Sunday, April 30, 2017

‘शिव’तारे त्याला कोण मारे?


शिवतारे के लिए चित्र परिणाम
२००४ सालची गोष्ट आहे. साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये मी एक लेखमाला लिहीत होतो. दोन महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणुका संपल्या होत्या आणि त्यात भाजपाप्रणि्त एनडीएने सत्ता गमावलेली होती. त्याचे निकाल अभ्यासून राज्य विधानसभा निवडणुकीत काय स्थिती होऊ शकेल, त्याचे विश्लेषण मी या लेखमालेतून करत होतो. लोकसभेचे निकाल असले तरी त्यात विधानसभा मतदारसंघाच्या अनुसार आकडेवारी उपलब्ध होती. सहाजिकच माझ्या अभ्यासानुसार शिवसेना भाजपा युतीला कुठल्या जागा जिंकणे सहज शक्य आहे आणि कुठे मेहनत करावी लागेल, असा एकूण विषय होता. त्यातले तीन लेख प्रसिद्ध झाले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी पुढे लेख थांबवण्याचे कार्यकारी संपादक वसंत सोपारकरांना सांगितले. मलाही त्यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले. लेख युतीला पुरक असूनही त्यांनी थांबवण्याचे कारण मला कळलेले नव्हते. जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी खुलासा केला. पण मला तो तेव्हा पटलेला नव्हता. आता मात्र बाळासाहेब किती दुरदर्शी होते, त्याचा अंदाज येतो. त्यांना माझे लेख व विश्लेषण आवडले होते. पण युतीमधले बहुतेक नेते कार्यकर्ते त्यापासून काही धडा घेतील, याची त्यांना अजिबात खात्री नव्हती. म्हणूनच ते म्हणाले, ‘यातून कॉग्रेसला कुठे दुबळे आहोत हे कळून तो पक्ष शहाणा होईल आणि आपले (युतीचे) लोक काहीही धडा घेण्याची शक्यता नाही. म्हणूनच शत्रूला सावध करू नकोस’. त्यानंतर मी अन्यत्र असे विषय लिहीत राहिलो. पण एक गोष्ट लक्षात आली, की शिवसेनेत निवडणुका कशा जिंकतात वा कशामुळे गमावतात, त्याचा अभ्यास होत नाही. हे मान्य करावे लागले. अशा स्थितीत गेल्या आठवड्यात शिवसेनेचे राज्यमंत्री विजय बापू शिवतारे यांची भेट झाली आणि आणखी एक धक्का बसला. हा माणूस त्याच विषयाचा अभ्यासक असल्याचे कळले. मग त्याचा उपयोग शिवसेना कशाला करीत नाही, त्याचा धक्का बसला.

