२०१२ च्या मध्यापासून मी सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा आढावा घेत राहिलो आहे. खरेतर तेव्हा फ़ारसा कोणी मोदी राष्ट्रीय पातळीवर येण्याचा गंभीरपणे विचारही करीत नव्हते. राजकारणी सोडाच, राजकीय अभ्यासकही तशा कल्पनेची टिंगल करीत होते. व्हायब्रंट गुजरात नामक कार्यक्रम मोदी आयोजित करायचे आणि त्यात जगभरच्या उद्योजकांना आमंत्रित करायचे. अशाच एका कार्यक्रमात रतन टाटा किंवा मुकेश अंबानी, यांच्यासारख्या मोठ्या उद्योगपतींनी मोदी पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आणि गंमत वाटली. अर्थात माध्यमातून त्यांच्या वक्तव्याची टवाळीच झाली. ते स्वाभाविकच होते. कारण माध्यमांनी सेक्युलर असायला हवे आणि सेक्युलर असण्यासाठी सेक्युलर राजकीय पक्ष बकवास करतील, त्यांचीच पुनरुक्ती करायची असा दंडकही होता. त्यामुळे मोदी पंतप्रधान ह्या कल्पनेची माध्यमातून हेटाळणी झाल्यास आश्चर्य नव्हते. पण यापैकी कोणालाही इतके मोठे उद्योजक असे का बोलतात, त्याची चाचपणी करावी असेही वाटले नाही. दुसरीकडे इंडियाटुडे किंवा हिंदूस्तान टाईम्स अशापैकी कोणीतरी त्यांच्या वार्षिक परिसंवादात तीन प्रमुख व्यक्तींना आमंत्रित केले होते. त्यापैकी दोन व्यक्ती तेव्हा देशाची सुत्रे हलवित होत्या, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग! तिसरी व्यक्ती त्या पंक्तीत बसणारी नव्हती. ती होती गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी! त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान नव्हते की भाजपाच्याही राष्ट्रीय नेतृत्वात स्थान नव्हते. अशा व्यक्तीला थेट मनमोहन व सोनियांच्या पंक्तीला आणून बसवणारी घटना खटकणारी होती. म्हणून मग माझेही लक्ष या नेत्याकडे गेले आणि तो नक्कीच देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे मला मनापासून वाटले. मग त्याचा शोध घेत गेल्याने पुढल्या काळात दोनशेहून अधिक लेख मोदी विषयावर लिहीले गेले.
साडेचार वर्षाहून अधिक काळ मोदींवर लिहीताना, माझ्यावर मोदीभक्त किंवा मोदींचा समर्थक असल्याची टिकाही झाली. अगदी पुरोगाम्यांकडून सतत ही टिका झालीच. पण माझे मित्र असलेल्या अनेक पुरोगामी मित्रांनाही मी अतिरेक करतोय असेच वाटले. पण मी मोदींची बाजू घेण्यापेक्षा, त्यांची जमेची बाजू माध्यमातून दुर्लक्षित होते, तेवढीच पुढे आणत होतो. अगदी बारकाईने माझे लेख आजही वाचले, तर त्यात मोदींचे कुठलेही गुणगान मी केलेले नाही. उलट हा माणूस पुरोगामी राजकारण आणि पुरोगामी चळवळी यांच्यावर येऊ घातलेला सर्वात मोठा ऐतिहासिक धोका असल्याचेच प्रतिपादन मी करीत होतो. म्हणजे असे की पुरोगामी राजकारण किंवा त्याचे पुरस्कर्ते मोदींच्या धोक्याकडे काणाडोळा करीत असल्याचे सांगत, त्यांनाच सावध करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे लक्षात येऊ शकेल. मात्र त्यातले सत्य किंवा तथ्य नाकारण्यात धन्यता मानली गेली आणि आज पुरोगामी चळवळ विचारसरणी अधिकच दुबळी होऊन गेली आहे. माझ्या त्या लिखाणाला खरेतर मोदी समर्थक वा त्यांचे भक्त यांनी आक्षेप घेतला असता, तर मला आवडले असते. कारण मोदी कोणते राजकारण व डावपेच खेळत आहेत, त्याचाच उहापोह माझ्या लिखाणातून चालला होता. त्यातले बारकावे पुरोगाम्यांनी ओळखले असते व समजून घेतले असते, तर त्यांची आजच्यासारखी दुर्दशा होऊन गेली नसती. पण ते होणे नव्हते. आज नरेंद्र मोदी सुरक्षित बहुमताने देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. तेवढेच नाही, मोदींचे ते स्थान बळकट करण्याचे आत्मघातकी डावपेच पुरोगाम्यांनी अजूनही सोडलेले नाहीत. त्यामुळे आता मला अशी शंका येते, की आता पुरोगाम्यांचा अजेंडाही मोदीच ठरवतात की काय? कारण मोदींना हवे तसेच पुरोगामी नेते व राजकीय पक्ष वागत असतात. दोन्हीकडून मोदीच खेळ करत असतात की काय, अशीही शंका येते.
