ढोंगीपणालाही काही सीमा असायला हवी. प्रामुख्याने जिथे वैचारिक वाद घातला जातो, तिथे तरी तशी लक्ष्मणरेषा आखण्याची गरज असते. कला आणि राष्ट्रप्रेमाचा संबंध नाही, असा जो युक्तीवाद आहे; तो त्यामुळेच फ़सवा असतो. आज जितक्या आवेशात पाक कलाकारांच्या बाजूने भारतात युक्तीवाद केला जात आहे, तसाच युक्तीवाद उद्या कुणा भारतीय कलाकाराला पाकिस्तानप्रणित जिहादी गटाने उचलून अपहरण केल्यावर होऊ शकणार आहे काय? म्हणजे समजा उद्या कुठल्या तरी घातपाती घटनेमध्ये जिहादी दहशतवाद्यांनी अनेकांना ओलिस ठेवले आणि त्यात कुणा भारतीय कलाकाराचा समावेश असेल, तर काय करायचे? त्याची सुटका कोणी करायची? जे कोणी अपहरणकर्ते असतील, त्यांना हे असले युक्तीवाद सांगून ओलिस ठेवलेल्या कलाकारांची मुक्तता होऊ शकणार आहे काय? हेच आजचे तथाकथित शहाणे पुढाकार घेऊन तशी सुटका करून घेणार आहेत काय? त्यावेळची स्थिती काय असेल? तेव्हा हेच तमाम कलवंत दिग्दर्शक वगैरे एकत्रित येऊन भारत सरकारला काय सांगू लागतील? वाटेल ते करा आणि ओलिस कलाकारांची सुटका करून आणा. तेव्हा यांच्यातला कोणी कलेला भौगोलिक सीमा नसल्याचा दावा करीत बसणार आहेत काय? तेव्हा सरकारने त्यात हस्तक्षेप केला पाहिजे अशीच मागणी असेल ना? मग त्यांना कुठलीही कला आठवणार नाही. तेव्हा कुठला युक्तीवाद सुरू होईल? आम्ही कलाकार असलो तरी भारतीय नागरिक आहोत आणि आमचे संरक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. म्हणून वाटेल ती ताकद लावा आणि ओलिसांची सुटका करा. याचा अर्थ इतकाच, की यांच्या सोयीचे असेल तेव्हा कलेला भौगोलिक सीमा नसतात आणि तोच युक्तीवाद गैरसोयीचा झाला, मग हेच भारताचे नागरिक होऊन जातात. ह्याला बुद्धीमत्ता नव्हे तर लबाडी म्हणतात.
गेल्या काही वर्षात इसिस नावाचा जो राक्षस पश्चीम आशियाला भेडसावतो आहे. तिथे फ़सलेल्या भारतीयांना सुखरूप माघारी आणण्यासाठी भारत सरकारला मोठी कसरत करावी लागली आहे. त्यात नुसतेच नोकरीधंदा करायला गेलेल्या भारतीयांचा समावेश नव्हता. काही ठिकाणी मदर तेरेसा किंवा तत्सम मिशनरी संस्थांचे सेवक धर्मगुरूही फ़सलेले होते. त्यांचाही दावा भिन्न नाही. अशा संघर्षाच्या जागी जाणेच मुळात घातक वा धोकादायक असते. तरीही त्यांनी तो धोका पत्करलेला होता. कारण करूणा दया असल्या गोष्टींना सीमा नसतात. पण जेव्हा जिहादीच्या तावडीत तुम्ही सापडता, तेव्हा मात्र तुम्हाला भौगोलिक सीमा महत्वाच्या वाटू लागतात. म्हणूनच अशा गोष्टींची काही सीमारेषा आखलेली असते. जिथे दोन्ही बाजू एका समान तत्वाचा वा नियमांचा सन्मान राखत असतात, तिथेच नियमानुसार खेळ चालू शकत असतो. पण जिथे नियमांनी खेळ होत