एका समारंभाच्या निमीत्ताने शिवतारे यांची भेट झाली आणि अल्पावधीसाठी राजकीय चर्चा झाली. त्यात आपोआपच उत्तरप्रदेशातील भाजपाच्या अपुर्व विजयाचा विषय आला. तेव्हा शिवतारे यांनी खिशातले घडी घातल्याने च्रुरगाळलेले काही कागद काढून मला बारीकसारीक तपशील समजावण्याचा प्रयास केला. अर्थात त्यातला बराचसा तपशील मलाही अभ्यासक असल्याने आधीच ठाऊक होता. पण असा बारकाईने निवडणूकांचा अभ्यास एका शिवसेना नेत्याकडून मला अपेक्षित नव्हता. उत्तरप्रदेशात भाजपा कशामुळे इतके मोठे दैदिप्यमान यश मिळवू शकला? त्याचे सुक्ष्म बारकावे सहसा माध्यमातून समोर आणले गेलेले नाहीत. त्यात त्या राज्यातील जातिनिहाय लोकसंख्या, कुठले समाज घटक भाजपाच्या कडव्या विरोधात आहेत? त्यांचे एकूण मतदारसंख्येतील प्रमाण काय आहे? कुठल्या गटांना आपल्या सोबत जोडून घेता येईल? कुठल्या समाजघटकांचे कुठले पक्ष व नेते आहेत? असा बारीकसारीक अभ्यास करून अमित शहांनी उत्तरप्रदेशची रणनिती आखलेली होती. मग त्यानुसार मित्र जोडले आणि त्यानुसारच तिकीटवाटप केलेले होते. इतके झाल्यावर सरासरी मतदानाचे प्रमाण किती आहे आणि त्यात किती भर टाकली तर चित्र पलटू शकते, त्याचे समिकरण मांडले गेले. थोडक्यात कुठलीही निवडणूक आपले समिकरण मांडून कशी जिंकावी, त्याचा वस्तुपाठच तिथे लिहीला गेला आहे. त्यात आपल्या दुबळेपणाचा अंदाज व आपल्या विरोधकांच्या बलस्थानाचाही अभ्यास केलेला होता. हा सगळा तपशील शिवतारे या शिवसैनिकाने कुठून मिळवला व कधी समजून घेतला, ते मला ठाऊक नाही. पण ज्याच्यापाशी इतकी कुशाग्र समज आहे, त्याचा वापर शिवसेनेने आजवर कशाला केला नाही, असा प्रश्न मला पडला. कारण तो केला गेला असता, तर स्थानिक निवडणुकीत सेनेला चौथ्या क्रमांकावर जाण्याची गरज भासली नसती.

माझ्या माहितीप्रमाणे विजय शिवतारे हा माणूस खुप उशिरा शिवसेनेत आलेला आहे. त्याने पुरंदर हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकून दिला आहे. १९७२ पासून समाजवादी वा जनता पक्षीय पकड असलेली ही जागा आहे. त्या काळात शिवतारे राजकारणातही नव्हते. जवळपास एकविसाव्या शतकाच्या आरंभी हा माणुस राजकारणात आला आणि राष्ट्रवादीमधून त्याने आपली कारकिर्द सुरू केली. पण तिथे अजितदादांच्या समोर अन्य कोणाला किंमत नसल्याने, लौकरच पर्याय म्हणून शिवतारे यांनी सेनेचा आश्रय घेतला. तिथे आल्यानंतर त्यांनी २००९ सालात हा मतदारसंघ शिवसेनेला जिंकून दिला. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत तिथे सेनेचा भगवा कायम फ़डकवत ठेवला आहे. त्या संदर्भात त्यांनी मला एक वेगळी गोष्ट कथन केली. नंतरच्या प्रत्येक मतदानात त्यांनी आपली मतसंख्या आणि टक्केवारी वाढवत नेलेली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या भागात उत्तम काम केले ही बाब नक्कीच आहे. पण निवडणुका नुसत्या काम केल्याने जिंकता येत नाहीत. तर त्यासाठी पक्की रणनिती अगत्याची असते. त्याची तयारी हा माणूस नक्की करत असणार. मतदान केंद्रापासून वेळोवेळी संघटनात्मक उभारणीला प्राधान्य असते. त्याची काळजी घेतली नसेल तर लागोपाठ विजय संपादन करणे सोपे नसते. त्यांच्याशी बोलताना याची जाणिव झाली. १९९० पासून शिवसेना विधानसभेतील प्रमुख पक्ष बनून गेली. पण प्रत्येकवेळी कमीअधिक झालेल्या आमदार संख्येचा अभ्यास करून रणनिती आखली जायला हवी, असा त्यांचा मुद्दा होता. माझ्यासारख्या अभ्यासकानेही त्याचा कधी विचार केला नव्हता. म्हणजे असे, की १९९० सालात सेनेचे ५४ आमदार निवडून आले. मग १९९५ सालात ७४ झाले. पण आधीचे सर्व ५४ पुन्हा जिंकले नव्हते. त्यापैकी किती जागा टिकल्या व गेल्या? त्या कशामुळे गमावल्या? त्याचा अभ्यास आवश्यक असल्याची बाजू माझ्या कधीच लक्षात आली नव्हती.

