Sunday, September 18, 2016

खामोशी सुनाने लगी है दास्ताँ

मराठा मोर्च्याची कारणमिमांसा  (६)

pawar cartoon के लिए चित्र परिणाम

ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने
मगर लगता है कुछ ऐसा,
मेरा हमदम मिल गया

ये मौसम ये रात चुप है
वो होठों की बात चुप है
खामोशी सुनाने लगी है दास्ताँ
नजर बन गयी है दिल की जबां

गेले दोन आठवडे तरी मराठा मूकमोर्चा किंवा क्रांती मोर्चा गाजतोय. पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जाऊन थेट भिडण्याची हिंमत कोणी राजकीय अभ्यासक वा राजकीय पक्षांनी दाखवलेली नाही. दलित मुस्लिम विषयावर अखंड पोपटपंची करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचीही वाचा या घटनाक्रमाने बसलेली आहे. कारण अशा काही प्रतिक्रीयेची अपेक्षाच आजवर कधी कोणी केलेली नव्हती. मराठा म्हणजे सुखवस्तु व राज्यकर्ती जमात, अशा समजूतीखाली दडपून टाकलेल्या भावनांचा हा उद्रेक आहे. म्हणूनच त्यावर थेट पुढे येऊन बोलण्याचे धाडस शरद पवारही करू शकलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी निदान आपल्या मनातील अस्वस्थता तरी बोलून दाखवली. पण अशा अटीतटीच्या परिस्थितीतही पवारांची प्रतिक्रीया केविलवाणी वाटली. ‘उठणारा आवाज सरकारविरोधीच आहे’ अशी ग्वाही पवारांनी कुठल्या आधारावर दिली? कर्जमाफ़ी व आरक्षणाच्या विषयावरून हा आवाज उठतो आहे, असे पवार म्हणाले. तेव्हा उपरोक्त जुन्या चित्रपट गीताचे स्मरण झाले. कारण मराठा मोर्चाचे वैशिष्ट्य तो ‘मूकमोर्चा’ आहे. त्याचे पोस्टर्स फ़लक झळकले आहेत. पण कुठलीही भाषणे नाहीत वा डरकाळ्या नाहीत. मग तो आक्रोश सरकारविरोधी असल्याचा अर्थ पवारांनी कुठून लावला? कारण सगळा उद्रेक कोपर्डीच्या बलात्कार हत्येनंतरचा आहे. त्याची प्रेरणा हतबलतेची आहे आणि दिर्घकाळ सत्ताधारी समाज असूनही आपल्याच रहात्या गावात-घरात सुरक्षितता गमावून बसल्याची ती वेदना आहे. ही स्थिती आजच्या दोन वर्षात आलेली नाही, किंवा सत्तांतरामुळे आलेली नाही. जे मागल्या पन्नास वर्षात पेरले गेले वा मशागत केली गेली, त्याचे पीक आहे. त्यातल्या खामोशीचा अर्थ लावण्यापुर्वी पवारांनी हेमंतकुमारचे हे गीत बारकाईने ऐकावे आणि समजूनही घ्यायला हरकत नाही.

‘खामोशी सुनाने लगी है दास्तां’ म्हणजे काय ते पवारांना कोणी समजावण्य़ाची गरज आहे का? मौन किंवा मूकभाषा बोलते, असा त्या ओळीचा अर्थ आहे. मराठ्यांचे भव्यसंख्येने व्यक्त होणारे मौन पवारांच्या शेकडो भाषणांपेक्षा अधिक बोलके व प्रभावशाली आहे. पण त्याचा अर्थ पवारांनी उलगडून सांगावा, यासाठीही मराठे लाचार राहिलेले नाहीत. कारण पुढल्याच ओळीत स्पष्ट झालेले आहे. ‘नजर बन गयी है दिल की जबां’. नजर बोलते आहे. पवारांनी वाहिन्यांवर किंवा माध्यमांना प्रतिक्रीया देत बसण्यापेक्षा त्या अफ़ाट गर्दीला प्रक्षोभक शांत मौनाच्या डोळ्यात झाकून बघावे. कारण ती नजर आज बोलते आहे. त्या गर्दीने भगवा ध्वज खांद्यावर घेतला आहे, जो शिवरायांचा भगवा मानला जातो. कुठल्या पक्षाचा वा विचारांचा झेंडा या गर्दीने खांद्यावर घेतलेला नाही. महाराजांचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन ते मूकमोर्चे कसली भाषा बोलत आहेत? आपण पुरोगामी प्रगतीशील वा वैचारिक क्रांतीचे दूत असल्याची ग्वाही हा अफ़ाट जमाव देत नाही. तो इतकेच सांगतो आहे, की ही स्थिती आजची नाही. जेव्हा तमाम लढवय्ये सरदार मनसबदारी जपण्यात गर्क होते, तेव्हा नव्या साम्राज्याचा पाया घालायला एक महापुरूष उभा ठाकला. त्यानेच कुठलाही वारसा नसलेल्या सामान्य मराठ्यांना हाताशी धरून न्यायाचे अभिमानाचे राज्य निर्माण केले. त्याचे स्मरण करून आम्ही जागलो आहोत, असेच हा मोर्चा सांगतोय. त्याला आपल्या स्वार्थाची लेबले लावण्याचे उद्योग कोणी करू नयेत. आमच्यातली लढण्याची वा मनगटाच्या बळावर सता फ़िरवण्याची कुवत संपलेली नाही, हेच त्या मौनातून सांगितले जाते आहे. ऐकण्याची व समजण्याची कुवत ज्यांच्यात असेल, त्यांनाच ती भाषा उलगडू शकते. त्यात कुणाचा विरोध वा आकस नाही, की राजकीय मतलबाचा हेतू नाही. तेव्हा पवारांनी आपले हेतू त्याला चिकटवण्यात अर्थ नाही.

