Thursday, September 29, 2016

दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये

“You will never reach your destination if you stop and throw stones at every dog that barks.”   ― Winston S. Churchill९ ते ११ जुलै १९७१ हे तीन दिवस जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले होते. त्याला आता ४५ वर्षे उलटून गेली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे सुरक्षा सल्लागार डॉ. किसींजर पाकिस्तानच्या भेटीला आलेले असताना ह्या तीन दिवसात गायब होते. आजच्या प्रमाणे नेते मान्यवरांचा पाठलाग करणारा माध्यमांचा ससेमिरा नसल्याने किसिंजर कुठे आहेत, त्याचा कोणी शोध घेतला नव्हता. तीन दिवसांनी ते पुन्हा पाकिस्तानात प्रकटले आणि मायदेशी निघून गेले. मग तब्बल सहा महिन्यांनी अमेरिकन अध्यक्षांनी चिनला भेट दिली. त्यापुर्वी चिन अमेरिका यांच्यातून विस्तव जात नव्हता आणि चिन संयुक्त राष्ट्रसंघाचा साधा सदस्यही नव्हता. पण निक्सन यांच्या चिनवारीने जगाचा चेहरामोहरा बदलून टाकला. कारण चिन नुसताच राष्ट्रसंघाचा सदस्य झाला नाही, तर नकाराधिकार असलेला वजनदार सदस्य म्हणून जागतिक पटावर त्याचा उदय झाला. तोपर्यंत चिनी राजधानीला पेकिंग संबोधले जायचे. त्या भेटीनंतर पेकिंगच बिजींग होऊन गेले. मुद्दा इतकाच, की १९७१ च्या मध्यापासून पुढल्या सहा महिन्यात किती घडामोडी चालल्या होत्या, त्याचा कुठल्याही पत्रकार व माध्यमातील जाणकारांना थांगपत्ता नव्हता. पण जे काही चालले होते, त्याला पिंगपॉंग मुत्सद्देगिरी असे संबोधले जात होते. आज चिन जगातली एक आर्थिक महाशक्ती मानली जात आहे, त्याची बीजे त्याच काळात पेरली गेली. त्याचा वृक्ष होऊन आजच्यासारखी मधूर फ़ळे येण्यास चार दशकांचा कालावधी खर्च झाला. आज त्याच प्राथमिक प्रयासांची कोणाला आठवण नाही, की चर्चाही करावी असे वाटत नाही. पण त्या पडद्याआड चाललेल्या मुत्सद्देगिरीने नुसते अमेरिका चिन संबंध बदलले नाहीत, तर अवघ्या जागतिक राजकारणाला नवी दिशा दिलेली होती. पुढल्या अनेक घडामोडी व घटनाक्रमाला त्यातूनच चालना मिळालेली होती.

चर्चा नेहमी घटनेची होते. परिणामांवर अभ्यासक उहापोह करतात. त्याचीच कारणमिमांसा चालते. पण त्या घटनेमागच्या कारणांचा कितपत उहापोह होतो, याची शंका आहे. म्हणून तर किसिंजर यांच्या त्या छुप्या पाकिस्तान भेटीला फ़ारसे महत्व मिळाले नाही आणि निक्सन यांच्या चिनभेटीवर खुप चर्चा झाल्या. सोवियत युनियन संपुष्टात आणणार्‍या १९८९ नंतरच्या घडामोडींवर आजही चर्चा होऊ शकते. त्या दरम्यान उध्वस्त झालेल्या बर्लिनच्या भिंतीवर सेमिनार होऊ शकतात. पण त्या स्थितीला कारणीभूत असलेल्या अनेक प्रयत्नांचा मागमूस अशा चर्चेत नसतो. काही प्रसंगी तर अशा घटना घडवल्या जात असताना डोळ्यांना दिसत असतात. पण त्या समजून घेण्यापेक्षा त्यांची आपल्या अज्ञानाच्या मदतीने टिंगल करण्यातच धन्यता मानली जात असते. निक्सन-किसिंजर यांच्या पिंगपॉंग मुत्सद्देगिरीचीही तेव्हा तशीच जागतिक टवाळी झाली होती. नरेंद्र मोदी किंवा भारताच्या नव्या परराष्ट्र धोरणाविषयी अशीच टिंगलटवाळी गेली दोन वर्षे आपण ऐकत आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात कमी असतात आणि परदेशीच अधिक वेळ असतात. असा युक्तीवाद करून त्यांना अनिवासी भारतीय ठरवणारी टिकाही आता नवी राहिलेली नाही. पण त्याचाच उल्लेख करून लोकसभेत एका चर्चेला उत्तर देताना मोदी काय म्हणाले, त्याची दखलही कुणा अभ्यासकाला वा बुद्धीमंताला घ्यावीशी वाटू नये याला बुद्धीवादी वर्गाची शोकांतिका म्हणता येईल. कारण गेली दोन वर्षे नेमके काय चालले आहे, त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत आणि त्याचे आकलन करण्याचा आवाकाही अशा जाणत्यांमध्ये दिसत नाही. तीन आठवड्यापुर्वी सत्तराव्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी लालकिल्ला येथून राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि त्यात बलुचिस्तानचा नुसता उल्लेख केला. त्यातून आलेल्या जगभरच्या प्रतिक्रीया थक्क करून सोडणार्‍या ठरल्या आहेत.

