Sunday, February 12, 2017

साहित्य संमेलनाचा ‘राजा’?

डोंबिवली मराठी साहित्य संमेलन डोंबिवली के लिए चित्र परिणाम

मागल्या दोनतीन दशकापासून कुठल्याही सार्वजनिक उत्सव सणांवर सडकून टिका करण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती दिसून येत असते. उदाहरणार्थ गणेशोत्सव आला, मग अनेकांना खडबडून जाग येते आणि लोकमान्य टिळकांनी हा उत्सव कशासाठी सुरू केला, त्याचे स्मरण होते. मग अशा उत्सवातून लोकमान्यांचा हेतू कसा विसरला गेला आहे, त्यावर भाष्य करण्याची स्पर्धा सुरू होते. तिथेच ही टिका थांबत नाही. त्या उत्सवाच्या खर्चासाठी पैसे कोणाकडून जमा केले जातात आणि खंडण्या वसुल केल्याप्रमाणे कशी सामान्य लोकांची लूट होत; त्याचेही तपशील सादर केले जातात. त्यात वाजणारे भोंगे किंवा भव्यदिव्य देखावे, त्यासाठी होणारी उधळपट्टी किंवा जमणारी गर्दी; यावरही सडकून टिका केली जात असते. अशी टिका केली, मग आपण काही महान सामाजिक उत्थान घडवून आणल्याचे समाधान तथाकथित जाणते व बुद्धीजिवी वर्गाला होत असते. असा एक अभिजनवर्ग समाजात आता प्रतिष्ठीत पावला आहे. त्याने अवघ्या समाजजीवनालाच ओलिस ठेवलेले आहे. मग हा वर्गच प्रत्येक बाबतीत पापापुण्याच्या गोष्टी ठरवत असतो आणि योग्य-अयोग्य यांचेही न्यायनिवाडे करीत असतो. अवघ्या समाजाने वा त्यातल्या प्रतिष्ठीतांनी कुठल्या प्रसंगी काय भूमिका घेतली पाहिजे; त्याचेही फ़तवे काढले जात असतात. असे वागणार्‍यांना अभिजन मानले जाते. खरे तर अशी एक अभिजनांची टोळी झालेली आहे आणि सामान्य जनतेला वा नागरिकांना कुठल्याही कारणास्तव हिणवणे; इतकेच त्यांचे एककलमी कार्य होऊन बसलेले आहे. ते कधी लेखक साहित्यिक म्हणून समोर येतात, तर कधी कलाकार वा बुद्धीमंत म्हणून मुखवटे पांघरून लोकांना सल्ले देत असतात. मात्र असे करताना त्यांनी स्वत: कसे वागावे किंवा त्यांच्या वागण्याचे मूल्यमापन कोणी करायचे नसते. म्हणूनच त्यांच्या तथाकथित उत्सव मेळाव्याकडे वक्रदृष्टीने बघायची कोणाची हिंमत होत नाही. साहित्य संमेलन त्यापैकीच एक उत्सव आहे.

या मराठी साहित्य संमेलनाच्या आमंत्रण पत्रिकेत शरद पवार यांचे नाव कुणाच्या खाली छापले गेल्याने वादावादी झाली आणि त्यासाठी नव्याने पत्रिका छापल्या गेल्याची बातमी आली होती. अशा संमेलनाकडे तरीही शरद पवारांनी पाठ फ़िरवली आणि ते अगत्याने मुंबईचे उपनगर असलेल्या मानखुर्द येथील आपल्या पक्षाच्या एका छोट्या प्रचारसभेला अगत्याने उपस्थित राहिले होते. अशा पाहुण्यांच्या अगत्यासाठी पत्रिका बदलल्या जातात. पण त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अवाक्षर काढायची कोणाची हिंमत झाली नाही. हे आपले आजकालचे अविष्कार स्वातंत्र्य आहे. अशा व्यासपीठावरून नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी साधा निषेधाचा शब्द निघेल, अशी अपेक्षा कोणी करायची? कारण निषेध कोणाचे करावे आणि कुठल्या कारणासाठी करावेत; याचे फ़तवे निघालेले असतात. त्याच कारणास्तव एकाच्या पापावर पांघरूण घातले जाते आणि दुसर्‍याचा त्याच कारणास्तव कडकडीत निषेधही केला जात असतो. इतकी विवेकबुद्धी ज्या साहित्यिक वर्गात जागृत असते, त्यांच्याकडून कुठल्या शहाणपणाची अपेक्षा करता येईल? कालपरवा पुण्यातील उद्यानातल्या गडकरींच्या पुतळ्याची एका संघटनेने विटंबना केलेली होती. पण त्याचा निषेध सोडा; साधा उल्लेखही या व्यासपीठावर करायची हिंमत ज्यांना झाली नाही; त्यापैकी अनेकजण गतवर्षी असहिष्णूतेच्या नावाने गदारोळ करताना आपण बघितलेले आहेत. त्यात बहुतांश साहित्य अकादमीचे पुरस्कारही परत करायला पुढे सरसावलेले होते. तेव्हाची संवेदनशीलता आज कुठल्या कुठे अंतर्धान पावलेली असते. ही आजची वस्तुस्थिती आहे. पण कुशाग्र बुद्धीच्या लोकांना ती बघता येत नाही. बिचार्‍या सामान्य बुद्धीच्या लोकांना हे सर्व दिसते आणि कळतेही. कारण हे सत्य बघण्यासाठी असामान्य बुद्धीची गरज नसते.

