Wednesday, September 28, 2016

झेंडा आणि अजेंडा

samana attacked के लिए चित्र परिणाम

   ‘कार्यकर्त्यांना चळवळीतून जोवर आर्थिक वा अन्य प्रकारचे लाभ होत नाहीत तोवरच त्या चळवळीचा आवेश टिकून रहातो. एकदा का अशाप्रकारचे लाभ मिळू लागले, की कार्यकर्ते त्या लाभाला चटावतात आणि चळवळीच्या मूळ उद्दीष्टांची त्यांना विस्मृती होते. भावी पिढ्य़ांकडून होणारा सन्मान आणि भविष्यात होणारी किर्ती हेच फ़क्त आपल्या कार्याचे बक्षीस, या भावनेने कार्यकर्ते जोवरच चळवळीसाठी खपतात, तोवरच चळवळीच्या कार्यावर त्यांचे लक्ष रहाते. प्राप्त परिस्थितीचा जास्तीत जास्त फ़ायदा उठवायचा ह्या हेतूने प्रेरीत झालेल्यांचा ओघ चळवळीकडे सुरू झाला, की चळवळीचे मूळ उद्दीष्ट बाजूला पडू लागले आहे, असा अंदाज करायला कोणतीच हरकत नाही.’ ( एडॉल्फ़ हिटलर, ‘माईन काम्फ़’ पुस्तकातून)

मराठा क्रांती मोर्चात जमा होणारी गर्दी बघून त्यात अनेक प्रवाह येऊन समाविष्ट होऊ लागले आहेत. वाढणारी गर्दी अधिक प्रोत्साहक असते. पण गर्दीला चेहरा नसतो. पण त्यात समाविष्ट होणार्‍यांना मात्र चेहरा असतो. म्हणूनच सहभागी होणारे कोण व त्यांचे अंतस्थ हेतू काय, याविषयी आयोजकांनी खुप सावधानता बाळगावी लागते. पण गर्दी बघून त्याचे भान रहातेच असे नाही. मग त्यात सहभागी होणारे आपापले हेतू साध्य करण्याच्या दिशेने हालचाली करू लागतात आणि चळवळ भरकटत जाऊ लागते. हे आजवर नेहमी होत आले आहे आणि म्हणूनच अनेक चळवळी खुप आशा निर्माण करणार्‍या ठरल्या, पण अखेरीस कुठल्या कुठे अस्तंगत होऊन गेल्या. अशा चळवळीची सुत्रे ज्यांच्या हाती असतात, त्यांच्या गाफ़ीलपणाने त्यांचा अस्त झाला, हेही एक वास्तव आहे. प्रत्येक बाबतीत जुने अनुभव खरे ठरतात असे अजिबात नाही. पण जुन्या अनुभवातील लक्षणे तशीच दिसू लागली, मग भवितव्याचे आडाखे बांधणे सोपे होत असते. आरंभी दुर्लक्षित असलेल्या मराठा क्रांती मोर्चा किंवा मूक मोर्चाला जसजसा प्रतिसाद वाढत गेला, तसतशी प्रसिद्धी वाढत गेली आणि त्यात विविध प्रवाह येऊन समाविष्ट होऊ लागले. त्यांना रोखण्याचे कारण नव्हते. पण त्यात आपापले अजेंडे व झेंडे घेऊन अशी घुसखोरी होणार नाही; याची काळजीही घेतली जात असली तर चिंता नाही. पण काही बाबतीत ती घेतली जात नसावी, अशी शंका येण्यासारख्या घटना घडत आहेत. व्यंगचित्राच्या निमीत्ताने ‘सामना’ दैनिकाच्या कार्यालयावरचा हल्ला त्याचे एक लक्षण आहे. जो मोर्चा अत्यंत शिश्तबद्ध आणि शांततेसाठीच लोकांच्या नजरेत भरलेला आहे, त्याचाच परिपाक म्हणून असा हल्ला झाला, असे दाखवले गेले आहे. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. कारण आजवरचे कौतुक शांतता व संयमाचे झालेले आहे. त्याला या कृत्याने गालबोट लागलेले आहे.

