Saturday, September 17, 2016

मराठ्याला जाग येतेय?

मराठा मोर्च्याची कारणमिमांसा  (५)

maratha morcha के लिए चित्र परिणाम

३५ टक्के मराठा समाजाची लोकसंख्या आहे असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. पण राज्यातील एकूण दुर्दशेने पछाडलेल्या समाजात मराठ्यांचे प्रमाण किती आहे? त्याचा सहसा उहापोह होत नाही. सगळे दुखणे तिथेच आहे. पन्नास वर्षात महाराष्ट्राचे राजकारण मराठ्यांनी चालवले हे खरे. कारण सत्ताधारी वर्गावर मराठा नेत्यांची छाप होती. पण अशा किती नेत्यांनी उघडपणे मराठा समाजाचे नेते म्हणून काम केले? त्या समाजाच्या समस्या किंवा स्थिती याविषयी जाणिवपुर्वक काम करणारे किती नेते दाखवता येतील? जातीचा लाभ फ़क्त मते व सत्ता मिळवण्यासाठी करणारे नेते, अशीच एकूण मराठा नेत्यांची ओळख आहे. जेव्हा आपल्या राजकारणाला बाधा येते, तेव्हा या नेत्यांना जातीचे स्मरण होते. पण सत्ता अबाधित झाली, मग खितपत पडलेल्या आपल्याच ज्ञातिबांधवांची फ़िकीर करणारा नेता मराठ्यात आढळून येत नाही. रामदास आठवले छाती ठोकून दलित वा बौद्धांचे नेते म्हणून मिरवतात. छगन भुजबळ अभिमानाने इतरमागासांचे किंवा अगदी माळी समाजाचा नेता अशी बिरूदावली मिरवत राहिले. इतरही अनेकांनी आपापल्या जाती व समाजघटकाचे नेतृत्व करण्यात पुढाकार घेतला. पण कुठलाही मराठा नेता सत्तेवर पोहोचला, मग त्याने आपली सर्वसमावेशक प्रतिमा उभी करताना मराठा जातीचा शिक्का पुसून टाकण्याचा प्रयत्न करत राहिला. भुजबळांकडून उपमुख्यमंत्रीपद हिसकावून घेताना अजितदादा मराठा नेता झालेले होते. अधूनमधून शेतकरी आंदोलन वा साखर कारखान्यांच्या विकेंद्रीकरणाचे आव्हान उभे राहिले, तेव्हा पवारांनी जातीचे स्मरण केले. पण खरोखर जिथे मराठा समाज खितपत पडलेला आहे, अशा क्षेत्रात कुठल्या मराठा नेत्याने पुढाकार घेऊन जातीचे नेतृत्व केले? क्वचितच कोणी असा राजकारणी सापडू शकेल. मराठा समाज आज अस्वस्थ आहे, त्याची वेदना इथेच दडलेली आहे.