एकूणच मराठी साहित्य संमेलन हे कुठल्याही गल्लीतल्या गणेशोत्सव किंवा शिवजयंतीपेक्षा वेगळे राहिलेले नाही. पण त्याविषयी सहसा बोलले जात नाही. कारण त्याची जाणिव असलेल्या कुणाला इतक्या सफ़ाईदारपणे मराठी वा कुठल्याही भाषेत आपला संताप व्यक्त करता येत नसतो. सामान्य माणूस कृतीवीर असतो. तो शब्दवीर नसल्याने त्याला शब्दात व्यक्त होता येत नाही. पण अशा दांभिक सोहळे वा उत्सवापासून चार हात दूर रहावे आणि आपली सामान्य बुद्धी शाबुत राखावी; इतके त्या सामान्य मराठी माणसाला नेमके कळत असते. म्हणूनच दिवासेदिवस अशा संमेलने वा दांभिक सोहळ्यापासून सामान्य माणूस दुरावत गेलेला आहे. आणिबाणीतल्या कराड येथील साहित्य संमेलनात अध्यक्ष पदावरून बोलताना दुर्गा भागवत यांनी स्वातंत्र्याच्या गळचेपीविषयी ठामपणे बोलायची हिंमत दाखवली होती. त्यांना तिथल्या तिथे अटक होण्याचा धोका होता आणि तोही त्यांनी पत्करला होता. अगदी बाजूलाच केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण बसलेले असतानाही आपल्या मनातला असंतोष अविष्कृत करायला दुर्गाबाई घाबरल्या नव्हत्या. संमेलनाचा समारोप होताच त्यांना अटक झालीही. त्या संमेलनाची गर्दी आणि आता डोंबिवलीत ओस पडलेल्या संमेलनाची गर्दी, यातला फ़रक दोन्ही वेळच्या साहित्यिक अभिमानात सामावलेला आहे. तसाच तो त्यांच्या स्वयंभूतेमध्ये सामावलेला आहे. साहित्यिक लेखक खराच स्वतंत्र व स्वयंभू असेल तर त्याने लिहीलेल्या व बोललेल्या प्रत्येक शब्दाचा आशय वाचकाला नेमका कळत असतो. त्यातल्या प्रामाणिकतेला तोच नागरिक तितक्याच आस्थेने प्रतिसादही देत असतो. पण त्यात थोडी जरी दांभिकता दिसली-जाणवली, तर सामान्य माणुस त्यातून अंग काढून घेतो. आजकालची साहित्य संमेलने म्हणजे नुसते दिखावू सोहळे बनून गेली आहेत. म्हणूनच त्यापेक्षा लालबागच्या राजाकडे गर्दी वाढली आहे.

