Saturday, October 8, 2016

श्रीमंता घरचे बेताल पोर


Image result for rahul cartoon

मागल्या लोकसभा निवडणूकीत राहुलने शतायुषी कॉग्रेसचा पुरता बोजवारा उडवून दिला असतानाही त्या पक्षाच्या उरल्यासुरल्या नेत्यांना जाग आलेली नाही. कॉग्रेसनेच देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठे होता? असे मुद्दे उपस्थित करणार्‍यांना, आज आपण व आपला पक्ष कुठे आहे, त्याचे तरी भान आहे काय? असेल तर मागल्या अडीच वर्षात त्यांनी निदान पक्षाची डागडुजी तरी केली असती. पण आता कॉग्रेसवाल्यांना त्यांचा पक्ष किंवा संघटना कशासाठी स्थापन झाली होती, त्याचेही पुरते विस्मरण झाले आहे. अन्यथा गुरूवारी राहुलने मुक्ताफ़ळे उधळल्यावर त्यांच्यातला एक तरी हरीचा लाल राहुलचा कान पकडायला पुढे आलाच असता. पण पक्ष कशासाठी आहे, देश म्हणजे काय, अशा गोष्टी आता कॉग्रेसवाल्यांना कळेनाशा झाल्या आहेत. राहुल काही पोरकटपणा करील त्याचे समर्थन आंणि गांधी घराण्याचे संरक्षण; इतक्यासाठी कॉग्रेस शिल्लक उरलेली आहे. सध्या राहुल उत्तरप्रदेशात मरून पडलेल्या कॉग्रेसला संजीवनी देण्याच्या मोहिमेवर असल्याचे सांगितले जाते. पण शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांना पाणी पाजावे, तशा आवेशात राहुल कॉग्रेसला नामशेष करण्यासाठी झटतो आहे. तसे नसते तर त्याने उत्तरप्रदेशच्या प्रचार मोहिमेत अकस्मात सर्जिकल स्ट्राईकच्या निमीत्ताने मोदींवर ‘खुन की दलाली’ असले शब्द वापरले नसते. यातून कॉग्रेसला मिळू शकणार्‍या २०-३० जागाही गमावल्या जातील याचे भान त्याला नसेल. पण बाकीच्या अनुभवी कॉग्रेस नेत्यांना तरी असायला हवे होते ना? त्यांनी राहुलच्या सुरात सुर मिसळून पक्षाची भूमिकाच समोर आणली आहे. आता कॉग्रेसला देशाशी कर्तव्य उरलेले नाही, की पक्षाच्या भवितव्याची फ़िकीर उरलेली नाही. राहुलच्या कुठल्याही बाललिलांचे कौतुक करताना कॉग्रेसचे दिवाळे वाजवणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.

पाकिस्तानला कुठल्याही सामन्यात वा क्रिकेट स्पर्धेत पराभूत केले, तरी ज्या देशातली जनता आनंदोत्सव साजरा करते. अशा देशात राहुलने उधळलेली मुक्ताफ़ळे त्या पक्षाला कुठे घेऊन जाऊ शकतील? भारतीयांच्या मनात पाकविषयी इतका तिरस्कार आहे, की कुठल्याही कारणाने व कुठल्याही ठिकाणी पाकिस्तानचे नाक कापले गेले, तर भारतीय माणूस सुखावत असतो. ही वस्तुस्थिती आहे. मग असे काही करणारा कोणीही असो, भारतीय त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. २०-२० क्रिकेटच्या पहिल्याच स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले आणि महेंद्रसिंग धोनी भारतीयांच्या गळ्यातला ताईत होऊन बसला. त्या स्पर्धेतला विजेता संघ मायदेशी परतला, तेव्हा त्याची जागोजाग मिरवणूक काढण्यात आली होती. धोनीच्या धावांपेक्षा तो देशाचा हिरो झाला, पाकला पाणी पाजले म्हणून. ही बाब लक्षात घेतली, तर सर्जिकल स्ट्राईकने काय साधले आहे, त्याचा अंदाज येऊ शकतो. पाकच्या कुरापतखोरीला भारतीय सेना चोख उत्तर देऊ शकते, याविषयी भारतीयांच्या मनात काडीमात्र शंका नाही. पण तशी संधी भारतातले राजकारणी सेनेला देत नाहीत, अशीच एकूण लोकभावना होती. त्यामुळेच दूधाची तहान ताकावर म्हणतात, त्याच पद्धतीने लोक क्रिकेटच्या विजयात पाकिस्तानचा पराभव शोधायला उतावळे होत राहिले. १९७१ च्या बांगला युद्धाच्या आठवणीवर जगत राहिले होते. त्याला ताज्या प्रतिहल्ल्याने छेद दिला गेला आहे. पाक हद्दीत घुसून केलेली कारवाई भारतीयांना हवी होती आणि तीच झाल्यावर लोकांना आनंदाला पारावार राहिला नाही. हे वेगळे सांगायला नको. याची प्राथमिक जाणिव प्रत्येक पक्षाला व नेत्याला असल्यामुळेच, त्यांनी निमूटपणे श्रेय मोदींना देत कारवाईचे समर्थन केले होते आणि कारवाईचे कौतुकही केले होते. मग माशी कुठे शिंकली?

