Monday, October 31, 2016

मुस्लिमांसमोरचा यक्षप्रश्न

muslims in UP के लिए चित्र परिणाम

उत्तरप्रदेशात सध्या जे समाजवादी वादळ घोंगावते आहे, त्याने सर्वात मोठा गोंधळ मुस्लिम मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. त्याचा कोणीही विचार करताना दिसत नाही. समाजवादी पक्ष दुभंगणार काय आणि तसे झाले तर कोणाचा लाभ होईल, इतक्याच पातळीवर उहापोह चालू आहे. पण विविध समाजघटकांची विभागणी कशी होऊ शकते त्याचा विचार करण्याची तसदी कोणी घेतलेली नाही. मुस्लिम समाज नेहमी चतुराईने मतदान करत आला आणि त्यामुळेच त्याने एका पक्षाला संजिवनी दिली तर दुसर्‍या पक्षाला धाराशायी करून दाखवलेले आहे. म्हणूनच गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदींनी मुस्लिम मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारल्याचे चित्रण सतत दाखवून, मोदींना घाबरवण्याचा खेळ अनेक पुरोगाम्यांनी व माध्यमांनी केलेला होता. पण मोदी त्या निवडणूकीत अभ्यास करूनच उतरले होते आणि त्यामध्ये मुस्लिम मतांच्या धुर्तपणाचाही बारकाईने विचार झालेला होता. किंबहूना त्यामुळेच मुस्लिम मतांचा प्रभाव त्या मतदानात अजिबात पडू शकला नाही. मात्र त्याचा कोणी गंभीरपणे अभ्यासही केलेला नाही. उत्तरप्रदेशात ८० पैकी ७१ जागा भाजपाने जिंकल्याची चर्चा खुप झाली. पण ८० पैकी एकही जागी कुठल्याही पक्षाचा एकही मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकला नाही. याचा विचार करण्याची बुद्धी कुणाही पुरोगामी विश्लेषकाला झाली नाही. उत्तरप्रदेशच्या लोकसभा मतदानात २० टक्केहून अधिक असलेल्या मुस्लिम मतदाराला मोदींनी कसे निष्प्रभ करून टाकले; त्याचा अभ्यासही ज्यांना करावासा वाटला नाही, तेच तथाकथित जाणकार मुस्लिम मतांशिवाय सत्ता मिळू शकत नाही, असेही दावे तेव्हा करत होते. पण मोदींना सत्ता मिळाली, बहुमत मिळाले आणि मुस्लिम मतांची महत्ता त्याच मतदानातून संपून गेली. आताही लौकरच होणार्‍या विधानसभा मतदानात मुस्लिमांचे स्थान काय, हा विषय कोणालाही सुचलेला नाही.

गेल्या म्हणजे २०१२ च्या वा त्याच्याही आधीच्या विधानसभा मतदानात उत्तरप्रदेशच्या मुस्लिमांची भूमिका निर्णायक होती. २००७ सालात मुस्लिम मोठ्या प्रमाणात बहुजन समाज पक्षाकडे झुकला आणि त्यात ब्राह्मणांच्या थोड्या मतांची भर पडताच. मायावती स्वबळावर बहुमताचा पल्ला गाठून सत्तेपर्यंत जाऊन पोहोचल्या. मात्र तोच मुस्लिम पाच वर्षांनी मुलायमकडे मोठ्या प्रमाणात झुकला आणि सत्तेचे पारडे फ़िरले होते. याला मुस्लिम मतदाराचा धुर्तपणा म्हणता येईल. त्या धुर्तपणाचा थोडा तपशील समजून घेण्यासारखा आहे. जिथे जो पक्ष शिरजोर आहे आणि भाजपाला पाडू शकेल असा उमेदवार समोर आहे, तिथे मुस्लिम मतदाराने शक्ती वापरली. मग भाजपाला झोपवणे शक्य झाले. त्यामुळे २०१२ साली उत्तरप्रदेश विधानसभेत अपुर्व संख्येने मुस्लिम आमदार निवडून आले. ४०३ पैकी ६८ आमदार मुस्लिम होते. याचा अर्थ असा, की विधानसभेतील १७ टक्के आमदार मुस्लिम होते. इतकी मुस्लिम आमदारांची संख्या त्या विधानसभेत कधीच नव्हती. जिथे मुस्लिम दाटवस्ती आहे, तिथेच मुस्लिम आमदार निवडून येत. पण डावपेचात्मक मतदानामुळे सर्व पक्षाचे मिळून ६८ मुस्लिम आमदार होऊ शकले. त्याचा सामान्य बिगरमुस्लिम मतदारालाही धक्का बसला होता. भाजपाने अडीच वर्षांनी आलेल्या लोकसभा मतदानात त्याच भावनेला खतपाणी घातल्याने लोकसभेत चमत्कार घडला आणि उत्तरप्रदेशातून एकही मुस्लिम खासदार लोकसभेपर्यंत मजल मारू शकला नाही. तेव्हा त्याच मुस्लिम मतदाराला किती वैषम्य वाटले असेल? विधानसभेत त्याची भरपाई करण्याचा विचारही नक्की झालेला असेल. त्यामुळे मुलायमच्या पक्षाकडे अशा मुस्लिमांचा ओढा असेल, तर नवल नव्हते. कारण मुलायमचा समाजवादी हा आजकालचा भारतातील एकमेव मुस्लिम पक्ष उरला आहे. पण त्याच्यातच फ़ाटाफ़ुट सुरू झाली आहे.

