Thursday, September 15, 2016

राजघराण्यातली ‘समाजवादी’ यादवी


raj narain mulayam yadav के लिए चित्र परिणाम
आजच्या पिढीला कदाचित राजनारायण माहिती नसतील आणि अनेक अनुभवी पत्रकारही या उत्तरप्रदेशी राजकीय नेत्याला विसरून गेले आहेत. जिथे समाजवादी नाव घेणार्‍या पक्षाला त्यांचे स्मरण उरलेले नाही, तिथे बाकीच्यांची काय कथा? पण राजनारायण यांनाच गुरू मानणारे अनेकजण आज विविध समाजवादी गटांचे म्होरके राजकारणात नामवंत म्हणून ओळखले जातात. त्यात बिहारचे लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आहेत, तसेच उत्तरप्रदेशातील मुलायमसिंग यादव यांचाही त्यात समावेश होतो. राजनारायण यांची आज आठवण होण्याचे कारण राजकारणात आलेला घराणेशाही हा शब्दप्रयोग! १९७० च्या दशकात राजनारायण कमालीचे फ़ॉर्मात होते आणि उत्तर भारतातील समाजवादी विचारांचे नेतृत्व त्यांच्याकडेच होते. इंदिरा गांधी व कॉग्रेस यांना संपवण्याची भूमिका घेऊन राजकारण खेळलेला व त्यासाठी अनेक राजकीय कसरती करणारा नेता, अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आपला समाजवादी पक्ष वा गट, त्यासाठी चरणसिंग यांच्या भारतीय क्रांती दलात विसर्जित करून, भारतील लोकदल नावाचा पक्ष स्थापन केला. त्याचाच वारसा आज लालू-मुलायम चालवित असतात. कॉग्रेसमुक्त भारत ही नरेंद्र मोदींची घोषणा नवी असली, तरी त्याची मूळ संकल्पना राजनारायण यांचीच! म्हणूनच त्यांनी १९७१ साली इंदिरा गांधी यांच्या विरोधात रायबरेलीतून निवडणूक लढवली होती आणि १९७७ सालात तिथूनच इंदिराजींना पराभूतही केलेले होते. पण त्यांचा खरा रोख कॉग्रेसच्या घराणेशाहीवर होता. इंदिराजी ह्या नेहरूंच्या वारस म्हणून आणि पुढे संजय गांधी मातेचा वारसा घेऊन राजकारणात आले, त्याला राजनारायण यांनी घराणेशाही असे नाव दिले होते. आज त्यांच्याच वैचारिक वारसांना त्याच आजाराची लागण झाली असल्याने या दिवंगत समाजवादी नेत्याचे स्मरण झाले.

संजय गांधी राजकारणात आले, तेव्हा कॉग्रेसचे निवडणूक चिन्ह गायवासरू असे होते. संजय गांधी अमेठीतून लोकसभेला उभे राहिले, तेव्हा राजनारायण यांनी गायबछडा अशीही शेलकी भाषा वापरली होती. पण त्यांचीच पुण्याई सांगत मागल्या दोनतीन दशकात उत्तरभारतीय राजकारणात पुढे आलेले लालू व मुलायम यांनी समाजवादी विचारसरणीलाच घराण्याची मालमत्ता करून टाकले. त्यापैकी लालूंच्या घराण्य़ात अजून तरी बेबनाव पुढे आलेला नाही. पण मुलायमच्या घराण्यात बेबंदशाही माजलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशात भाजपाने ७१ आणि त्याच्या मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या. उरलेल्या सात जागात पाच समाजवादी व दोन कॉग्रेसच्या खात्यात गेल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे अमित शहा म्हणाले होते, उत्तरप्रदेशात अन्य कुठला पक्ष शिल्लक उरलेला नाही. त्याकडे पत्रकारांनी प्रश्नार्थक नजरेने बघितले तेव्हा शहा उत्तरले, अन्य दोन पक्षांना सात जागा मिळाल्या आहेत. पण ते नावापुरते पक्ष आहेत, त्या सात जागा दोन घराण्यात वाटल्या गेल्या आहेत. त्याचे कारणही स्पष्ट होते. सोनिया व राहुल असे दोनच कॉग्रेस उमेदवार निवडून आले आणि समाजवादी पक्षाचे पाच जिंकले ते सर्वच्या सर्व मुलायमच्या कुटुंबातले आप्तस्वकीय होते. म्हणजे भाजपा सोडल्यास अन्य कुठल्या ‘पक्षाला’ जागा मिळाल्या नाहीत, तर दोन घराण्याचे सदस्य त्यात यशस्वी होऊ शकले. त्यापैकी कॉग्रेसकडे देशाची सत्ता होती, तर समाजवादी पक्षाकडे उत्तरप्रदेशची सत्ता होती. ते मुलायमच्या कुटुंबाचेच राज्य आहे. प्रत्येक सत्ताकेंद्र वा सत्तापद हे मुलायमच्या कुटुंबातच राखून ठेवलेले आहे. आता त्याच सत्तेला घराण्यातल्या यादवीने घरघर लागली आहे. कारण घरातली भांडणे राजकीय चव्हाट्यावर आलेली असून, त्यातून मार्ग काढताना मुलायमची तारांबळ उडालेली आहे.

