Friday, September 9, 2016

चोराच्या उलट्या बोंबा

Image result for kapil sharma show

अण्णांच्या लोकपाल आंदोलनाने एक नवी पिढी सार्वजनिक जीवनात आणली, ज्यांना कांगावखोर म्हणता येईल. आपण कोणावरही आरोप करायचे आणि आपल्यावरच आरोप झाले, मग पळ काढायचा. आपल्यावरच्या आरोपांना उत्तरे द्यायची नाहीत आणि उलट प्रत्यारोप करून आपण निरपराध असल्याचे नाटक रंगवायचे, अशा उलट्या बोंबा मारणार्‍यांची लाट सध्या देशात आलेली आहे. त्याचा एक राष्ट्रीय तमाशा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खेळतच आहेत. पण आता त्यात कपिल शर्मा नावाच्या विनोदवीराची भर पडली आहे. गेल्या दोनतीन वर्षात लोकप्रिय चेहरे आमंत्रित करून त्यांच्याशी गमतीजमती करीत लोकप्रियतेवर स्वार झालेला कपिल शर्मा, याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अच्छे दिन कुठे आहेत, असा सवाल केल्याने शुक्रवारी वाहिन्यांवर खळबळ माजली. स्वाभाविकच होते. वाहिन्यांची टीआरपी हल्ली मोदी या नावाभोवतीच घोटाळत असते. सहाजिकच विनाविलंब कपिलचा आरोप घेऊन बवाल सुरू झाला. कारण कपिलने भाषाच अशी केली होती, की वाहिन्यांना खाद्य मिळावे. आपण गेली पाच वर्षे सरकारी तिजोरीत प्रामाणिकपणे १५ कोटी आयकर भरणा केला. मात्र आपल्याला मुंबई महापालिकेला पाच लाख रुपयांची लाच द्यावी लागते आहे. मग अच्छे दिन कुठे आहेत? हा सवाल मोदींच्या ट्वीटर खात्यावर विचारला गेला आणि धुमाकुळ सुरू झाला. भाजपाचे, मोदींचे सरकार कसे भ्रष्टाचाराने बरबटले आहे, त्याचीच अखंड स्वप्ने बघणार्‍यांना इतके निमीत्त पुरेसे होते. त्यांनी सरबत्ती सुरू केली. पण कपिलकडे कुठल्या अधिकार्‍याने कशासाठी लाच मागितली वा कपिलने कशासाठी लाच दिली, याचा शोध घेण्याची कुठल्याही वाहिनीला गरज भासली नाही. आरोप भाजपा शिवसेनेच्या विरुद्ध आहे ना? सवाल मोदींच्या कारभारावर लागला आहे ना? मग हल्ला सुरू करा. पुराव्याची गरज काय?

सगळीकडे एकाच सुरात कपिलवरील अन्यायाचा गाजावाजा सुरू झाला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कपिलकडे तपशील मागत कारवाईची जाहिर हमी देऊन टाकली. मग हळुहळू वाहिन्यांचे डोके ठिकाणावर आले. पाच लाखाची लाच कुणाला कशासाठी द्यावी लागली, याचा शोध सुरू झाला. तेव्हा अंधेरी पश्चिमेला चार बंगला म्हणून असलेल्या परिसरातील एका बांधकामाचा विषय असल्याचे लक्षात आले. बांधकामात अडथळे आणून कुठल्याही नागरी सेवेतील अधिकारी पैसे खातात. अनधिकृत बांधकामांना मान्यता देतात. ती बांधकामे होऊ देतात. ही बाब जगभर प्रसिद्ध आहे. त्यात नवे काहीही नाही. किंबहूना अच्छे दिनाचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही. मुंबई पालिकेचा कारभार पंतप्रधान हाकत नाहीत. म्हणूनच सर्वप्रथम कपिलने पंतप्रधानांना असा जाब विचारणेच गैरलागू होते. पण पंतप्रधान म्हटल्यावर लोकांचे लक्ष वेधले जाणार, ही कपिलची अपेक्षा होती. झालेही तसेच. पण कशासाठी लाच हे तपासले जाईल, अशी त्याची अपेक्षा नव्हती. तिथेच सगळा घोळ झाला. आपल्यावर अन्याय होतो असे दाखवून सहानुभूती मिळवणे; हे हल्ली गुन्हेगारी वृत्तीचे बचावासाठी सोपे हत्यार झाले आहे. कपिलने त्याचाच वापर केला होता. रितसर आयकर भरणारे आपण प्रामाणिक नागरिक असल्याचे सांगून, लाच हा अन्याय दाखवण्याचा तो प्रयास होता. पण कायदा नियम मोडला नसेल, तर लाच देण्याचा विषय आला नसता. अर्थात अडवणूक करूनही लाच वसुल केली जातेच. इथेही आपली अडवणूक करून लाच घेतली जातेय, असेच कपिलला दाखवायचे होते. झालेही तसेच. पण ज्यांच्यावर आरोप झाला, त्यांनाही आपली कातडी बचावणेही भाग होते. कारण कपिलच्या तक्रारीची दखल घेऊन थेट मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आश्वासन दिले. सहाजिकच संबंधित पालिका अधिकार्‍यांना कातडी वाचवायला सत्य समोर आणावेच लागले. तिथे कपिलची गोची झाली.