नाही, तिथे क्रिकेटचा नियम फ़ुटबॉलसाठी लावण्याचा उद्योग शुद्ध फ़सवणूक असते. इसिस वा कुठल्याही जिहादी संघटनांनी आजच्या जगातले नियम मानलेले नाहीत. त्यांनी प्रत्येक कायदा व नियम झुगारलेले आहेत. म्हणूनच त्यांना कला वा खेळ यांच्याशी कर्तव्य नसते. त्यांची चहुकडून कोंडी करणे, एवढाच एकमेव मार्ग असतो. त्यात प्रत्येकाने आपले योगदान देणे अगत्याचे असते. सैनिक व पोलिस त्यात आपल्या प्राणाचे योगदान देत असतात. तितके मोठे योगदान कलाकारांकडे कोणी मागितलेले नाही. पण साधे सहकार्याचे योगदान देण्याची वेळ आली तरी माघार घेऊन युक्तीवाद करणे; ही शुद्ध बनवेगिरी आहे. हा निव्वळ राजकीय पवित्रा असतो. ज्याला पुर्वापार तळ्यात मळ्यात म्हटले गेलेले आहे. यांच्यापेक्षा खरे जिहादीही बरे असतात. ते प्रसंग ओढवला तर आपल्या जीवाचे मोल देऊन आपल्या भूमिका व विचारांशी निष्ठावान असतात.
काही वर्षापुर्वी ‘सेव्ह गाझा’ नावाचा तमाशा अशाच तथाकथित कलावंतांनी आरंभला होता. भारतातल्या एका नाट्य महोत्सवात इस्त्रायलचे पथक येणार होते. तर त्याच्यावर बंदी घालण्याची मागणी यापैकीच अनेक कलावंतांनी केलेली होती. कारण काय होते? तर गाझा या व्याप्त प्रदेशातील मुस्लिमांवर इस्त्रायली सैनिक हल्ले करतात व अत्याचार करतात. ते सैनिक नाट्यपथक घेऊन इथे भारतात येणार नव्हते. इस्त्रायलचे सैनिक आणि कलावंत यांच्यातला फ़रक अशा प्रतिभावंतांना समजत नाही काय? इस्त्रायली कलाकार आणि पाकिस्तानी कलाकार यात नेमका कोणता फ़रक असतो? इस्त्रायली सैनिकांनी केलेल्या हिंसेसाठी इस्त्रायली कलाकारांना कुणा राजकीय पक्षाने जबाबदार धरले नव्हते, की झुंडशाही केलेली नव्हती. ती बंदीची मागणी करणारे तमाम लोक पुरोगामी म्हणून मिरवणारे भारतीय कलाकारच होते. पण आज तेच पाकिस्तानी सेना आणि पाक कलाकार यांच्यातला फ़रक घसा कोरडा करून सांगत आहेत. त्याचा साधा सरळ अर्थ असा, की यांच्या सोयीचे असेल तेव्हाच कला आणि राजकारण वेगळे असते. पण यांच्या सोयीचे नसेल तेव्हा कलेत राजकारण आणायला काहीही हरकत नसते. नथूराम गोडसेवरचे नाटक बंद पाडताना कला खड्ड्यात जाते आणि नाना फ़डणवीसाचे नाटक करताना कलेला वेगळे ठेवायचे असते. ही शुद्ध भोंदूगिरी आहे आणि ती आपल्या देशात राजरोस चालू आहे. सामान्य लोकांना कचरा ठरवून आपले मोठेपण मिरवण्याची ही मस्ती आहे. एकाहून एक बेशरम लोक त्यात मान्यवर म्हणून मिरवताना दिसतील. ज्यांना कुठलीही वैचारिक बैठक नाही. राजरोस शेकडो निरपराधांना गोळ्या घालून किडामुंगीप्रमाणे ठार मारणार्या अजमल कसाबने भारतीत कायदा व न्यायप्रणालीचा गैरफ़ायदा उठवावा, त्यापेक्षा हे लोक तसूभर वेगळे मानता येणार नाहीत.
