Wednesday, April 26, 2017

दिल्लीतली नावडनिवड

delhi MCD poll kejri gupta के लिए चित्र परिणाम

सामान्य माणसाचे निकष व शहाण्यांची मोजपट्टी, यात जमिन अस्मानाचा फ़रक असतो. शहाण्यांना सर्वकाही नेमके व बिनचुक असावे लागते. उलट सामान्य माणसे आपल्या गरज व प्रसंगानुसार उपलब्ध असलेल्या पर्यायातून निवड करत असतात. ती निवड यथायोग्य किंवा निर्दोष असते, असे अजिबात नाही. पण जीवन चालले पाहिजे आणि जगरहाटी अडता कामा नये, अशी सामान्य माणसाची मोजपट्टी असते. प्रत्येकाला माधुरी दिक्षीत वा मधुबालासारखी सुंदर मुलगी पत्नी म्हणून हवी असते. पण ती मिळण्याची दुरान्वये शक्यता नसते. सहाजिकच जी कोणी जीवनात सहचरी म्हणून येईल, तिच्यातली वहिदा रेहमान वा श्रीदेवी शोधून सामान्य नवरा गुण्यागोविंदाने संसार चालवित असतो. ती़च कहाणी पत्नीचीही असते. आपसात भांडतात वा रागावतात. पण दोघे मिळून संसाराचा गाडा ओढत असतात. आपल्याला कल्पनेतला साथीदार मिळावा, म्हणून हटून बसत नाहीत. नेमकी तीच गोष्ट सामान्य जीवनात मतदाराची असते. कुठलाही पक्ष वा नेता सत्तेत आला, म्हणून सुखनैव जीवन चालेल, अशी अपेक्षा कुठलाही सामान्य मतदार करीत नाही. सामुहिक जीवनात सुरक्षा असावी व किमान गरजा भागवण्यात अडचण येऊ नये, इतकीच लोकांची किरकोळ अपेक्षा असते. त्यात बाधा आणणारे जनतेला आवडत नाहीत. काही दोष असलेली, पण जीवन चालू राखणारी व्यवस्था लोकांना खुश करत असते. विश्लेषकांची गोष्ट वेगळी असते. त्यांच्या गरजा इतक्या छोट्या नसतात, म्हणूनच शहाणे लोक निर्दोष व्यवस्थेच्या चिंतेते कायम गढलेले असतात. तिथेच मतदार व शहाणे यांच्या विचारात व निवडीत फ़रक पडत असतो. हा फ़रक ओळखला तर दिल्लीकरांनी भाजपाला इतक्या प्रचंड संख्येने महापालिका मतदानात कशामुळे कौल दिला, त्याचा खुलासा होऊ शकेल. केजरीवाल यांचे अपयशही उलगडू शकेल.

इंजिनियर होऊन वा उच्चशिक्षण घेऊन राजकारणात आलेले केजरीवाल, नव्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी आले होते. पण त्यांच्या पद्धतीचे राजकारण नवे काही देण्यापेक्षाही असलेली जीवनाची घडी विस्कटू लागले आहे. त्यामुळेच जनता कमालीची भयभीत होत गेली. त्याचेच प्रतिबिंब दिल्लीच्या निकालात पडलेले आहे. आम आदमी पक्ष स्थापन करताना, ज्या मोठमोठया उदात्त गोष्टी केजरीवाल व त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितल्या होत्या. त्यापैकी कुठलीही गोष्ट ते व्यवहारात साध्य करून दाखवू शकले नाहीत. भ्रष्ट राजकारणाला कंटाळलेल्या दिल्लीकरांनी केजरीवालना उत्तम संधी दिली होती. त्याचे सोने करून केजरीवाल पाचदहा वर्षात मोठी मजल मारू शकले असते. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणतात, तशीच काहीशी सत्तेची नशा त्यांना व त्यांच्या सवंगड्यांना चढली. पुढला घटनाक्रम ताजा इतिहास आहे. दिल्लीत जितके म्हणून अराजक माजवता येईल, तितका गोंधळ त्यांनी सत्ता हाती घेतल्यापासून केला. केंद्रातील भाजपा सरकार वा राज्यातील भाजपाच्या हाती असलेल्या महापालिका, यांच्यात आवश्यक असलेली सुसुत्रता केजरीवाल यांनी पुरती उध्वस्त करून टाकली. वाजपेयी यांचे सरकार केंद्रात असताना शीला दिक्षीत दिल्लीत मुख्यमंत्री झाल्या. पण केंद्र-राज्य असा संघर्ष तेव्हा झाला नाही. शीला दिक्षीत मुख्यमंत्री असतानाच पालिका भाजपाच्या हाती होत्या, पण दिल्लीत कचर्‍याचे ढिगारे उभे रहाण्याची स्थिती आली नाही. सफ़ाई कर्मचार्‍यांचे पगार अडल्याने वारंवार संप झाले नाहीत. भिन्न पक्ष सत्तेत असतानाही दिल्लीकरांच्या सार्वजनिक जीवनात कधी अराजक निर्माण झाले नाही. केजरीवाल आल्यापासून दिल्लीकरांना अनुभवायला मिळाला, तो इतकाच फ़रक होता. त्यांनी देशाच्या राजधानीत सर्वप्रकारचे अराजक उभे केले आणि त्यालाच ते सुशासन असे नाव देत राहिले.

