Tuesday, September 6, 2016

कबरस्थानातून फ़ोडलेला टाहो

Image result for syed salahuddin

हफ़ीज सईद किंवा अझर मसूदच्या आधीपासून जिहादी हिंसाचाराचा बाजार मांडणार्‍या इसमाला सय्यद सलाहुद्दीन म्हणून ओळखले जाते. तोयबा किंवा जैशे महंमद या पाक हेरसंस्थेने जन्माला घातलेल्या जिहादी गटांच्या आधीपासून, हा सलाहुद्दीन काश्मिरात दहशतवाद माजवणारा इसम आहे. त्याची हिजबुल मुजाहिदीन संघटना खुप जुनी आहे. पण अफ़गाण जिहादमुळे हिजबुल मागे पडत गेली. अफ़गाणिस्तानवर रशियाने कब्जा केल्यावर अमेरिकेने त्यात हस्तक्षेप करण्याचा पवित्रा घेतला. तेव्हा पाकसेना व हेरखात्याच्या पुढाकारानेच जिहादी घडवण्याचे काम सुरू झाले. त्यातून अमेरिकन पैसा व शस्त्रास्त्रे मिळत असल्याने, पाक राज्यकर्त्यांनीही काश्मिर विषय बाजूला ठेवून अफ़गाण जिहादला उद्योग म्हणून हाती घेतले. त्यातलेच काही हिंसाचारी व शस्त्रास्त्रे काश्मिरमध्ये वापरणे शक्य असल्याने, पाक सरकारकडून सलाहुद्दीनला मिळणारी दक्षिणा आटत गेली. उलट अफ़गाण जिहादमध्ये सहकार्य करणार्‍या हाफ़ीज सईद सारख्यांना हाताशी धरून, पाक हेरखात्याने तोयबासारख्या गटाला प्राधान्य दिले. सहाजिकच सलाहुद्दीनची किंमत घटली वा जिहादी बाजारात नवे स्पर्धक उदयास आले. त्यांच्याशी सलाहुद्दीनला स्पर्धा करणे भाग पडू लागले. अलिकडे त्याला या बाजारात कोणी विचारत नव्हता. आपला धंदा पुन्हा तेजीत यावा, म्हणून त्याची दिर्घकाळ धडपड चालू आहे. बुर्‍हान वाणी त्याच्या हत्येनंतर त्याला चालना मिळालेली आहे. म्हणूनच त्याचा फ़ायदा उठवून हा इसम पोकळ धमक्या देऊ लागला आहे. अलिकडेच त्याने भारतीय वर्तमानपत्राला फ़ोनवरून मुलाखत देताना काश्मिरला भारतीय सेनेची स्मशानभूमी बनवण्याची डरकाळी फ़ोडलेली आहे. असे शब्द वापरताना निदान त्याचे अर्थ तरी ठाऊक असावे लागतात. सलाहुद्दीनला ते ठाऊक नसावेत. अन्यथा त्याने स्मशानभूमी असा शब्द नक्कीच वापरला नसता.

