Saturday, September 24, 2016

पाकची झोप उडवणारा गृहस्थ

Image result for ajit doval family

आपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल? राजकीय किंवा सुरक्षा विषयक चर्चा चालतात, त्यामध्ये कायम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल यांना शिवीगाळी चालू असते. कशी गंमत आहे ना? हाफ़ीज हा जगाने जिहादी दहशतवादी म्हणून घोषित केलेला गुन्हेगार आहे आणि दुसरा एका खंडप्राय देशाचा सुरक्षा जाणकार आहे. पण पाकिस्तानला त्याच सल्लागाराची भिती वाटते, यातच डोवाल यांचे कौतुक आहे. याला रणनिती किंवा युद्धनितीची महत्ता म्हणतात. कारण देशाची सुरक्षा निव्वळ सैनिक वा सुरक्षा दलाकडून होत नसते. त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी, परिस्थिती व पुर्वतयारी करून देण्याला फ़ार महत्व असते. पाकिस्तानला डोवाल यांची तेवढ्यासाठीच भिती वाटत असते. आजकाल पाकिस्तान सतत भारतात हिंसक हल्ले घडवण्याच्या मागे लागला आहे. तसे हे हल्ले पुर्वीपासून चालू आहेत. पण आधी त्यांना जितके अडथळे येत नव्हते, तितकी आता त्यांची कोंडी होत चालली आहे. नुकताच उरी येथे जिहादी हल्ला झाला आणि त्यानंतर जगभर जी प्रतिक्रीया उमटलेली आहे, तशी प्रतिक्रीया वा प्रतिसाद यापुर्वी भारताला मिळत नव्हता. न्युयॉर्क येथे राष्ट्रसंघाच्या बैठकीला गेलेले पाकचे पंतप्रधान एकाकी पडले. अवघ्या जगानेच भारताच्या बाजूने कौल देताना पाकिस्तानला जणू वाळीत टाकलेले आहे. याचे श्रेय डोवाल यांना द्यावे लागेल. कारण मागल्या दोन वर्षात त्यांनीच पाकिस्तानसह चिनची जागतिक कोंडी करण्याचे डावपेच यशस्वीरित्या खेळलेले आहेत. आताही उरीनंतर चिननेही पाकच्या बाबतीत हात झटकण्याचे तेच कारण आहे. या माणसाविषयी पाकिस्तानला इतका तिटकारा कशाला असावा, तेही समजून घेण्याची गरज आहे. कारण त्यांनी पाकच्या बलुची दुखण्याची खपली काढली आहे.

देशात सत्तांतर झाल्यापासून डोवाल यांनी विविध गुप्तचर संस्था, सुरक्षा यंत्रणा यांच्यात सुसुत्रिकरण आणुन सुरक्षेला प्राधान्य दिलेच. पण आजपर्यंत जो बचावात्मक पवित्रा घेतला जात होता, त्याला आक्रमक चेहरा प्रदान केला आहे. आपल्या अंगावर कोणी चाल करून आल्यावर आपण नेहमीच अंग आखडून घेऊन बचाव करण्याचा प्रयास करतो. पण जेव्हा तुम्ही सतत बचावात्मक पवित्रा घेता, तेव्हा कोणीही तुम्हाला टपली मारण्याची हिंमत करत असतो.. याच्या उलट कोणी आपल्याकडे नुसत्या वाकड्या नजरेने बघत असेल, तर त्याला हटकण्याचे धाडस तुम्ही दाखवता, तेव्हा तुमच्याकडे बघणार्‍याची नजरही बदलून जाते. तुमच्या वागण्याचा व बोलण्याचा धाक वचक निर्माण होतो. सहाजिकच तुमची खोड काढण्यापुर्वी असा कोणीही दहा वेळ विचार करतो. डोवाल यांचा पवित्रा तसा आहे आणि म्हणूनच पाकिस्तान चवताळला आहे. काश्मिरचा विषय सोडवायचा असेल, तर भारताच्या वेदना पाकिस्तानला अनुभवता आल्या पाहिजेत, ही डोवालनिती आहे. त्यामुळेच पाकिस्तान खवळला आहे. आजवर भारताने कधीही पाकच्या दुखण्यावर बोट ठेवले नाही, की बलुची नावाच्या जखमेवरची खपली काढली नाही. उलट त्यावर फ़ुंकर घालण्याचे पाप मात्र भारताच्या नेत्यांनी केलेले होते. काही वर्षापुर्वी शर्म अल शेख इथे जागतिक परिषद असताना शरीफ़ यांनी मनमोहन सिंग यांच्याकडे भारतीय गुप्तचर खात्याविरुद्ध तक्रार केलेली होती. बलुची चळवळ्यांना भारतीय हेर मदत करतात अशी ती तक्रार होती. तेव्हाच्या भारतीय पंतप्रधानांनी पुरावे द्या चौकशी करतो, अशी पडती भूमिका घेतली होती. पण काश्मिरातील उचापतींसाठी शरीफ़ यांना जाब विचारला नव्हता. मोदी सरकार आल्यानंतर काश्मिर विषय बाजूला पडला आणि भारताने बलुची असंतोषाला चुड लावायचे काम हाती घेतले. त्यामुळे पाक चवताळला आहे. कारण त्यामागची प्रेरणा डोवालनिती आहे.