प्रत्येक जातीच्या तथाकथित नेत्यांनीच त्या जातीसमुहाला जितके फ़सवले किंवा नाडलेले आहे, तितका भीषण अन्याय इतर कोणी त्यांच्यावर केला नसेल. आपापल्या स्वार्थाला जातीवरचा अन्याय ठरवण्याचे जे राजकारण दिर्घकाळ महाराष्ट्रात झालेले आहे, त्यावरची ही प्रतिक्रीया नक्की आहे. फ़ुले शाहू आंबेडकर ही भाषा वापरताना पवारांनी कधीच मराठ्यांच्या दुखण्यावर फ़ुंकर घातली नाही. उलट त्याच शब्दावलीचा बोळा मराठ्यांच्या तोंडात खुपसून एट्रॉसिटीचे बुक्के खायला लागले. त्यावरची ही संतप्त प्रतिक्रीया आहे. आरक्षण व एट्रॉसिटी हे मुद्दे अशा मोर्चात आले, त्याला दोन वर्षापुर्वी सत्तेत आलेले लोक जबाबदार नाहीत. पण या निमीत्ताने नुसत्या एट्रॉसिटी कायद्यावर घसरूनही चालणार नाही. ह्या कायद्याच्या अनेक तरतुदी गुंतागुंतीच्या व जाचक आहेत. पण अशा जाचक अटींचा जो गैरवापर राजकारणासाठी होत राहिला, त्याचे खापर फ़क्त दलितांवर किंवा तक्रारदारावर फ़ोडूनही चालणार नाही. अशा तक्रारींच्या मागची प्रेरणाही तपासून बघावी लागेल. नामांतराच्या अखेरच्या टप्प्यात दिलेल्या एका मुलाखतीत रामदास आठवले यांनीही मराठवाड्यात याच कायद्याच्या अतिरेकी तक्रारींनी दोन समाजात बेबनाव असल्याचे बोलून दाखवले होते. कुठल्याही गावात बारीकसारीक बाचाबाचीमध्ये अशा कायद्याचा वापर करण्याचा अट्टाहास अशा वैमनस्याचे मोठे कारण होऊन गेला. तशा तक्रारी तिथे पोहोचून नोंदवण्यात बाहेरच्या तथाकथित ‘सुधारकांनी’ पुढाकार घेतलेला आहे. त्यातून दलित वा हा कायदा याविषयी मराठा वर्गात दुषित मन होण्याला हातभार लागलेला आहे. तसा पुढाकार घेणारे सुधारक कोण व त्यांचे हेतू कोणते, याचाही थोडा तपशील पुढे आणला गेल्यास मोठे रहस्य उलगडले जाऊ शकेल. मराठ्यांना दलितांच्या शत्रुस्थानी आणण्यात अशा सुधारकांचा मोठा सहभाग असल्याचे लक्षात येऊ शकेल.