नेहमी त्या गणेशोत्सवाच्या गर्दीवर बोलणार्‍यांनी जरा आपल्या सभा संमेलनातली गर्दी का ओसरली आहे; ते डोळसपणे तपासायची गरज आहे. जेव्हा अशी संमेलने किंवा व्याखानमाला लोकांना शिकवायला प्रबोधन करायला व्हायच्या; तेव्हा सामान्य माणुस तिकडे धाव घेऊन गर्दी करीत होता. तेव्हाही प्रवचनलार होते, किर्तनकार होते आणि त्यांचेही उत्सव मेळे होत असत. पण त्यापेक्षा अधिक गर्दी सभा संमेलनामध्ये दिसायची. कारण अशा सोहळ्यात लोकांना समजणारी व समजावणारी भाषा कानावर पडत असे. त्यातून काही ज्ञानप्रबोधन होत असे. आजकाल निरर्थक व दुर्बोध बोलणार्‍या लिहीणार्‍यांनी हे क्षेत्र इतके व्यापून टाकले आहे, की वाचकाला समजणारे लिहीणे वा बोलणे, जणू पाप होऊन बसले आहे. गतवर्षीच्या अध्यक्षांनी संमेलनापेक्षाही आपल्या मुक्ताफ़ळांनीच कारकिर्द गाजवली. यंदाच्या अध्यक्षांना आपल्या भाषणात गडकरींचा उल्लेख करण्याचीही भिती वाटली. त्याचेही कारण आहे. यजमानांना दुखावणारे कुठलेही समारंभ साजरे होऊ शकत नाहीत. यजमानांच्या कृपेने चालणार्‍या सोहळ्यावर उपजिवीका करणार्‍यांना, यजमानांच्या दुखण्यावर बोट ठेवता येत नाही. राघोबादादांना दोषी ठरवणारा निकाल देण्यापुर्वी न्यायाधीश रामशास्त्री प्रभूणे यांनी आपल्या चाकरीचा राजिनामा दिलेला होता. आजकाल कोणाला त्यांचे नावही आठवत नाही. पण रामशास्त्री फ़िके पडावेत, अशा थाटात बारीकसारीक गोष्टीत हेच शहाणे न्यायदानाचा पवित्रा घेत असतात. सरकारच्या व धनदांडग्यांच्या पैशावर जेवणावळी उठवल्यासारखी संमेलने भरवली, मग कुठल्या तोंडाने त्यांच्या पापाचा जाब विचारला जाऊ शकतो? मात्र असेच पुख्खा झोडणारे, चवीपुरते मीठ म्हणतात, त्या शैलीत दाभोळकर पानसरेंच्या मारेकर्‍यांना कधी पकडणार; असा सवाल करून आपली पाठ थोपटून घेत असतात. पण तिथेच गडकरींच्या पुतळ्याबद्दल बोबडी वळलेली असते.

काही वर्षापुर्वी मुंबईत शिवाजीपार्क येथे संमेलन झाले; तेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री असल्याने राजकीय लुडबुड संमेलनात नको म्हणून विद्रोही संमेलनाचाही घाट घातला गेला होता. पुढे तर अशा वेगवेगळ्या संमेलनात, राजकीय रंग बघून असे पक्षपात सातत्याने होत राहिले. चिपळूणच्या संमेलनासाठी ह. मो. मराठे यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडने इतके काहूर माजवले, की त्यांना त्यातून माघार घ्यावी लागली होती. तेव्हा कितीजण मराठें यांचे समर्थन करायला उभे राहिले होते? ब्रिगेडचा तेव्हा दबदबा होता आणि त्यांनी संमेलन उधळण्याची धमकी दिल्यावर मराठेंना गुपचुप माघार घ्यावी लागली. तेव्हा राजकारणच झालेले होते. मग मंडपाच्या कुठल्या प्रवेशद्वाराला बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशाला, म्हणूनही आक्षेप घेतला गेलेला होता. त्यापैकी कोणी स्वातंत्र्यवीर आज गडकरीचा पुतळा वा विटंबनेसाठी पुढे आला नाही. कारण लेखन, साहित्य वा कला यांचा आता निर्मिती व सृजनशीलतेशी संबंध राहिलेला नसून, पुरोगामी असे शिक्कामोर्तब झालेला मालच, अशा संमेलन वा सोहळ्यात स्विकारला जात असतो. त्याला ठराविक रंग असायला हवा, ठराविक झेंडा व अजेंडा असायला हवा. साहित्य ही आता अभिजात कलाकृती राहिलेली नसून, ठराविक राजकीय मानसिकतेची पठडी झालेली आहे. त्यासाठी जो कोणी खर्चाचा बोजा उचलण्यास तयार असेल, त्या यजमानाचा उदो उदो करायला जमणार्‍या भिक्षुकांचा मेळा; असे त्याचे स्वरूप झालेले आहे. त्यामुळेच त्यातले साहित्य वा कलानिर्मिती केव्हाच संपून गेलेली आहे. ज्यांना त्याविषयी खात्री पटलेली आहे, असे प्रामाणिक लोक त्यापासून मैलोगणती दुर असतात. सामान्य मराठी भाषकालाही त्याचे केव्हाच भान आलेले असल्याने, त्यानेही त्याकडे पाठ फ़िरवली तर नवल नाही. आशय हरवलेले साहित्य किंवा संमेलन यात फ़रक कसा असेल?

