"You can avoid reality, but you cannot avoid the consequences of avoiding reality." - Ayn Rand
जयराम रमेश नावाचे एक कॉग्रेस नेता आहेत. ते आखाड्यात उतरून मैदान मारणारे वक्ते नाहीत, किंवा संघटनात्मक बाजूने पक्षाला शक्ती मिळवून देणारेही नेता नाहीत. तर राजकारणाचे अभ्यासक व घडामोडींचे सार काढणारे नेता आहेत. राहुल गांधी राजकारणात आल्यानंतर त्यांची भाषणे व त्यातले मुद्दे मांडून देण्यासाठीही रमेश यांचे नाव घेतले जात होते. युपीएच्या कारकिर्दीत काहीकाळ मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. पण हास्यास्पद ठरतील अशी विधाने केल्यामुळे त्यांच्यावर कधी आक्षेप घेतला जाऊ शकला नाही. उलट नेमक्या क्षणी योग्य विधाने केल्यानेच त्यांचा पक्षात बळी गेल्याचे काही दाखले देता येतील. कॉग्रेसमध्ये मागल्या काही वर्षात गुणी नेत्यांचे जगणे कसे असह्य होऊन गेले, त्याचा नमूना म्हणून जयराम रमेश यांना सादर करता येईल. अलिकडे त्यांचा चेहरा कुठल्या वाहिनीवर किंवा वृत्तपत्रात दिसत नाही. त्यांची जाण किती नेमकी आहे, त्याची आज आठवण येते. जुन २०१३ म्हणजे जवळपास साडेतीन वर्षापुर्वी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि अजून त्यांची पक्षानेही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली नव्हती. अशावेळी रमेश यांनी केलेले एक जाहिर विधान आज आठवते. ते विधान भविष्य वर्तवणारे होते. पण त्यातला आशय समजून घेण्यापेक्षा राहुल सोनियांच्या चमच्यांनी रमेश यांची हुर्यो उडवली आणि त्यांना गप्प बसणे भाग पाडले. अर्थात त्यामुळे रमेश यांचे कुठलेही व्यक्तीगत नुकसान झाले नाही. पण त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्यामुळे आज एकूणच कॉग्रेस पक्षाला वनवासात जावे लागलेले आहे. रमेश तेव्हा म्हणाले होते, ‘नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस पक्षासमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे’. तात्काळ त्यांच्या विरोधात पक्षातच मोठे काहूर माजले. सत्यव्रत चतुर्वेदी नावाच्या नेत्याने तर रमेश यांनी भाजपात जाऊन मोदींची आरती करावी, असा टोमणा मारला होता.
त्यानंतर दिर्घकाळ रमेश गप्प होते आणि पुढे खरोखरच भाजपाने मोदींना लोकसभा निवडणूकीत प्रचारप्रमुख व पुढे पंतप्रधानपदाचे उमेदवार केल्यावर, रमेश असेच काही गंभीर बोलले होते. पण यावेळी रमेश सावध होते. त्यांनी मोदींचे कौतुक किंवा निंदा करण्यापेक्षा राहुल गांधींच्या नेतृत्वातील त्रुटी समोर आणण्याचा प्रयास केला होता. कारण कॉग्रेस पक्षाने मोदींचे आव्हान स्विकारायला राहुलना पुढे केले होते. मात्र खुद्द राहुलनाच आपण कशासाठी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली आहे, त्याची कल्पनाही नव्हती. राहुल हा काळ प्रसंगाचे भान नसलेला तद्दन बेअक्कल तरूण आहे, असेच रमेश यांना म्हणायचे होते. पण ते त्यांनी अतिशय साखर पेरल्या शब्दात कथन केलेले होते. ‘राहुल गांधी उत्तम काम करीत आहेत. ते मुळापासून कॉग्रेस पक्षाची संघटना बांधण्याचे दुरगामी काम करीत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी राहुल कॉग्रेस संघटना सज्ज करीत आहेत. मात्र आम्ही कॉग्रेसजन २०१४ मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा मतदानासाठी चिंताक्रांत आहोत.’ असे रमेश यांचे विधान होते. यातला गर्भितार्थ काय होता? लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली आहे आणि राहुलना त्याचा पत्ताच नाही. त्यांच्या लेखी ती निवडणुक सहा वर्षे पुढे आहे. म्हणूनच २०१४ मध्ये काही आव्हान नाही, असे राहुल वागत आहेत. त्याचा जबरदस्त फ़टका पक्षाला बसू शकतो, असेच रमेश यांना सुचवायचे होते. पण इतके खरे व स्पष्ट कॉग्रेसमध्ये राहुन बोलता येत नाही. राहुल हेच पक्षातले एकमेव बुद्धीमान गृहस्थ असल्याची समजून असेल, त्यांनाच पक्षात स्थान आहे. त्यावर शंका असेल, त्यांनी पक्षात राहू नये, असा अलिखित नियम आहे. रमेश यांना कॉग्रेस सोडायची नसल्याने त्यांनी राहुल कसा बेअक्कल आहे, तेच गोड शब्दात सांगितले आणि तेच राहुलचे कौतुक समजून कोणी आक्षेपही घेतला नाही. ही कॉग्रेस पक्षाची गेल्या दहाबारा वर्षातली शोकांतिका होऊन गेली आहे.
