Sunday, February 26, 2017

नव्या पिढीचा उदय

fadnavis drinking water के लिए चित्र परिणाम

गेल्या महिन्याच्या अखेरीस मुंबई महापालिका निवडणूकीच्या निमीत्ताने शिवसेना भाजपा युतीच्या फ़ाटाफ़ुटीचा शिमगा झालेला होता. आधी प्रजासत्ताकदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या मैदानावर युती संपल्याची घोषणा केली, त्याच जागी दोन दिवसांनंतर भाजपाच्या मेळाव्यात शिवसेनेची कौरव अशी संभावना करून, भाजपाने युती फ़ुटण्याचे स्वागतच केले होते. त्याच सभेत आवेशपुर्ण भाषण करताना मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचा आवाज बसला आणि त्यांनी पाणी पिता पिता पिचक्या आवाजात बजावले होते, ‘आज पाणी पितोय, २१ तारीखला पाणी पाजणार आहे.’ त्यांची तेव्हा खु्प टवाळी झालेली होती, इथेही या सदरात आम्ही फ़डणवीसांची खिल्ली उडवली होती. पण आज त्यांनी शब्द खरे करून दाखवले असतील, तर त्यांचे कौतुकही करणे भाग आहे. माणूस काय करतो वा कशी मांडणी करतो, यापेक्षाही त्याच्या मांडणीतील बांधीलकी महत्वाची असते. त्या दिवशी फ़डणवीस यांचा घसा बसलेला असेल, पण त्यांच्या मनातला निर्धार पक्का होता आणि नंतरच्या चार आठवड्यात त्यांनी त्याची प्रचिती आणून दाखवली आहे. पाणी पाजणार वा अन्य शब्दप्रयोग हे काही आशय व्यक्त करीत असतात. त्याचा शब्दश: अर्थ घ्यायचा नसतो, त्यामागचा आशय समजून घेण्याची गरज असते. या तरूण नेत्याचे भाषण आवेशपुर्ण असते आणि त्यात आशयही असतो. तसे नसते तर नंतरच्या चार आठवड्यात आपल्या अत्यंत धावपळीच्या दिनक्रमातून सवड काढीत मुख्यमंत्र्यांनी इतक्या सभा व दौरे केले नसते. मोहिमेवर असल्याप्रमाणे त्यांनी सभांचा झपाटा लावला होता आणि त्यात यशही मिळवून दाखवले आहे. या निमीत्ताने आपले नेतृत्वगुण सिद्ध करण्य़ाची व प्रस्थापित करण्याची अपुर्व संधी असल्याचे हेरूनच फ़डणवीस धावपळ करीत होते. त्यात ते कमालीचे यशस्वी झाले असून, आपली झालेली निवड त्यांनी योग्य ठरवून दाखवली आहे.