दिल्लीकरांनी आज कौल दिला आहे, तो केजरीवाल यांना व त्यांच्या कार्यशैलीला नाकारणारा कौल आहे. पक्षाची स्थापना करताना त्यांच्या सोबत असलेले अभ्यासक व विश्लेषक योंगेद्र यादव यांनी आम आदमी पक्षाच्या या दारूण पराभवाचे नेमके विश्लेषण केलेले आहे. दहा वर्षे भाजपाचे पालिकेतील काम सर्वात नाकर्तेपणाचे होते आणि तसे प्रमाणपत्र दिल्ली हायकोर्टानेच दिलेले आहे. जगातील सर्वात बेशिस्त व अनागोंदी असलेल्या संस्था, असा ठपका हायकोर्टाने भाजपाच्या पालिका कारभारावर ठेवलेला आहे. सहाजिकच अशा अनागोंदीला दिल्लीकर मतदार उत्साहात जाऊन तिसर्‍यांदा सत्ता बहाल करणेच अशक्य आहे. पण तसेच नेमके घडले आहे. म्हणूनच जे आकडे व टक्केवारी समोर आली आहे, त्याच्याही पलिकडे जाऊन अशा निकालांचे विश्लेषण आवश्यक आहे. यादव यांनी नेमके त्याच गोष्टीवर बोट ठेवले आहे. ताज्या मतदानात दिल्लीकराने भाजपाची पाठ थोपटलेली नाही, किंवा त्याच्या चांगल्या कामाची पावती दिलेली नाही. त्यापेक्षा आणखी भयंकर काही घडू नये, म्हणून भाजपाला पुन्हा सत्तेत आणुन बसवले आहे. याचे कारण भाजपाला पराभूत केल्यास केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या हाती पालिकेचाही कारभार जाईल आणि उरलीसुरली व्यवस्थाही अराजकात विरघळून जाईल. अशा भितीपोटी मतदाराने भाजपाला कौल दिला आहे. जे पर्याय समोर होते, त्यात कॉग्रेस लढण्याच्या अवस्थेत राहिलेली नाही. म्हणून तो पर्याय आपोआप बाद झाला होता. भाजपा भ्रष्ट असला तरी दहा वर्षे त्याने थोडेफ़ार काम केलेले होते. तिसरा पर्याय आम आदमी पक्षाचा होता. त्याला मत म्हणजे पालिकेच्याही कामात अराजक आणणे होते. पालिकेची कामेही पंतप्रधान नरेंद्र मोदी करू देत नाहीत, म्हणत केजरीवाल तमाशा करीत बसतील, ही भिती दिल्लीकरांना भाजपाकडे घेऊन गेली.

आगीतून सुटून फ़ुफ़ाट्यात, अशी मराठी उक्ती आहे. दिल्लीकरांसमोर नेमकी तशीच स्थिती उपलब्ध होती. भाजपाची आग परवडली. केजरीवालांचा आम आदमी पक्ष म्हणजे फ़ुफ़ाट्यात पडणे होय. असेच गेल्या दोन वर्षात दिल्लीकरांचे मत होऊन गेले आहे. कारण हाती जितकी सत्ता व अधिकार आहे, त्यातून काही जनहिताचे काम करण्यापेक्षा नसलेल्या अधिकारासाठी अखंड भांडत बसणे व गफ़लतीचे खापर अन्य कुणाच्या माथी फ़ोडणे; इतकाच कारभार केजरीवाल यांनी केला आहे. त्यातून त्यांनी काय राजकारण केले, याच्याशी सामान्य जनतेला कर्तव्य नसते. त्यात सामान्य माणसाचे काय हाल होतात, इतकेच मतदार बघत असतो. त्यातून त्याचे मत तयार होत असते, अशारितीने केजरीवाल यांनी मागल्या दोन वर्षात आपल्याच विरोधातले मत तयार करण्यासाठी अपार कष्ट उपसले. त्याचेच पीक आता पालिका मतदानात आलेले आहे. नरकात राहू, पण केजरीवाल वा आम आदमी पक्ष नको, अशा निष्कर्षाप्रत लोकांना यायला, अन्य कोणी भाग पाडलेले नाही. सहाजिकच त्यांना सत्तेपासून दूर राखणे, हेच मतदाराचे उद्दीष्ट बनून गेले. तसे करताना पर्याय वा परिणाम म्हणून भाजपाचे उमेदवार निवडले गेलेले आहेत. लोकांनी भाजपाला भरभरून मते दिली असे अजिबात दिसत नाही. दोन वर्षापुर्वी जितक्या उत्साहात केजरीवालना दिल्लीकरांनी भरभरून मते दिली होती, तसा उत्साह यावेळी दिसलेला नाही. म्हणजेच हे भाजपासाठी सकारात्मक मतदान आहे, असाही दावा करता येणार नाही. पण त्याहीपेक्षा केजरीवाल अजिबात नको म्हणून दिलेला हा कौल आहे. अर्थात तो केजरीवालना उमजण्य़ास पुढली तीन वर्षे लागतील. पण भाजपाने मात्र त्यातून धडा घेतला पाहिजे. ही भाजपाची निवड नसून मतदाराची नावडनिवड आहे. ‘आप’च्या कांगावखोरीच्या विरोधात झालेले मतदान आहे. त्याचा लाभार्थी भाजपा आहे.

5 comments:

  1. Poll result of Delhi MCD Total 272 seats

    Congress 28
    AAP- 46
    Others- 10
    *EVM Error- 186*

    ReplyDelete
  2. Don't agree completely. Delhi residents had an option of Congress as well. Why didn't it do well? With the kind of BJP chaos, voters should have preferred congress.

    ReplyDelete
  3. Bhau,Vishleshan atishay avadle.

    ReplyDelete