Thursday, September 15, 2016

पळवाटा शोधण्याचा इतिहास

मराठा मोर्च्याची कारणमिमांसा  (३)

dalit panther leaders के लिए चित्र परिणाम

पॅन्थरचे संस्थापक नेते अविनाश महातेकर आणि ज. वि. पवार

स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही वगैरे आली, तरी सामान्यपणे गावगाडा होता तसाच चालू राहिला. दरम्यान कुळकायदा, आरक्षण, सार्वत्रिक शिक्षण यांची सुरूवात झाली होती. त्याचे परिणाम दिसायला खुप कालावधी लागत असतो. किमान एकदोन पिढ्यांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नवे कायदे व त्यांचा सामाजिक प्रभाव दिसायला वीसतीस वर्षे जावी लागतात. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर लगेच आरक्षणाचा निर्णय झाला असला, तरी त्याचा लाभ उठवणारे मागास जातीजमातीचे प्रमाण कमी होते. ज्या जातीजमाती आधीपासून कमीअधिक प्रमाणात सुखवस्तु होत्या, त्यांच्यावरही बदलत्या काळाचे परिणाम व्हायला लागले होते. पुर्वी पांढरपेशा व्यवसाय उच्चभ्रू वा स्पष्ट शब्दात ब्राह्मणांची मक्तेदारी होती. तिथे त्यांच्या खालोखाल सुशिक्षित सुखवस्तु असलेल्या जातींनी स्पर्धा निर्माण केली. उच्चवर्णिय म्हणून त्यात मराठा वर्ग पुढे होता. खालोखाल इतर मागास जातींचाही चंचुप्रवेश झालेला होता. उलट तुलनेने चिमुटभर लोकसंख्या असलेल्या ब्राह्मण जातीला या स्पर्धेत स्थानही उरले नाही. ग्रामिण भागातून हा सर्वोच्च वर्ग शहरी भागात सरकला आणि पुढल्या काळात परदेशीही संपन्न आयुष्यासाठी स्थलांतर करीत गेला. सहाजिकच महाराष्ट्रात ब्राह्मण ही बाब नगण्य झालेली होती. पण त्यांचे उच्चभ्रूपण मिळवण्यात पुढे असलेल्या मराठा जातीने आधी राजकीय आघाडीवर त्यात मुसंडी मारली. नंतरच्या काळात विविध व्यावसायिक व नोकरी पेशासह सत्तेवर कब्जा मिळवला. सहकार वा अन्य मार्गाने त्यांच्या पुर्वापार ग्रामिण सत्तेवर शिक्कामोर्तब होत गेले. सहाजिकच महाराष्ट्रात ग्रामिण भागातले जातीचे संघर्ष वा भेदभाव होते, त्यातून ब्राह्मण ही बाब अस्तंगत होत गेली. तो बेबनाव प्रामुख्याने मराठा व अन्य लहानसहान मागास जातींत चालू झाला होता. त्यावर पांघरूण घातले गेले ही वस्तुस्थिती आहे.

उदाहरणार्थ दलित पॅन्थरचा उदय तपासून बघता येईल. दलित पॅन्थर ह्या संघटनेचा बोलबाला बावडा येथील धुमशानामुळे झाला. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार व मंत्री शंकरराव बाजीराव पाटील यांच्याच बावडा या गावात दलितांवर दिर्घकाळ बहिष्कार घातला गेला होता. अशा घटना राज्यात अनेक गावात व जिल्ह्यात घडत होत्या. ही घटना १९७० च्या दशकातली. मुंबई-पुणे शहरातल्या प्रक्षुब्ध दलित तरूणांमुळे ती घटना घडली. त्या दलित बहिष्काराला मोडून काढण्यात कॉग्रेसचे सरकार अपेशी ठरले होते. कारण बहिष्कार घालणारे शहाजी बाजीराव पाटील हे खुद्द मंत्र्याचे सख्खे बंधूच होते. त्याच मंत्रीमंडळात असलेले दादासाहेब रुपवते यांनाही तिथे भेट दिली असताना, टपरीवाल्याने दलित म्हणून चहा देण्यासही नाकारले होते. हा संघर्ष मोडून काढण्यासाठी पॅन्थरच्या तरूणांनी केला तो आततायीपणा असेलही. पण त्याचे कारण काय व कोण होते? या घटनेने पॅन्थरला बळ मिळाले. त्या निमीत्ताने मरगळलेली रिपब्लिकन चळवळ डोके वर काढू शकली. पण ती चळवळ मरगळलीच कशाला होती? बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाच्या एकेक नेत्याला सत्तापदाचे गाजर दाखवून कॉग्रेसमध्ये आणले गेले आणि दलित चळवळ अस्तंगत होत गेली. मात्र नेत्यांना सत्तापदे मिळाल्याने समाजातील दलितांना न्याय वा सन्मान मिळू लागलेला नव्हता. त्याच्याच विरोधात जो आवाज दुमदुमला, त्याला आज दलित पॅन्थरची चळवळ म्हणून ओळखले जाते. पण त्या दलित अन्यायाचे कारण कोण होता? कॉग्रेसच्या मार्गाने सत्ता मिळवलेले गावागावातील मराठा नेतेच होते. मात्र त्याबद्दल कोणी खुलेआम बोलायला राजी नव्हते. त्या सत्यावर पांघरूण घालण्यातच धन्यता मानली गेली. पण त्यातूनच मग एट्रोसिटीसारखे कायदे आणावे लागले. त्याची अंमलबजावणी किती व कशी झाली, हा वेगळा विषय आहे.