ज्या जागा वारंवार व सातत्याने एखादा पक्ष जिंकत असतो, तेव्हाच त्याच्यासाठी तो बालेकिल्ला होऊन जातो. अशा जागा जितक्या अधिक तितकी पक्षाची जनतेतील मान्यता व पाठबळ अधिक हक्काचे असते. म्हणूनच कोण असे स्थान जनतेत संपादन करतो आणि पक्षाला बालेकिल्ला उभारून देतो, त्याला प्राधान्य असायला हवे. तर पक्षाचा पाया भक्कम होत जातो आणि पर्यायाने तिथला विरोधक दुबळा होऊन जातो. शिवतारे यांच्या बाबतीत त्यांनी निदान आपल्या मतदारसंघात अशी संघटना उभी केलेली असावी, किंवा मतदान केंद्राच्या पातळीवार तटबंदी भक्कम केलेली असावी. त्या विषयात जाण्य़ाची गरज नाही. त्यापेक्षा त्यांचा निवडणूकविषयक हा अभ्यास शिवसेना आपल्या रणनिती आखण्यात कशाला वापरत नाही, याचे मला नवल वाटले. यातली पहिली गोष्ट म्हणजे शिवतारे हा ग्रामिण भागातून उदयास आलेला नेता आहे आणि त्याला ग्रामीण जनतेचे प्रश्न समस्या नेमक्या ठाऊक आहेत. विरोधात असतानाही त्यांनी आपल्या मतदारसंघात सरकारच्या योजनांचा वापर करून घेत मिळवलेला जनतेचा विश्वासही तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे आपल्यासह पक्षाचा पाया परिसरात कसा भक्कम करावा, त्याची या माणसाला जाण आहेच. पण त्याच्याही पलिकडे राज्यव्यापी निवडणूका जिंकण्यामागची आजची यंत्रणा कशी असली पाहिजे, त्याचेही या माणसाला पक्के ज्ञान आहे. उत्तरप्रदेशात अमित शहा वा भाजपाने योजलेल्या रणनितीचा असा अभ्यास, अन्य कुठल्या विरोधकाने केलेला मला तरी बघायला मिळालेला नाही वा वाचनात आलेला नाही. अमित शहांनी भाजपात अशा लोकांचा एक गटच तयार केलेला असून, त्यांच्या यंत्रणेमार्फ़त निवडणूका पक्षासाठी सोप्या करून टाकलेल्या आहेत. त्यात अन्य नेते वा स्थानिक नेतेही ढवळाढवळ करू शकत नाहीत. हेच भाजपाच्या लागोपाठच्या यशाचे खरे रहस्य आहे.

भाजपाची निवडणूक यंत्रणा वा आयोजन, रणनिती याचा तपशील शिवतारे यांनी कुठून वा कशासाठी मिळवला, ते मला ठाऊक नाही. पण त्यांनी त्याचा बारकाईने अभ्यास केला आहे, यात शंका नाही. कदाचित भाजपाच्याही महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनी तितका अभ्यास केला नसावा. मग सवाल इतकाच, की या शिलेदाराचा वापर शिवसेना पक्षप्रमुखांनी मुंबई महापालिका वा अन्य जिल्हा परिषद निवडणूकीत कशाला करून घेतलेला नाही? की शिवतारे नावाचा आपलाच एक खंदा कार्यकर्ता इतका अभ्यासू आहे व त्याच्यापाशी निवडणूका जिंकण्याचे तंत्र सज्ज आहे, याचाच थांगपत्ता सेना नेतृत्वाला लागलेला नाही? उत्तरप्रदेश वा मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची अशी अयारी भाजपा सहा महिने आधीपासून करत होता आणि त्यात शिवतारे यांच्यासारखे कित्येकजण दिर्घकाळ गुंतलेले होते. प्रचाराचे फ़लक वा जाहिरातीच्या घोषणा या खुप नंतरच्या गोष्टी असतात. आधी पाया घालावा लागतो आणि तो कसा घालावा, याविषयीचा अभ्यास शिवतारे यांच्या बोलण्यातून समोर आला. अर्थात कदाचित उत्तरप्रदेशचे निकाल लागण्यापुर्वी त्यांनाही हे तपशील माहिती नसू शकतील. कदाचित ठाऊक असल्यास त्यांनी पक्षाच्या बैठकीत मांडलेले असूनही त्याची दखल घेतली गेली नसेल. पण नुकसान पक्षाचेच झाले आहे. आपल्यापाशी असलेल्या कुशल खेळाडू वा रणनितीकाराला आळशी बसवून ठेवण्याने, त्याचे नव्हेतर पक्षाचे नुकसान होत असते. पुढल्या काळात शिवसेना-भाजपा युतीला राजकारणात भविष्य नाही. आताच सत्तेत भागी असून दोघातून विस्तव जात नाही आणि पुढल्या काळात भाजपाशीच सेनेला टक्कर द्यावी लागणार आहे. त्यात कॉग्रेस वा राष्ट्रवादी हे पक्ष लयास जायचे आहेत. अशावेळी भाजपाशी लढताना जुन्या पद्धतीने वा कालबाह्य रणनितीने लढता येणार नाही. भाजपाने जी विजयाची रणनिती बनवलेली आहे, तिचाच अवलंब करण्याला पर्याय नाही.

