Wednesday, October 19, 2016

जरा हटके जरा बचके

त्या मोर्चानंतर मेळावा झाला, त्यात एका पोलिस शिपायाने आपल्या नोकरीची पर्वा न करता व्यासपीठावर जाऊन पोलिसांच्या बचावाला पुढे आला म्हणून राज ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. ह्याला सामान्य माणसाची कृतज्ञता म्हणतात, जी प्रतिष्ठीत मान्यवरांकडे क्वचितच आढळते.

raj thackeray raza academy के लिए चित्र परिणाम

"In the End, we will remember not the words of our enemies, but the silence of our friends." - Martin Luther King Jr.

२०१२ च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत एक मोठी घटना घडलेली होती. दूर पलिकडे कुठे म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात बौद्ध भिक्षूंनी दंगली पेटवल्या होत्या. त्यामुळे हजारो मुस्लिमांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला होता. त्याच्या झळा इथल्या मुस्लिमांना किंवा मुस्लिम संघटनांना इतक्या भाजून काढणार्‍या होत्या, की रझा अकादमी नावाच्या संघटनेने मुंबईत त्या हिंसेच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. आझाद मैदानावर मेळावा आणि मोर्चा असा कार्यक्रम होता. तिथे अकस्मात दंगल पेटवली गेली. मजेची गोष्ट म्हणजे त्या व्यासपीठावरून काही पोलिस अधिकार्‍यांनीही भाषणे केल्याच्या बातम्या होत्या. मात्र दंगल पेटली, तेव्हा मुस्लिम दंगेखोरांनी पहिला हल्ला चढवला होता, पोलिसांवरच! तेव्हा कुणा दंगेखोराला एका अधिकार्‍याने बकोटीला धरून पकडले, तर तात्कालीन पोलिस आयुक्तांनी त्या अधिकार्‍यालाच दमदाटी करून दंगेखोराला सोडायला फ़र्मावले होते. तिथे हजर असलेल्या पोलिस व टिव्हीच्या गाड्यांनाही आगी लावल्या गेल्या. दुकानांची मोडतोड व जाळपोळ झालेली होती. अश वेळी मोठा पोलिस फ़ौजफ़ाटा उपस्थित असताना सामान्य नागरिकांना कोणते संरक्षण मिळाले होते? नजिकच्या बोरीबंदर स्थानकात महिला पोलिसांशीच मुस्लिम दंगेखोरांनी लैंगिक चाळे केल्याची घटनाही गाजलेली होती. तेव्हा पोलिस व नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी व सुरक्षेच्या मागणीसाठी कोण हरीचा लाल पुढे सरसावला होता? फ़ार कशाला, दंगा माजवून मुस्लिम जमाव पांगला तर त्यांना अटक करण्याचीही धमक पोलिसांनी दाखवली नव्हती. संशयितांना लगेच पकडू नका, रमझान महिना संपेपर्यंत कळ काढा, असे आदेश दिल्याच्याही बातम्या होत्या. विसरून गेले सगळे शहाणे, तो काळ? तेव्हा एक संघटना त्याविरुद्ध आवाज उठावायला पुढे सरसावलेली होती, तिचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना होते.