एका बाजूला काश्मिर पेटलेले आणि तिथे सलग महिनाभर संचारबंदी लावलेली. तमाम विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलेले आणि पाकिस्तानसह त्याचे इथले हस्तक दबाव आणत असताना, मोदींनी थेट पाकिस्तानच्या दुखर्‍या जखमेवर आपल्या या भाषणातून बोट ठेवले. जणू भळभळणार्‍या जखमे्वर मीठ चोळले. काश्मिरी विषयावर बोलायचे सोडून, मोदी यांनी पाकिस्तानातील अनेक समाज घटकांच्या मानवी हक्काचा विषय जगाच्या व्यासपीठावर मांडण्याचे आश्वासन दिले. भारताकडून या शेजारी देशातील पिडीत नागरिकांच्या असलेल्या अपेक्षांच्या पुर्ततेची हमी दिली. जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या अशा पाक नागरिकांच्या विविध गटांनी तात्काळ मोदींच्या त्या आश्वासनाला प्रतिसाद देत पाक विरोधी निदर्शनांचा सपाटा लावला. बघता बघता पाकिस्तानची जगभर कोंडी सुरू झाली. मागली सत्तर वर्षे उठसुट काश्मिरी वेदना जगभर मांडणारा पाकिस्तान एकदम कोंडीत सापडला. अवघे जग त्याला बलुची, पख्तुनी, सिंधी व मोहाजीर नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा जाब विचारू लागले. जी२०, एसियान या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोदींनी पाकिस्तानला दहशतवादी देश ठरवण्याची मागणी केली. जगभरच्या दहशतवादाचा जनक म्हणून पाकची निर्भत्सना केली. पाकवर आर्थिक निर्बंध लावण्याचा विषय काढला. त्याला अनेक देश पाठींबा देण्यास पुढे सरसावले. अमेरिकेनेही अल्पावधीत पाकला वारंवार इशारे देण्याची पावले उचलली. खुद्द पाकिस्तानातही मुंबई हल्ल्याचा धुळ खात पडलेला खटला नव्याने सुरू करण्याच्या हालचाली झाल्या. अशा घटना अकस्मात घडत नसतात. त्यामागे एक योजना असते. पद्धतशीरपणे त्या घटना घडवून आणलेल्या असतात. त्यामागचा बोलविता धनी नजरेस येत नाही. पण पटावरची प्यादी मोहरे हलवावे, तसा हा खेळ चालू असतो. त्याला मुत्सद्देगिरी म्हणतात. दोन वर्षात मोदींनी काय केले, त्याचे उत्तर पाकच्या या कोंडीत शोधता येऊ शकेल.

