Thursday, September 1, 2016

माफ़िया टोळीचा सरदार


दिल्लीच्या महिला बालकल्याण मंत्र्याला तडकाफ़डकी बडतर्फ़ करण्याची हिंमत दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री केजरीवाल यांचे ‘खास’ अभिनंदनच करायला हवे. कारण असे झटपट निर्णय अन्य कुठला नेता, पक्ष वा मुख्यमंत्री सहसा करीत नाही. त्याचे कारणही आहे. असे पक्ष वा नेते कधी आपल्या पक्षाचे उमेदवार ठरवताना इतकी कसून छाननीही करीत नसतात. त्यामुळे कोणी आमदार, खासदार वा मंत्री नंतरच्या काळात बेताल वा गुन्हेगारी वृत्तीचा निघाला, तर त्यांचा विश्वासच बसत नसतो. आपल्या पक्षात असा नालायक भामटा गुन्हेगार आहे, याची माहिती कुठलेच पक्ष आधीपासून घेत नाहीत. कारण हे सर्व प्रस्थापित राजकीय पक्ष मुळातच भ्रष्ट व गैरलागू झाले आहेत. त्यांना लोकलज्जेची वा पारदर्शकतेची कधी गरजच वाटत नाही. त्यासाठीच २०१३ साली देशात एका नव्या प्रेषिताने अवतार घेतला होता. त्याचे नाव अरविंद केजरीवाल! त्यांनी भारताचे राजकारण साफ़ स्वच्छ करण्यासाठी नव्या पक्षाची स्थापना केली आणि त्याचे निर्णय घेताना प्रत्येक पावलावर सामान्य जनतेची पुर्वसंमती घेण्याचे वचन दिलेले होते. शिवाय ज्यांना पक्षातर्फ़े उमेदवारी दिली जाईल, त्यांच्या चारित्र्याची व पुर्वायुष्याचीही काळजीपुर्वक छाननी करणार असल्याचे ओरडून सांगितले होते. त्यासाठी पक्षांतर्गत लोकपाल व्यवस्था आणलेली होती. इतक्या अग्निदिव्यातून कुठल्याही बदमाश भामट्याला पक्षाची उमेदवारी मिळूच शकणार नाही, अशी पक्की व्यवस्था केलेली होती. मग आता दिड वर्षात त्यांना आपल्याच पक्षात मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या या भामट्यांना बडतर्फ़ करण्याची वेळ कशाला आलेली आहे? त्याचा अर्थ त्यांनी उमेदवारी देताना भामटेगिरी केलेली आहे किंवा आपल्या पक्षाविषयी सामान्य जनतेची साफ़ दिशाभूल केलेली आहे. काहीही असले तरी यात सदरहू मंत्र्यापेक्षा केजरीवाल व त्यांचा पक्षच प्रमुख गुन्हेगार ठरत नाही काय?

अन्य पक्षात इतक्या तडकाफ़डकी कारवाई होत नाही. आम आदमी पक्षाने पुरावा मिळाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटात मंत्र्याची हाकालपट्टी केली, असे सांगून केजरीवाल यांच्या उपमुख्यमंत्र्याने आपलीच पाठ थोपटून घेतली आहे. पण मुद्दा इतकाच, की अशी घोषणा करून आपलीच पाठ थोपटून घेण्यासाठी केजरीवाल स्वत:च पत्रकार व माध्यमांच्या समोर कशाला आलेले नाहीत? शिसोदियांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देता कशाला पळ काढला? सवाल मंत्र्याला बडतर्फ़ करण्याचा नाहीच. अन्य पक्षातही अंगाशी येऊ लागले मग मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेलेला आहे. कोळसाखाण प्रकरणातील सीबीआयचे प्रतिज्ञापत्र अगोदर बघण्यावरून सुप्रिम कोर्टाने ताशेरे झाडले, तेव्हा कायदामंत्री अश्विनीकुमार यांना मनमोहन सिंग यांनी बाहेरचा रस्ता दाखवलाच होता. रेल्वेच्या टेंडर भानगाडीत भाचा फ़सल्याचे उघडकीस आले, तेव्हा त्या खात्याचे मंत्री पवनकुमार यांचा राजिनामा सिंग यांनीही घेतला होता. कालपरवा महाराष्ट्रात महसुली विभागातल्या प्रकरणाचा गवगवा झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनीही ज्येष्ठ असलेल्या एकनाथराव खडसे यांचा राजिनामा घेतलेला होताच. मग केजरीवाल यांनी असे काय मोठे केले? दोनतीन दिवस आणि अर्धा तास, यात कसला फ़रक असतो? महत्व वेळेला नाही तर गुन्ह्याला आहे. तुलनेने अन्यपक्षीय मंत्री वा नेत्यांचे गुन्हे किरकोळ आहेत. केजरीवाल यांच्या प्रत्येक मंत्र्यांचे गुन्हे अतिशय गंभीर व फ़ौजदारी संहितेच्या व्याख्येत येणारे आहेत. म्हणजेच ज्याला अट्टल गुन्हेगार म्हणता येतील, अशा स्वरूपाने गुन्हे करणारे मंत्री नेते अन्य पक्षात नाहीत, इतके आम आदमी पक्षात ठासून भरलेले आहेत. ही बाब लक्षणिय आहे. कारण थेट अटकेपर्यंत मामला जावा, इतक्या टोकाचे भयंकर गुन्हे करणार्‍यांना अरविंद केजरीवाल उमेदवारी देतात आणि मंत्रीपदाने सन्मानित करतात, ही बाब लक्षणिय आहे.