‘सामना’तील व्यंगचित्र गैरलागू आहे यात शंका नाही. पण तशा तर अनेक घटना गैरलागू असतात. पण कुठलाही अनुचित प्रकार आजवरच्या मोर्चात घडलेला नाही, हीच बाब मराठा क्रांती मोर्चासाठी कौतुकाची ठरली होती. स्फ़ोटक विषय व प्रश्न असूनही दाखवल्या गेलेल्या संयमानेच मराठ्यांचे सार्वत्रिक कौतुक झाले. त्याला अशा घटना पुरक नाहीत. पण अशा कृतीचा मोर्चा नेतृत्वाकडून तात्काळ निषेध झाला नाही, तर तोच कार्यक्रम होऊ शकतो. कारण त्याला मोर्चाची मान्यता मिळाल्यासारखे होईल. हा मोर्चाचा अजेंडा असता, तर यापुर्वीच्या प्रत्येक मोर्चानंतर जागोजागी हल्ले झाले असते आणि हिंसाही झाली असती. पण तसे एकदाही घडले नाही. याचा अर्थच हिंसा वा सूडबुद्धी हा मोर्चाचा अजेंडा नाही. पण त्यात सहभागी होत असलेल्या काही गटांचा अजेंडा वेगळा आहे. अन्यथा नव्या मुंबईत घडले, तसे काही घडले नसते. अशाच घटना यापुर्वीच्या अनेक मोर्चात व चळवळीत घडल्या आहेत. त्यांना त्यातून अफ़ाट प्रसिद्धीही मिळालेली आहे. पण मग तशा चळवळी टिकल्या किती, त्याकडेही बघावे लागेल. चळवळीची लोकप्रियता व पाठींबा महापुरासारखा असतो. त्यात अनेक प्रवाह येऊन मिसळत असतात. पण ते मूळ प्रवाहाशी एकरूप होणे अगत्याचे असते. तसे झाले नाही तर नुसताच लोंढा येतो आणि वाहून संपून जातो. साध्य काहीच होत नाही. कडेला उरलेला पालापाचोळा किंवा गाळ यापलिकडे काही हाती लागत नाही. मराठा मोर्चा हा असाच एक महापूर आहे. त्याला दिशा व मार्ग दिला तरच ती चळवळ कुठल्या तरी ध्येयपुर्तीच्या मार्गाला लागू शकेल. अन्यथा ती सुडाच्या मार्गानेच वाटचाल करू लागली, तर काहीही साध्य करू शकणार नाही. ते साध्यही महत्वाचे आहे. उफ़ाळून आलेला उत्साह त्यातून मावळला जाऊ शकतो. ही बाब खरी चिंताजनक आहे. म्हणून अजेंडा व झेंडा यांही गल्लत होता कामा नये.

मराठ्यांच्या अशा शक्तीप्रदर्शाने अनेक लोक व गट अस्वस्थ झालेले आहेत. जितके ते मराठा समाजाबाहेरचे आहेत, तितकेच असे गट मराठा समाजाच्या आतलेही आहेत. आजवर आपल्याला साधले नाही, ते या मोर्चाला कसे साध्य होते आहे, याचेही दुखणे असू शकते. त्यामुळेच त्या गर्दीचे नेतृत्व खेचुन घेण्याच्या हेतूनेही काही लोक त्यात घुसखोरी करू शकतात. आरक्षण वा अनेक विषयावर आजपर्यंत अनेक मराठा संघटनांनी आपल्या परीने प्रयास केलेले आहेत. पण त्यांना कितीही प्रक्षोभक भूमिका घेऊन इतका अपुर्व पाठींबा मिळू शकलेला नाही. कारण त्यांचा अजेंडा सामान्य मराठ्यांनाही मान्य नव्हता. असे गटही या गर्दीत आपले हेतू घेऊन आलेले असू शकतात. गर्दीचा आडोसा घेऊन आपले हेतू साध्य करण्याचा त्यांचा मनसुबा यशस्वी होऊ शकतो. पण त्याचे भलेबुरे परिणाम शेवटी मोर्चाला भोगावे लागणार आहेत. ह्याचा आताच विचार व्हावा लागेल. लोकपाल आंदोलन वा भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीने चार वर्षापुर्वी देशातले वातावरण ढवळून काढलेले होते. त्याचे पुढे काय झाले? त्यात केजरीवाल आपल्या हेतूने सहभागी झाले होते. त्यांच्यासह त्यांच्या संघटनेने उरलेल्या विविध संघटनांना सोबत घेऊन एक वातावरण निर्मिती केली. परंतु पुढल्या काळात सर्व श्रेय आपल्याकडे घेऊन चळवळीचा बोजवारा उडाला. आज अन्य एकाहून एक भंपक पक्षाच्या पंगतीत जाऊन बसणारा पक्ष जनतेला मिळू शकला. त्याच आंदोलनाचे म्होरके अण्णा हजारे कुठल्या कुठे फ़ेकले गेले आहेत आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचे नावही कोणी घेत नाही. उलट त्याच केजरीवाल यांच्या सहकार्‍यांवर एकाहून एक गंभीर आरोप होत आहेत. चळवळ भरकटली तर काय होऊ शकते, त्याचा हा अलिकडला इतिहास आहे. मराठा क्रांती मोर्चा तसा भरकटत जाण्याचा धोका म्हणूनच आधी सांगणे भाग आहे. ताज्या घटना त्याचा संकेत देत आहेत.