समाजवादी पक्षातली फ़ाटाफ़ुट हा म्हणूनच केवळ त्या पक्षातल्या विविध नेत्यांचा वा अन्य मागास समाजघटकांचा विषय नाही. तो सर्वात मुस्लिमांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. पण सध्या जी चर्चा व उहापोह चालू आहे, त्यात कोणाचेही लक्ष मुस्लिम मतदाराच्या भावनांकडे अजिबात गेलेले नाही. आक्रमकपणे मुस्लिमांचे समर्थन करणारा अशी समाजवादी पक्षाची ओळख आहे. त्यातच दोन गट पडले आणि मतांची विभागणी होत असेल, तर अशा डावपेचात्मक मतदान करणार्‍या मुस्लिम लोकांनी कोणाला झुकते माप द्यायचे? एका पक्षाची निवड हा मुस्लिमांचा डावपेच नसतो. तर भाजपला पाडू शकेल असा कुठल्याही पुरोगामी सेक्युलर पक्षाचा उमेदवार, असाच मुस्लिम मतांचा कल असतो. तो मुलायमकडे असावा की बंड पुकारून उभा असलेल्या अखिलेशकडे असावा? त्यांना झुगारून मायावतींना कौल द्यावा, की कॉग्रेसकडे पुन्हा आशेने बघावे? आज उत्तरप्रदेशच्या मुस्लिम मतदारासमोर हा मोठा यक्षप्रश्न उभा आहे. कारण तशाही मायावती मुलायमपेक्षा आघाडीवर असल्याचा निष्कर्ष ताज्या मतचाचणीतून पुढे आला आहे. पण भाजपाही पहिल्या क्रमांकावर दिसतो आहे. मुलायम तिसर्‍या क्रमांकावर आधीच फ़ेकला गेलेला आहे. तसे झाले तर मुलायमच्या घराणेशाहीला कंटाळलेला मोठा मागाससमाज भाजपाकडे झुकण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मुस्लिम मतदाराला कुठेही झुकते माप देऊन लाभ होण्याची शक्यता उरणार नाही. मुलायमच्या समाजवादी पक्षात घोंगावणारे फ़ाटाफ़ुटीचे वादळ, म्हणूनच त्या राज्यातील मुस्लिम मतदारांसाठी कयामत घेऊन अवतरले आहे. कॉग्रेस तर नामशेष झाली आहे आणि मुलायमच्या पक्षाला दुभंग भेडसावतो आहे. अशावेळी आज विधानसभेत आहेत, तितके तरी मुस्लिम प्रतिनिधीत्व शिल्लक उरणार काय, हा म्हणूनच मुस्लिमांसाठी गंभीर विषय झाला आहे.

