Monday, April 24, 2017

डाव्यांचे राष्ट्रपती

pawar with left front के लिए चित्र परिणाम

इंदिरा गांधी ह्या अतिशय समर्थ राजकारणी म्हणून विसाव्या शतकात ओळखल्या गेल्या. त्यांच्यानंतर भारतात तितका समर्थ नेता झाला नाही. पण समर्थ राष्ट्रीय नेता म्हणजे नेमके काय असते? ज्याच्या नावाची व कर्तबगारीची एकूण जनमानसावर छाप पडते आणि त्यातून तो पक्षाला निवडणूका जिंकून देतो. इतकाच या राजकीय सामर्थ्याचा निकष नसतो. एकाच वेळी असा नेता देशातील व्यापक जनमानसावर आपली जादू चालवतो आणि दुसर्‍या बाजूला जागतिक राजकारणावरही आपली छाप पाडू शकतो. तेव्हाच त्याला समर्थ नेता मानले जात असते. वाजपेयी यांच्यासह मनमोहन सिंग वा नरसिंहराव किंवा विश्वनाथ प्रताप सिंग असेही पंतप्रधान भारताने बघितले आहेत. त्यांच्याही आधी राजीव गांधी वा मोरारजी देसाई यांनी देशाचा कारभार केलेला होता. पण त्यांना जागतिक राजकारणावर आपली छाप पाडता आलेली नव्हती. ती मजल भारतातील एकाच नेत्याने प्रथम मारली, त्या होत्या इंदिराजी. म्हणूनच आज कोणीही इंदिराजी व नरेंद्र मोदींची तुलना केल्यावर अनेक अभ्यासकांना आवडत नाही. पण काहीशी तशीच स्थिती इंदिराजींच्या आरंभीच्या कालखंडात होती. डॉ. राममनोहर लोहियांसारख्या नेत्यांनी तर इंदिराजींची गुंगी गुडिया म्हणून टवाळी सुद्धा केली होती. पण तो आरंभीचा काळ होता आणि १९८० नंतरच्या दशकात इंदिराजींच्या अखेरचा कालखंड सुरू झाला, तेव्हा त्यांच्या जवळपास फ़िरकू शकेल, असा कुणी नेता देशात शिल्लक राहिलेला नव्हता की स्पर्धेत उरला नव्हता. आज नरेंद्र मोदींनी तितकी मजल मारली आहे. त्यांना तुल्यबळ म्हणावा असा नेता त्यांच्याही पक्षात कुणी नाहीच. पण अन्य पक्षातही कोणी मोदींशी झुंज देण्याइतका बलवान नेता आढळून येत नाही. सहाजिकच इंदिराजींच्या कालखंडात जसे विरोधक वागायचे, तसेच आजचे विरोधी पक्ष राजकारण करीत आहेत. तसे नसते तर शरद पवार यांचे नाव डाव्यांनी राष्ट्रपती पदासाठी सुचवले नसते.