जिवंत पकडला गेल्यावर कसाबने आपला बचाव मांडण्यासाठी कोर्टात किती वेगवेगळे खोटे दावे केले होते आठवते? आज पाक कलाकारांच्या समर्थनार्थ चाललेले इथल्या कलाकारांचे दावेही त्यापेक्षा तसूभर वेगळे नाहीत. मध्यंतरी माजी सेनाप्रमुख व विद्यमान परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग येमेनमधून भारतीयांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी एडनच्या बंदरात नौदलाची युद्धनौका घेऊन ठाण मांडून बसले होते. जगभर त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक चाललेले होते. पण तेव्हाच त्यांची भारतातले बुद्धीमान कलाकार निंदानालस्ती करण्यात गर्क होते. कारण एका क्षणी त्यांनी दुटप्पी पत्रकारांना प्रेश्या म्हणून हिणवले होते. तेव्हा शोभा डे नावाची हिडीस महिला त्याच सेनाधिकार्याला मुर्ख जनरल ठरवत होती. आज तीच बया जवानांच्या कौतुकाचेही लेख खरडते आहे. अशी बेशरम माणसे ज्या समाजात प्रतिष्ठीत मानली जातात, त्याला कुठलेच भवितव्य नसते. मग तिथल्या कलासंस्कृतीची काय कथा? ज्यांनी तोफ़ा डागून हजारो वर्षे जुन्या अतिप्रचंड बुद्धमुर्ती उध्वस्त केल्या, त्याच वृत्तीचा एका शब्दाने निषेध करायला जो पाक कलाकार धजावत नाही, त्याच्या समर्थनाला उभे रहाणारे मुळात कलाकार कसे असू शकतात? या निमीत्ताने इथे कलाकार म्हणून मिरवणार्यांचा मुखवटा गळून पडला आहे. किंबहूना मागल्या अर्धशतकात ज्यांनी कला म्हणून जे पुरोगामी थोतांड उभे केले आहे, तेच उघडे पडत चालले आहे. आपल्या बाजारू कलाकारीला प्रतिभेची, अविष्कार स्वातंत्र्याची वस्त्रे चढवणार्यांना यापुढे सामान्य माणसाच्या क्षोभाला सामोरे जावे लागणार आहे. कारण सामान्य लोक झुंड म्ह्णून एकत्र आले, मग कायदाही कोणाला वाचवू शकत नाही. तर तकलादू कलेची काय कथा? देश बदल रहा है म्हणजे काय, ते वेळीच ओळखले नाही तर यांना जमिनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही. संस्कृती कला माणसांची असते मुठभरांची मक्तेदारी नसते.
खर आहे भाऊ,एखाद्यावेळी लोखंडी नळी वाकेल पण यांची शेपुट सरळ होणार नाही
ReplyDeleteभाऊ जरा वरूण गांधी बद्दल लिहा उत्तर प्रदेशच्या cm पदाबद्दल
ReplyDelete६४ कलापैकि ' युद्ध कला ' हि सुध्दा एक कला आहे. आम्ही देखील कलाकार आहोत व आम्हाला देशाच्या राजकारणाशी घेणे-देणे नाही असे म्हणून जर सैनिकांनी शस्त्र खाली ठेवले तर . तुम्ही कला कला म्हणून गळ्यात गळे घालणार तर मग सैन्याची पाकिस्तानशी वैयक्तिक दुश्मनी आहे काय ? खरं तर सर्वानी सरकारशी सहकार्य करायला हवे , प्रत्येक वेळी वाद घालने बरे नव्हे , समर्थानी सांगितलेच आहे ' आति वाद वेवाद तोही नसावा '
ReplyDelete