चार बंगला इथे एक निवासी घर कपिलने खरेदी केलेले आहे. तिथे तळमजला आणि वरती एक मजला उभारण्याची मुभा आहे. पण त्या घराचे बांधकाम करताना कपिल शर्माने दुसरा मजला उठवायला घेतला. त्याच्या विरोधात आसपासच्या नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली. सहाजिकच नियमबाह्य बांधकाम थांबवावे, अशी सुचना पालिकेकडून पाठवली गेली. म्हणजे मुळातले प्रकरण कपिल शर्माने बेकायदा वा अनधिकृत बांधकाम करण्याचे होते. अर्थात असे बेकायदा बांधकाम होण्यातूनच अर्ध्याहून अधिक मुंबई उभी राहिलेली आहे. त्यामुळे लाखो अनधिकृत बांधकामापैकी कपिलचे एक आहे. अशा प्रत्येकाने पालिकेतील कर्मचारी वा अधिकार्‍यांना लाच दिलेली आहे. पण त्यांनी कधी पंतप्रधान वा मुख्यमंत्र्याकडे लाच मागितली गेल्याची तक्रार केलेली नाही. कपिलने तोच जगावेगळा ‘विनोद’ केला. आपण नियमाला टांग मारून बेकायदा बांधकाम करीत असल्याचे त्याने सोशल मीडियातून सांगितले नाही. तर लाच द्यावी लागली, हे मात्र बोंब ठोकून सांगितले. जेव्हा अधिकारी त्याविषयी खुलासा करायला पुढे आले, तेव्हा कपिलचे पितळ उघडे पडले. त्याने आपल्या लोकप्रियतेचा फ़ायदा उठवत बेकायदा कृत्य लपवण्यासाठी कांगावा सुरू केला. आपल्याकडून लाच वसुल केली गेल्याची तक्रार केली. अशा गोष्टीत चोरीचा मामला असतो. देणार्‍याने व घेणार्‍याने आळीमिळी गुपचिळी मौन पाळायचे असते. कारण त्या पापातले दोघेही सारखेच गुन्हेगार असतात. अधिकारी तुम्हाला गुन्हा करायची मुभा देण्याच्या बदल्यात लाच घेत असतात. तुम्ही कायदा मोडला नसेल, तर आवाज उठवणे योग्य असते. कपिलनेही नियमाला टांग मारून गुन्हा केला आणि तो पोटात घालण्यासाठी अधिकार्‍यांनी लाच घेतली वा मागितलेली. तर कपिल निरपराध कसा? पण पांढरपेशी गुन्हेगारी हाच आजचा सभ्यपणा झालेला आहे. केजरीवाल हा त्याचा एक मानबिंदू झाला आहे.

कपिल शर्माने लाच दिली नाही वा त्याच्याकडे लाच मागितलीच गेलेली नाही, असे कोणी ठामपणे म्हणायची गरज नाही. सगळीकडे लाचखोरी उघडपणे चालते, त्यावर कोणी कसली सफ़ाई देण्याचे कारण नाही. देशाचा पंतप्रधान बदलला किंवा सत्ताधारी पक्ष बदलला, म्हणून लाचखोरी एकदोन वर्षात संपेल, अशी अपेक्षाही करायचे कारण नाही. किंबहूना नियमातून पळवाट काढायला उत्सुक व उतावळे नागरिक असलेल्या समाजात, लाचखोरी कधीच संपत नसते. पण चोरांचीही एक नितीमत्ता असते. त्यात लाच देणार्‍या व मागणार्‍यांनी परस्परांना संरक्षण द्यायचे असते. त्यात गफ़लत झाली, मग पाप चव्हाट्यावर येते. जोवर केजरीवाल दडपू शकले तोवर त्यांनीही आपल्या सुदीप कुमार नावाच्या मंत्र्याचे लैंगिक चाळे पाठीशी घातलेच ना? खोटे प्रमाणपत्र दाखवणार्‍या मंत्र्याला तीन महिने पाठीशी घालून केजरीवाल यांनी उलट भाजपावरच कारस्थानाचा आरोप केला नव्हता का? पण जेव्हा प्रकरण आपल्याच अंगाशी येईल अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा केजरीवाल यांनी तोमर किंवा सुदीप या मंत्र्यांना बडतर्फ़ करून आपली कातडी बचावलीच ना? त्याला हल्ली चारित्र्यसंपन्नता म्हणतात. सहाजिकच त्यातली नितीमत्ता कपिल शर्मा पाळू शकला नसेल, तर अधिकारीही त्याला नंगाच करणार ना? त्यांनी लाच खाण्याचे पाप केले. पण प्रत्यक्षात कपिलच्या पापावर पांघरूण घालण्याची किंमत घेऊन पाप केले होते. पण जमाना कांगावखोर असेल, तर यापेक्षा दुसरे काय होणार? चोराच्या उलट्या बोंबाच ऐकायला मिळणार ना? देशातला भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याची मोहिम व आंदोलन लोकपालच्या मागणीतून पुढे आल्यावर, देशातील अशा कांगावखोरांना भलतीच प्रतिष्ठा लाभली आहे. उलट्या बोंबा मारणार्‍यांचा बाजार तेजीत आलेला आहे. त्यातच आपलाही धंदा चालवून घेणार्‍या वाहिन्या सज्ज असल्या मग काय विचारता?

1 comment:

  1. भाऊ हा माणुस जोकर आहे अशांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचे नसते tv channels वाले व९५% पेपरवाले म्हणजे circus's वाले आहेत त्यातील हा पॅंट सुटून जाळीत पडणारा हा गिड्डा जोकर आहे

    ReplyDelete