अशा खेळीत आपण काय केले व कोणती रणनिती वापरली, हे त्या क्षेत्रात काम करणारे कधी जाहिरपणे सांगत नाहीत. प्रत्यक्ष कृती करताना, त्यासाठीची आखणी करताना किंवा तिची अंमलबजावणी केल्यानंतरही; याविषयी गोपनीयता पाळली जात असते. मुत्सद्देगिरी हा जाहिर चर्चेचा विषय नसतो. सेमिनार भरवून, चहा पिताना, पिकनिकला गेलेले असताना चर्चा करण्याचे अन्य खुप विषय असतात. पण मुत्सद्देगिरी ही नेहमी गोपनीय बाब असते. तिच्या गोपनीयतेतच तिचे यश सामावलेले असते. यश मिळाल्यावरही त्याची चर्चा करण्याचा मोह टाळला जातो. फ़क्त परिणामांचे खुलासे होतात, चर्चा विचारविमर्श होतात. त्यामागचे डाव किंवा प्रयत्नांना मात्र पडद्याआड गडप व्हावे लागत असते. म्हणूनच आज पाकिस्तानची चहूकडून कोंडी होत असल्याविषयी जोरदार चर्चा चालू आहे. त्यामागचे डावपेच शोधले जात आहेत, किंवा त्यातल्या चुकाही शोधून धोकेही दाखवण्याचा उद्योग जोरात चालू आहे. पण त्यामागच्य़ा दोन वर्षातील हालचाली व खेळींचा कुठलाही तपशील समोर आला नाही, येणारही नाही. कारण ज्यांना ह्या खेळी करायच्या असतात. त्यांना परिणामांशी कर्तव्य असते. त्याचे श्रेय घेण्याचा मोह टाळू शकणारेच अशा खेळात उतरू शकतात, किंवा बाजी मारू शकतात. देशात सत्तांतर घडवून सत्ता काबीज करणार्‍या नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीलाच सार्क देशांच्या तमाम राष्ट्रप्रमुखांना खास आमंत्रण देऊन बोलावले. त्याचा अर्थ तेव्हा किती लोकांना उमजला होता? ती एकप्रकारची घोषणा होती. या दक्षिण आशियात वा भारतीय उपखंडाच्या परिसरात भारतच थोरला भाऊ आहे, हे सांगण्याचा उद्देश त्यामागे होता. पुढल्या दोन वर्षात त्याच दिशेने मोदी पावले टाकत गेले. आज दिसत आहे, ते त्याच प्रयत्नांना आलेले यश आहे. शेजारी देशांना व जाणत्यांना आता त्याचा अर्थ थोडाथोडा उलगडू लागला आहे.

इंदिरा गांधी यांच्या निर्वाणाला आता ३२ वर्षे होऊन गेली आहेत. त्यानंतर कुठल्या भारतीय पंतप्रधानाला जगात इतकी मान्यता मिळाली? तब्बल आठ पंतप्रधान या कालावधीत भारताने बघितले. पण त्यापैकी कोणालाही जागतिक नेत्याप्रमाणे वागणूक मिळाली असे दिसले नाही. नरसिंहराव यांनी तर जगाकडे पाठ फ़िरवली होती आणि राजीव गांधींकडे इंदिराजींचा वारस म्हणूनच बघितले गेले. मनमोहन सिंग यातले सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान. पण त्यांच्याकडे बुजगावणे म्हणूनच बघितले गेले. राष्ट्रसंघाच्या बैठकीला न्युयॉर्कमध्ये असताना त्यांनीच जारी केलेल्या एका अध्यादेशाच्या चिरफ़ळ्या करून राहुलनी त्यांना अपमानित केले. पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांनी मग मनमोहन यांची पाणवठ्यावर कुरबुरणारी ग्रामिण महिला; अशी टिंगल केलेली होती. अशा पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हा नेता भारतीय पंतप्रधान म्हणून जगाच्या राजकीय क्षितीजावर उगवला. एका मध्यम राज्याचा प्रभावशाली मुख्यमंत्री, अशी त्याची तोपर्यंतची प्रतिमा होती. अनेक पाश्चात्य देशांनी गुजरात दंगलीचे कारण दाखवून बहिष्कृत केलेला भारतीय नेता, इतकीच जगाला मोदींची ओळख होती. अशा स्थितीत या नेत्याने दोन वर्षात नुसती परराष्ट्र संबंधाची कुशलता सिद्ध केलेली नाही; तर जगालाही आपल्याकडे आदराने बघायला भाग पाडले आहे. हा व्यक्तीगत वा राजनैतिक फ़रक अकस्मात घडलेला नाही. त्यामागे अतिशय प्रयत्नपुर्वक योजलेली रणनिती आहे. पण तशा गंभीर गोष्टीकडे बघण्यापेक्षा टिंगलटवाळी हाच अभ्यास, विश्लेषणाचा विषय केला, मग ती योजना बघता येत नाही, की तिचे आकलन होऊ शकत नाही. उलट शरीफ़च्या आईला मोदींनी दिलेली शाल, किंवा शरीफ़ यांनी मोदींच्या मातोश्रीला पाठवलेली साडी चर्चेचा विषय होऊन जातो. मग बाकीच्या घटनाक्रमाचे आकलन होणार कसे आणि त्यात गुरफ़टलेली मुत्सद्देगिरी समजणार कशी?

