय नेता मैदानात आला आणि त्याने हिलरीचे सर्व मनसुबे उधळून लावले होते.
उमेदवारीच्या त्या पक्षांतर्गत स्पर्धेत हिलरींनी ओबामा यांच्यावर एकाहून एक भयंकर आरोप केलेले होते. पण त्यांची डाळ शिजलेली नव्हती. आजच्याप्रमाणेच तेव्हाही हिलरीचे पती माजी अध्यक्ष तिच्यामागे ठामपणे उभे राहिले होते. त्यांनी कोट्यवधी डॉलर्स पत्नीच्या प्रचार मोहिमेसाठी उभे केले होते. पण पहिला कृष्णवर्णिय उमेदवार म्हणून ओबामा मैदानात आले आणि त्यांनी नव्या पद्धतीने मोहिम आखून हिलरींना चितपट केले. उलट तेव्हा रिपब्लिकन पक्षापाशी तितका जिद्दी व आक्रमक नेता नव्हता आणि ओबामांचे काम सोपे होऊन गेले. अखेरच्या टप्प्यात उमेदवारी मागे घेत हिलरींनी ओबामा यांना पाठींबा दिला आणि तेच अध्यक्ष झाल्यावर पहिल्या कारकिर्दीत परराष्ट्रमंत्री म्हणूनही काम केले. पण त्याच दरम्यान अशा काही घटना घडल्या, की हिलरींवर मोठमोठे दोषारोप झाले. त्यांना आपले पद सोडावे लागले होते. लिबियामध्ये जो हिंसाचार माजला, त्यात अमेरिकन दुतावासाला जमावाने आग लावली आणि त्यांच्या मदतीसाठी हिलरी यांनी काहीही केले नाही, हा मोठा आक्षेप आहे. कारण योग्यवेळी माहिती मिळाली होती. पण बेफ़िकीरीमुळे राजदूतालाही मरण पत्करावे लागले होते, असे अनेक आरोप आजही हिलरी यांच्यावर कायम आहेत. पण तरीही त्या उमेदवारी मिळवू शकल्या. कारण उमेदवारी मिळवण्यात श्रेष्ठी मानल्या जाणार्‍यांची मक्तेदारी. लोकमताचा कल बघता बर्नी नावाचे स्पर्धक डेमॉक्रेटीक उमेदवार होऊ शकले असते. पण त्यांना लोकप्रतिनिधी गटातून पुरेसा पाठींबा मिळू शकला नव्हता. त्यामुळे त्यांना संधी नाकारली गेली. उलट डोनाल्ड ट्रंप यांना त्यांच्याच पक्षातही पुरेसा पाठींबा नव्हता, पण लोकमताचा कल त्यांच्या बाजूने इतका जबरदस्त होता, की बाकीच्या उमेदवारांना बाजूला होणे भाग पडले. ट्रंप पारंपारिक चाकोरीतले राजकारणी नाहीत. ते संयमी नाहीत. अशी ही चमत्कारीक लढत आहे.
आपल्याकडे जसे राजधानी दिल्लीत बसलेले ढुढ्ढाचार्य राजकीय नितीमत्ता निश्चीत करतात, तसेच अमेरिकेत कॅपिटल हिल नामक प्रदेशातील शहाणे राजकीय नितीमत्तेची व्याख्या करीत असतात. मग बाकीचे राजकीय अभ्यासक वा पत्रकार संपादक त्यानुसारच विश्लेषणे करू लागतात. भारतात अडीच वर्षापुर्वी नरेंद्र मोदींना जसे दिल्लीतले शहाणे मान्यता देत नव्हते, तशीच काहीशी आज ट्रंप यांची अमेरिकेतील स्थिती आहे. त्यांच्या बाजूने लोकमताचा कौल असूनही पक्षातले जाणकारही त्यांना मान द्यायला राजी नाहीत. पत्रकार माध्यमांनी तर पहिल्या दिवसापासूनच ट्रंप यांची हेटाळणी चालविली आहे. पण त्यापैकी कोणालाही न जुमानता ट्रंप यांनी इथपर्यंत मजल मारलेली आहे. मग त्यांच्या जुन्या वक्तव्ये किंवा शेरेबाजीचा आधार घेऊन त्यांच्यावर माघार घेण्याचे दडपण आणले गेले आहे. त्यांनी महिलांची टिंगल केली वा अश्लिल शेरेबाजी केल्याचा आरोप, आता अखेरच्या टप्प्यात मुद्दामच पुढे आणला गेला आहे. दहा वर्षापुर्वीच्या त्या शेरेबाजीसाठी ट्रंप यांनी माफ़ीही मागितली आहे. पण त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा मात्र माध्यमांनी ठळकपणे प्रसिद्ध केलेला नाही. