Thursday, October 27, 2016

क्वेट्टा आणि उरीतले साधर्म्य

quetta police training school violence के लिए चित्र परिणाम

क्वेट्टा ही बलुचिस्थानची प्रांतिक राजधानी आहे. तिथे पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयात सोमवारी घातपाती हल्ला होऊन त्यात ६१ लोकांचा बळी पडलेला आहे. आता त्याचा निषेध कोणकोण करतात, ते बघायला हवे. म्हणजे पाकिस्तानच्या विविध लोकांनी निषेध केला आहेच. चीन व अमेरिकेनेही निषेधाच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. भारतही अशा हल्ल्याचा नेहमीच निषेध करत आला आहे. पण ज्या माणसामुळे भारतात गेला महिनाभर गदारोळ झाला, तो पाकिस्तानी अभिनेता फ़वाद खान क्वेट्टाच्या हल्ल्याविषयी काय बोलतो, हे बघावे लागणार आहे. आता तो क्वेट्टाचा हल्ला असे म्हणतो, की जगातल्या कुठल्याही दहशतवादाचा निषेध करीत क्वेट्टा हे नाव घ्यायचे टाळतो, ते बघावे लागेल. ही घटना घडताच पाकिस्तानचे सरसेनानी जनरल राहिल शरीफ़ तिथे तात्काळ जाऊन पोहोचले आणि त्यांनी मृतांच्या अंत्यसंस्कारातही भाग घेतला. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ही तिथे जाऊन धडकले. त्यांनी म्हणे उच्चस्तरीय बैठक घेऊन दहशतवादाला लगाम लावण्याची भाषाही वापरली. पण कुठला दहशतवाद? जेव्हा पाकिस्तानात उरीच्या हल्ल्यात आपलाच सहभाग होता, असे लष्करे तोयबाचे पोस्टर्स उजळमाथ्याने सांगत आहेत, त्याच देशाचा पंतप्रधान कुठल्या दहशतवादाचा बंदोबस्त करणार आहे? कारण पाकिस्तान हा जगातल्या विविध ब्रॅन्डच्या दहशतवादाचा मॉल झालेला आहे. तिथे कुठल्या दहशतवादाला बंदी व कुठल्या दहशतवादाच्या मार्केटींगला प्रोत्साहन; याचे कधीच स्पष्टीकरण होत नाही. त्यामुळे फ़वाद खानसह दोन्ही शरीफ़ कुठल्या दहशतवादाच्या बंदोबस्ताची वा निषेधाची भाषा बोलतात, ते स्पष्ट होत नाही. क्वेट्टाच्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधामध्ये म्हणूनच काही खास अर्थ उरत नाही. नशीब इतकेच, की अजून तरी पाकने त्याचे खापर भारतावर फ़ोडलेले दिसत नाही.

क्वेट्टाच्या या घटनेची आणखी एक खासियत आहे. त्या घातपाताचे वा हिंसाचाराचे पितृत्व घ्यायला अनेकजण पुढे आले आहेत. त्यामध्ये-सिरीयात धुमाकुळ घालणार्‍या इसिसचाही समावेश आहे. त्या संघटनेने या घटनेची जबाबदारी परस्पर उचलली आहे. पण त्याचवेळी लष्करे झंगवी नामक पाकिस्तानी जिहादी संघटनेनेही त्याचे पितृत्व आपलेच असल्याचाही दावा केला आहे. पाक सरकारनेही झंघवीचाच त्यात हात असल्याचे म्हटले आहे. मग यापैकी कोणाला खरा दहशतवादी म्ह्णावे असाही प्रश्न आहे. त्याचे उत्तर पाकिस्तान देऊ शकत नाही. कारण अशा सर्व ब्रॅन्डचे उत्पादक कारखानेच पाकिस्तानात आहेत. त्यामुळे मालाचे नाव काय यापेक्षा त्यांचे कर्तृत्व वा परिणाम काय, याला महत्व आहे. नाव कुठलेही असो, त्यात गाफ़ील निरपराध माणसांचे हत्याकांड होते, ही एकमेव व्याख्या योग्य आहे. आणि म्हणूनच त्यात पाकिस्तान हा खरा आरोपी आहे. कारण त्यानेच अशा विविध गटांना पोसलेले वा प्रोत्साहन दिलेले आहे. जेव्हा सोयीचे नसतात, तेव्हा त्यांचे पालकत्व पाकिस्तान नाकारत असतो. बाकी सर्व अपत्ये पाकचीच आहेत. इसिस हे नुसते नाव आहे. पण त्याचा जगभर बोलबोला झालेला असल्याने, इतरत्र कोणीही माथेफ़िरु उठतो आणि आपल्या कृतीवर इसिसचे लेबल लावत असतो. त्याही संघटनेला आपला पसारा दाखवण्यास अशा घटनांचा हातभार लागत असल्याने, इसिसही जबाबदारी नाकारत नाही. पण वास्तवात इराक-सिरीयाच्या बाहेर हे नुसते नाव किंवा झेंडा आहे. बाकी ज्याला असे उद्योग शक्य आहेत, ते धमाल उडवत आहेत. पण क्वेट्टाच्या निमीत्ता्ने काही समानता नजरेत भरणारी आहे. उरी आणि क्वेट्टा या दोन्ही हल्ल्याची मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. त्यात बळी पडलेल्यांमध्येही साधर्म्य आहे. हल्ल्याची वेळ वा प्रसंगात चमत्कारीक साधर्म्य आढळून येणारे आहे.