आपापल्या सत्तेसाठी डाव खेळताना तथाकथित (कुठल्याही पक्षातील) मराठा नेत्यांनी जातीला आवाहन केलेले आहे. पण त्या जातीच्या लक्षावधी गरीबांना खर्‍याखुर्‍या अडीअडचणीतून बाहेर काढण्याचा संघर्ष करणारा कोणी नेता दिसणार नाही. कोल्हापूरच्या युवराजांना भाजपाने राज्यसभेत नेमणूक दिल्यावर पवारांना मराठा अस्मिता आठवली. छत्रपतींना पेशव्यांनी प्रथमच नेमणूक दिली, अशी मल्लीनाथी पवारांनी सहजपणे केली. त्यामागे जातीचा अभिमान सुचवण्याचा प्रयास केला. पण शेतकरी म्हणून हलाखीचे जीवन जगणारा किंवा आर्थिक कोंडीत फ़सलेल्या खेड्यापाड्यातील कोट्यवधी सामान्य मराठ्यांच्या वाट्याला आलेल्या दुर्दशेविषयी पवारांनी कधी दोन शब्द उच्चारले आहेत? अभिमान फ़ुलवून आपली आसने बळकट करण्यातून त्याच तथाकथित नेत्यांनी मराठा समाजाची कायम दिशाभूल केली. आपल्या खर्‍याखुर्‍या हलाखीच्या प्रश्नांवर मराठ्यांना कधी संघर्षाला मैदानात आणायचा प्रयत्नही झाला नाही. ज्याला मराठ्यांनी दिर्घकाळ सत्ता उपभोगली असे आज म्हटले जाते, ते मराठे म्हणजे मराठा समाज आहे, की दिडदोनशे मराठा घराणी व त्यांचे आश्रीत असलेला निकटचा गोतावळा आहे? अशी कमीअधिक लाभ उठवलेली आठदहा हजार मराठा घरे कुटुंबे सोडली, तर बाकी विखुरलेला कोट्यवधी मराठा कुठल्या सुस्थितीत आहे? त्याच्या समस्यांसाठी कुठला संघर्ष झाला आहे? जमिनदारी व शेती डबघाईला गेलेली असली, तरी पुर्वापार चालत आलेला अभिमान संपलेला नाही. कालपर्यंत मुठीत असलेली ग्रामसत्ता व सार्वजनिक प्रतिष्ठा नव्या रचनेमध्ये लयाला गेलेली आहे. मुठभर नेत्यांना मानाची पदे मिळाल्याने खितपत पडलेल्या मराठ्यांना न्याय मिळत नाही, की सन्मानाने जगणेही शक्य राहिलेले नाही. त्यातून मग हेवा द्वेष अशा गोष्टींना चालना मिळत असते. आपले मागासलेपण बोचरे होऊन जाते.

इतर कनिष्ट वर्ग व जातींचा इतर मार्गाने झालेला विकास वा संपन्नता बोचरी होऊन जाते. बापजाद्यांपुढे झुकून जगले वागले, त्यांनी ताठ मानेने चालणेही हरवलेल्या अभिमानाला बोचू लागते. ती बोच आपला विकास करून संपवता येऊ शकते. पण त्यासाठी कोणी मार्गदर्शन केले नाही. त्यापेक्षा जातीचा फ़ुकाचा अभिमान फ़ुलवून मराठा समाजाला ओलिस ठेवल्यासारखे वागवले गेले आहे. ज्यांच्याकडे सत्तेत जाणारे नेते म्हणून बघितले, त्यांनीच सर्वसमावेशक पवित्रा घेऊन खेड्यापाड्यातले वादंग संपवण्यापेक्षा त्यावर पांघरूण घातले आहे. मराठा समाज पुरोगामी व समावेशक असल्याचा आभास निर्माण करण्यात सत्ताधारी मराठा नेतेच पुढे होते. त्या गडबडीत आपल्याच समाजाची त्यांनी दिशाभूल केली आहे. ज्या मुठभर नेत्यांच्या हाती सुबत्ता आली, त्यांनी त्याचे लाभ अन्य ज्ञातीबांधवांपर्यंत पोहोचवण्याचे कुठलेही प्रयास केले नाहीत. म्हणूनच शेतीमुळे सुखवस्तु मानला गेलेला मराठा, त्या पेशाच्या दुर्दशेने पुरता उध्वस्त होऊन गेला. उलट शेतीवर विसंबून नसलेल्या आणि आरक्षणामुळे अधिक संघी मिळालेल्या अन्य समाजघटकांनी मोठी मुसंडी मारली. त्यांची प्रगती व संपन्नता डोळ्यात भरणारी होती, तशीच खुपणारीही होती. तिला जातीय गर्वाने डंख मारला, मग द्वेषाचे फ़ुत्कार टाकत उफ़ाळून ती वृत्ती येत असते. त्याला प्रबोधनातून वेसण घातली जाणे अगत्याचे असते. पण त्यापेक्षाही सोपा उपाय म्हणून एट्रोसिटी कायदा आणला गेला. ज्याचा किरकोळ प्रकरणातही गैरवापर होऊ शकला. सहाजिकच सामाजिक अभिसरण होण्यापेक्षा उलथापालथ होत गेली. विसंवाद वितुष्ट वाढत गेले. ती येऊ घातलेल्या संकटाची चाहूल होती. पण त्यावर पांघरूण घालण्यासाठी फ़ुले शाहू आंबेडकर ह्या पळवाटेचा वापर झाला. आता ह्या सर्व देखाव्याचा थोतांडाचा कडेलोट होऊन गेला आहे. म्हणूनच त्याला सामोरे जाण्याचीही हिंमत मराठा नेत्यांमध्ये दिसून येत नाही.

