Saturday, September 3, 2016

आपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का?


aap sexscadle के लिए चित्र परिणाम
आपला गुलछबू नवरा आपल्यावर किती प्रेम करतो, याचे कौतूक त्याची पत्नी तिच्या मैत्रिणींना सातत्याने सांगायची. मजा अशी, की त्या मैत्रिणी तिच्या पतीप्रेमाला विरोध करीत नसत किंवा त्याबद्दल तिच्यासमोर कधी शंका घेत नसत. पण तिची पाठ वळली वा तिचे लक्ष नसेल; तेव्हा एकमेकींशी फ़िदीफ़िदी हसून त्या तिच्या पतीप्रेमाची टवाळी मात्र हमखास करीत असत. किंबहूना ती पतिव्रता त्यांच्यात नसली; मग तिच्या नवर्‍याची लफ़डी, हाच त्या मैत्रिणींचा कुजबुजण्य़ाचा मुख्य विषय असायचा. काही प्रमाणात हे तिच्याही कानी आलेले होते. पण मैत्रिणींना तिने कधी त्याबद्दल छेडले नव्हते. मग एके दिवशी या पतिव्रतेनेच मंडळातल्या दुसर्‍या मैत्रिणीच्या नवर्‍याला कुणासोबत बघितले आणि त्याची वाच्यता केली; त्यावरून खडाजंगी उडाली. त्यामुळे मग हिच्या निष्ठावान नवर्‍याचा विषय खुलेआम आखाड्यात आला. तेव्हा आपल्या नवर्‍याचे प्रताप ऐकून तिचे डोके भणभणले. पण तिचा आपल्या पतीदेवावर अढळ विश्वास व निष्ठा होती. तिने चक्क मैत्रिणींचा नाद सोडला. ती त्यांच्या मंडळात जायची बंद झाली. याला म्हणतात पातिव्रत्य. यालाच म्हणतात बांधिलकी. सगळे जग एका बाजूला आणि आपण त्या बांधिलकीसाठी दुसर्‍या बाजूला.
एकेदिवशी तिचा नवरा ऑफ़िसमधून लौकर घरी आला आणि तब्येत थोडी बरी नाही म्हणून आलो, असे त्याने सांगितले. ही पतिव्रता शॉपिंगला निघालेली. पतीने तिला निश्चिंत मनाने जायला सांगितले व अधिक तिच्याकडे आपले क्रेडीट कार्ड दिले. मस्त शॉपिंग करून यायला सांगितले. त्याला थकवा असल्याने भरपूर विश्रांतीची गरज होती. नवर्‍याच्या आग्रही व प्रोत्साहक वागण्याने पतिव्रता सुखावली. दाखवायपुरते थांबू का, डोके दाबून देऊ का, असे प्रश्न विचारले तिने. पण पतीनेच निघायचा आग्रह केला, तशी पडत्या फ़ळाची आज्ञा घेऊन, ती लगबगीने घराबाहेर पडली.

पण आज बिचारीचे नशीब चांगले नव्हते. हातात क्रेडीट कार्ड असूनही, कुठे काही खरेदी करण्याजोगे तिला पसंतच पडत नव्हते. तासाभरात दोनतीन मॉल फ़िरून झाले. पण काहीच खरेदी जमली नाही. तेव्हा वैतागून नशीबाला दोष ती घरी परतली. मनात म्हणाली, कधी नाही ती पतिसेवा करू तेवढीच. बिचारा दिवसदिवस राबतो आपल्या चैनीसाठी. आज दुसरे काही काम नाही, तर पतिसेवेचे पुण्य पदरात पाडून घेऊ. मात्र याची तिच्या नवर्‍याला कल्पना नव्हती. शॉपिंग व क्रेडीट कार्ड असल्यावर लाडकी पत्नी तीनचार तास तरी माघारी येणार नाही, अशी त्याला खात्री होती. मात्र तो आंदाज फ़सला. अनपेक्षितरित्या पतिव्रता तासाभरातच घरी परतली; तर दोघांनाही थक्क व्हायची पाळी आली. पतिपत्नीचा आपापल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, अशी स्थिती होती. शयनगृहात त्या पतिव्रतेचे निष्ठावान पतिदेव भलत्याच कुणा अप्सरेसोबत प्रणयक्रिडेत रममाण झालेले होते. पतिव्रतेची सगळी झिंग क्षणात उतरली. आजवर मैत्रिणी सांगत होत्या; त्याचा साक्षात पुरावा तिच्या घरात, तिच्या शयनगृहात व तिच्या समोर हजर होता. तिला काही सुचेना. रागाने बेभान झालेल्या पतिव्रतेला बोलताही येत नव्हते. शब्द सुचत नव्हते. तिच्या आजवरच्या समजुतीला धक्का बसला होता. तिच्या अवाक तोंडातून शब्दही फ़ुटत नव्हता. सहाजिकच होते. ज्या पतिप्रेमासाठी तिने आपल्या जुन्या जिवलग मैत्रिणींना झिडकारले होते, त्याने असा उद्योग करावा? आपल्या प्रेमाचे श्रद्धेचे काय? सगळा मुर्खपणा होता काय? मैत्रिणी कुजबुजत होत्या, त्यात तथ्य होते तर? शेकड्यांनी विचार तिच्या मनात फ़ेर धरून नाचू लागले. मात्र इतके होऊनही नवर्‍याला कसलीही फ़िकीर नव्हती. तो पतिदेव कसला बेरक्या. काही क्षणातच सावरला आणि आपल्या लाडक्या पत्नीला म्हणाला,