सत्ता हाती घेतल्यापासून मोदींना एक गोष्ट ठाऊक होती. भक्कम बहूमतामुळे पाच वर्षे त्यांच्या खुर्चीला राजकीय धोका नव्हता. सहाजिकच पहिले सहासात महिने आपले सहकारी निवडून त्यांना देशांतर्गत कारभार करण्याच्या कामाला जुंपणे, हे प्रारंभिक काम होते. ते हातावेगळे झाल्यावर मोदींनी जगात आपल्या देशाची व आपली प्रतिमा उभी करण्याचे काम सुरू केले. हे काम दोन भागात विभागलेले होते. एक जबाबदारी खुद्द मोदींनी पत्करली होती आणि शक्य तितक्या देशांमध्ये भारताविषयी आत्मियता निर्माण करण्याचे काम त्यांनी सुरू केले होते. प्रत्येकाशी दोस्ती व त्यातून सदिच्छा निर्माण करण्यासाठी परदेश दौरे सुरू झाले. त्याचवेळी उपयुक्त ठरणार्‍या विविध महत्वाच्या देशांच्या प्रमुखांना अगत्याने आमंत्रित करून मैत्रीला प्राधान्य दिले. शिवाय आधीपासून शत्रू वा प्रतिस्पर्धी असलेल्यांनाही दोस्तीच्या जाळ्यात ओढण्याचा पवित्रा घेतला. ही गोडीगुलाबीची कामे मोदी व्यक्तीगतरित्या करीत होते. त्यासाठी परराष्ट्र खात्यातले अधिकारी मुत्सद्दी त्यांच्या दिमतीला होते. पण दुसरे अतिशय जोखमीचे व गुंतागुंतीचे काम त्यांनी आपले सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर सोपवले होते. मनमोहन सिंग यांचे सुरक्षा सल्लागार शंकर मेनन सतत त्यांच्या अवतीभवती दिसायचे. तसे डोवाल कधी मोदींच्या जवळ दिसत नाहीत. पण परदेश दौर्‍यावर मोदी असतात, तेव्हा सतत त्यांच्याच निकट डोवाल आपल्याला दिसू शकतात. भारतात ही जोडी एकत्र दिसत नाही. मग डोवाल अशावेळी काय करीत असतात? कुणा अभ्यासक विश्लेषकाने एकदा तरी तसा प्रश्न स्वत:ला विचारला आहे काय? भारताचा लष्करप्रमुख म्हणून काम केलेल्या निवृत्त जनरल व्ही. के. सिंग यांना परराष्ट्र राज्यमंत्री कशासाठी बनवण्यात आले, असा विचार तरी शहाण्या लोकांच्या मनाला कधी शिवला आहे काय? डोवाल व सिंग नेमके काय काम करतात, याची चर्चा कधीतरी गंभीरपणे झाली आहे काय?

