Monday, October 17, 2016

ट्रंप आणि माध्यमे

hillary trump debate के लिए चित्र परिणाम

आणखी तीन आठवड्यांनी अमेरिकेच्या पुढल्या अध्यक्षांच्या निवडीसाठी मतदान व्हायचे आहे. त्यासाठी प्रचारमोहिमा अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचल्या आहेत. माध्यमांवर विश्वास ठेवायचा तर त्यात हिलरी क्लिंटन सहज विजयी होतील, असे म्हणावे लागेल. कारण एकूण मुख्यप्रवाहातील माध्यमांचा सूर ट्रंपविरोधी आहे. म्हणूनच माध्यमे किती विश्वासार्ह राहिली आहेत, अशीही एक चर्चा अमेरिकेत रंगली आहे. अमेरिकेत नित्यनेमाने विविध विषयांवर जनमताची चाचणी करणार्‍या गॅलप नामक संस्थेने म्हणूनच राजकीय मताचा कानोसा घेताना, अमेरिकेतील माध्यमांच्या विश्वासार्हतेबद्दल लोकांकडे विचारणा केली. त्याचे निकाल धक्कादायक आहेत. अमेरिकेत आज सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणार्‍या माध्यमांनी लोकांचा विश्वास पुर्णत: गमावला असल्याचा निर्वाळा या चाचणीने दिलेला आहे. अमेरिकेतील फ़क्त १४ टक्के लोक माध्यमातील बातम्या खर्‍या मानतात, असा त्या चाचणीचा निष्कर्ष आहे. म्हणूनच तो गंभीर विषय झाला आहे. जितकी तावातावाने हिलरी व ट्रंप यांच्याविषयी अमेरिकेत चर्चा चाललेली आहे, तितकीच विविध माध्यमातही जुंपलेली आहे. एकूण प्रस्थापित माध्यमे हिलरींना झुकते माप देण्यासाठी पक्षपात करतात, असा खुला आरोप ट्रंप यांनी केलेला होताच. पण गॅलपच्या चाचणीने त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. कारण कुठलेही सत्य लपवले म्हणून कायमचे झाकलेले राहू शकत नाही. अशाच अनेक सत्यांची कहाणी क्रमाक्रमाने बाहेर येऊन माध्यमे विश्वास गमावून बसली आहेत. हिलरी यांच्या प्रकृतीविषयी सोशल माध्यमात बातम्या येत होत्या, तर तो ट्रंप यांच्या चमच्यांनी केलेला अपप्रचार असल्याचे सांगण्यात प्रस्थापित माध्यमांनी शक्ती खर्ची घातली. पण महिन्याभरापुर्वी न्युयॉर्कच्या कार्यक्रमातच हिलरी चक्कर येऊन कोसळल्या आणि सत्य मानायची नामुष्की प्रतिष्ठीत माध्यमांवर आली.