लोक दोन दिवसात सर्व काही विसरून जातील आणि आपण मोदींच्या या निर्णयशक्तीला आव्हान देऊ; असे राहुल किंवा तत्सम क्षुद्रबुद्धी असलेल्या केजरीवाल यांना वाटले होते. म्हणूनच त्यांनी पाकिस्तानचा इन्कार आल्यावर पुरावे मागण्याचा पवित्रा घेतला. राहुलनी मोदी श्रेय लाटत असल्याचा आक्षेप घेतला. पण श्रेय घेण्याचा विषयच कुठे येतो? अफ़जल गुरू वा कसाबला फ़ाशी देण्याचे श्रेय घेणार्‍यांनी आज मोदींच्या श्रेयाची उठाठेव करावी काय? इंदिरा गांधी यांच्या हौतात्म्याचे भांडवल करणार्‍या दिवट्या नातवाने हौतात्म्याच्या श्रेयाचा सवाल विचारावा काय? जयपूर येथे तीन वर्षापुर्वी तावातावाने भाषण करताना पक्षाच्या अधिवेशनात, राहुलने काय म्हटले होते? ‘इन लोगोंने मेरे दादीको मारा. मेरे पापा को मारा, मुझेभी मार डालेंगे. लेकिन मुझे कोई फ़रक नही पडता’. हेच विधान होते ना राहुलचे? याच्या दादी वा पित्याला कोणी मारले होते? घातपात्यांनी मारले होते. विरोधी पक्षातल्या कोणी त्यांच्या हत्या केलेल्या नव्हत्या. मग असा हौतात्म्याचा बाजार मांडण्याची राहुलला काय गरज होती? पण कुठल्याही सहानुभूतीचा वाडगा घेऊनच फ़िरायची सवय असल्यावर, दुसरी काय अपेक्षा करता येईल? जे आपल्या कुटुंब वा घराण्यातील कुणाचे हौतात्म्य असे बाजारू वस्तु म्हणून विकतात, त्यांना जगातल्या सगळ्या वस्तु व भावनाही विकावू माल वाटल्यास नवल नाही. म्हणूनच जगाने सर्जिकल कारवाईसाठी मोदींची पाठ थोपटली, तर राहुलला वाटले मोदींनी बाजारातून ते श्रेय विकत घेतले आहे. जशी तुमची मानसिकता असते, तशाच नजरेतून तुम्ही जगाकडे बघत असता. राहुल व त्याच्या कुटुंबाला तसाच व्यापार करायची सवय असल्यावर, त्याने असे उच्चार काढल्यास नवल नव्हते. पण त्यातून भारतीय जनमानस दुखावले जाते आहे, याचा तरी विचार पक्षातल्या बुजूर्गांनी करायला हवा ना?