अर्थात कुठलाही मानव समूह समाजघटक नेत्याचा लाचार नसतो. जेव्हा त्याचे नेतृत्व पांगळे वाटू लागते, तेव्हा समाजच नवे नेतृत्व जन्माला घालत असतो. मराठा समाजाच्या आजवरच्या नेत्यांनी वा गटांनी जो हलगर्जीपणा किंवा आपमतलबीपणा केला, त्यातून हा समाज बाहेर पडताना दिसतो आहे. मुक्तीमोर्चा किंवा क्रांतीमोर्चा अशी जी जमवाजमव सुरू आहे. त्याला पडद्यामागून काही मराठा राजकारणी मदतही करीत असतील. पण अजून त्यातल्या कुठल्याही नेत्याला समोर येऊन ‘मराठ्यांचा नेता’ म्हणवून घेण्य़ाची हिंमत झालेली नाही. मुस्लिम, दलित वा इतरमागास नेते ठामपणे आपल्या समाजाच्या वेदनांचे आवाज उठवताना जात सांगायला घाबरत नाहीत. मग मराठा म्हणून तमाम फ़ायदे उकळणार्‍या नेत्यांनी मराठा नेता म्हणून आज कसोटीच्या वेळी पुढे यायला काय हरकत आहे? जातीच्या संख्येचे राजकीय लाभ उठवायची लाज वाटत नसेल, तर संकटात समाजाचे नेतृत्व करण्यात शरम कसली? पिढीजात उच्चवर्ण म्हणून जगलेला आणि आज विविध कारणांनी डबघाईला आलेला समाज, अशी मराठा समाजाची कोंडी झाली आहे. त्यातून हा आवाज उठतो आहे. त्याकडे जातीय वा संकुचित म्हणून बघण्यात मोठी गल्लत होऊ शकते. ते एकूण मराठी व भारतीय समाजाचे दुर्दैव असेल. कारण कुठल्याही लोकसंख्येत बहुसंख्य समाजघटकानेच नेतृत्व करावे आणि त्यासाठी त्यानेच सर्वसमावेशक असावे ही अपेक्षा असते. उलट त्याच्यातच अन्यायाची धारणा मूळ धरू लागली आणि किरकोळ समाजघटकांकडून कोंडी होत असल्याची भावना वाढीस लागली; तर समाजजीवन विस्कटून जाण्याची प्रक्रिया सुरू होत असते. मात्र एक गोष्ट नक्की आहे, ह्या मोर्चातून मराठा हा शिवकालीन जिद्दीने उभा राहू लागल्याची चाहूल मिळते आहे. त्याला पुरोगामी वा अन्य कुठले लेबल लावण्याची गरज नाही. त्याला एकविसाव्या शतकात आणण्यास हातभार लावायला पुढे आले पाहिजे. (अपुर्ण)

5 comments:

  1. छान भाऊ मस्तच,हे नेते समाजाचे नेते म्हणून आले आणि चुकुन समाजाने स्वीकारले तर हा समाज परत मातीत गेलेला दिसेल.(अपूर्ण )

    ReplyDelete
  2. ब्रामहणांनी कोणा कढे पाहायचा त्यांना तर कोणी वालीच नाही.

    ReplyDelete
  3. वैधानिक इशारा: कुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्याला हा ब्लॉग वाचणे अपायकारक असू शकते.

    ReplyDelete
  4. Sampurn lekh atishay bara pan ..... Atrocity act na bolalech bare...!!! jay bhim jay shivray

    ReplyDelete