ज्यांना दादा कोंडके हा अभिजात कलाकार वाटत नाही, असे लोक संमेलनात मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करायला जमा होतात. ज्या गावंढळ माणसाने मराठी चित्रपट बघायला अमराठी माणसांना पटगृहात खेचून आणले; त्याला यांच्या कलानिर्मितीमध्ये स्थान नाही. ज्या माणसाने अलिकडल्या कालखंडात मराठी भाषा बोलून लक्षावधी लोकांना ऐकायला भाग पाडले व त्यांच्या मनावर राज्य केले; त्या बाळासाहेबांची भाषा गलिच्छ म्हणून हे लोक नाके मुरडत राहिले. त्यांच्याकडून कुठल्या मराठी भाषेची जोपासना होऊ शकते? जी भाषा सामान्य मराठी माणसालाच उमजत नाही, इतकी क्लिष्ट असते; असे लिखाण करणार्‍यांचा गोतावळा मराठीचे संवर्धन कसे करणार? अशाच लोकांची मांदियाळी जिथे जमा होत असते, तिथे मराठी भाषेवर प्रेम करणार्‍याचे काय काम? आज सोशल माध्यमातून हजारो लोक ब्लॉग लिहीतात. फ़ेसबुक वा तत्सम माध्यमातून अखंड लिहीले जात असते आणि करोडो लोक जगभर वाचत असतात. त्या मराठी भाषेला अशा संमेलनाच्या शुश्रुषागृहाची बालवाडीची आता गरज उरलेली नाही. संमेलनाच्या अध्यक्षापेक्षाही सामान्य फ़ेसबुकी लेखकाला आजकाल अधिक मराठी लोक वाचत असतील, तर संमेलनाची महत्ता किती शिल्लक राहिल? त्या सोशल माध्यमापेक्षाही अधिक सकस व आशयघन लिहीता आले, तरच संमेलनवादी लेखकांचे महत्व शिल्लक राहू शकेल. कारण कुठलीही भाषा मुठभर शहाणे निर्माण करू शकत नसतात ,की तिची जोपासना करू शकत नसतात. बोलणाराच भाषेचे संवर्धन करत असतो आणि त्याला बोलण्याइतकी सोपी वाटेल, तशीच भाषा कालौघात टिकून रहात असते. खड्डे वा चिखलातून वाट काढत रक्तबंबाळ होत वाटचाल करणार्‍याच भाषा जगात टिकून राहिल्या आहेत आणि मराठी त्यापैकीच भाषा आहे. तिला अशा लाचार संमेलनातून वा उधारीच्या पैशातून सोहळे साजरे करून जगवण्याची गरज नाही.

शेकडो वर्षानंतरही ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा वाचल्या जातात. त्यासाठी कुठली संमेलने भरवावी लागली नाहीत. पुल, अत्रे, खांडेकर, सावरकर यांच्या पुस्तकांच्या स्वस्त आवृत्या काढाव्या लागल्या नाहीत. सानेगुरूजी कुठल्या विचारांचे होते, म्हणून त्यांची मराठी वाचली जात नाही. त्यांनी लिहीले ते साहित्य त्या काळातच नव्हेतर पुढल्या अनेक पिढ्यांनाही वाचनीय व बोधकारक वाटले; म्हणून आजही वाचले जात असते. त्यांनी कार्यशाळा भरवून लेखक तयार केले नाहीत. त्यांचे बोट धरून अनेक पिढ्या साहित्यिक उदयास आले आणि त्यातून मराठीची जोपासना झालेली आहे. त्यांना कुठले अविष्कार स्वातंत्र्याचे झेंडे खांद्यावर घेऊन, अजेंडा पुढे करावा लागला नाही. तेच मराठी भाषेचे संवर्धक होतेच. पण मराठीचे असे शिलेदार होते, की त्यांच्यासमोर सत्ताधारी वा राजकारणी अरेरावी करू शकले नव्हते. संमेलनात येणार्‍या राजकारण्यांची त्यांना भिती वाटली नाही. कुणापुढे त्या मराठी सारस्वतांना नतमस्तक होण्याची गरजही वाटलेली नव्हती. कारण त्यांनी भरवलेले साहित्य मेळे वा संमेलनांना भव्यदिव्य करणारी रोषणाई त्यांच्या प्रतिभेत होती. त्यासाठी सेट लावावे लागत नव्हते, की सजावटी कराव्या लागत नव्हत्या. लेखकांना आमंत्रितांना खाऊपिऊ घालणारी संमेलने भरवली जात नव्हती. तर तिथे जमणार्‍या साहित्य रसिकांना पोटभर समाधान मिळणारी पंगत वाढली जात होती. आज जेवणावळी व खानावळी झाल्यासारखी संमेलने भरवण्यासाठी यजमान शोधले जात असतील. तर संमेलनात गर्दीसाठी सलमानखान वा अमिताभ बच्चन यांनाही अगत्याने बोलवावे. मग तिकडे गर्दी कशाला झाली नाही, असे शोकमग्न होण्याची नामुष्की येणार नाही. खरेतर यापुढे ‘मराठी साहित्याचा राजा’ असे नाव या सोहळ्याला दिले तरी चालेल. लालबागची थोडी गर्दी तिकडेही सरकू लागेल. मराठी भाषा व मराठी संस्कृती अशा भव्यदिव्य सोहळ्याची लाचार नाही, इतके समजले तरी पुरे आहे.

2 comments:

  1. भाऊ या बिनकाम्यांनी काय साहित्य निर्माण केले ??? गेल्या काही वर्षांत काय लिहीले गेले??? Ans- 000

    ReplyDelete