मोदींनी जागतिक नेत्यांच्या गळ्यात गळे घालायचे आणि सिंग-डोवाल यांनी पडद्याआड राहून अन्य कुटनिती करायची; अशीच ही विभागणी असल्याचे लक्षात येऊ शकेल. मोदी बांगलादेश दौर्‍यावर गेले, तेव्हा डोवाल त्यांच्यासमवेत जायचे होते. पण अकस्मात त्यांनी वाट वाकडी करून म्यानमारच्या जंगलात कमांडो पथकासह प्रस्थान केले आणि प्रथमच भारताने अतिरेक्यांचा सीमापार जाऊन खात्मा केला होता. इसिसचा धुमाकुळ सुरू झाला, तेव्हा कुठलाही गाजावाजा होऊ न देता भारताने २०-३० हजार फ़सलेल्या भारतीयांना इराक-सिरीयाच्या युद्धभूमीतून मायदेशी आणले. त्याची योजना कशी कोणी राबवली, त्याचा कुठे किती उहापोह झाला? येमेनमध्ये युद्धाचा भडका उडाला. तिथेही अनेक भारतीय फ़सलेले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारताची युद्धनौका एडनच्या बंदरात जाऊन ठाण मांडून बसली. तेव्हा फ़क्त भारतीय नव्हे, तर ४३ देशाच्या तशा फ़सलेल्या नागरिकांना भारतीय सैनिकांनी सुखरूप बाहेर काढले. किंबहूना पाश्चात्य पुढारलेल्या देशांनी आपल्या फ़सलेल्या नागरिकांना भारतीय वकिलातीकडे मदत मागण्याचा सल्ला दिलेला होता. अशा कारवाया शिताफ़ीने यापुर्वी कधी भारताकडून झाल्या नव्हत्या. हे सर्व सहजगत्या होत नाही. त्यात तुमच्या परराष्ट्र संबंध व जागतिक मुत्सद्देगिरीची कसोटी लागत असते. याचे कुठलेही श्रेय घ्यायला पंतप्रधान मोदी पुढे सरसावले नाहीत, त्याचे श्रेय घ्यायला त्या खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज हजर होत्या. एडनच्या बंदरात मुक्काम ठोकलेल्या जनरल सिंग यांनीही त्या श्रेयाची मागणी केली नाही. डोवाल तर अशा कुठल्याही प्रसिद्धीपासून चार हात दूर असतात. कारण परराष्ट्रनिती म्हणजे शत्रूदेशाला शह काटशह देणारा सावल्यांचा खेळ असतो. त्यात बिनचेहर्‍याचे रहाण्याला खुप महत्व असते. डोवाल मागे असतात आणि पंतप्रधान मोदी समोर दिसतात.

दोन वर्षात मोदींनी पाकिस्तानी नेत्यांना गळ्यात गळे घालून बेसावध राखण्याचे काम चोख पार पाडले. त्यासाठी अकस्मात शरीफ़ याच्या घरी लग्नसोहळ्याता हजर रहाण्यासाठी पाकिस्तानची वारीही केली. पण या सर्व काळात त्यांचीच सावली असलेले सुरक्षा सल्लागार डोवाल काय करत होते, याची कुठे चर्चा झाली नाही. गळ्यात गळे घालून शत्रूला गाफ़ील ठेवता येते. त्याच काळात बलुचिस्तान, बाल्टीस्तान, फ़ाटा, व्याप्त काश्मिर, सिंध प्रांतातील असंतुष्ट मोहाजीर इत्यादिंना चुचकारण्याचे काम कोणी तरी करीत होता. अन्यथा अकस्मात दोन वर्षांनी त्या विखुरलेल्या लोकांनी पाकनेतृत्व आणि सरकारच्या विरोधात असा संघटित आवाज कशाला उठवला असता? त्यासाठी कोणी तरी त्यांना संघटित करीत असणार, त्यांच्यात समन्वय घडवून आणत असणार ना? तसा आवाज पकिस्तानातून वा अन्यत्र उठला, तर त्याला जागतिक समर्थन मिळण्याची तरतुद कोणीतरी करून ठेवलेली असणार ना? आपोआप अशा गोष्टी घडत नाहीत. मोदी व त्यांच्या निवडक सहकार्‍यांनी त्याची जय्यत तयारी केल्याशिवाय पाकिस्तान असा कोंडीत सापडला नसता. जगात मोदींची प्रतिमा उंचावली नसती, तर जगातून पाकविषयक भारतीय भूमिकेला असा प्रतिसाद मिळू शकला नसता. नुसता पाक नाही तर त्याचा खंदा समर्थक असलेल्या चिनलाही आज भारताशी जुळवून घेण्याला भाग पडण्याची वेळ आलेली आहे. प्रसंगी पाकिस्तानला गप्प बसवण्यासाठी चिनलाच पुढाकार घ्यायलाही भाग पडू शकते. हे सर्व करत असताना मायदेशी मात्र मोदींची अनिवासी भारतीय म्हणून टवाळी होत राहिली. पण त्यांनी तिकडे पाठ फ़िरवली. जणू चर्चिलचा सल्ला मोदींनी मानला. तो म्हणतो, भुंकणार्‍या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसलात, तर आपल्या ध्येयाप्रत पोहोचणेच अशक्य होऊन जाईल.