काश्मिरसाठी पाकने नेहमीच मानवाधिकार किंवा असंतोषाचा मुद्दा उचलून धरला. तितकी बलुची चळवळ समर्थ नाही वा नव्हती. पण मागल्या दोन वर्षात डोवालनिती त्याला खतपाणी घालत राहिली. आज जगभर त्याचे पडसाद उमटत आहेत, त्याला डोवाल कारण झाले आहेत. पण त्यातूनच पाकिस्तानचा दुटप्पीपणा चव्हाट्यावर आला. पर्यायाने पाकिस्तानचे काश्मिर नावाचे हत्यार एकदम बोथट होऊन गेले आहे. न्युयॉर्क येथे राष्ट्रसंघासमोर बलुची निर्वासित निदर्शने करून पाक पंतप्रधानाचा निषेध करीत होते. त्यांना सहानुभूती दाखवणारे कोणी शरीफ़ यांचे काश्मिर रडगाणे ऐकून घायला राजी नव्हता. ही पाकिस्तानची पोटदुखी आहे. बलुचिस्तानच्या या असंतोषाला आगडोंब बनवण्याची संपुर्ण योजनाच मागल्या दोन वर्षात आखली व राबवली गेली आहे. मात्र हे पडद्याआड चालू असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाक पंतप्रधानाच्या गळ्यात गळे घालत होते. कुणालाही गाफ़ील ठेवायचे असते, तेव्हा त्याच्याशी अतिरिक्त सलोख्याने वागावेच लागते ना? अफ़जलखानाला गळाभेट करण्यासाठी शिवरायांनी आमंत्रित केले, तेव्हा त्याला गाफ़ील ठेवण्याचाच हेतू होता. मात्र ती गळाभेट करताना वाघनखे कुठे ठेवली आहेत, ते कळू दिले नव्हते. कुटनिती अशीच असते. नरेंद्र मोदी दिलखुलास हसून शरीफ़ यांच्या गळ्यात गळे घालत होते आणि दुसरीकडे सुरक्षा सल्लागार डोवाल पाकिस्तानातील विविध असंतुष्ट गटांना एकत्र करून बंडखोरीच्या पवित्र्यात आणत होते. ही सज्जता करण्यात दोन वर्षे गेली आणि नंतरच स्वातंत्र्यदिनी त्याची पहिली वाच्यता मोदींनी लालकिल्ल्यावर केली. बलुची स्वातंत्र्य व मानवी हक्कांचा उल्लेख मोदींनी केला. पण त्यासाठीची लढ्याची सज्जता डोवाल यांनी आखलेल्या रणनितीनुसार झालेली होती. पाकिस्तानला डोवाल नावाचा माणुस राक्षस त्यामुळेच वाटतो. सतत पाक वाहिन्या म्हणूनच त्यांच्यावर दुगाण्या झाडत असतात.