योगायोग असा, की भारतामध्ये मागल्या बारा वर्षात सतत नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी मुख्य प्रवाहातील माध्यमे व पत्रकार अहोरात्र झटत होती. खोट्यानाट्या बातम्या रंगवून मोदींना राजकारणातून संपवण्याचा उद्योग पुढे मोदी राष्ट्रीय राजकारणात आल्यावर आणखीच जोमाने चालू राहिला. तर त्यांच्या नादी लागण्यापेक्षा मोदींनी सोशल माध्यमांचा वापर आपली बाजू मांडण्यासाठी खुबीने करून घेतला. त्याच कालखंडात या नव्या माध्यमाचा वेगाने प्रसार होत गेला आणि सामान्य माणसाला प्रस्थापित माध्यमावर विसंबून रहाण्याची गरज उरली नाही. किंबहूना माहितीच्या नाड्या आपल्या हाती ठेवणार्‍या या माध्यमांची मक्तेदारी सोशल माध्यमांनी संपुष्टात आणली होती. मोदींनी त्याला वापर करून घेतला आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी उतरले, तेव्हा त्यांच्या चहात्यांची एक फ़ौजच तयार झालेली होती. मग मोदींनी त्याच फ़ौजेचा वापर करीत प्रस्थापित माध्यमाच्या मक्तेदारांना नामोहरम करून टाकले. ही एकप्रकारची स्पर्धाच होऊन गेली. माध्यमांनी पत्रकारांनी मोदींविषयी खोटे काही प्रसिद्ध करावे आणि त्यावर सोशल माध्यमात प्रतिहल्ला होऊ लागला. अशा धुमश्चक्रीत जो अखेरीस खरा ठरतो, त्याची विश्वासार्हता वाढत असते. तिथेच मग माध्यमे व पत्रकार रसातळाला जात राहिले. कारण माध्यमातून पिकवल्या गेलेल्या कंड्या व उठवलेल्या अफ़वा, खोट्या पडत गेल्या आणि त्यामुळे माध्यमेही खोटारडी ठरू लागली. लोकमत बनवण्याची वा बदलण्याची माध्यमांची शक्ती त्यांची खरी ताकद होती. पण मोदी विरोधाच्या आहारी जाऊन केलेल्या खेळात, भारतीय माध्यमांची विश्वासार्हताच लयाला गेली. त्या गडबडीत मोदींनी राजकीय विरोधकांप्रमाणेच माध्यमांनाही पराभूत करून टाकले होते. मोदींची मुलाखत मिळावी म्हणून नावाजलेल्या पत्रकारांना वाडगा घेऊन फ़िरण्य़ाची नामूष्की आलेली होती. आज त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेत ट्रंप यांच्या बाबतीत होते आहे.

उदारमतवादी किंवा पुरोगामी म्हणवणार्‍या लोकांनी माध्यमावर आपला कब्जा मिळवला आणि त्यातून राज्यकर्त्या वर्गावर आपली दहशत निर्माण केली. ही प्रक्रिया साधारण मागल्या दोनतीन दशकापासून सुरू झाली होती. त्यात त्यांना काही प्रमाणात यशही मिळाले. पण सोशल माध्यमांचा उदय झाल्यामुळे लोकांपर्यत माहिती घेऊन जाण्याची माध्यमाची असलेली मक्तेदारी संपुष्टात येत गेली. पाच वर्षापुर्वी जयललिता यांनी तामिळनाडूत विधानसभा जिंकली आणि द्रमुकचा पराभव झाला. तेव्हा त्याची कबुली एनडीटिव्हीचा म्होरक्या प्रणय रॉय याने दिलेली होती., यापुढे निवडणूकीच्या राजकारणात प्रस्थापित माध्यमांना किंमत उरली नाही, असेच त्याने सांगितले होते. कारण माध्यमे द्रमुकच्या यशाची हमी व आकडे सादर करत होती. पण त्याच पक्षाचा तिथे दारूण पराभव झाला होता. मोदी हे त्याचे दुसरे उदाहरण होते. अमेरिका तर सोशल माध्यमाची जनक आहे. तिथे जवळपास प्रत्येक नागरीकाला आज हे नवे मुक्त माध्यम उपलब्ध झालेले आहे आणि आपले मत बनवण्यासाठी त्याला कुणा अभ्यासक वा जाणकारावर विसंबून रहाण्याची गरज उरलेली नाही. कोणी आपल्या वतीने विचार करून आपल्यावर मत लादावे, इतका आता अमेरिकन मतदार गरजवंत उरलेला नाही. म्हणूनच मुख्य माध्यमातून लपवल्या जाणार्‍या वा दिल्या जाणार्‍या खोट्या माहितीचा शोध लोक स्वत:च घेऊ लागले. तिथे मग हिलरी क्लिंटन यांच्यासाठी पक्षपात करणारी मोठी माध्यमे खोटी पडू लागली आणि आता तर त्यांची विश्वासार्हता लयाला गेलेली आहे. याचा अर्थ ट्रंप प्रामाणिक आहेत वा चांगले उमेदवार आहेत, असा होत नाही. पण दोन्ही उमेदवारांची असेल ती बाजू मांडण्यातली तटस्थता माध्यमे दाखवू शकली नाहीत, हे लोकांना जाणवले आहे. म्हणूनच उद्या ट्रंप जिंकले, तर तो एकट्या हिलरीचा पराभव नसेल, माध्यमांचाही पराभव असेल.