सुधारणा वा परिवर्तनाच्या चळवळींनी अशा कायद्याचा आडोसा घेऊन गावागावामध्ये अशा कायद्याचा मुक्तपणे वापर करण्यात पुढाकार घेतला. हजारोच्या संख्येने त्यानुसार गुन्हे नोंदले गेले आणि त्या कायद्यातील न्यायाची अपेक्षाच पराभूत झाली. किंबहूना ग्रामिण भागात सबळ सवर्ण म्हणून ओळखल्या जाणार्‍या मराठ्यांना हैराण करण्यासाठी या कायद्याचा हत्याराप्रमाणे वापर झाला. त्यात पवार सारख्यांनी वेळीच हस्तक्षेप केला असता, तर कायद्याचा गैरवापर झाला नसता, की दलित मराठा अशी वैमनस्याची धार त्यातून येत गेली नसती. पण त्यावर फ़ुले शाहू आंबेडकर असे साळसूद पांघरूण घातले गेले आणि सत्तेतील ‘साहेब’ मराठ्यांच्या मौनाने समाजातील खदखद दाबली गेली. तशा खटल्यांचा व तक्रारींचा वेळीच योग्य निचरा झाला असता, तर हा उद्रेक होऊ शकला नसता. पण आपापल्या जातींचे अहंकार फ़ुलवून आपली सत्तेची पोळी भाजून घेण्याला प्रत्येक जातीच्या ‘अभिमानी’ नेत्यांनी प्राधान्य दिले. त्याना पंखाखाली ठेवण्यात व्यापक सत्तेचे समिकरण जुळणारे असल्याने पवार यांच्यासारख्या नेत्यांनी फ़ुले शाहू आंबेडकर ही शब्दावली त्यासाठी चतुराईने वापरली. आजचा उद्रेक त्याच दडपेगिरीच्या विरोधात आहे. आम्ही पुरोगामी नाही. आम्ही पिचलेले पिडित ग्रासलेले आहोत. आम्ही क्षात्रधर्मिय मराठे आहोत. आम्ही क्षत्रिय आहोत, असे ठामपणे या मूकमोर्चाही नजर बोलते आहे, ती जुबान म्हणजे भाषा समजून घ्यायची असेल, तर त्यातली वेदना ओळखता आली पाहिजे. त्यातला हमदम शोधण्यापेक्षा त्यातले दु:ख समजून घेता आले पाहिजे. पुरोगामी उदारमतवादाने पिचलेला मराठा असह्य झालेले थोतांड व दांभिकपणा झिडकारून मैदानाता आला आहे. माणुस म्हणून सन्मानाने सुखवस्तु जगण्याचा जन्मदत्त हक्क ही त्याची अपेक्षा, म्हणूनच मागणी आहे. त्याला कुठल्याही प्रगतीशील औदार्याचे बिरूद वा खोटी प्रतिष्ठा नको आहे. तो कोणाच्या विरोधात नाही, पण कोणाच्या दबावाखालीही खितपत पडून रहाण्याचा त्याचा संयमही संपला आहे. (संपुर्ण)

5 comments:

 1. इतिहास म्हणतो मराठ्यांशी लढुन तुम्ही कधीही हवे ते मिळवु शकत नाहीं परंतु फसवुन चिथवुन सहज मिळवु शकता हेच या राजनीतिक लोकांनी केले व यशस्वी झाले यामुळे झालेल्या कुचंबणेतुन समाज बाहेर यावा व प्रगतिकडे यशस्वी घौडदौड होइलच (अपूर्ण)

  ReplyDelete
 2. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 3. मौनात मोठा अर्थ वसे, ज्यास तो दिसे त्यास म्हणती पिसे.

  ReplyDelete
 4. भाऊ आपल्या मागील काही लेखातून आपण "जाणत्या" नेत्यांनी मतपेटीचे आणि फुले शाहू आंबेडकर असे राजकारण करत करत त्यांचाच शेतीत व गावगाड्यात रमलेला मराठा समाज कसा दुर्लक्षित ठेवला आणि आणि तो बुडती शेती आणि कर्जबाजारी पणा यापायी कसा बहुसंखेने मराठा समाज नडला गेला आणि त्याचा आक्रोश आता बाहेर पडतो आहे असे सर्वसाधारण प्रतिपादन करून या समाजातील धुरिणांना त्या साठी जबाबदार ठरविले आहे.

  पण भाऊ यासाठी आमचा हा संख्येने प्रचंड असणारा तुलनेने बहुबल आणि राजकीय बाल असणारा मराठासमाज स्वत:च - त्यांचे तथाकथित जाणते नेते नव्हे - जबाबदार आहे असे आपल्याला वाटत नाही का.
  यासाठी तुम्ही ब्राह्मण समाजाशी तुलना करा. हा समाज १९४८ नंतर खेडोपाड्यातून देशोधडीला लागला. शेती कूळ कायद्यात गेली. माझे अनेक मित्रांचे वडील काका आजोबा अक्षरश: वार लावून कसे जेवलो उपाशी अर्धपोटी राहत देखील कसे शिकलो मिळेल त्या नोक-या करत गेलो हे मला सांगितले आहे. असे असून हा समाज ना कधी रस्त्यावर येत ना बोंबा ठोकत. बर यांना जातीचा म्हणून मोठा नेता पण नाही. त्यांच्यात देखील पेसेवले मधले गरीब असे स्तर आहेतच.

  त्यामुळे मराठा समाजाच्या दुर्गतीला मराठसमाज आणि मुख्यत त्याचा सतत इतिहासात रमत बसायचा दुर्गुण,खोटा मोठेपणा मिरवायची हौस, आणि अक्कल गहाण टाकून पुढा-यामागे मेंढरागत धावायची वृत्ती कारणीभूत आहे.

  ReplyDelete
 5. भाऊ सगळ्याच समाजाच्या रोजगारासाठी एक योजना सुरूकरायचा प्रयत्न करत आहे याचे यश लोकप्रतिनीधींच्या मदतीवर अवलंबून आहे योजना सुरूकरताना भाऊ आपल्या शुभेच्छा व मार्गदर्शन गरजेचे आहे (संपूर्ण)

  ReplyDelete