इथे शहाजी पाटिल यांच्याकडे मराठा म्हणून बोट दाखवणे सोपे आहे. पण त्या एका व्यक्तीकडे जातीयवादी म्हणून बोट दाखवून विषय निकालात निघत नसतो. किंवा मिमांसा पुर्ण होत नसते. हा माणूस वा तसे काही मुठभर सत्ताधारी मराठे तसे कशाला वागले असतील, त्याचाही शोध घेतला पाहिजे. त्यांना रोखण्यात तेव्हाचे कॉग्रेस नेतृत्व तोकडे कशाला पडले, त्याचाही मागोवा घेण्याची गरज आहे. ते काम कधीच झाले नाही. त्यापेक्षा दलित अत्याचाराला पायबंद घालण्याचा सोपा मार्ग म्हणून एट्रोसिटी सारखा प्रतिबंधक कायदा आणून, ते काम पोलिस यंत्रणेवर सोपवले गेले. ही यंत्रणा समाजप्रबोधन करू शकत नाही की समाज परिवर्तन घडवून आणु शकत नाही, याचे भान कोणीही ठेवले नाही. सवाल एका व्यक्तीला त्याच्या अशा वर्तनासाठी दंडित करण्याचा नव्हता आणि नाही. त्यामागची मानसिकता बदलण्याचा विषय होता. पण त्या सत्याकडे पाठ फ़िरवली गेली. अशा कायद्यामुळे व त्याचा अतिरेकी वापर करणार्‍या उथळ समाजसेवी संघटनांमुळे दलितांमध्ये एक वेगळीच शक्ती आल्यासारखे चित्र तयार झाले. त्याचा पुढला परिणाम मग तशाच एका घटनेमध्ये दिसून आला. जनता लाटेने राजकारणाला वेगळी कलाटणी दिली होती आणि त्याच लाटेवर स्वार झालेल्या शरद पवार यांनी अल्पवयात मुख्यमंत्री होण्यापर्यंत मजल मारली. तेव्हा त्यांच्याभोवती समाजवादी नेत्यांचा गोतावळा होता. त्यामुळेच आपली क्रांतीकारी प्रतिमा उभी करण्याच्या नादात पवारांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करण्याचा निर्णय घेऊन टाकला. कुठलाही राजकीय पक्ष त्याला उघडपणे विरोध करण्याची शक्यता नव्हती. म्हणून तो प्रस्ताव विधानमंडळात संमत झाला. पण त्याची अंमलबजावणी करताना तारांबळ उडाली. कारण ज्यांनी प्रस्ताव संमत केला त्यांनाही आपल्या मराठवाड्यातील अनुयायांच्या गळी तो निर्णय उतरवता आला नाही.

१९७० दशकाच्या शेवटी जो नामांतराचा प्रस्ताव पवारांनी मंजूर करून घेतला होता. ते नामांतर दोन दशके होऊ शकले नाही. त्या विरोधाच्या मागे कोण उभे होते? कशाला इतक्या टोकाचा विरोध करीत तेव्हा त्या नामांतराचा प्रस्ताव दंगली पेटवून हाणून पाडला गेला? त्यामागची मानसिकता कुठली होती? दलितांना सरकारी ब्राह्मण संबोधणारी मनोवृत्ती कुठून निपजली होती? की आधीपासून होती आणि अशा निर्णयामुळे डिवचली गेली होती? कधी कोणी त्याची योग्य कारणमिमांसा केली आहे काय? त्यातून काही सत्य शोधण्याचा प्रयास केला आहे काय? अशी मानसिकता असेल, तर त्याचा निषेध करण्यावर निभावले गेले. पण त्या मानसिकतेचा निचरा करण्याचा प्रयास कधीच झाला नाही. नामांतराच्या निर्णयानंतर मराठवाड्यात किती एट्रोसिटीचे गुन्हे नोंदवले गेलेत, त्याचा तरी अभ्यास कोणी केला आहे का? उलट असे विषय आले, मग आजही शिवसेनेवर किंवा संघावर त्याचे खापर फ़ोडणारे दिडशहाणे विश्लेषक शेकड्यांनी मिळतील. त्यातून सत्यावर पांघरूण घातले जरूर गेले, खरे चेहरे लपवले जरूर गेले. पण ती मानसिकता तशीच आतल्याआत धुसफ़ुसत धुमसत राहिली. ही लबाडीच आजच्या उद्रेकाचे खरे कारण आहे. कुठल्याही राग, प्रक्षोभाला दडपून संपवता येत नाही. मग तो दलितांचा असो, मुस्लिमांचा असो किंवा विविध जातीजमातीतला असो. त्याचे निराकरण हाच एकमेव उपाय असतो. पण त्यालाच नकार देऊन जी दडपेगिरी होत राहिली, त्याला आज धुमारे फ़ुटताना दिसत आहेत. समाजप्रबोधन व समाज परिवर्तनाच्या उतावळ्या उपायांनी, विविध जाती व समाजघटकातील बेबनाव, संशयाचे जळमट संपण्यापेक्षा अधिक गडद होत गेले. त्यांच्यातले अंतर्विरोध अधिक गुंतागुंतीचे होत गेले. तेव्हा हिंदुत्ववादावर दोषारोप करण्याची नवी पळवाट शोधण्यात आली. पण सत्याला सामोरे जाण्याची कोणी हिंमत केली नाही. (अपुर्ण)

3 comments:

  1. भाऊ ..sociology,political science ,international relations ह्यासगळ्याचं अद्ययावत शिक्षण तुमच्या लेखांमधून मिळत राहतं ....आम्ही महाराष्ट्रातले तरुण नशीबवान आहेत की तुमच्यासारखा परखडपणे लिहिणारा पत्रकार आमच्या पिढीला तुमच्या blogs मधून भेटत असतो ..नाहीतर ' pressitutes' च्या बाजारू पत्रकारीतेच्या युगात सत्य कोण सांगणार ??

    ReplyDelete