Friday, September 9, 2016

खोटे ठामपणे बोलावे

ashutosh kejriwal के लिए चित्र परिणाम

खोटे ठामपणे बोलले, मग अधिक खरे ठरते असे म्हणतात. बहुधा पुरोगामीत्वाचा बोलबाला त्यामुळेच मध्यंतरीच्या काळात अधिक झाला असावा. अन्यथा राहुल गांधी यांना सुप्रिम कोर्टात थप्पड खाऊन माघारी भिवंडीच्या कनिष्ठ कोर्टात हजर होण्याचे मान्य करावेच लागले नसते. मागल्या बाराचौदा वर्षात जो म्हणून कोणी पुरोगामी मुखवटे लावून जगत व बोलत होता, त्याला प्रत्येक कसोटीवर खोटे पडावे लागले आहे. पण खोटे बोलण्याची हौस वा व्यसन सुटायची चिन्हे नाहीत. किंबहूना त्यामुळेच खोटे बोलणे व आणखी तावातावाने खोटे बोलणे, हे पुरोगामीत्वाचे व्यवच्छेदक लक्षण होत चालले आहे. याची जितकी उदाहरणे द्यावीत तितकी थोडीच आहेत. गुरूवारी सकाळी आपल्या अशाच पुरोगामीत्वाची साक्ष द्यायला आम आदमी पक्षाचा छचोर नेता आशुतोष राष्ट्रीय महिला आयोगासमोर दाखल झाला होता. दिल्लीचा माजी मंत्री सुदीप कुमार याची लैंगिक शोषणाची भानगड चव्हाट्यावर आली आणि तमाम शुद्ध चारित्र्याचे आपने्ते बिळात जाऊन बसले होते. पण खोटेपणाच्या व्यसनातून मुक्त होऊ शकलेला नसल्याने, आशुतोष याने ब्लॉग लिहून त्या लैंगिक शोषणाचे समर्थन केले होते. दोन प्रौढ व्यक्तींमध्ये सहमतीने लैंगिक शरीरसंबंध झाले असतील, तर त्यात गुन्हा कुठला? असा सवाल करताना आशुतोषने गांधीजी, वाजपेयी, नेहरू इत्यादी राष्ट्रीय नेत्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्यासही मागेपुढे पाहिले नाही. मात्र लौकरच त्याचे पाप उघडे पडले. कारण सुदीपच्या त्या भानगडीतली महिला पोलिस ठाण्यात पोहोचली आणि तिने बलात्काराचा आरोप दाखल केला. त्यानंतर आपली चुक मान्य करणे सभ्य ठरले असते. पण पुरोगामीत्व चुक मान्य करीत नाही, की खोटे बोलल्याबद्दल क्षमा मागत नाही. त्याचा बचाव करताना आणखी धडधडीत खोटे बोलण्याचा विक्रम केला जातो. आशुतोषने त्याचीच साक्ष दिली.

आपला बचाव करताना आशुतोषने प्रथम राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा भाजपाच्या असल्याने राजकीय सूडबुद्धीचा आरोप करून टाकला. त्याचा उपयोग झाला नाही, तेव्हा जुन्याच खोट्याचा आधार घेणे अपरिहार्य झाले. आयोगाच्या पायर्‍या झिजवून परतलेल्या आशुतोषने मग आपण आयोगालाच कसे पेचात पकडले, त्याची शेखी मिरवली. त्याने सांगितले की मोदी व अमित शहांच्याही भानगडीचा तपास करण्याची आपली मागणी आयोगाने मान्य केलेली आहे. ही मोदी-शहांची भानगड कुठली? तर गुलेल व कोब्रा पोस्ट नावाच्या दोन वेबसाईटनी लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने एक ध्वनीमुद्रीत संवाद प्रसारीत केला होता. त्यात गुजरातच्या दोन पोलिस अधिकार्‍यांचा संवाद होता. तो संवाद एका मुलीवर पाळत ठेवण्याशी संबंधित होता. यातल्या आरोपानुसार त्या मुलीचे कुणाशी प्रेमसंबंध होते आणि ती कुणाला भेटते वा कुठे जाते, यावर पाळत ठेवण्याचे काम पोलिसांवर गृहमंत्र्यानेच सोपवलेले होते. त्यात काली दाढी व सफ़ेद दाढी असे उल्लेख आहेत. त्याचा अर्थ सफ़ेद दाढी म्हणजे मोदी व काली दाढी म्हणजे अमित शहा, असा खुलासा बातमीत केलेला होता. गृहमंत्री शहांनी या अधिकार्‍यांना मोदींसाठी ही पाळत त्या मुलीवर ठेवायला भाग पाडले, अशी ती भानगड म्हणून पेश करण्यात आलेली होती. त्याचा तेव्हा स्नुपगेट म्हणून खुप गाजावाजा करण्यात आला होता. तेव्हाच्या कॉग्रेसी महिला आयोग अध्यक्षानेही त्याची दखल घेतली होती आणि हे प्रकरण थेट सुप्रिम कोर्टातही गाजलेले होते. मात्र तो आरोप आपल्या प्रतिज्ञापत्रातून काढून टाकला नाही, तर सगळी याचिकाच फ़ेटाळून लावावी लागेल, असे कोर्टानेच बजावले होते. कारण त्यात तथ्य नव्हते. इतके स्पष्ट झालेले असताना गुरूवारी आपल्या बचावासाठी आशुतोष पुन्हा कोर्टातल्या त्याच प्रतिज्ञापत्राचा हवाला देत होता. ह्याला रेटून वा ठामपणे खोटे बोलणे म्हणतात.