‘लाडके काय झाले? तू अशी विचलित का झाली आहेस? तुला थक्क व अस्वस्थ होण्याचे काही कारण नाही. मी तुझ्याशीच एकनिष्ठ आहे. तुला जे काही दिसते आहे व दिसले आहे; त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आपण बांधिलकी व नितीमुल्ये जपणारी माणसे आहोत ना? आपली नियत साफ़ आहे ना? मग जे दिसते त्याच्यावर विश्वास कसा ठेवून चालेल? तुझ्या पतीच्या शब्दावर विश्वास ठेव, तुझ्या पातिव्रत्यावर विश्वास ठेव. तुला फ़सवणार्‍या तुझ्या डोळ्य़ावर विश्वास ठेवून आजवर जपलेल्या निष्ठेची व बांधिलकीची नासाडी करणार आहेस का? निष्ठा, बांधिलकी आपल्याला कधी फ़सवत नाहीत. आपले डोळे फ़सवत असतात लाडके!’

ती पतिव्रता तशीच उठली आणि तडक महिला मंडळात आली. तिला अनेक दिवसांनी परतल्याचे पाहून सगळ्या मैत्रिणी एकदम गप्प झाल्या. तर त्या शांततेचा भंग करीत ही पतिव्रता म्हणाली. मला माझा पती निष्ठावान असल्याची आज अनुभवातून खात्री पटली. उगाच तुमच्यावर चिडून क्लब सोडला होता. आपल्या सगळ्यांचेच नवरे किती निष्ठावान व बांधिलकीचे आहेत ना? अकारण जगातले नालायक लोक काहीबाही अफ़वा पसरवत असतात, वावड्या उडवत असतात. आपण आपल्या समजुती व बांधिलकीला कधी सोडू नये. दुपारी माझ्या घरात आणि शयनगृहातच त्याची मला खात्री पटली. अनुभवाचे बोल सांगते मैत्रिणींनो. पातिव्रत्य खरे असते. आपली आपल्या नवर्‍याच्या निष्ठेवर अढळ श्रद्धा असायला हवी. त्या दिवशी रागावून निघून गेले त्याबद्दल माफ़ करा. सगळ्यांनी तिचे उभे राहून पुन्हा क्लबमध्ये स्वागत केले. आता तीही असल्या कुजबुजीमध्ये आडपददा न ठेवता सहभागी झाली. काही वेळाने कुजबुज संपली आणि उद्या वटसावित्रीच्या सणाला काय काय करायचे, त्याच्या नियोजनात मैत्रिणी रंगून गेल्या.

ही कुणाची गोष्ट आहे? वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे काय? बुधवारी रात्री दिल्लीत पावसाने नागरी जीवनाची उलथापालथ झालेली असताना वाहिन्यांवर आम आदमी पक्षाचे उपमुख्यमंत्री मनिष शिसोदिया काहीशी अशीच गोष्ट सांगत होते. त्यात पावसाचा उल्लेख नव्हता की तुंबलेल्या पाण्याने बेजार झालेल्या त्रस्त दिल्लीकर जनतेच्या दुर्दशेचाही विषय नव्हता. गोष्ट होती केजरीवाल यांच्या चारित्र्यसंपन्न राजकारणाच्या बांधिलकीची. त्यांच्या कुणा महिला कल्याणमंत्र्याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गवगवा झाला होता. तशा लैंगिक शोषणाचे पुरावेच कोणी चित्रित करून केजरीवालना पाठवले होते आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याला बडतर्फ़ केल्याची गर्जना शिसोदिया करीत होते. ते चित्रण म्हणे केजरीवाल यांच्यापाशी १५ दिवसांपासून होते आणि काहीही हालचाल झालेली नव्हती. पण काल दिवसभरात कोणीतरी तेच चित्रण नायब राज्यपाल व माध्यमांकडे सुपुर्द केले आणि केजरीवाल धडाक्याने कामाला लागले. त्यांनी विनाविलंब मंत्र्याला बदतर्फ़ केले, तशी घोषणाच ट्वीटरवरून करून टाकली आणि पुढली गाथा सांगायला शिसोदियांना पुढे केलेले होते. आम आदमी पक्षाची उमेदवारी कसून छाननी केलेल्यांनाच मिळते. त्यांच्या सर्व गोष्टी बघून तपासूनच तिकीट दिले जाते, अशी ग्वाही केजरीवाल सतत देत होते. मग असे भामटे भुरटे व गुन्हेगार लोक आमदार होऊन मंत्रीपदापर्यंत पोहोचले कसे? ते पोहोचल्याचे आपल्य डोळ्यांनाही दिसते आहे. त्यांनी केलेले गुन्हेही आपल्या डोळ्यांना दिसत आहेत. त्यांच्यावर शंका असतानाही त्यांना उमेदवारी व सत्तापदे दिलेली दिसत आहेत. मात्र तरीही केजरीवाल व त्यांचा आम आदमी पक्ष अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा आहे आणि तिथे भ्रष्टाचारला किंचितही स्थान असू शकत नाही, असा दावा आहे. आपण कशावर विश्वास ठेवायचा? केजरीवाल मंडळीवर की आपल्या डोळ्यावर?

1 comment: