Sunday, September 11, 2016

मराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)

Maratha morcha

सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात मराठा समाजाचे नाव घेऊन मोठमोठे मोर्चे निघत आहेत. त्याची माध्यमातून फ़ारशी दखल घेतली गेलेली नाही. गंमतीची गोष्ट अशी आहे, की असेच मोर्चे गुजरातमध्ये गतवर्षी हार्दिक पटेल या नवख्या तरूण नेत्याच्या नेतृत्वाखाली निघत होते, विराट सभांचे आयोजन चालू होते. तेव्हा त्याची माध्यमांनी मोठी दखल घेऊन मोदींचा गुजरातचा बालेकिल्ला ढासळत असल्याचे निष्कर्षही काढलेले होते. अगदी इथेही मराठी माध्यमातही हार्दिक पटेलची अतिरिक्त दखल घेतली गेली होती. तुलनेने आपल्याच मराठी प्रांतात तितकेच मोठे मोर्चे अकस्मात निघत असताना, मराठी माध्यमांनी बातम्या देण्यापलिकडे त्याबद्दल फ़ारसा उहापोह कशाला करू नये, हा प्रश्न आहे. वास्तविक ह्या मोर्चाचे नेतृत्व वा आयोजन कुठल्या प्रस्थापित संघटना वा पक्षाने योजलेले नाही. त्याचे नेतृत्व करताना कोणी प्रस्थापित मोठा नेताही दिसून येत नाही. त्याविषयी आरोप प्रत्यारोपही खुप झाले. छुपे समर्थक पाठीराखे म्हणूनही अनेक आरोप होत आहेत. पण त्याची मिमांसा करण्याचा प्रयत्न फ़ारसा होताना दिसत नाही. शरद पवार यांची स्ट्रॉंग मराठा अशी ओळख दिर्घकाळ आहे. त्यांनी ओझरता उल्लेख करून त्याविषयी अधिक बोलायचे टाळलेले आहे. पण या जमवाजमवीचा कुठलाच अंदाज येत नसल्याने, अनेक राजकीय विचारवंत, अभ्यासक वा प्रामुख्याने पुरोगामी गोटात मोठी खळबळ उडाली आहे. कारण मोर्चाचे निमीत्त नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या बलात्कार हत्येचे असले, तरी त्यात दोन मुख्य मागण्या डोके वर काढताना दिसत आहेत. पहिली मागणी अर्थातच मराठा आरक्षणाची आहे आणि दुसरी एट्रोसिटी कायदा रद्द करण्याची आहे. ह्या मागण्या त्या मोर्चे वा जमवाजमवीचा गाभा असावा असे दिसते. त्यामुळे आजवरच्या एका सिद्धांताला धक्का लागल्याने ही अजब अस्वस्थता आली आहे काय?

गेल्या दहाबारा वर्षात महाराष्ट्रात एक परवलीचा शब्द झाला होता. फ़ुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र! ही भाषा बोलणार तो आपोआप पुरोगामी ठरत होता. फ़ार नाही गेल्या वर्षी याच दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा सांगली येथे एक कार्यक्रम होता. तिथे त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा खुद्द शरद पवार यांनी देवेंद्र फ़डणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्र फ़ुले शाहू आंबेडकरांचा असल्याची आठवण करून दिलेली होती. तो हल्ला कशासाठी झाला, यापेक्षा त्यामध्ये आव्हाड काय बोलले वा कोणत्या विषयावर समारंभ होता, याला महत्व आहे. तेव्हा सरकारतर्फ़े दिला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहिर झाला होता. ते ब्राह्मण असल्याने त्यांना पुरस्कार देण्यावरून विरोधाचे सूर उमटले होते. त्याच विरोधासाठी सांगलीचा समारंभ योजलेला होता. त्यात आव्हाड यांनी पुरंदरे यांच्याविषयी अपमानास्पद शब्द उच्चारल्याने हाणामारीचा प्रसंग उदभवला होता. फ़ुले शाहू आंबेडकर ही नेमकी काय भूमिका आहे वा होती? तर ब्राहमणविरोधी काही मांडायचे असेल, तेव्हा ही शब्दावली वापरायची. त्याचा अर्थ असा, की ब्राह्मण सोडल्यावर बाकी तमाम उरतात ते बहुजन! अशा बहुजनांचे महात्मे म्हणून फ़ुले शाहू आंबेडकर असा प्रकार चालू होता. जणू आजवरचे दलितांवरील अत्याचार फ़क्त ब्राह्मणांनीच केलेत आणि तमाम मराठेही त्यापासून अलिप्त होते, अशी त्यामागची भूमिका होती. ती बर्‍याच अंशी लोकांच्या गळी उतरवली गेलेली होती. निदान माध्यमातून तसा देखावा तरी छान उभा राहिलेला होता. म्हणून ती वास्तविकता होती असे अजिबात नाही. तसे असते तर एट्रोसिटी कायद्यानुसार नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी व तपशील बघितल्यास त्यात बहुतांश मराठे वा अन्य जातींवरच गुन्हे दाखल झालेले दिसतील. पण त्यावर पडदा पाडण्यास फ़ुले शाहू आंबेडकर शब्दावली उपयुक्त ठरत होती.