मुद्दा नुसता भाजपाला पराभूत करण्याचा नाही, तर मुस्लिमांचे विधानसभेतील प्रतिनिधीत्व टिकवण्याचाही आहे. आधीच लोकसभेत उत्तरप्रदेशी मुस्लिमांचे प्रतिनिधीत्व शून्यावर आलेले आहे. भाजपात मुस्लिमांचीच संख्या कमी असल्याने, तिथे मुस्लिमांना उमेदवारीच कमी मिळणार. त्यामुळे त्यातून किती मुस्लिम आमदार निवडून येऊ शकतील, त्याची काही हमी नाही. जिथे मुस्लिम दाटवस्ती आहे, तिथेच भाजपा मुस्लिम उमेदवार उभे करील. मुस्लिम दाटवस्ती नसूनही मुस्लिमांना उमेदवारी देणारे पक्ष मायावती मुलायमचे आहेत. त्यापैकी एक दिवाळखोरीत चालला आहे तर दुसरा बसपा किती मुस्लिमांना उमेदवारी देतील, याची हमी नाही. तिकिटे मिळालेल्या सर्वांना निवडून येणेही शक्य नाही. आजवर तीन प्रमुख पक्षाकडून मुस्लिमांना उमेदवार्‍या मिळत होत्या आणि त्यांना डावपेचात्मक मतदान करून अधिक प्रतिनिधीत्व मुस्लिमांना मिळवता येत होते. पण आता समाजवादी फ़ाटाफ़ुटीमुळे उमेदवार विजयी होऊ शकतील असा मायावतींचा बसपा, हा एकमेव पक्षच शिल्लक उरला आहे. पण त्यातून मोठ्या संख्येने मुस्लिम आमदार विधानसभेत पोहोचण्याची शक्यता नाही. त्याकरिता मुस्लिमांना प्रतिनिधीत्वासाठी विजयी होऊ शकणार्‍या पक्षाकडे म्हणजेच भाजपाकडे धाव घ्यावी लागणार आहे. दाटवस्ती असलेल्या मुस्लिम मतदारसंघात कुठल्याही पक्षाचा मुस्लिम निवडून येऊ शकेल. पण निम्मेहून कमी मुस्लिम मतदार असलेल्या जागी भाजपाचा बिगर मुस्लिमही सहज निवडून येईल. मग ती हक्काची जागाही मुस्लिमांनी गमावण्याचा धोका आहे. थोडक्यात आजवरचा डावपेचात्मक मतदानाचा पर्याय मुस्लिमांपाशी उरलेला नाही. त्यांना भाजपाच्या मुख्यप्रवाही राजकारणात यावे लागेल आणि तिथे धार्मिक अट्टाहास चालवून घेतला जाण्याची अजिबात शक्यता नाही. म्हणूनच समाजवादी पक्षातल्या फ़ाटाफ़ुटीचा हा एक विधायक परिणाम राजकारणाला नवी दिशा देऊ शकेल.


5 comments:

 1. छानच भाऊ,गमतीचा भाग असा की सापीयेंचे तुकडे झाले तर नवजात शिशुंचे पक्ष चिन्ह काय असतील !!! पायडल टायर ट्यूब रीम हॅंडेल ब्रेक फोक्स कॅरियर घंटा?

  ReplyDelete
 2. Very Nice Articles bhau.. I became fan of your writings.. really How can you get it in mind?? God gift.. waiting for your article on Bhopal terrorist encounter...
  Keep it up bhau... All the best...

  ReplyDelete


 3. भाऊराव,

  मागील खेपेस जाटांनी मोठ्या कौतुकाने अखिलेश यांना निवडून दिलं. मुस्लीम आमदारांची संख्या फुगाण्यामागे हिंदू जाटांचाही सहभाग आहे. अखिलेश सरकारने बदल्यात काय दिलं? सरकार सुरू झाल्या झाल्या मुझफ्फरनगरच्या दंगली उसळल्या. आता हिंदू जाटांनी का म्हणून मुलायम वा अखिलेशला परत निवडून द्यायचं? यामुळे मुस्लिमांना फटका बसणार हे नक्की आणि म्हणूनंच औवेशी तिथे घुसू पहाणार. मुस्लिमांसमोर यक्षप्रश्न उभा असला तरी हिंदूंची रात्रही वैऱ्याचीच आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 4. what about MiM Bhau.. will they not capitalize on vacuum in muslim leadership space un UP?

  ReplyDelete