गुजरातच्या एका सनदी अधिकार्‍याला सरकारने बडतर्फ़ केलेले होते. असे अनेक अधिकारी तेव्हा मोदीविरोधी मोहिमेत आपापली पापे झाकण्यासाठी सहभागी झाले होते. संजीव भट हा असाच खोटारडा. त्यानेच दंगलीला मोदींनी संरक्षण दिल्याची आवई उठवली आणि त्यावरून बारा वर्षे पुरोगामी खोटारडेपणा चालू राहिला. अखेरीस सुप्रिम कोर्टानेच त्याचा दावा खोटा ठरवला. म्हणून त्याही खोटारड्याच्या खोटेपणाचे हवाले देणारे पुरोगामी शांत कुठे बसले आहेत? आता लोकही यांच्या खोटेपणाला विटून गेले आहेत आणि त्यांच्याकडे बघेनासे झाले आहेत. पण ‘लागी नही छूटे रामा’ म्हणतात, तसा अखंड खोटारडेपणा सुरूच असतो. आशुतोष तर त्यातला मुरलेला गडी आहे. अन्यथा त्याने स्नुपगेटचा उल्लेख आता कशाला केला असता? ज्या गुलेल वा कोब्रा पोस्ट वेबसाईटचा हवाला आशुतोष देतो, त्यांची विश्वासार्हता किती? तर आशिष खेतान नावाचा माणूस त्यांचा संचालक! ज्याने स्नुपगेट ही भानगड चव्हाट्यावर आणल्याचा दावा केला. तो आज आम आदमी पक्षाचा नेता म्हणजे आशुतोषचा साथीदार! म्हणजे एकाने खोटे बोलायचे, अफ़वा पसरवून द्यायची. मग इतरांनी त्याचीच कुजबुज बाजारात करायची आणि मग बाजारात ‘लोक’ असे बोलत असल्याची बातमी रंगवून सांगत रहायची. ही अशा खोटारडेपणाची मोडस ऑपरेन्डी झालेली आहे. त्यामुळे मुळातच बिनबुडाच्या गोष्टी लोकांच्या माथी मारल्या जात असतात. एकाने दुसर्‍या खोटारड्याची साक्ष काढायची, अशी त्यांची शैली झालेली आहे. आपल्या एका सहकार्‍याने सत्तेत बसून महिलेचे शोषण केले, ते मुख्यमंत्र्यानेही मान्य केले असताना, आशुतोष कोणाचा कशासाठी बचाव करीत होता? त्यानंतर पंजाबातील त्याच्याची तसल्याच पापाचे पि्तळ उघडे होण्याच्या भयाने त्याला पछाडलेले आहे काय? कारण त्याच्यावर पंजाबच्या आपनेत्याने असाच आरोप केलेला आहे.