मागल्या खेपेस मायावतींना पराभूत करून उत्तरप्रदेश विधानसभेत बहूमत मिळवल्यानंतर मुलायमनी धाडसी निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपदी त्यांनी आपला लाडका मुलगा अखिलेश यादव याला स्थानापन्न केले. पण स्पर्धेत मुलगा एकटाच नव्हता. त्याच्याही आधीपासून मुलायमचे दोन सख्खे भाऊ राजकारणात येऊन थोरल्याला हातभार लावत होते. त्यांच्यातही आधीपासून स्पर्धा चालूच होती. पुतण्या मुख्यमंत्रीपदी बसला आणि त्यात तिसरा स्पर्धक आला. त्यात राज्यसभेत पक्षाचे नेतृत्व रामगोपाल यादव यांच्याकडे होते, तर धाकट्या भावाला पुतण्याच्या हाताखाली ज्येष्ठमंत्री म्हणून रुजू व्हावे लागले. पण वडील आपण आहो्त हे दाखवण्याची संधी शिवपाल काकांनी एकदाही सोडली नाही. त्या भांडणात दिल्लीचे काका रामगोपाल पुतण्याच्या बाजूने उभे राहिले आणि घरातल्या भांडणाला जोर चढत गेला. काही महिन्यांपुर्वी निवडणूकीची जुळवाजुळव म्हणून शिवपाल काकांनी परस्पर कौमी एकदा दल पक्षाचे समाजवादी पक्षात विसर्जन करून आणण्याचा प्रयास केला. पण त्यामुळे खवळलेल्या मुख्यमंत्री पुतण्याने नाराजी उघड व्यक्त केली आणि त्याच्याच पित्याला ते विसर्जन निकालात काढावे लागले होते. तिथून काका पुतण्याचे भांडण अधिक उघड व स्पष्टपणे समोर येऊ लागले. जसजशी निवडणूक जवळ येत चालली आहे, तसे हे भांडण विकोपास चालले आहे. पुत्राचा आक्षेप असतानाही मुलायमनी नव्याने अमरसिंग यांना पक्षात आणले आणि खासदारकीही बहाल केली. आता शिवपाल यादव यांच्या निकटवर्ति दोन मंत्र्यांसह दोन अधिकार्‍यांना डच्चू देऊन अखिलेशने कोण बॉस आहे, त्याची साक्ष दिली. ही पित्यासाठीही धक्कादायक बाब होती. कारण अखिलेशने परस्पर शिवपाल काकांची तीन मोठी खातीही हिसकावून घेतली. मग तात्काळ सारवासारव करण्यासाठी मुलायमनी राज्यातील पक्षाध्यक्षपद अखिलेशकडून काढून घेत, तिथे शिवपालची नेमणूक करून टाकली आहे.

थोडक्यात आता घरातली यादवी चव्हाट्यावर आलेली आहे. ज्या पद्धतीने शिवपाल यांची खाती काढून घेतली व त्यांच्या निकटवर्तियांना बाहेरचा दरवाजा दाखवला गेला, त्याला मुलायमची मान्यता नव्हती. हे सहज लक्षात येऊ शकते. म्हणजेच मुलगा पित्याला दाद देईनासा झाला, असाच त्याचा अर्थ होतो. पण निवडणूका समोर उभ्या असताना पिताही तडकाफ़डकी पुत्राला मुख्यमंत्री पदावरून हुसकावून लावू शकणार नाही. हेच लक्षात घेऊन अखिलेशने पित्यासमोर पेच उभा केला आहे. शिवपाल यांनीही तक्रार करण्यापेक्षा ‘मुख्यमंत्र्यांचे विशेषाधिकार’ असल्याचे गोलमाल उत्तर दिले आहे. पण आगामी निवडणूका संपल्यावर पक्षाचे संसदीय मंडळच भावी मुख्यमंत्री ठरविल असे जाहिरपणे सांगत, अखिलेश पक्षाचा भावी मुख्यमंत्री नाही, असा इशाराही देऊन टाकला आहे. त्याचा सोपा अर्थ इतकाच होतो, की मुलायमच्या कुटुंबातील आपसातली भांडणे आता विकोपाला गेलेली असून, त्यामागे समाजवादी पक्ष फ़रफ़टत चालला आहे. पण त्याबद्दल पक्षातला कोणी ज्येष्ठ नेता कुणाला जाब विचारू शकत नाही, की मध्यस्थीही करू शकत नाही. कारण नाव समाजवादी पक्ष असले तरी त्याचा समाजवादी किंवा डॉ. लोहियांच्या विचारसरणीशी काडीचा संबंध उरलेला नाही. ती ठरल्या दिवशी वा तिथीला पुजायची दैवते आहेत. बाकी त्यांचे देव्हारे माजवून आपली मनमानी करायाला लालू वा मुलायम मोकळे आहेत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाईल त्याला पक्षात स्थान नाही. घराणेशाही हा परवलीचा शब्द झाला आहे. आज राजनारायण हयात असते, तर त्यांना आपल्या वारसांनी कोणत्या थराला राजकारण नेऊन ठेवले त्याच्या किती वेदना झाल्या असत्या? पण ज्या समाजवादी लोकांना लोहिया वा राजनारायण आठवतही नाहीत, त्यांना अशा पुर्वजांच्या भावनांशी काय कर्तव्य असेल ना?

1 comment:

  1. छान भाऊ मस्तच निरीक्षण

    ReplyDelete