कुणाला ताकद दाखवणे वा कुणावर सूड घेणे, असला अजेंडा असता तर मुळात त्याला मराठा समाजातही प्रतिसाद मिळाला नसता. कारण मराठा समाज मुळातच अत्यंत संयमी व सहिष्णू आहे. म्हणून त्याने राजकीय वा सामाजिक वितुष्टाच्या अनेक प्रयत्नांना कधी साथ दिलेली नव्हती. समाजातला बहुसंख्य म्हणूनच जबाबदार वृत्तीने या समाजाने नेहमी प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. जातीधिष्ठीत अनेक कार्यक्रम वा संघटनांना मराठ्यांचा असा भव्य प्रतिसाद मिळू शकला नाही. पण क्रांती मोर्चा तशा कुठल्याही संकुचित उद्दीष्टांनी प्रेरीत नसल्याची जाणिवच त्यातले यश आहे. त्याला राजकीय वा सामाजिक हेतूचे वळण लागले, तर त्यातला आवेश वाढत जाईल आणि उदात्त हेतूलाच हरताळ फ़ासला जाऊ शकेल. जनता पक्ष असो, महाराष्ट्राचा लढा असो, लोकपाल आंदोलन असो; प्रत्येकवेळी याच प्रवृत्तीने त्याचा अस्त ओढवून आणला आहे. चळवळींना त्यात घुसलेल्यांच्या अजेंड्याने पराभूत केले आहे. चळवळीचा झेंडा मग बाजूला पडतो आणि त्यात घुसलेल्यांचा अजेंडा गर्दीवर स्वार होऊन फ़रफ़ट सुरू होते. अगदी मोदींना मिळालेल्या मोठ्या यशामध्येही अशाच अनेक गटांचा समावेश होता आणि त्यांना वेसण घालताना मोदींच्याही नाकी दम येत आहे. पण त्यांनी निदान त्यासाठी प्रयत्न चालविला आहे. मराठा मोर्चातली गर्दी बघून अनेकांना आपल्या हेतूसाठी त्यात शक्ती व साधने दिसत आहेत. त्यांना कितपत सामावुन घ्यायचे आणि त्यांच्यावर कसा लगाम कसायचा, याचा विचार वेळीच व्हावा. नाहीतर आणखी एक ऐतिहासिक चळवळ इतिहासजमा झाल्याचे महाराष्ट्राला बघावे लागेल. जे त्या गर्दीत आहेत आणि नेतृत्व करीत आहेत, त्यांनीच त्याचा विचार करावा. कारण इतिहास कोणाला माफ़ करीत नाही, की दुसरी संधी देत नाही.

1 comment:

  1. छान भाऊ दैनिक सामना मध्ये छापलेले व्यंग्य-चित्र ही चूक आहे परंतु त्यामध्ये "काही लोक"हे स्पष्ट लिहीले आहे पुर्वी "काही लोक"असे वागले आहेत यामुळे मराठा समाजच नाही तर महाराष्ट्राचे नभरून येणारे नुक्सान झाले आहे हा विषय ताणून परत एकदा मराठा समाजाला ncp,खांग्रेस च्या दावणीला बांधायचा प्रयत्न चालू आहे तेव्हा मराठा समाजाने सावध रहायला हवे तसेच गोंधळ घालुन यांच्या चाललेल्या चौकशा बंद करायचा प्रयत्न काही लोक करतायत

    ReplyDelete