सव्वा दोन वर्षापुर्वी या तरूणाची मुख्यमंत्री पदासाठी निवड झाली, तेव्हा पक्षापाशी पुर्ण बहूमत नव्हते आणि कुठलीही जुळवाजुळव न करता सरकार स्थापन करण्याचा जुगार खेळला गेला होता. दुखावलेल्या मित्र शिवसेनेला अंगावर घेऊन सरकार स्थापलेले होते आणि प्रशासनासह कुठल्याही पाताळयंत्री राजकारणाचा अनुभव नसलेल्या तरुणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखवला होता. शरद पवार व कॉग्रेस अशा दोन बिलंदर राजकीय विरोधकांसह, शिवसेनेचा दुखावलेला वाघही त्याच्या समोर उभा होता. त्यामुळेच फ़डणवीस आपली कारकिर्द किती यशस्वी करतील, यापेक्षाही ते किती काळ सरकार टिकवू शकतील; याचीच शंका व्यक्त केली जात होती. पण या दोन वर्षात अनेक वेड्यावाकड्या प्रसंगांना समर्थपणे सामोरे जात आणि अडचणीतून वाट काढत, फ़डणवीसांनी मोठा पल्ला गाठला आहे. त्यातला पहिला अडथळा त्यांच्या पक्षातच होता. आणखी चारपाचजण मुख्यमंत्री व्हायला उत्सुक होते आणि त्यांना संभाळून घेत व त्यांच्यावरच मात करीत, आपले बस्तान बसवण्याचे आव्हान या तरूणासमोर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसुलमंत्री नाथाभाऊ खडसे अशा दोन दिग्गजांना नाकारून, या तरूणाला नेतृत्व देण्यात आले होते. त्यांच्याखेरीज पित्याचा वारसा म्हणून जनमानसातील मुख्यमंत्री अशी भाषा करणार्‍या पंकजा मुंडेही समोर होत्याच. दुसर्‍या फ़ळीतले विनोद तावडेही शर्यतीत होते. त्यांना संभाळत कारभार करताना, शिवसेनेचा विरोध व धुसफ़ुस सहन करत कारभार हाकणे सोपे काम नव्हते. पण सर्कशीसारखी कसरत करतानाही मुख्यमंत्र्यांनी आपला तोल व संयम ढळणार नाही, याची पुरेपुर काळजी घेत, आपण बिलंदर असल्याचे व कारभारात काटेकोर असल्याचे अनेक दाखलेच सिद्ध केले. ताज्या मिनी विधानसभा निवडणूका त्यावरचा कळस मानता येईल. कारण त्यात त्यांनी विरोधकांसह पक्षांतर्गत विजय संपादन केला आहे.

तसे बघितले तर अकस्मात मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले ते भाजपाचे पहिलेच मुख्यमंत्री नाहीत. पण गाठीशी कुठलाही प्रशासकीय अनुभव नसलेले मोजकेच आहेत, त्यापैकी एक अशी फ़डणवीसांची नोंद करणे भाग आहे. २००१ सालात नरेंद्र मोदी यांची स्थिती यापेक्षा भयंकर होती. कुठलीही निवडणूक न लढवलेला व कुठल्याही प्रकारचे घटनात्मक पद न संभाळलेला नेता असलेले मोदी, अकस्मात गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. त्यापेक्षा फ़डणवीसांना निदान संसदीय अनुभव होता. इतक्या जबाबदारीच्या पदावर आरुढ होण्यातला मोठेपणा सर्वाना हवा असतो. पण त्यातून येणारा जबाबदारीचा बोजा संभाळणे सोपे नसते. तितके सुखदायक नसते. त्यात पुन्हा विविध राजकीय कारस्थाने व उलथापालथींना सातत्याने सामोरे जावे लागत असते. खाजगी जीवनावर तुळशीपत्र ठेवावे लागत असते. एकप्रकारचे ते अग्निदिव्य असते. त्यातून उडणारी तारांबळ आपण अनेक मुख्यमंत्र्यांची बघितली आहे. मोठे मुरब्बी व कुशल नेतेही हात टेकताना बघितले आहेत. त्यांच्या तुलनेत फ़डणवीस यांनी दोन वर्षात एकाही भानगडीत न सापडता केलेला कारभार, लक्षणिय मानावा लागेल. पण असे असले तरी त्यांच्याकडे त्यांच्याच पक्षातला निर्विवाद नेता म्हणूनही बघितले जात नव्हते. मग संपुर्ण राज्याचा एकमुखी नेता अशी गणती होणे दूरची गोष्ट झाली. खडसे वा गडकरीही तितका पल्ला मागल्या तीन दशकात मारू शकलेले नव्हते. म्हणून तर शरद पवार यांचेच नाव आजवर घेतले जात होते. या निकालांनी फ़डणवीसांना त्या शंकेतून मुक्त केले आहे. कारण त्यांनी आता पक्षावर पक्की मांड ठोकली आहेच. पण मिळवलेल्या विजयामुळे राज्यातला लोकप्रिय नेता, अशी त्यांची ओळख झाली आहे. भाजपाची सत्ता असलेल्या विविध राज्यातील समर्थ मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत आता हा तरूण जाऊन बसला आहे.