जयराम रमेश यांची उपरोक्त दोन्ही विधाने काळजीपुर्वक समजून घेतली असती, तर कॉग्रेसला आपली रणनिती आखता आली असती. इतकी दुर्दशा होण्याचे कारणही उरले नसते. पण ज्याला लढाई म्हणजे काय ते माहित नाही आणि कोणाशी लढायचे आहे, त्याचाही अजून थांगपत्ता लागलेला नाही; अशा व्यक्तीला सेनापती करून पक्ष लढत असेल, तर यापेक्षा काय वेगळे घडु शकणार होते? रमेश यांचे पहिले विधान भविष्याची चाहुल होती. तेव्हा एका मध्यम राज्याचा मुख्यमंत्री असलेला नरेंद्र मोदी नावाचा नेता, केवळ लोकसभा निवडणूकीपुरते आव्हान नव्हते. तर ते स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान होते, असे रमेश म्हणाले होते. कारण एका भावी राष्ट्रीय नेत्यासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेची लक्षणे मोदींमध्ये रमेश बघू शकत होते. अगदी भाजपातल्या अनेक जाणत्यांनाही त्याचा सुगावा लागला नव्हता, तेव्हा रमेश यांनी भविष्यवाणी केली होती. त्यांनी निवडणूका भाजपाला जिंकून देणारा नेता असे म्हटलेले नव्हते. तर सर्वात मोठे राजकीय आव्हान असे मोदींचे वर्णन केलेले होते. त्याचा अर्थ सत्ता मिळाली तर हा नेता कॉग्रेसचे नामोनिशाण पुसून टाकण्यापर्यंत मजल मारू शकतो. म्हणूनच त्याला सत्तेपर्यंत पोहोचू देण्यात कॉग्रेसचा विनाश असल्याचाच इशारा रमेश देत होते. दिल्लीच्या राजकारणात अडीच वर्षापुर्वी पदार्पण केलेल्या मोदींनी जागतिक मंचावरही रमेश यांचे भाकित खरे करून दाखवले आहे. पण मुद्दा तो नाही. तेव्हा सत्यव्रत चतुर्वेदी यांच्यासारख्या राहुल चमच्याला ती मोदींची चमचेगिरी वाटली. जो प्रत्यक्षात कॉग्रेसला जागवायचा प्रयास होता. तेव्हा रमेश यांचे शब्द व विधान गंभीरपणे विचारात घेऊन कॉग्रेसने रणनिती आखली असती, तर मोदींना सत्ता मिळणे रोखता आले नसते कदाचित. पण त्यांना इतके मोठे यश मिळण्यात अडथळे तर नक्की उभे करता आले असते.
कुणाही व्यक्तीचे स्पर्धेतील यश दोन गोष्टींवर अवलंबून असते. पहिली गोष्ट त्या व्यक्तीची कुवत, गुणवत्ता व यशस्वी होण्यासाठीची त्याच्यातली जिद्द होय. पण फ़क्त तेवढ्याने मोठे यश संपादन करता येत नाही. तिथे प्रतिस्पर्ध्याच्या चुका, मुर्खपणा व बेतालपणाची मदत आवश्यक असते. मोदींना पंतप्रधान पदापासून रोखण्यात कॉग्रेस यशस्वी होऊ शकली नसती. पण त्यांना पंतप्रधानपद उपभोगताना कामात यशस्वी होण्यामध्ये तर कॉग्रेसला अडथळे नक्की निर्माण करता आले असते. आज मोदी यांना जी जागतिक मान्यता मिळालेली आहे, किंवा देशांतर्गत कारभारात अडीच वर्षे उलटून गेल्यावरही त्यांची लोकप्रियता कायम आहे; त्याचे सर्व श्रेय मोदींना एकट्याला घेता येणार नाही. त्यात राहुल व सोनियांसह विरोधकांचा मोठा हातभार लागलेला आहे. आधीची दहा वर्षे सत्तेत असलेली कॉग्रेस आज इतकी अगतिक व कालबाह्य वाटण्याचे अन्य कुठले कारण असू शकते? मुद्दे, काम व धोरणांच्या संदर्भाने कॉग्रेस पहिल्यापासून मोदी विरोधात कामाला लागली असती, तर मोदींना इतके सहजासहजी यशस्वी होता आले नसते. दुसरी गोष्ट, लोकसभेच्या निकालानंतर राहुलची लायकी लक्षात आलेली होती. तरीही त्याचेच नेतृत्व पक्षावर लादण्यातून मोदींचे काम अतिशय सोपे होऊन गेले. कारण मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठे आव्हान होते आणि राहुलना तर २०१९ ची लोकसभा जिंकायची होती. आजही त्यांना नेमके काय करायचे आही, तेही कोणी कॉग्रेसवाला सांगू शकणार नाही. पण मुद्दा राहुलचा नाहीच. त्या पक्षातल्या जयराम रमेश यांच्यासारख्या गुणी प्रतिभावान नेत्याचा सवाल आहे. आजही कोणी त्यांच्याकडे गंभीरपणे बघायला तयार नाही आणि कॉग्रेसचा बोजवारा उडालेला आहे. नेताच पक्ष बुडवण्यासाठी अविरत झटतो आहे. माझी जो नैय्या डुबोये, उसे कौन बचाये? रमेश पक्षात असले म्हणून उपयोग काय?
छान भाऊ
ReplyDelete