Monday, September 19, 2016

अणूयुद्धाचा बागुलबुवा

indo pak nuclear के लिए चित्र परिणाम

हुंडाबळी कसा जातो? एखादा विवाहित मुलीला संरक्षण देणारे अनेक कायदे अस्तित्वात आहेत. पण तरीही अनेक मुलींचा अशा अत्याचाराने बळी जातच असतो. तसा बळी घेणारे असतात, त्यांना गुन्हेगार मानले जाते आणि शिक्षाही होत असते. गुन्हा सिद्ध झाल्यावर त्यांना शिक्षा होते. पण दरम्यान एका मुलीचा हकनाक बळी गेलेला असतो. त्याला खरे तर बळी घेणारे जबाबदार नसतात, इतके त्या मुलीला सावधानतेचा इशारा देऊन हतोत्साहीत करणारे गुन्हेगार असतात. पण त्यांना कधीच कुठली शिक्षा होत नाही, किंवा त्यांच्यावर गुन्हाही दाखल होत नाही. एकदा बळी पडला, मग हेच संभावित लोक उर बडवून त्या मुलीच्या न्यायासाठी आक्रोश करताना आपण बघतो. पण जेव्हा ही विवाहित मुलगी तक्रारी करत असते व अत्याचाराच्या छळवादाच्या कहाण्या सांगत असते, तेव्हा तिच्या मदतीला किती लोक उभे रहातात? उलट तिचेच माहेरचे वा अन्य सगेसोयरे तिला थोडी कळ काढ, सहन कर, संयम राख; असे सल्ले देऊन त्या अन्याय अत्याचाराच्या खाईत लोटून मोकळे होत असतात. अशा छळवादातून तिचा बळी जातो. हे दिसत असतानाही संयमाचे सल्ले देणारे म्हणूनच प्राथमिक गुन्हेगार असतात. कारण पुढल्या काळात बळी घेणार्‍यांसाठी पोषक स्थिती असेच लोक निर्माण करीत असतात. छळ करणार्‍यांची हिंमत तेच वाढवत असतात. कारण रोखण्याच्या काळात संयमाने अशा मारेकर्‍यांची हिंमत वाढत जात असते. आता उरी या काश्मिरातील सीमेलगतच्या जिहादी हल्ल्यानंतर निषेधाचे आक्रोश करणारे तिळभर वेगळे नाहीत. कारण त्यांनीच नेहमी जिहादी मनोवृत्तीसमोर संयमाचे सल्ले भारतीय जनता व सरकारला दिलेले आहेत. अगदी कालपरवापर्यंत पाकिस्तान वा फ़ुटीरवाद्यांशी वाटाघाटी करण्याचे सल्ले देणारे या हल्ल्याचे खरे आरोपी नाहीत काय?

गेल्या तीन दशकात पाकिस्तानने खलीस्तान वा काश्मिरचा विषय काढून भारतात जिहादी वा दहशतवादी घुसवण्याचा सपाटा लावला आहे. त्यातला पाकिस्तानचा हात लपून राहिलेला नाही. पण त्यासाठी पाकला धडा शिकवण्याचा विषय आला, की भारतातले पुरोगामी म्हणवणारे लोक युद्धापासून सावधानतेचा व संयमाचा इशारा देत राहिले आहेत. १९९९ नंतर अणूस्फ़ोटात यश मिळवल्यानंतर पाकिस्तानने तेच एक हत्यार बनवले आहे. भारताशी युद्ध झाले तर पाकिस्तान अणुबॉम्ब वापरणार, असा बागुलबुवा सतत करण्यात आला. त्याचे भारतातले प्रायोजक असेच शांततावादी पुरोगामी राहिले आहेत. जिहादी हल्ल्यानंतर भारताने पाकला हात लावण्याचा प्रयास केला तर अणुयुद्ध भडकू शकते आणि ते भारताला परवडणारे नाही. हीच भाषा राहिली आहे ना? युद्धापेक्षा शांतता आणि त्यासाठी मैत्रीची बोलणी, असेच टुमणे लावले गेले आहे ना? पण तीन दशकात पाकिस्तानने अशा कुठल्याही प्रयासांना एकदा तरी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे काय? उलट जरा कुठे खुट्ट वाजले, मग पाकिस्तानी नेते अण्वस्त्रांच्या धमक्या देत असतात. गतवर्षी भारतीय कमांडोंनी म्यानमारमध्ये घुसून अतिरेक्यांना ठार मारल्यावर; सर्वप्रथम प्रतिक्रीया आली पाकिस्तानातून. असे काही पाकिस्तानात करायला जाल तर महागात पडेल, असा इशारा पाक सेनेने दिला होता. तशी भिती मुळात पाकला कशाला वाटावी? आजवर एकदाही भारतीय सेनेने पाक प्रदेशात घुसून कुठलीही कृती केलेली नाही. मग असा इशारा मुशर्रफ़ यांच्यापासून अन्य पाकनेते कशाला देत असतात? पाकची अण्वस्त्रे दिवाळीचे फ़टाके नाहीत, असे बोलण्याची गरज काय? तर त्यांनी तिथून तसे बोलायचे आणि मग इथे त्यांनीच पोसलेले हस्तक भारतीयांना अणूयुद्धाचा बागुलबुवा करून दाखवणार. हा एक नेहमीचा खेळ होऊन बसला होता. त्यात किती तथ्य आहे?