लोकशाहीत जितका विरोधी पक्ष आवश्यक असतो, तितकीच प्रभावी तटस्थ माध्यमेही अगत्याची असतात. गेल्या अर्धशतकात जगातील बहुतेक लोकशाही देशात तशीच माध्यमे होती आणि त्यांनी अतिशय जबाबदारीने आपली भूमिका पार पाडलेली होती. पण मागल्या तीनचार दशकात माध्यमातले अनेकजण राजकारणात नेत्यांशी जवळीक करून लुडबुडू लागले आणि त्यांनी लोकमत बनवण्याची सुपारी घेतल्यासारखी पत्रकारीता जोखडाला जुंपली. तिथून ही घसरण सुरू झाली. भारतात ती घसरण लौकर झाली. मोदींनी तिचा बुरखा फ़ाडून टाकला. आता तीच वेळ अमेरिकेतील पत्रकारितेवर आलेली आहे. कारण मोदींप्रमाणेच ट्रंप हा शासनकर्त्या वर्गाच्या परिघात नावडता उमेदवार होता. त्याला बदनाम करण्याची मोहिम खुप आधीपासून राबवली गेली. तशीच हिलरीला पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याचेही डावपेच माध्यमातूनही खेळले गेले होते. त्यासाठी हिलरीचे पक्षांतर्गत स्पर्धकही संपवण्याचे डाव खेळले गेले होते. आता त्याची कसोटी या मतदानातून लागणार आहे. कारण ट्रंप लोकप्रिय नेता नसला तरी त्याने जिद्दीने लढत दिली आहे. त्यात तो यशस्वी झाला तर एकाच वेळी हिलरी पराभुत होतील आणि अमेरिकेतील प्रस्थापित माध्यमेही पराभूत होतील. तशी शक्यता नाकारता येत नाही. कारण आता विविध माध्यमांनी ट्रंप स्पर्धेत मागे पडल्याच्या दिलेल्या बातम्याही उघड्या पडू लागल्या आहेत. विविध चाचण्या कशा मोडूनतोडून लोकांची दिशाभूल करण्याचे कारस्थान रचले गेले, त्याच्याही बातम्या येऊ लागल्या आहेत. प्रामुख्याने ट्रंप यांना बदनाम करणार्‍या बातम्यांना ठळक प्रसिद्धी द्यायची आणि हिलरीच्या तशा बातम्या दडपून ठेवायच्या, अशा गोष्टींचा अतिरेक अंगलट येताना दिसत आहे. म्हणूनच ट्रंप विजयी झाले तर ते उमेदवाराच्या कर्तृत्वापेक्षा माध्यमांच्या खोटेपणामुळे मिळालेले यश असेल.

4 comments:

  1. बरोबर भाऊ,आपल्याकडे मिडीयाला लोकशाहीचा ४था खांब म्हणतात परंतु सध्या या खांबाची पहार झाली आहे उरलेले तीन खांब मुळासकट उखडायचे काम हे करतायत (अपूर्ण )

    ReplyDelete
  2. भाऊ,लोकसभा प्रचारावेळी सध्याच्या एका फारच मोठ्या मंत्र्याचा इंटरव्यू इतक्या विचित्र पद्धतिने घेतला होता मी प्रेक्षक असुन मला जाणवत होते इंटरव्यू घेणारी व्यक्ति महाराष्ट्रातील मोठ्या दैनिकासाठी व सगळ्यात मोठ्या न्यूज़ चैनल साठी काम करणारी आहे

    ReplyDelete

  3. रीता बहुगुणा ने छोड़ी कांग्रेस,BJP में हुईं शामिल
    Read more Todaynews18.com https://goo.gl/aiasD7

    ReplyDelete
  4. A question that a common man has been asking about Donald Trump's shocking interview (locker room talk ) and practically innumerable girls coming out revealing Donald's objectionable behaviour is this : why all these things surfaced when the presidential campaign is ints last stage and not earlier ? the political analysts ,commentators have preferred not to ask or answer this .

    ReplyDelete