स्मशानभूमी म्हणजे जिथे मृतांचे अंत्यसंस्कार पार पाडले जातात. जिथे जीवंत लोकांना स्थान नसते. किंवा मृतांची वस्ती असेही स्मशानाला म्हणत येईल. सलाहुद्दीन याला त्याची जाण आहे काय? असेल तर त्याच्याच उचापतींमुळे काश्मिरी, मुस्लिम व सामान्य नागरिकांसाठी काश्मिरी प्रदेश स्मशानभूमी होत असल्याचे त्याच्याच लक्षात आले असते. तिथे जितके भारतीय सैनिक मारले गेले, त्याच्या अनेकपटीने निरपराध काश्मिरी नागरिक व जिहादच्या नादी लागलेले सामान्य नागरिक मारले गेले आहेत. त्यातही जास्त मुस्लिमांचाच भरणा आहे. खेरीज जे मारले गेलेत, त्यांचा सलाहुद्दीनच्या जिहादशी काडीमात्र संबंध नाही. त्यातले अनेकजण त्याच्या हल्लेखोरांनी केलेल्या हिंसेलाच बळी पडल्याचे लक्षात येऊ शकेल. म्हणूनच असे शब्द जपून वापरायचे असतात. पृथ्वीतलावरचा स्वर्ग म्हणून काश्मिर जगात ओळखला जातो. त्याला नरक वा स्मशानभूमी बनवण्याची भाषा बोलणारा माणूस कोणत्या लायकीचा आहे, ते काश्मिरी मुस्लिमांनीही लक्षात घेण्याची गरज आहे. पण तो मुद्दा नाही. जे शब्द सलाहुद्दीन वापरतो आणि ज्या भूमीवरून वापरतो आहे, त्या भूमीचे काय? त्याला पाकिस्तानने आश्रय दिला आहे. म्हणूनच तो मनमानी करून वाटेल तशी बाष्कळ बडबड करीत असतो. पण अशा माणसांना आश्रय देऊन पाकिस्तानने काय साधले आहे? सलाहुद्दीन वा हाफ़ीज सईद अशा लोकांनी पाकिस्तानलाच एक स्मशानभूमी करून टाकलेले नाही काय? तीनचार दशकापर्यंत पाकिस्तानही भारतासारखा एक सामान्य नागरिकांचा सुरक्षित देश होता. पण जेव्हापासून पाकिस्तानने जिहादी प्रवृत्तीला आश्रय दिला तेव्हा त्यांच्या नापाक कर्तबगारीने पाकिस्तानची भूमी कबरस्तानात रुपांतरीत होत गेली आहे. सिंध, बलुचिस्तान, बाल्टीस्थान वा विविध भागामध्ये सतत मृत्यूचे थैमान चालू असून, सामुहिक कबरीत मृतांना ढकलावे लागत आहे.

बलुची वा अन्य प्रांत प्रदेशामध्ये ज्या अफ़ाट संख्येने मुस्लिमच नित्यनेमाने मारले जात आहेत. त्याला कुठलीही भारतीय सेना जबाबदार नाही. ते पाप पाकिस्तानी सेना व हेरखात्याने सोकावून ठेवलेले जिहादींचेच आहे. त्यांच्याच कर्तबगारीने पाकिस्तानचे एक एक शहर व जिल्हा स्मशानभूमीत रूपांतरीत होत आहे. तुलनेने भारतीय काश्मिरी प्रदेशातील मृतांची संख्या किरकोळ आहे. कारण स्मशानभूमी करणार्‍यांना भारत सरकारने स्थान वा आश्रय दिलेला नाही, की पोसलेले नाही. उलट त्यांना संपवण्यासाठी लाखोच्या संख्येने भारतीय सेना काश्मिरात अखंड डोळ्यात तेल घालून जागत असते. त्यांच्याच अशा दक्षतेमुळे बुर्‍हान वाणीसारखा स्मशानासूर वेळीच गाडला गेला आहे. त्याला ज्या भूमीत गाडले, त्याच भूमीला जग काश्मिर म्हणून ओळखते. सलाहुद्दीनच्या हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर असलेल्या बुर्‍हानची स्मशानभूमी काश्मिरच आहे. तेव्हा स्मशानाचा अर्थ सलाहुद्दीनने समजून घ्यावा. नुसत्या बुर्‍हानसाठी काश्मिर ही स्मशानभूमी झालेली नाही. त्याच्यासारख्या प्रवृत्तीसाठीही काश्मिर हीच स्मशानभूमी होऊन गेली आहे. सलाहुद्दीनचे जे बगलबच्चे आहेत किंवा हफ़ीज सईदचे चेले आहेत, त्यांनाही इथेच गाडले जाते आहे. आपल्या अशा बगलबच्च्यांना भारतीय हद्दीत ठार मारले गेल्यावर, त्यांचे मृतदेह घेण्याची हिंमतही अशा जिहादी म्होरक्यांना कधी दाखवता आलेली नाही. कारगिलचे युद्ध असो किंवा मुंबईला स्मशानभूमी बनवायाला आलेला अजमल कसाब असो, त्याचाही मृतदेह ताब्यात घ्यायला पाक सरकारची हिंमत झाली नाही. तर त्याच पाकचे पाळीव कुत्रे असलेल्या सलाहुद्दीनने किती गमजा कराव्यात? ज्यांनी आपल्या नापाक इराद्याने सुखवस्तु पाकिस्तानी प्रदेशालाच आजकाल स्मशानभूमी करून टाकले आहे, त्यांनी काश्मिरला भारतीय सेनेचे कबरस्थान बनवण्याच्या गोष्टी कराव्यात, हा विनोद नाही काय?