कथा-कादंबरी किंवा सिनेमा नाटकात जशी प्रत्येक पात्राची भूमिका ठरवून दिलेली असते आणि त्यानुसारच पात्रे बोलत वागत असतात, तसाच काहीसा प्रकार आजकाल भारतीय राजकारणात होत असतो. कथानकात ज्याला हिरो ठरवलेले असते, त्याची प्रतिमा उजळ करण्यासाही खलनायकाने प्रेक्षकात अधिकाधिक संताप जागा व्हावा, असे बोलावे वागावे, हीच योजना असते. मोदी पंतप्रधान झाल्यापासून तमाम विरोधक व प्रामुख्याने पुरोगामी, तसेच वागताना दिसत नाहीत काय? कथानकात अशा वागण्याने नायकाविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा हेतू असतो. म्हणूनच खलनायक अधिकाधिक तिटकारा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतो. राजकारणात मोदींचे विरोधक त्यापेक्षा काय वेगळे करताना दिसतात? आपल्या प्रत्येक कृती व वक्तव्यातून नित्यनेमाने जनमानसात संताप निर्माण व्हावा आणि पर्यायाने मोदींकडे लोकांची सहानुभूती तयार व्हावी, असे हे विरोधक कशाला वागत असावेत? कन्हैयाच्या नेहरू विद्यापीठातील घोषणबाजीने लोकांमध्ये संताप उसळला होता. त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवला गेला. तो सामान्य माणसाला आवडणार हे उघड सत्य आहे. तरी विरोधक त्याच्या समर्थनाला उभे ठाकतात, तेव्हा स्वत:विषयी जनमानसात राग निर्माण करतात. त्याची प्रतिक्रीया म्हणून मोदी वा सरकारला सहानुभूती मिळत असते. आताही पाकिस्तानला लष्कराने धडा शिकवल्यानंतर मोदींनी सेनाधिकार्यांनाच त्याची माहिती जाहिर करायला पुढे केले. तरीही विरोधकांनीच पंतप्रधानांचे अभिनंदन करून मोदींनाच श्रेय दिलेले होते. पण त्याविषयी मौन धारण करून मोदी गप्पच राहिले आणि आता तेच विरोधक मोदींनी सैन्याच्या कर्तृत्वाचा राजकीय लाभ उठवल्याचा आरोप करीत आहेत. मग मोदीभक्त कोणाला म्हणायचे? जे मोदींच्या कर्तृत्वाला नवनव्या संधी उपलब्ध करून देतात त्यांना मोदीशत्रू म्हणायचे की मोदीभक्त म्हणायचे?
आताही या घडामोडीत मोदींनी केवढे मोठे राष्ट्रीय कार्य केले, असेच तावातावाने सांगितले जात आहे. दुसरीकडे तितक्याच तावातावाने मोदींवर दोषारोपही होत आहेत. त्यात राजकीय निर्णय घेण्य़ाची मोदींच्या क्षमतेवर मला तीळमात्र शंका नाही. पण राजकारण विसरून मोदी सर्वकाही करतात, असे म्हणण्याइतका मी तरी भोळाभाबडा नाही. म्हणून तर यातही मोदी कसे धुर्त राजकारण खेळतात, हे मी उलगडून सांगतो आहे. खरे तर त्यातले मोदींचे लबाड राजकारण मीच उलगडतो आहे. तरी मोदींचे चहाते माझ्यावर खुश आहेत आणि मोदींचे विरोधक मात्र माझ्यावर नाराज आहेत. कारण मोदी इतके धुर्त व चतूर राजकारण करू शकतात, हेच पुरोगाम्यांना मान्य नाही. सर्व अडचण तिथेच आहे. मोदींची गुणवत्ता, कुवत किंवा धुर्तपणाच पुरोगाम्यांना मान्य नाही. म्हणून तोच धुर्तपणा नाकारण्यासाठी हे शहाणे मोदींच्या सापळ्यात अलगद जाऊन फ़सतात आणि ते उलगडून दाखवले की त्यांना माझा राग येतो. त्यात माझे काहीही नुकसान झालेले नाही, की मोदीचाही तोटा होऊ शकलेला नाही. पुरोगामी मुर्खपणा ही हळुहळू मोदींच्य राजकारणाची जमेची बाजू होऊन गेली आहे. जो सर्जिकल स्ट्राईक विधानसभांच्या निवडणूकीपर्यंत जुना विषय झाला असता, त्याला ताजा ठेवण्याचे नवे पाप पुरोगामी करीत आहेत. सहाजिकच त्यातून आगामी पाच विधानसभा निवडणूकीसाठी मोदींसह भाजपाचे काम सोपे करून टाकत आहेत. स्वत:च गळ्यात हार घालून कत्तलखान्याकडे धावत सुटलेल्या बकरीला ब्रह्मदेवही वाचवू शकत नाही. या देशातल्या पुरोगाम्यांना कोण वाचवू शकेल? साडेचार दशकांनंतर दुसरी इंदिरा गांधी आपण अनुभवतो आहोत, याचे भान राजकारण्य़ांना नाही, की माध्यमातील पुरोगाम्यांना नाही. मग वेगळे काय व्हायचे? माझ्या किंवा अन्य कुणाच्या लिहीण्याने बोलण्याने मोदी मोठे होत नाहीत आणि राहुल गांधी यशस्वी ठरू शकणार नाहीत.
अजून काय समजावणार पुरोगाम्यांना.. पुरोगामी म्हणजे जन्मजात हुशार. ते न्यूटनलासुद्धा सफरचंद पडल्यामुळेच गुरुत्वाकर्षणाचा शोध का लावला म्हणून जाब विचारतील.
ReplyDeleteज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे.
छान भाऊ मस्तच,पुरोगामी बकरी खाटकाकडे धावत चालली आहे हाहाहा
ReplyDeleteभाउ जबरदस्त!!!!
ReplyDelete