नरेंद्र मोदींनी भाजपाला लोकसभेत बहूमत मिळवून दिले, या घटनेला आता तीन वर्षे पुर्ण होत आली आहेत. त्यानंतरही विरोधकांना हा नेता देशाला व देशांतर्गत राजकारणाला कुठे घेऊन चालला आहे, त्याचा पुरता अंदाज आलेला नाही. तसे नसते तर लोकसभेनंतरच्या प्रत्येक विधानसभा निवडणूकीत पंतप्रधान असूनही मोदींनी इतकी मेहनत कशाला चालवली होती? त्याचा विचार अन्य पक्षांनी केला असता आणि मोदींना शह देणारे राजकारणही तेव्हाच केले असते. पण उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागून संपले, तेव्हा विरोधकांना जाग येते आहे. मोदींचे गेल्या तीन वर्षात चाललेले राजकीय डाव यशस्वी होत आल्यावर, विरोधी नेते भवितव्याचा विचार करू लागले आहेत. मोदींनी मध्यंतरीच्या तीन वर्षात आपल्याच पसंतीचा राष्ट्रपती निवडून आणण्याची पुर्ण तयारी केल्यावर विरोधकांना त्या निवडणूकीचे स्मरण झाले आहे. त्यामुळेच आता काहीतरी जुळवाजुळव सुरू झाली आहे. लोकसभा व राज्यसभेसह विधानसभांचे सदस्य, राष्ट्रपती पदाचे मतदार असतात. तेव्हा तिथे आपली संख्या अधिक करण्याकडे मोदींचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न राहिला आहे. केवळ अधिकाधिक राज्यात आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री बसवणे वा त्यासाठी वाटेल तशा तडजोडी करून सत्ता मिळवणे; त्यांनाही शक्य झाले असते. पण त्यातून कायदेमंडळातील भाजपाच्या वा एनडीएच्या सदस्यांची संख्या वाढलीच नसती. म्हणून मोदींचा भर अधिकाधिक भाजपा उमेदवार निवडून आणणे व जोडीला एनडीएच्याही सदस्यांची संख्या वाढण्याकडे भर होता. सहाजिकच आता तीन वर्षांनी त्यांना यश समोर दिसू लागले आहे. एनडीए बाहेरच्या बीजेडी वा अण्णा द्रमुक अशा एका प्रादेशिक पक्षाने साथ दिली, तरी मोदींच्या पसंतीचा राष्ट्रपती निवडून येऊ शकतो, इतकी स्थिती आज आलेली आहे. त्यानंतर विरोधकांना राष्ट्रपती कोण, असा प्रश्न पडला आहे.

या आधीच्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीचे निकाल लागल्यापासून राष्ट्रपती निवडणूकीचे वेध लागलेले होते आणि त्यात ममतासह मुलायमनी पुढाकार घेतला होता. जोवर उत्तरप्रदेश हातात आला नव्हता, तोवर त्यात कोणी मुलायमना विचारलेही नव्हते. सहाजिकच यावेळी उत्तरप्रदेशच्या निवडणूका राष्ट्रपती निवडीसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत, याचे भान विरोधकांनी ठेवायला हवे होते. मोदींना निव्वळ त्या राज्यात मुख्यमंत्री सत्तेत आणायचा नसून, राष्ट्रपती पदाला मतदार असू शकतील, असे अधिकाधिक आमदार निवडून आणायचे होते. याचे भान पुर्वी़च विरोधकांना यायला हवे होते. तसे झाले असते, तर मोदींना व भाजपाला फ़ारतर बहूमतापर्यंत रोखण्याचा विचार पुढे आला असता आणि सत्ता संपादनापेक्षाही उत्तरप्रदेशात भाजपाला बहूमतापर्यंत रोखण्याची रणनिती तयार झाली असती. पण तसे झाले नाही. कारण कोणाच्या मनात तेव्हा राष्ट्रपती निवडणूक नव्हतीच. एकट्या नरेंद्र मोदींनी तो विषय डोक्यात ठेवून, त्या राज्याच्या निवडणूकीत झेप घेतली होती. खुप पुढले वा भविष्यातले बघण्याची हीच कुवत इंदिराजींपाशी होती. म्हणून त्या भारतीय जनमानसावर राज्य करू शकल्या आणि आपल्या पक्षाला फ़ारमोठे यश मिळवून देऊ शकल्या होत्या. जगावर त्यांनी आपल्या राजकारणाची छाप पाडली होती आणि नरेंद्र मोदी त्यांचेच अनुकरण करत चालले आहेत. पण दुर्दैव असे, की त्याच इंदिराजींचा वारसा सांगत राजकारणात लुडबुडणार्‍यांना मात्र इंदिराजी अजून उमजलेल्या नाहीत. सहाजिकच त्यांना कॉग्रेस पक्ष संभाळता आलेला नाही, किंवा विरोधकही सोबत घेऊन राजकारण खेळता आलेले नाही. जितकी कॉग्रेस दुबळी होऊन गेली आहे, तितकेच विरोधी वा डावे पक्षही निष्कीय होऊन गेले आहेत. त्यातून मग पोरसवदा राजकारण व डावपेच खेळले जात असतात. ते़च आता डाव्यांकडून चालले आहे.