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. अश्लिल शेरेबाजीतून ट्रंप महिलांची टवाळी व विटंबना करतात, हा आक्षेप चुकीचा नाही. पण ट्रंप म्हणतात, आपण नुसते शब्द बोललो. हिलरीच्या पतीने अध्यक्ष असताना महिलांची प्रत्यक्ष विटंबनाच केलेली आहे. ही बाब दुर्लक्षित करता येईल काय? आपला पती देशाचा अध्यक्ष असताना राष्ट्रपती निवासातल्या महिला कर्मचार्‍यांशी असभ्य वर्तन करीत होता, त्याचा हात धरून प्रचारसभेत फ़िरणार्‍या हिलरींना, आज ट्रंप यांच्या वक्तव्याचा जाब विचारण्याचा किती नैतिक अधिकार उरतो? पण त्याचा फ़ार उहापोह होणार नाही. कारण उघड आहे. हिलरी राजधानीची लाडकी आहे, तर ट्रंप राजधानीसाठी उपरा आहे.
एकूण काय? अमेरिकेसमोर आज दोन अतिशय नाकर्ते वा नालायक उमेदवार अध्यक्ष पदासाठी जनतेसमोर पेश करण्यात आलेले आहेत. त्या दोघांना नाकारण्याची सोय मात्र नाही. म्हणजेच त्यातला कमी नालायक कोण, अशी निवड तिथल्या मतदाराला करावी लागणार आहे. कारण यापैकी एकही उमेदवार आपल्यात खुप गुणवत्ता असल्याचा दावा करू शकलेला नाही. आपल्या जागी दुसर्‍याला निवडले तर अधिक नुकसान होईल, अशी भिती घालून जनमताचा कौल मिळवण्याची ही लढाई होऊन गेली आहे. त्यामुळे मग जगाला शहाणपण शिकवणार्‍या राजधानीतील मुठभर बुद्धीमंतांना एक प्रश्न सतावतो आहे. इतक्या भानगडी बाहेर काढूनही अजून ट्रंप माघार कशाला घेत नाही? अजून त्याचे पाठीराखे ट्रंपला नाकारायला पुढे कशाला येत नाहीत? असा प्रश्न ज्यांना पडतो, त्यांना जनमताची तिळमात्र कल्पना नसावी, इतकाच त्यातून अर्थ काढता येईल. कारण दोन नालायकांमधून लोकांना निवड करायची आहे. शहाण्यांना भले हिलरी सर्वगुणसंपन्न उमेदवार वाटत असेल, पण मतदाराच्या लेखी हिलरीही ट्रंप इतकीचा बेताल बेजबाबदार आहे. म्हणूनच दोघांपैकी कोण कमी त्रसदायक ठरू शकेल, असाच निवाडा लोकांना करावा लागणार आहे. कारण त्याचे भलेबुरे परिणाम सरकारी अनुदानावर जगणार्‍यांना कधीच भोगावे लागत नसतात. सामान्य जनतेला आपल्या कष्टाच्या कमाईवर जगावे लागत असते. तर विश्लेषण वा उहापोह करणार्‍यांचा उदरनिर्वाह कुठल्यातरी देणगी वा अनुदानातून होत असतो. म्हणून सामान्य माणसाला बौद्धिक निकषावर नव्हेतर व्यवहारी कसोटी लावून देशाचा अध्यक्ष निवडावा लागतो. अध्यक्षाने वैचारिक उहापोह करायचा नसतो, तर योग्यवेळी योग्य निर्णय घेऊन अंमलात आणायचे असतात. तेव्हा नालायकातून कमी नालायक निवडण्याला पर्याय उरत नसतो. गुणवान उमेदवारांमधून निवड करायची संधी नसणे, ही बौद्धिक दिवाळखोरी असते.

3 comments:

  1. मस्त भाऊ,ट्रंप अध्यक्ष झाले तर त्याचा भारतावर काय परिणाम होईल

    ReplyDelete
  2. भाऊ,आपल्याकडे एका टिममध्ये अशिच आवस्था आहे, श्रीमंत लुटारुंची गरीब टीम,टोळी जंगलात आहे,सगळे मुर्ख प्राणी वाट बघतायत,टिमचा कर्णधार कोण ?? पांढर गाढव की पांढरी ....

    ReplyDelete
  3. अमेरीकेत ही निवडणूकीपुरती धुळवड आहे त्यांची धोरणे शक्यतो बदलत नाहीत बुशने मोदींवर घातलेली बंदी ओबामानेही मोदी पंतप्रधान होईपर्यंत उठवली नव्हती

    ReplyDelete