आज त्याच मनसेने पाक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रतिबंध घालण्याची मागणी केल्यावर अनेकांना पोलिस व कायदा आठवला आहे. त्या लोकांना पोलिस व कायदा किती व कोणाचे संरक्षण करू शकतो, हे अजून कळलेले नाही काय? ज्या पोलिसांना आपल्याच सहकारी महिला पोलिसांवर लैंगिक हल्ले झाल्यावर गुन्हेगारांना जागच्या जागी रोखता आले नाही; किंवा पाठलाग करून पकडण्याची हिंमत झाली नाही, त्यांच्याकडून कसल्या सुरक्षेची अपेक्षा करायची? तेव्हा त्याच पोलिसांच्या अब्रु व सुरक्षेसाठी मनसेने आवाज उठवला असेल, तर आज तेच पोलिस मनसे वा तिचा नेता राज ठाकरे याच्या विरोधात कुठली कारवाई करू शकतील? त्यांच्यापाशी तो नैतिक अधिकार तरी उरतो काय? सेक्युलर थोतांडामुळे भारतातल्या कायद्यांनी आपला कायदेशीर अधिकार कधीच गमावला आहे. नैतिक अधिकार रझा अकादमीच्या दंगलीनंतर गमावलेला आहे. पण मुद्दा पोलिसांचा नाहीच. ते बिचारे गळ्यात पट्टा बांधलेल्या शिकारी कुत्र्यासारखे आज्ञेचे बांधिल असतात. त्यांचा पट्टा ज्यांच्या हाती असतो, त्यांच्याच इच्छेनुसार त्यांना शिकार करता येते. असे पोलिस करण जोहरच्या चित्रपटाला संरक्षण देणार म्हणजे काय? कलाकार म्हणून ज्यांना आज अविष्कार स्वातंत्र्याचा पुळका आला आहे, त्यांनी आपल्याच उपजातीतल्या माध्यमांच्या ओबीव्हॅन रझा दंगलखोरांनी पेटवल्या, तेव्हा कुठे बिळात दडी मारून बसलेले होते? त्या वाहिन्या किंवा अन्य पत्रकारांनी तरी किती आवाज उठवला होता? त्या घटनेविरुद्ध न्याय मागण्यासाठी मनसेने मोर्चा काढला, त्यालाही बंदी घालण्यात आली होती. ती झुगारून मोर्चा निघाला, हे इतक्यात आपण विसरून गेलो आहोत काय? सगळा कायदा वा राज्यघटना कोणासाठी आहे? भारतीयांच्या वा देशभक्तांच्या मुसक्या बांधण्यासाठी देशाचे कायदे अस्तित्वात आलेले आहेत काय?

तेव्हा मुंबई महापालिकेच्या दारातील अमर जवान स्मारकाची मोडतोड करण्यात आली. ती नुसती सुरूवात होती. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झालेली होती. भारतीय जवान सैनिकांच्या स्मारकाची अशी मोडतोड त्या दंगेखोरांनी कशासाठी केलेली होती? म्यानमारच्या मुस्लिमांना भारतीय सैनिकांनी मारलेले जाळलेले नव्हते. मग त्याच हिंसेच्या निषेधासाठी भारतीय सेनेच्या विटंबनेतून हे मुस्लिम दंगेखोर काय सिद्ध करत होते? जे कोणी भारतीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांच्या संरक्षणाला पुढे येतील, त्यांना आम्ही शिल्लक ठेवणार नाही. जमेल तिथे, शक्य असेल त्या पद्धतीने, भारताच्या सुरक्षेसाठी लढणार्‍यांची अवहेलना; ही त्यामागची प्रेरणा आहे. ती रझा अकादमी आयोजित त्या मोर्चातून, हिंसेतून व्यक्त झाली होती. तीच भावना फ़वादखान नावाचा पाकिस्तानी कलाकार आपल्या मौनातून व्यक्त करतो आहे. तो पेशावरच्या हिंसेचा निषेध करतो. पॅरीस वा अन्य कुठल्या हत्याकांडाचा निषेध करतो. पण उरी येथील भारतीय जवानांच्या हत्याकांडाचा निषेध मात्र फ़वादखान करत नाही. फ़वादच कशाला जे कोणी कलेचे महान प्रेषित आज बोलत आहेत, त्यांनी १९ सप्टेंबरला उरीची घटना घडल्यापासून कधी त्या हिंसेचा निषेध केला होता? चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी येणार म्हटल्यावर सारवासारवी सुरू झाली आहे. प्रदर्शनाचे नाक दाबले गेल्यावर निषेधाचे तोंड उघडले आहे. पण त्यातला कोणीही फ़वादखान वा कुणा पाकिस्तानी कलाकाराला उरीचा निषेध करण्यासाठी एका शब्दाने आग्रह करताना दिसलेला नाही. इथे गयावया करण्यापेक्षा करण जोहर वा अनुराग कश्यपसारखे दिवटे फ़वादलाच निषेधाचे दोन शब्द उच्चारण्याचा आग्रह एकदाही करू शकलेले नाहीत. कारण त्यांचीही प्रेरणा तीच अमर जवान स्मारकाची विटंबना करण्यातून आलेली असते. मनसेने तेव्हाही आवाज उठवला होता आणि आजही उठवते आहे.