आपल्या सव्वा दोन वर्षाच्या कारकिर्दीत मोदींनी अशी परराष्ट्रनिती राबवली आहे, की आज भारताला जागतिक पटावर मान्यता मिळत चालली आहे. भारताला वगळून कुठले निर्णय होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे. भारतासाठी काही करायची व भूमिका घेण्याची मानसिकता जागतिक नेत्यांमध्ये वाढते आहे. चिनलाही आपल्या आक्रमकतेला मुरड घालण्याची पाळी आली आहे. चिनला दक्षिण सागरात आणि पाकिस्तानला त्यांच्या मायभूमीतच मोदींच्या नितीने आव्हाने उभी केलेली आहेत. त्या परराष्ट्रनितीचे आकलन आपल्या देशातल्या जाणत्यांना दोन दशकांनंतर होईल. आज इतकेच म्हणता येईल, की मोदींनी एक जुनी भारतीय उक्ती खरी करून दाखवली आहे. म्हणूनच जग भारतासमोर झुकते आहे. ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’. भारत कधीच दुबळा नव्हता वा कमजोर नव्हता. हे ४५ वर्षापुर्वी पाकिस्तानचे तुकडे पाडून इंदिराजींनी सिद्ध केलेच होते. आज पुन्हा त्याचीच प्रचिती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणून देत आहेत.

9 comments:

 1. भाऊ आपले इतके जबरदस्त लेखन आजपर्यंत बघीतले न्हवते अशी उंची आजपर्यंत बघीतली नाहीं असेच लेखन वारंवार वाचायला मिळावे अशी अपेक्षा आहे

  ReplyDelete
 2. भाऊ मोदीजीं कडून यापेक्षा मोठ्या अपेक्षा आहेत ही तर पुर्व-तयारी असावी अशी अपेक्षा आहे

  ReplyDelete
 3. भाऊ "घेतल शिंगावर " what's app वर जवळ जवळ ५० जणांनी १तासामध्ये काल संध्याकाळी पाठवले होते त्यावेळी आश्चर्यचकित व्हायची वेळ माझी होती. भाऊ गामा पैलवान सध्या कोठे गायब आहेत दिसत नाहीत ???

  ReplyDelete
 4. Precise foreign policy and diplomacy analysis, widely circulate this post on FB & whatsApp. Khupach chan sir.

  ReplyDelete
 5. Attaparyantache Modi nitiwarcha sarvottam lekh.Salaam tumhala Bhau.

  ReplyDelete
 6. अलीकडच्या काळात वाचनात आलेले सर्वोत्तम राजकीय विश्लेषण...!

  ReplyDelete
 7. भाऊ खूप छान, देशप्रेमी आणि बुद्धी शाबूत असलेल्या लोकांना सहज सोप्या भाषेत कळेल असे आपण नेहमीच लिहिता. परराष्टरणीती सारखे क्लीष्ट विषय आपण खूप छान समजावले आहे.राष्ट्रप्रेमी आणि जागरूक नागरिक आपल्या जागत्या पहारा मूळे झोपलेले जागे आणि जागृत असलेले सजग होतायेत. अभिनंदन आणि खूप शुभेच्छा

  ReplyDelete
 8. छान विश्लेषण...

  ReplyDelete