मागल्या खेपेस विधानसभा जिंकताना भाजपाला पंतप्रधानांचा चेहरा पुढे करावा लागला होता. राज्यातील मोठा पक्ष होताना फ़डणवीसच प्रदेश पक्षाचे अध्यक्ष होते. पण त्यांच्या नेतृत्वाची कसोटी लागलेली नव्हती. आज दोन वर्षांनी ताज्या मिनी विधानसभा मतदानाच्या शर्यतीत, राज्याबाहेरचा कोणी मोठा नेता भाजपाला आणावा लागला नाही. किंवा तसा कोणी प्रचारक न आणण्याचा धोकाही मुख्यमंत्र्यांनी पत्करला होता. सगळ्या प्रचाराची धुरा त्यांनी एकट्याच्या खांद्यावर घेतली होती आणि जे काही परिणाम होतील, त्याची जबाबदारी स्विकारण्याचा जुगारही खेळला होता. महानगरांपासून परिषदांच्या प्रचारासाठी अहोरात्र झटत असताना, अपयश आल्यास त्याचे खापर आपल्या डोक्यावर फ़ोडावे, इतक्या टोकाची भाषाही त्यांनी केलेली होती. प्रत्येक जागी आपला शब्द देत त्यांनी मतदाराला सामोरे जाण्याची हिंमत केली आणि त्याला गोंडस फ़ळे आलेली आहेत. म्हणूनच या विजयाचे श्रेय त्यांनाच आहे. पण याच निकालातून राज्यातील भाजपच्या नेतृत्वाची पिढी बदलली जाण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुंडे-महाजन वा गडकरी-खडसे यांच्या पिढीला मागे टाकून नवे भाजपा नेतृत्व फ़डणवीस यांच्या रुपाने उदयास आले असून, स्पर्धेत असलेल्या अन्य पक्षांवरही या तरूणाने आपली छाप पाडलेली आहे. त्याच्याशी तुल्यबळ ठरू शकेल असा अन्य कोणी नेता अन्य पक्षात दिसत नाही. शरद पवारांना आव्हान म्हणून बाळासाहेब, महाजन, मुंडे वा विलासराव अशा नेत्यांची एक मोठी फ़ळी महाराष्ट्रात होती. ती अस्तंगत होत असताना दुसर्‍या पिढीतले म्हणुन अशोक चव्हाण व अजितदादा वा राज व उद्धव ठाकरे यांची नावे घेतली जात होती. पण त्यांना मागे टाकून फ़डणवीसांनी जबरदस्त झेप घेतली आहे. सत्ता वा मुख्यमंत्रीपद हाती आल्यास होतकरू माणूस किती मोठा पल्ला गाठू शकतो, त्याचे उदाहरणच त्यांनी यातून पेश केले म्हणायला हरकत नाही.

2 comments:

  1. ‘आज पाणी पितोय, २१ तारीखला पाणी पाजणार आहे.’ त्यांची तेव्हा खु्प टवाळी झालेली होती, इथेही या सदरात आम्ही फ़डणवीसांची खिल्ली उडवली होती. पण आज त्यांनी शब्द खरे करून दाखवले असतील, तर त्यांचे कौतुकही करणे भाग आहे.

    - भाऊ हा आपला मोठेपणा आहे. बाजारू पत्रकारितेच्या जमान्यात स्वतःची चूक मान्य करायला मोठे मन लागते. आपली विश्वासार्हता त्यामुळेच टिकून आहे.

    लेख अत्यंत उत्तम !!!
    -नितीन सुखदेव शिंदे (हडपसर पुणे)

    ReplyDelete
  2. भाऊ,आपल्यासारख्या मुरब्बी विश्लेषकाचे कौतुक नक्कीच देवेंद्र फडणवीस या तरूण मुख्यमंत्र्याला हुरूप देणारे ठरेल व एक प्रामाणिक,स्वच्छ राजकीय व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन देईल.

    ReplyDelete