२०१४ पर्यंत ज्या बंगालमध्ये भाजपा स्वबळावर एकही आमदार निवडून आणू शकत नव्हता, तिथे आज ममताला तोच पक्ष आव्हान देऊ लागला आहे. ओडिशात तर युती तुटल्यावर नविन पटनाईकसमोर भाजपाला आपले पाय रोवूनही उभे रहाणे अशक्य झाले होते. अशा दोन्ही राज्यात आज तीन वर्षात अमित शहांनी मुसंडी मारून दाखवली आहे. शून्यातून तिथे पक्षाचे संघटन उभे केले आहे. ओडिशा बंगालमध्ये कॉग्रेस डाव्यांना मागे टाकून भाजपाने दुसर्‍या क्रमांकाची मते स्थानिक मतदानात मिळवली आहेत. त्याचे श्रेय अर्थातच अमित शहांना जाते. पण ते श्रेय व्यक्तीचे नसून त्यांच्या रणनितीचे आहे. त्यामागच्या सज्जतेला आहे. म्हणूनच भाजपाशी लढत म्हणजे त्याच रणनितीशी लढत देण्याखेरीज पर्याय नाही. सवाल इतकाच उरतो, की त्यासाठी शिवसेना कितीशी सज्ज आहे? तर अलिकडे सेनेला मुंबईतही भाजपाला रोखता आलेले नाही. भाजपा आताच मुंबईच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेला तुल्यबळ पक्ष झाला आहे. सेनेला भाजपाच्या नव्या रणनितीची टक्कर देत्ता आली नाही. कारण सेनेला भाजपाची रणनितीच ओळखता आली नव्हती. ती रणनिती ज्याला ठाऊक आहे असा कोणी शिवसेनेत असू शकेल, ही माझी तरी अपेक्षा नव्हती. म्हणून शिवतारे यांच्याशी झालेल्या गप्पांनी मला थक्क केले. कारण हा माणूस अभ्यासू आहे आणि त्याच्यापाशी पर्यायी रणनितीची जाण आहे. शिवसेनेने त्यालाच कामाला जुंपले, तर भाजपासाठी शिवसेना हे खरेच आव्हान होऊ शकेल. पुढला काळ राज्यातले राजकारण सेना व भाजपा यांच्यातच विभागले जाणार असेल, तर त्याला पर्याय नाही. शिवाय सेनेतील बहुतांश नेते मुंबईचे वा शहरी आहेत, तर शिवतारे हा अस्सल ग्रामीण भागातून उदयास आलेला कार्यकर्ता आहे. कदाचित त्यातून शिवसेनेचे नवे ग्रामीण नेतृत्वही बाळसे धरू शकेल. भाजपाच्या ग्रामिण नेतृत्वाला ते खरे आव्हान ठरू शकेल.