अकस्मात या डाव्यांना राष्ट्रपती निवडणूकांचे वेध लागलेले असून, ज्यांना आपली राज्यसभेतील जागा टिकवणे अशक्य आहे, तेच राष्ट्रपती निवडणूकांचे डावपेच खेळू लागले आहेत. डाव्यांनी म्हणे आता शरद पवार यांचे नाव राष्ट्रपती पदासाठी पुढे केले आहे. पवारांमध्ये विविध पक्षाचे मतदार ओढण्याची वा भिन्न प्रवृत्तीच्या नेत्यांना एकत्र आणण्याची कुवत असल्याने त्यांचे नाव पुढे आले आहे. त्यातही पवार मराठी असल्याने शिवसेनेची मतेही एनडीएला झुगारून पवारांना मिळतील, अशी त्यामागची अपेक्षा आहे. त्यात तथ्यही आहे. पण मोदींसारखा मुरब्बी माणूस मध्यंतरीच्या राजकीय घडामोडीनंतर सेनेवर विसंबून राहिल, ही खुळी कल्पना नाही काय? शिवसेना दगा देईल, अशा हिशोब मांडूनच मोदी आपली समिकरणे तयार करीत आहेत. शिवसेनेसह जाऊनही मोदींपाशी पुरेशी मते नाहीत. म्हणूनच एनडीए बाहेरच्या पक्षांनाही सोबत आणायचा खेळ मोदींनी खुप पुर्वी सुरू केला आहे. त्यापैकी एक म्हणजे अण्णाद्रमुक त्यांनी जवळपास खिशात टाकला आहे. त्याच एका पक्षाची मते शिवसेनेच्या दुप्पट असून, सेनेशिवाय अण्णद्रमुकच्या मतांनी मोदींच्या पसंतीचा उमेदवार राष्ट्रपती भवनात पोहोचू शकतो. अर्थात तिथेच मोदी नक्की थांबलेले नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन अधिकची मते मिळवण्याचा त्यांचा प्रयास कधीच चालू झालेला आहे. सहाजिकच सेनेची मते फ़ोडू शकणारा वा अन्य पक्षांना सोबत घेऊ शकणारा म्हणून शरद पवार यांचे नाव पुढे करण्याचा प्रकार निव्वळ पोरकटपणा असू शकतो. त्यातही पवार स्वत:च नजमा हेपतुल्ला यांचे नाव पुढे करत असताना, डाव्यांनी परस्पर पवारांचे नाव सुचवण्यात उतावळेपणा मात्र दिसून येतो. असे खेळ १९७०-८० च्या दशकातले विरोधक इंदिराजींशी खेळायचे. वास्तवात इंदिराजीच अशा गोष्टी विरोधकांकडून करून घेत असत. त्यापेक्षा मोदी आज काय वेगळे करीत आहेत?

2 comments:

  1. भाऊ, विरोधक कोणी नाही म्हणून भाजपची घोड दौड सुरु आहे, अर्थात मोदी समर्थ आहेतच, पण विरोधक स्वताच आत्महत्या करून संपलेत, तुम्हीही भक्तांप्रमाणे एकांगी लिहू लागलात कि काय अशी शंका येते। एवढे ते समर्थ आहेत मग गोआ, बिहार, मणिपूर, पंजाब मध्ये का नाही जादू चालली।

    ReplyDelete
    Replies
    1. Bhau - would like to know your thoughts on
      गोआ, बिहार, मणिपूर, पंजाब मध्ये का नाही जादू चालली।

      Delete