शेवटी लोकशाहीत लोकमतावर सत्ता वा यश मिळवता येत असते. त्यासाठी लोकभावना चुचकारावी लागत असते. लोकभावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. पण जनतेशी काडीमात्र संबंध उरलेला नाही, अशा राहुलला ते कसे समजावे? त्याने जवानांच्या ‘रक्ताची दलाली’ मोदी करतात असा बेछूट आरोप करून जनतेसह सेनादलाच्या भावनाच पायदळी तुडवल्या आहेत. परिणामी लोकमत आता कॉग्रेसच्या कमालीचे विरोधात गेले आहे. दोनतीन दिवसात पडलेला फ़रक आपण वाहिन्यांवर होणार्‍या चर्चेतही बघू शकतो, गेला महिनाभर अनेकदा विविध माजी सेनाधिकारी चर्चेत सहभागी होत असतात. त्यापैकी कोणी कधी राजकीय पवित्रा घेतलेला नव्हता. पण राहुलनी मुक्ताफ़ळे उधळली आणि एका दिवसात सरसकट बहुतांश माजी सेनाधिकारी कॉग्रेस विरोधात व मोदी समर्थनार्थ बोलू लागले आहेत. आपल्याला आजवर कॉग्रेसी नेभळट नेतृत्वामुळे कठोर कारवाई करता येत नव्हती आणि मोदींनी मोकळीक दिल्यानेच इतकी ठाम कारवाई प्रथमच होऊ शकली; अशी ग्वाही सेनाधिकारी देऊ लागले आहेत. म्हणजेच एका फ़टक्यात राहुलनी देशातल्या कोट्यवधी सैनिक व त्यांच्या आप्तस्वकीयांना मोदींच्या गोटात ढकलून दिले आहे. आजीमाजी सैनिकांना मोदींच्या पाठीशी नेऊन उभे केले आहे. मग कॉग्रेसला काय भवितव्य उरले? अर्थात कॉग्रेस नेत्यांनाही कॉग्रेसचे श्राद्धच घालायचे असेल, तर दुसरे काय होऊ शकते? त्यांना देशाशी कर्तव्य नाही की कॉग्रेस पक्षही शिल्लक ठेवण्याशी कर्तव्य उरलेले नाही. राहुल-सोनिया व गांधी घराण्यासाठी पक्ष बुडाला तरी बेहत्तर, अशी आज कॉग्रेसी मानसिकता झालेली आहे. त्याचेच परिणाम आपण बघत आहोत. श्रीमंत घरच्या लाडावलेल्या बेताल पोराने महागडे किंमती खेळणे मोडून तोडून टाकावे, तशीच आता कॉग्रेसची दुर्दशा झाली आहे. पुढल्या लोकसभेपर्यंत पक्ष शिल्लक असेल की नाही राहुल जाणे!

2 comments:

  1. हेअर डाय च्या पाकिटावर एक सुचना लिहीलेली असते कि हि पावडर त्वचेच्या लहान भागावर लावा व काही अपाय नाही झाल्यास डोक्यावर लावावी . राहुलनी असेच करावे आपल्या भाषणाचा डेमो आधी बंद खोलीत दहा-बारा लोकासमोर द्यावा , त्यांच्या प्रतिक्रिया बघाव्यात त्या छोट्या जनसमुहाने भाषण पास केले तर ते भाषण जाहीर सभेत द्यावे . नाहीतर त्यांनी त्यांचा सल्लागार बदलावा म्हणजे त्यांची अवस्था आ कुत्ते मुझे काट अशी होणार नाही. लोकशाहीत एक सशक्त हवाच असतो. राहुलने स्वतःचे व पक्षाचे असे हसे करुन घेउ नये. बघा माझे पटतेय का ते !

    ReplyDelete
  2. भाऊ,हे दिवटे काही दिवसांपुर्वी आलूकी फॅक्ट्री बाबत बोलत होते,इतकी बुद्धिमत्ता??? यांच्याच पक्षातील एक नेता यांचे पिता प्रधानमंत्री असताना बोलताना म्हणाला होता"शिवसेनेला शेतीतल काय कळतय ? रताळ जमिनीच्या खाली उगवतय का वर ?" यावरच दादा कोंडके यांचे उत्तरही आठवतय "दिल्लीत राजीव गांधींच्या पायापडून वर बघितल्यावर ......"

    ReplyDelete