याची दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे. ज्यांचा अशा मराठा राजकारणाशी वा राजकीय भूमिकेशी काडीमात्र संबंध नाही, त्यांनीही उत्साहात अशा शब्दावलीच्या वापरात स्वत:ला झोकून दिलेले होते. त्यात पुरोगामीत्व मिरवणार्‍यांचा भरणा होता. त्यांना मराठा किंवा फ़ुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी कुठलेही कर्तव्य नव्हते. त्यांना अशा शब्दावली व भूमिकेतून रा. स्व. संघ वा भाजप अशा हिंदूत्ववाद्यांची कोंडी करायला मदत मिळत होती. म्हणून पुरोगाम्यांनीही ही शब्दावली उचलून धरलेली होती. संघावर ब्राह्मणी शिक्का मारायला आणि म्हणूनच त्यांना बहुजन मानल्या जाणार्‍या अन्य जातीजमातींपासून तोडण्या्ला रणनिती म्हणून पुरोगामी लोकांनी फ़ुले शाहू आंबेडकर ही शब्दावली आनंदाने स्विकरली होती. मध्यंतरीच्या दोनतीन दशकात महाराष्ट्रातील डावे पुरोगामी म्हणवणारे पक्ष व संघटना पुरत्या लयास गेल्या. निवडणूकीसह मोर्चे निदर्शने काढण्याचीही शक्ती त्यांच्यात उरलेली नव्हती. सहाजिकच त्यांना फ़ुले शाहू आंबेडकर असा मुखवटा चढवून मराठा अस्मितेचे बळ वापरण्याची संधी यातून मिळत होती. त्यामुळेच बहूजन म्हणत पुरोगाम्यांनी ब्राह्मणविरोधी जातीय प्रचाराला या शब्दावलीला हातभार लावला. मराठा अस्मितेच्या आक्रमकतेवर स्वार होऊन आपले पुरोगामी संघविरोधी राजकारण यशस्वी करण्याचा तो डाव काहीसा यशस्वी होत आला होता. त्याला भले सामान्य जनता फ़सलेली नसेल, पण पवारांसारखे दिग्गज नेतेही त्यात फ़सलेले होते. मुद्दा इतकाच, की नेस्तनाबुत झालेल्या पुरोगामी डाव्या दिवाळखोर राजकारणाचा व्यापार मराठा राजनितीच्या गळ्यात बांधण्यात त्यामुळे यश आले. मात्र ते वास्तववादी मतदानाच्या राजकारणात पुर्णपणे वाहून गेले. लोक त्याला मोदीलाट म्हणतात. तिथून मग फ़ुले शाहू आंबेडकर शब्दावलीतली फ़सगत उघड होऊ लागली. आज जे मोर्चे निघत आहेत, त्यातून त्याच शब्दावलीला तडा गेलेला आहे.