अन्यत्र सोडा, पण भारतातही मोदींच्या शरीफ़मैत्रीची खुप टिंगल झाली. त्यावर टोकाची टिका झाली. इतक्या जवळीकीसाठी शेकडो प्रश्न विचारले गेले. मोदींनी सर्व काही सहन केले. पण त्याची कारणे कधी सांगितली नाहीत. कालपर्यंत शरीफ़च्या गळ्यात गळे घालणारा भारतीय पंतप्रधान, आता पाकला इतक्या टोकाचा शत्रू कसा म्हणतो, याचेही कोडे अनेकांना पडले आहे. त्याची उत्तरे डोवालनितीमध्ये दडलेली आहेत. मागल्या दहा वर्षात देशाची सुरक्षानिती रसातळाला गेलेली होती आणि भारतात उजळमाथ्याने पाकनिष्ठ गोतावळा तयार झाला होता. त्यांना अंधारात ठेवूनच नवी रणनिती राबवणे आवश्यक होते. त्यासाठी शरीफ़मैत्री व आडून पाकविरोधी जागतिक मांडणी; असा डाव डोवाल यांनी राबवला आहे. त्याचे दुष्परिणाम आज पाकला भोगावे लागत आहेत. म्हणून तर पाक माध्यमात मोदींपेक्षाही डोवाल यांचा अखंड उद्धार चालू असतो. सौदी राजेही पाकिस्तानच्या पाठीशी आज उभे नाहीत आणि अमेरिकेने पाकला झटकले आहे. हा बदल आकस्मिक नसतो. मोदींच्या दोन वर्षे चाललेल्या परदेश वार्‍या आणि डोवाल यांनी हलवलेले मोहरे व प्यादी, यातून हे सर्व घडून आलेले आहे. त्यात पाकिस्तान एकाकी पडला आहे. काश्मिरचे हत्यार बोथट झाले आहे आणि पाकला रक्तबंबाळ करू शकणारे बलुची हत्यार भारताच्या हाती आले आहे. त्यामुळेच पाकिस्तान गडबडला आहे. मग त्याचा कर्ताकरविता असलेल्या डोवाल यांचा द्वेष व हेवा वाटणे स्वाभाविक आहे. त्यात उरीच्या घटनेने पाकला कडेलोटावर आणून ठेवले आहे. यापुढे असे हल्ले होतीलही. पण दिवसेदिवस पाकिस्तानचा अंत जवळ आणणारे, इतकेच त्याचे महत्व असेल. कारण सिंध, बलुची व मोहाजिर अशा पाकला रक्तबंबाळ करू शकणार्‍या ‘बलुची’ हाफ़ीज व अझरना भारताने मदतीचा हात देऊ केलेला आहे. यामागचा सुत्रधार पाकला राक्षसच वाटणार ना?

16 comments:

  1. हा आधुनिक चाणक्य केवळ पाकिस्तानलाच नाही तर कांग्रेसलाही नको आहे , कालच tv वरिल चर्चेत कांग्रेसच्या एका नेत्याने डोवाल यांनी राजीनामा द्यावा असे म्हणाला . वा खांग्रेस.

    ReplyDelete
  2. Bhau, dhanyawad! Additional information for readers of Jagata Pahara.

    http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1

    ReplyDelete
  3. Pak la russian madat miltey tyabaddal chinta vatte.

    ReplyDelete
  4. परंतु हे TV वर चर्चा करणार्या ' कुमार ' ला कसे समजणार?

    ReplyDelete
  5. अतिशय अभ्यापूर्ण लेख पुर्ण सहमत

    ReplyDelete
  6. आपल्या कांंही अर्धवट राजकारण्यांंना मोदींंचा मुत्सद्दीपणा न कळल्याने ते मोदींच्या धोरणावर बेतालपणे टीका करत होते. पाकिस्तान बरोबर अशा आपल्या राजकारण करणा-यांंनाही ही चांंगलीच चपराक बसलीय. आतातरी त्यांंनी शहाणपण शिकावे.

    ReplyDelete
  7. राजकारण बाजूला ठेऊन राष्ट्रहिताला अगोदर प्राध्यान्य दिले पाहिजे.... पण याच्या उलट आपल्या देशात होत आहे...

    ReplyDelete
  8. If he is so intelligent did he not able to understand Uri incident ?

    ReplyDelete
  9. जबरदस्त विसलेशन भाऊ

    ReplyDelete
  10. शिवरायनिती हेच राष्ट्र उद्धारक ठरेल. अगदी योग्य मांडणी केली भाऊ

    ReplyDelete