अमित शहांनी भाजपाची नवी घडी बसवली असे मानले जाते. पण वास्तवात त्यांनी पक्षाच्या संघटनेला आता एक निवडणूका जिंकून देणारी एक अजस्त्र यंत्रणा बनवले आहे. त्यात विविध कार्यकर्त्यांच्या गुणवत्ता, कुशलता व योग्यतेचा नेमका वापर करून घेण्याची सुविधा केलेली आहे. मोदी हा त्यातला चेहरा आहे. संघटना नियंत्रित करणारे अमित शहा आहेत. विविध आघाडीवर प्रचाराची लढाई संभाळणारे लोक आहेत. त्याच्याही मागे रणनितीकार व त्यांना लागणारा तपशील गोळा करणारे कार्यकर्ते आहेत. मतदाराला नेमका लक्ष्य करणारी रणनिती, हे भाजपाचे बलस्थान झालेले आहे. त्याच्याशीच थेट टक्कर घेऊ शकणारी तशी वा पर्यायी रणनिती, हेच भाजपाला उत्तर असू शकते. योगायोगाने तसा विचार करू शकणारा माणूस शिवसेनेत असेल, तर त्याचा योग्य वापर झाला पाहिजे. कदाचित असे अनेक शिवतारे संघटनेत असून सुद्धा नजरेत आलेले नसतील. त्यांना शोधून कामाला जुंपणे व योग्य जबाबदार्‍या सोपवून, पुढल्या काही वर्षाची राज्यव्यापी सिद्धता करणे, सेनेला लाभदायक ठरू शकेल. अशी माणसे वा कार्यकर्ते आपल्या गोटात असण्याला भाग्य लागते. सेना नेतृत्वाने असे दुर्लक्षित ‘शिव’तारे शोधुन त्यांच्यावर जबाबदार्‍या सोपवल्या, तर भाजपा हे मोठे आव्हान असू शकत नाही. नुसत्या शाब्दिक कसरती करून लोकांचे लक्ष वेधण्यापेक्षा निवडणुकीतील विजयाचे लक्ष्य वेधणे निर्णायक असते. भाजपाला त्यामध्ये पराभूत करायचे आव्हान आज सेनेसमोर आहे. ते आव्हान वाटते तितके सोपे नाही. पण अशक्यप्राय सुद्धा नाही. आपल्यापाशी असलेली साधने व संख्याबळ यांचा कुशलतेने उपयोग करण्यालाच तर गनिमी कावा म्हणतात. ज्यांना तो कळू शकतो, त्यांना आत्मसात करता येतो. जग विजयासमोर विजेत्यासमोर झुकत असते, इतके लक्षात घेतले तर ‘शिव’तारे त्याला कोण मारे, ह्याचा अर्थ अधिक समजावण्याची गरज नाही.

7 comments:

  1. भाऊ, आपली सूचना उचित आहे. पण एक छोटा फरक एवढाच आहे की क्षमता हा शिवसेना मध्ये आधार बनेल व ठाकरे घराणे सोडून जोवर अन्य कोणी सरसेनापती होईल अशी मानसिकता उपजणार नाही तो पर्यंत राणे,भुजबळ,ई आले व गेले,तसे च हे शिवतारे

    ReplyDelete
  2. me kahi shivsena samarthak nahi, pan balasahebancha samarthak ahe, vijaya peksha tyanna "SANJAY" mahatwacha watat asel, aplya parigha baher baghaychi vrutti badlawlee nahi tar sene che nuksan ahe

    ReplyDelete
  3. विनाशकाले विपरित बुध्दी दुसरे काय ?

    ReplyDelete
  4. शिवसेनेला माहिती पोचवायला हा लेख लिहिलेला दिसतो भाऊ तुम्ही

    ReplyDelete
  5. उद्या शिवतारे भाजपमध्ये दिसले तर नवल वाटू नये।

    ReplyDelete