म्हणूनच जे मोर्चे निघत आहेत, त्याला कोपर्डीची घटना निमीत्त आहे आणि मागण्या आरक्षण व एट्रोसिटी विषयाशी संबंधित आहेत. एट्रोसिटी कायद्याने खुप अन्याय केला किंवा अन्याय दुर केला, असे दोन्ही दावे फ़सवे आहेत. कुठल्याही कायद्याचा यथेच्छ गैरवापर होत असतो. तसा एट्रोसिटी कायद्याचा गैरलागू वापर झालेला असणार यात शंका नाही. त्यात अर्थातच गावागावातील प्रभावशाली वा अधिक संख्येने असलेले मराठेच भरडले जाणार, ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. पण तशा खेड्यापाड्यातल्या घटनांची दखल फ़ारशी कोणी घेत नाही. म्हणूनच त्याविषयातला संताप दबलेला व धुसफ़ुसत राहिला. त्याला आता वाचा फ़ुटलेली आहे. दुसरी बाजू आरक्षणाची! आरक्षणाची मागणी आज देशातली प्रत्येक जात व जमात करते आहे. कारण आरक्षणाने ज्या संधी सवर्ण म्हणून नाकारल्या जातात, त्यातही लोकसंख्येतील मोठा घटक असलेल्यांना अधिक चटका बसणार. महाराष्ट्रात ३५ टक्के मराठा समाज असेल, तर संधी गमावलेल्या सवर्णांमध्ये त्यांचाच भरणा अधिक असणार. ही आजची वस्तुस्थिती आहे. ती गेल्या दोनतीन दशकातील गोष्ट आहे. त्यावर बहूजन म्हणून पांघरूण घातले गेले, तरी विविध कारणाने समाजातील हा मोठा सवर्ण घटकच गेली अनेक वर्षे कोंडीत सापडलेला आहे. ज्याला मराठा किंवा कुणबी म्हणून ओळखले जाते, त्यांचाच भरणा त्यात जास्त असल्याने वैचारीक अपरिहार्यतेपोटी पवारांसारख्या मराठा नेत्यांनीही ते दुखणे बोलायची हिंमत केलेली नव्हती. म्हणून ती पोटदुखी संपते असे नाही. उलट जितके दुखणे दाबून ठेवले जाते, तितके अधिक उफ़ाळून उसळून बाहेर येते. आजचे मराठा मोर्चे म्हणून उथळ खुलासे देऊन थांबणार नाहीत किंवा वैचारिक प्रतिवाद करून आटोक्यात येणार नाहीत. विषय जातीचा दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो जातीपलिकडे आहेर-नाहीरे यांच्यातला संघर्ष आहे. त्याची सखोल मिमांसा आवश्यक आहे. (अपुर्ण)

3 comments:

  1. बरोबर भाऊ हे राजकारणी सगळ्याच समाजाची माथी भडकवुन स्वतःच्या तुमड्याभरून घेत आलेत व फक्त मराठा समाजच नाही सगळेच समाज यांच्याकडुन भरडले गेलेत एक फटकारा बसताच फसवे राजकारणी सत्ताभ्रष्ट झालेत सामान्य जनतेला विकास हवा आहे मानाने २ वेळची भाकर मिळावी अशी अपेक्षा आहे शेताची नासाडी ससे व पाखरे करतात यांना मारण्यासाठी बंदूक परवाना मागितला तर बुजगावण्याची परवानगी मिळते म्हणून ही तोफेची मागणी आहे.(अपुर्ण)

    ReplyDelete
  2. भाऊ सांगलीत हा जीतू फक्त बाबासाहेब पुरंदरें बद्दल बोलला न्हवता तर सगळेच शिवभक्त ज्यांना गुरू मानतात (मोदींसह उद्धव ठाकरे व महाराष्ट्रातील जवळ जवळ सगळेच खांग्रेस नेतेही)अशा आदरणीय "गुरूजी संभाजीराव भिडे "यांच्या बद्दल बरेवाईट बोलला होता याचे नशिब म्हणून ...

    ReplyDelete
  3. I suspect is this confrontation to politician that you welcome and divide us on Cast.

    I am not sure who is sponsoring these events and I am sure it is not coming from common man, Is it Money laundying case ?

    Yogesh

    ReplyDelete