फ़वादखान किंवा तत्सम पाकिस्तानी कलाकारांना भारतात वाडगा घेऊन यावे लागते. कारण त्यांच्यातल्या तथाकथित प्रतिभासंपन्न कलेला पाकिस्तानात कुठलाही वाव राहिलेला नाही. नाटक, चित्रपट, गाणे-संगीत अशा गोष्टी इस्लामबाह्य म्हणून त्यांना भिकेला लावलेले आहे. त्यामुळे त्यांचे कलाप्रेम खरे असेल, तर पाकिस्तानातील कलेचा गळा घोटणार्‍यांच्या विरोधात त्यांनीच कंबर कसून उभे रहायला हवे. त्यासाठी भारतीय कलाकार वा बॉलिवुडने हातभार लावला, तर त्याचे स्वागतच करायला हवे. पण पाकिस्तानी कलेचा गळा घोटणार्‍यांच्या विरोधात फ़वादखान उभा ठाकलेला नाही. तर त्यांचीच पाठराखण करण्यासाठी तो मौन धारण करून बसला आहे. प्रतिभेला चालना देण्यासाठी तो झटत नाही, तर कलेला प्रोत्साहन देणार्‍या सार्वभौम भारताच्या व भारतीयांच्या जीवावर उठलेल्या पाकिस्तानी जिहादी मारेकर्‍यांच्या समर्थनाला फ़वादखान खतपाणी घालतो आहे. म्हणूनच त्याचा चित्रपट वा अभिनय, कलाक्षेत्रालाच मारक आहे. तो भारतीयच नव्हेतर जागतिक कलाक्षेत्राला मिळालेला शाप आहे. भारतीय जवान सैनिक फ़क्त देशाची सुरक्षा करीत नाहीत, तर भारतीय कलाक्षेत्राला व प्रतिभेला जे अविष्कार स्वातंत्र्य लाभलेले आहे, त्याचीच जपणूक करण्यासाठी आपल्या प्राणाचे मोल मोजत असतात. करण जोहर, अनुराग कश्यप यांच्या प्रतिभेचा गळा घोटणार्‍या जिहादींना रोखण्यासाठी उरी येथे सैनिकांनी आपले प्राण पणाला लावलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रतिष्ठेसाठी उभा रहाणारा राज ठाकरे असेल, किंवा मनसे वा अन्य कोणीही असेल, त्याची भारतीय कलावंतांनी पाठ थोपटायला पुढे आले पाहिजे. तेच कलास्वातंत्र्य असते. नाहीतर रझा अकादमी आणि तिचे दंगेखोर तुमचा कधीच फ़डशा पाडून मोकळे झाले असते. मनसे वा शिवसेनेच्या गुंडगिरीचा निषेध करणे फ़ॅशन असते. पण अब्रु जायची वेळ येते, तेव्हा युक्तीवाद नव्हेतर अशा आक्रमकांनीच जगाची प्रतिष्ठा व सभ्यता जपलेली आहे. कारण हे पक्ष व तसली माणसे तुमच्यासारखी नॉर्मल नसतात. ‘जरा हटके’ असतात. त्यांच्याबाबत ‘जरा बचके’ असण्यातच शहाणपणा आहे.

2 comments:

  1. छान भाऊ,या घटने नंतर पोलिसांना कळले असेल आपले कोण ? आजपर्यंत गृहखात्याला गुलामा प्रमाणे वागवले आहे मुंबई सारख्या मोठ्या शहरात छोट्या घटना होतच राहिल्यात खात्यावर चढलेला गंज उतरायला हवा चमक ✨ यायला हवी पोलिस मित्र वाटायला हवेत संकट नको

    ReplyDelete
  2. एकदम मार्मिक बोललात भाऊ...आणि हे तुम्ही बोललात त्याबद्दल आधी धन्यवाद...नाहीतर तुष्टीकरणाच्या राजकारणात लाळ चाटायची तेवढी बाकी ठेवली आहे tv वाल्यांनी....

    ReplyDelete