क्वेट्टा येथे सर्वसाधारण जागी घातपाती हल्ला झाला नाही. ती जागा पोलिस प्रशिक्षण महाविद्यालय आहे आणि उरी येथे भारतीय लष्क्राचे विभागिय मुख्यालय होते. दोन्ही जागी पहाटेच्या गाफ़ील क्षणी हल्ला झाला आणि तेव्हा बहुतांश जवान किंवा प्रशिक्षणार्थी गाढ झोपेत होते. दोन्ही जागी पहारा देत असलेल्या एकाकी शिपायावर बेछूट गोळीबार करून घटनेला आरंभ झाला आणि तीनचार जणांच्या गटानेच हा हल्ला केला. आधी पहारेकर्‍यावर गोळ्या झाडून गोंधळ निर्माण करण्यात आला. त्याच गोंधळाचा लाभ उठवून मारेकरी आवारात घुसले. मग नेमके झोपलेल्या जवान वा प्रशिक्षणार्थींच्या शयनकक्षात मारेकरी घुसलेले आहेत. झोपेत व अर्धवट झोपेत असलेल्यांना गोळ्या घातल्या गेल्या. दिसेल तिथे माणूस टिपून मारण्याचा प्रकार झाला आणि शक्य नाही, तिथे अंगाभोवती लपेटलेली स्फ़ोटके उडवून अधिकाधिक माणसे मारली जातील, अशीच कारवाई झाली. आणखी एक गोष्ट समान म्हणजे मारेकरी फ़िदायीन होते आणि ते क्षणोक्षणी आपल्या दूर बसलेल्या वरीष्ठांच्या संपर्कात होते. त्यांच्या आदेशाबरहुकूम कारवाई पार पाडत होते. क्वेट्टा व उरी घटनांमधील ही ठळक साम्ये कुठल्याही तपासाशिवाय नजरेत भरणारी आहेत. त्यासाठी कुणा तपास पथकाला शोध घेण्याची गरज नाही. नुसत्या विविध वाहिन्या वा वर्तमानपत्रातील बातम्या चाळल्या, तरी क्वेट्टा व उरी घटनांमधील अशी साम्ये नजरेत भरणारी आहेत. त्यामुळे दोन्हीकडले घातपाती सारखेच आहेत काय? त्यामागची कार्यशैली समान असली म्हणून, त्यात गुंतलेली जिहादी संघटना एकच आहे काय? नसेल तर उरीचीच पुनरावृत्ती क्वेट्टा येथे कशाला घडवण्यात आली? ती नुसती नक्कल आहे, की एका फ़िदायीन गटाने दुसर्‍या फ़िदायीन गटाला दिलेला तो इशारा मानायचा? तुम्ही जे कराल तेच आम्हीही करू शकतो, असा त्यामाचा सूचक इशारा तर नाही?

आता जिहादी संकल्पना बाजारू झालेली आहे. त्याचे म्होरके हे हिंसाचाराचे व्यापारी झालेले आहेत. सुपारी घेतल्यासारखे हत्याकांड घडवणारे ठेकेदार झाले आहेत. सामान्य घरातील मुले वा संकल्पनांनी भारावलेले माथेफ़िरू हाताशी धरून, कोणालाही ठराविक किंमतीत सामुहिक हत्याकांड घडवून देणारे कंत्राटदार अशी स्थिती आलेली आहे. त्यामुळे आजवर पाकिस्तानच्या इशार्‍यावर सुपारीबाजी करणारे जिहादी, आता अन्य कोणी पैसे मोजले तर त्याच्यासाठी पाकिस्तानलाही गुरूची विद्या शिकवू शकतात. ही बाब लक्षात घेतली तर उरी व क्वेट्टा येथील हिंसक हल्ल्यातल्या साधर्म्याचा उलगडा करण्यास मदत होते. उरीच्या हल्ल्यानंतर माजी भारतीय लष्करप्रमुख जनरल रॉयचौधरी यांनी भारतही फ़िदायीन प्रतिहल्ले करू शकतो, असा निर्वाळा अनेक वाहिन्यांवर बोलताना दिलेला होता. त्याचा अर्थ भारताने फ़िदायीन प्रशिक्षित करून पकिस्तानात पाठवणे असा घेण्याचे अजिबात कारण नाही. ज्यांना पाकने प्रशिक्षित केले आहेत आणि जे स्वयंभू कंत्राटी सुपारीबाज झाले आहेत, अशा कुठल्याही जिहादी गटाकडून भारतही पाकिस्तानला जेरीस आणू शकतो, असेच रॉयचौधरी म्हणत नसतील कशावरून? क्वेट्टा येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात तयार होणारे पाक रेंजर्स वा सशस्त्र पोलिस शेवटी कोणावर हत्यार उगारणार असतात? ते बलुची, पख्तुनी वा अन्य असंतुष्ट पाकिस्तानी जनतेवरच हत्यार उपसत असतात. त्यामुळे त्यांच्या विरोधातली घातपाती कारवाई करण्यासाठी बलुची असंतुष्टांनी क्वेट्टाचा हल्ला केलेला असू शकतो. अशा कारवायांसाठी लागणारी पैशाची वा हत्यारांची मदत भारताकडून प्रोत्साहन म्हणून देण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यातून पाक असंतुष्टांचा हेतू साध्य होत असला, तरी आपल्या अंगाला झळ न लागता भारतालाही किंमत वसुल करता येत असते ना? यापेक्षा दोन्ही हल्ल्यातील साधर्म्याचा अन्य काही वेगळा अर्थ लागू शकतो का?

1 comment:

  1. भाऊ असे गायब होत जाऊनका.छानच सुंदर माहिती

    ReplyDelete