अणूयुद्ध हे इतके गंमतीने सुरू होऊ शकते काय? अमेरिका, चिन वा रशिया यांच्यापाशी कित्येक वर्षापासून अण्वस्त्रे आहेत आणि एकाहून एक भयंकर अस्त्रे आहेत. पण कितीही कसोटीचा प्रसंग ओढवला, तरी त्यापैकी कोणी अण्वस्त्रे वापरण्याची धमकी कुणाला दिलेली नाही. मग पाकिस्तान व त्याचे भारतातील हितचिंतक, अशी भाषा सातत्याने कशाला वापरत असतात? ही भाषा विवाहितेला हुंड्यासाठी होणार्‍या त्रासात सल्ला देणार्‍यांसारखीच नाही काय? लग्न तुटायला नको असेल, तर तिने निमूट छळ अत्याचार सहन करावा, इतकाच त्याचा अर्थ असतो. इथेही पाकप्रेमी भारतीय बुद्धीजिवी, समाजसेवी, शांततावादी वेगळे काहीही करीत नाहीत. पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करील, असे भय दाखवत असतात. पण खरेच अण्वस्त्रे वापरणे वा अणुहल्ला करणे इतके सोपे असते काय? पाकिस्तानने अशा धमक्या देण्याचा अर्थ तरी यांना ठाऊक आहे काय? अण्वस्त्र कोणीही कोणाच्याही विरोधात वापरले, तरी अवघे जग त्या युद्धात ओढले जाण्याचा कायम धोका आहे. म्हणूनच सात दशके उलटून गेल्यावर आणि अनेक प्रगत देशांनी ते तंत्रज्ञान अवगत केल्यावरही, कधी त्याचा वापर झाला नाही. मग पाकिस्तान तरी इतक्या सहजपणे त्याचा वापर कसा करू शकेल? ती निव्वळ पोकळ धमकी आहे. कारण पाकने त्याचा वापर केला, तर भारतालाही कोणी त्यापासून रोखू शकणार नाही. त्यातून होणारा विध्वंस विचारात घेतला, तर पाकिस्तानचे नामोनिशाण पुसले जाईल. पण भारताचा काही हिस्सा तरी शिल्लक राहिल. उलट पाकिस्तानची भूमी इतकी किरकोळ आहे, की भारताने त्याचा वापर केल्यास त्याचे दुष्परिणाम पाक इतकेच त्याचा मित्र पाठीराखा चिनलाही भोगावे लागतील. मैत्रीसाठी चिन इतकी किंमत मोजायला राजी आहे काय? नसेल तर चिनलाच पाक अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवणे भाग आहे. किंवा त्याच्या संमतीशिवाय पाक अशी अस्त्रे वापरण्याच्याही स्थितीत असू शकत नाही. म्हणजेच उठसुट अण्वस्त्र वापराची धमकी वा इशारे; हा निव्वळ बागुलबुवा आहे.

अर्थात याची भारतालाही कल्पना आहे. भारतीय शास्त्रज्ञ, सेनाधिकारी व संरक्षण जाणकार हे सत्य जाणून आहेत. पण अणुयुद्धाविषयी सामान्य जनतेमध्ये इतके भ्रम आहेत, की तिला भयभीत करायला असा बागुलबुवा पुरेसा असतो. त्या जनमानसाचा दबाव भारत सरकारवर निर्माण करता येतो. आणि त्याच कामासाठी भारतामध्ये अनेक बुद्धीजिवी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकारांना पाकिस्तानने हाताशी धरले आहे. त्यांच्याकडूनच नेहमी युद्धाला विरोध होत असतो आणि वाटाघाटींचा आग्रह धरला जातो. मात्र त्यामुळे दबून जाणारा नेता, आज पंतप्रधानपदी विरजमान झालेला नाही. म्हणूनच आता ही भाषा चालणार नाही. युद्धाने काश्मिर व पाकिस्तानचा विषय संपवणे भाग असेल, तर त्याचाही अवलंब करण्याची धमक असलेला नेता आज देशाचा कारभार हाकतो आहे. म्हणूनच उरीच्या हल्ल्यानंतर चोख उत्तराची भाषा कानी येते आहे. ते चोख उत्तर अनेक प्रकारचे असू शकते. त्यात थेट युद्धापासून घातपाती युद्धापर्यंत अनेक प्रकार समाविष्ट असतात. ते युद्ध भारताने पुकारण्याची गरज नाही. कारण पाकने अघोषित युद्ध पुकारलेले असून, त्यांचेच सैनिक अतिरेकी वा जिहादी मुखवटे लावून येत असतात. हिंसा करीत असतात. भारतीय सैनिकांनीही तशी मरणाची पर्वा करायचे सोडून सीमापार जायचे ठरवले, तर त्यांना कोण रोखू शकणार आहे? असे सैनिक आजी वा माजी असू शकतात आणि मरणाला झुगारणारे असू शकतात. त्यांचा सरकार वा सेनेशी संबंध नाकारण्याचे स्वातंत्र्य पाकप्रमाणेच भारतालाही असू शकते. देशासाठी हकनाक बळी होण्यापेक्षा पराक्रम करीत शत्रूवर चाल करून जाण्याची खुमखुमी असलेले, कमी भारतीय जवान नाहीत. त्यांना तशी मुभा व साधने मिळाली, तर गमजा करणार्‍या किती पाक सैनिकांना आपल्या छावणी वा सीमेवर उभे राहून लढायची हिंमत असेल? त्याची इतिहासच साक्ष देतो.

रोजनिशी  दै. जनशक्ति    

2 comments:

  1. भाऊ, एक छान लेख वाचायला मिळाला. यावर तुमचे विचार जाणून घ्यायला आवडेल. लिंक खाली देत आहे. http://kiranasis.blogspot.in/2016/09/if-india-has-to-hit-terror-factories-in.html?m=1

    ReplyDelete