धोपटून काढणे इतकीच अशा लोकांची लायकी असते आणि ते वेळीच ओळखणारा द्र्ष्टा पुरूष म्हणून आपल्या बसपाचे संस्थापक कांशीराम यांचे स्मरण करावे लागेल. जेव्हा वाहिन्यांचा इतका महापूर आलेला नव्हता आणि देशात मोजक्याच वृत्तवाहिन्या होत्या, तेव्हा कांशीराम यांनी अशा लोकांनी लायकी ओळखली होती. १९९८ सालात बहुधा आजतक वाहिनीसाठी कांशीराम यांना काही प्रश्न विचारणार्‍या आशुतोषला तिथल्या तिथे त्या नेत्याने सणसणित थप्पड मारली होती. किंबहूना आशुतोष नावाच्या पत्रकाराची सर्वप्रथम जगाला त्याच कारणास्तव ओळख झाली. ज्यांना शब्द व सभ्यता कळत नाही, त्यांना जोड्याने मारणेच योग्य असते. कारण शहाण्याला शब्दाचा मार, असे आपल्या पुर्वजांनी म्हणून ठेवलेले आहे. ज्यांना ती भाषा समजत नाही, त्यांना खेटराचीच भाषा कळत असते. सातत्याने तेच तेच खोटे बोलणार्‍याला रोखून धरण्याचा अन्य मार्ग नसतो. कांशीराम यांनी ते खुप पुर्वी ओळखले होते. दिल्लीत पत्रकाराला राष्ट्रीय नेत्याने जाहिरपणे थप्पड मारण्याचा अन्य कुठला प्रसंग नसावा. पण त्यातून आशुतोषची लायकी कळते. अशा लोकांना पुरोगामी ठरवण्यातून वा सोबत घेण्यातूनच सेक्युलर वा प्रगितीशील राजकारणाचा बोर्‍या वाजला आहे. पुरोगामी हा शब्द बदनाम होऊन गेला आहे. त्या समाजाभिमुख चळवळीचा बोजवारा उडाला आहे. त्यांना सुधारणे शक्य नव्हतेच. पण त्यांच्या सहवासात राहून क्रमाक्रमाने आता पुरोगामी बनण्यासाठी सार्वत्रिक खोटारडेपणाचा अवलंब होत गेला आहे. सहाजिकच जनामानसातील पुरोगामी व्यक्ती व संघटनांची विश्वासार्हता पुरती रसातळाला गेलेली आहे. त्याला केजरीवाल म्हणतात, तशी एक गंदी मछली कारणीभूत असते. अशा घाणेरड्या खोटारड्यांनी संपुर्ण पुरोगामी चळवळीचा उकिरडा करून टाकला आहे. लोकांना आता नाक मुठीत धरून यांच्यापासून दुर पळण्याची वेळ त्यामुळेच आली आहे.

3 comments:

  1. Rajkarnat zadu gheun safaila Aaleli hi mandali jevadi ghan karat aahe tevadhi 60 Varshat koni keli nahi mulat he khare purogami sudha nahit he sandhisadhu patrakar,ngo .celebrity aahet Mulat hi chandal chaukadi aahet yanchyamule aata news chanel pahane sudha nakose vatate delhit ghan kelyanantar aata hi mandali panjab madhe ghan karayla nighalet aahe lokani aata yana rajkarnatun hadd par karayla pahije

    ReplyDelete
  2. सार्वजनिक जिवनात वावरताना काही विधिनिषेध ,नितिमता पाळाव्या लागतात. सामान्यापेक्षा तुम्ही काही वेगळे असता.तुम्हाला मोठे पद हवे ,पैसा हवा आणि अशी घाणेरङी कामे करताना सापडले की आम्ही देखील 'माणसेच' अशी भलामन करणार.पण ऐक लक्षात ठेवा सामान्य जनता हि पाप भिरु आहे ,ती सुध्दा ऐवढ्या खालच्या स्तरावर जात नाहि आणि आपण केलेल्या पापाचे समर्थन करण्यासाठी कोणा थोरा-मोठ्याचे दाखले देत नाहि,गांधी -आटल विचारात आप ला ऐवढेच 'विचार धन'सापडले का ? गाईचे शेण दिसते पण दूध दिसत नाहि. पाश्चिमात्य देश मोकळ्या विचार सरणीचे आहेत परंतु तेथे नेता चारित्र्य वाणच लागतो , त्याच्या कडून काहि शिकायचे असेल तर हे शिका.

    ReplyDelete