युद्धभूमी म्हणणे समजू शकते. काश्मिरात सलाहुद्दीन वा हफ़ीजच्या पठ्ठ्यांना संपवण्यासाठी भारतीय सेनेला सतत सज्ज रहावे लागते. पण स्मशानभूमीत मृताला अंतिम संस्कार देण्याचे काम होत असते. ते करायला असल्या कुणा जिहादी म्होरक्याने कधी पुढाकार घेतला आहे काय? कुत्र्याच्या मौतीने मारल्या गेलेल्या आपल्या अनुयायांना अखेरचे संस्कार देण्याची हिंमत ज्यांच्यात नाही, त्यांनी स्मशानाच्या गोष्टी करू नयेत, की लढायच्या गमजा करू नयेत. उचापती करून बिळात दडी मारून बसणार्‍यांना जग लढवय्ये म्हणून ओळखत नाही. लढवय्या मर्द मैदानात आमनेसामने येऊन उभा ठाकतो. बेसावध सैनिकावर मागून हल्ला करीत नाही. निरपराध सामान्य नि:शस्त्र नागरिकांना हकनाक ठार मारणार्‍याला, कोणी सैनिक म्हणत नाहीत. नामर्द अशीच त्यांची ओळख असते. ते काम पाकसेना बलुचिस्थानात करीत असते. सिंध बलुच वा अन्य प्रांतातील आपल्याच नागरिकांना छळून वा मारून त्यांच्या सामुहिक कबरी करण्याचा पराक्रम पाकसेना करते आहे. म्हणूनच तिथल्या लोकांनी आता मुक्तीसाठी भारताकडे आशेने बघायला आरंभ केला आहे. त्यातून जे काही होईल, ती पाकिस्तान नावाच्या संकल्पनेची स्मशानभूमी असेल. कारण असे राजकारण व हिंसा पाकिस्तानची कबर खोदते आहे. भारत सरकार त्याला प्रतिसाद देते आहे. कारण सलाहुद्दीन सारख्यांच्या उचापतींना रोखण्याचा तोच उत्तम मार्ग आहे. पण त्यातून अखेरीस पाकिस्तान नावाच्या देशाची कबर खोदली जाणार आहे. ही तोंडाची वाफ़ नाही. पुर्व पाकिस्तान नाहिसा होऊन चार दशके लोटली आहेत. जो पश्चीम पाकिस्तान उरला आहे, त्याची कबर सलाहुद्दीन व हफ़ीज खोदत आहेत. भारतीय सेनेला त्यावर फ़क्त माती पसरण्याचे काम करावे लागेल. कारण बलुच आदी जनतेच्या मनातला पाकिस्तान कधीच मेला आहे. थोडक्यात काश्मिरला भारतीय सेनेचे कबरस्थान बनवण्याची सलाहुद्दीनची डरकाळी ,म्हणजे मरणासन्न अर्धमेल्या श्वापदाने आपल्याच कबरीतून फ़ोडलेला टाहो नाही काय?

रोजनिशी (दै, जनशक्ति)

3 comments:

  1. बलुचिसतान स्वातंत्र्य लवकर व्हावा.

    ReplyDelete
  2. सलाहुद्दीन बरोबर आहे भाऊ काश्मिरला स्वातंत्र्या नंतर किती हांडगे भारतीय सेनेने मारले असतील त्यांना काश्मिरातच पुरले आहे यामुळे काश्मिरचे स्मशान झाले आहे फक्त तो भारतीय सेना हे शब्द वापरताना चुकला आहे.सेक्युलरांच्या मते दहशतवादाला धर्म नसतो यामुळे या हांडग्याना मारल्यावर जाळायला हवे यामुळे काश्

    ReplyDelete
  3. काश्मीर स्मशान होण्या पासुन वाचेल

    ReplyDelete