कायद्याची परिक्षा दिल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन वकीलीची सनद मिळवणारा माणुस, केजरीवालांच्या आशीर्वादाने कायदेमंत्रीपदी पोहोचतो. बिल्डरकडून खंडणी मागणारा नेता अन्नपुरवठा मंत्री होतो. आणि आता महिला कल्याणमंत्री म्हणून केजरीवाल यांनी जबाबदारी सोपवलेला माणूस, थेट महिलांचे लैंगिक शोषण करतो. अशी माणसे यांनी कुठून शोधून आणली आणि त्यांची कसली छाननी करून त्यांना पक्षाची उमेदवारी दिलेली होती? केजरीवाल यांचेच आरंभीचे निकतवर्ति असलेले प्रशांत भूषण व योगेंद्र यादव, अशा नेत्यांनी त्या उमेदवारीवर तेव्हाच प्रश्नचिन्ह लावलेले होते. म्हणजे हे लोक संशयास्पद चारित्र्याचे आहेत, असा आक्षेप उमेदवारी देण्यापुर्वीच घेतला गेलेला होता. पण पक्षाची बांधिलकी म्हणून त्यांना तेव्हा गप्प करण्यात आले. मग पुढे अशाच गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना मंत्रीपदे दिल्यावर केजरीवाल यांनी या दोघा प्रामानिक नेत्यांना खड्यासारखे पक्षातून बाहेर काढले. तिथेच केजरीवाल आणि टोळीची नियत साफ़ झालेली होती. त्यांना चारित्र्यसंपन्न व पारदर्शकता यांचा आग्रह धरणारे पक्षात नकोच होते. म्हणून भूषण व यादव यांना जवळपास धक्के मारून पक्षातून हाकलले गेले होते. मात्र त्यांनी ज्यांच्याकडे आरोपी म्हणून बोट दाखवले होते, शंका व्यक्त केल्या होत्या; त्यांचा आम आदमी पक्षात सन्मान केला जात होता. त्यांना अधिकाराच्या जबाबदार्‍या सोपवल्या जात होत्या. कारण त्यांच्याविषयी शंका व संशय असला, तरी पुरावे नव्हते. कुणी भक्कम पुरावे समोर आणलेले नव्हते. थोडक्यात ही माणसे नि:संशय निष्कलंक नक्कीच नव्हती, तरीही केजरीवाल व त्यांच्या टोळीने त्याना पक्षात आणले व ठेवले होते. त्यांना सन्मानित करणारे निर्णय घेतले होते. म्हणजेच शंका असलेले गुन्हे करण्याची सुवर्णसंधी या तिघाही मंत्री गुन्हेगारांना खुद्द केजरीवाल यांनीच बहाल केलेली होती. मग खरा गुन्हेगार कोण आहे?

एखादा माणूस शंकास्पद असेल तर त्याच्या हाती जबाबदारी सोपवणारा अधिक गुन्हेगार नाही काय? कुंटणखान्याचा दलाल वा मालकिणीच्या हाती जाणिवपुर्वक आपल्या मुलीची जबाबदारी सोपवणारा निर्दोष असू शकतो काय? ज्या मंत्र्यांना बडतर्फ़ करावे लागले आहे. त्यांच्याविषयी तिकीट देण्यापासून संशय असताना, त्यांना आश्रय व जबाबदारी देणारे केजरीवाल यातले खरे गुन्हेगार आहेत. एखाद्या वेश्यागृहातील मालकीण कशी त्या मुलींनी कमावलेल्या पैशातला मोठा हिस्सा घेते आणि पोलिसांनी धाड घातल्यावर त्या मुली आपल्या कोणी नाहीत म्हणून हात झटकते, त्यापेक्षा केजरीवाल यांची कृती किंचित तरी भिन्न आहे काय? जेव्हा कायदामंत्री जितेंद्र तोमर यांच्या पदवीविषयी भानगड उजेडात आली, तेव्हा भाजपावाले उगाच तोमरना बदनाम करीत असल्याचा प्रत्यारोप करून केजारीवाल यांनी केला होत्ता. पण विद्यापीठानेच ग्वाही दिल्यावर कंबरेचे सुटताना तोमर यांना बडतर्फ़ केले. आताही ह्या सुदीपच्या रासलिलेचे चित्रण केजरीवाल यांच्यापाशी १५ दिवस पडून होते. तेव्हा त्यांनी काहीच केले नाही. जेव्हा तेच चित्रण नायब राज्यपाल नजीब जंग व माध्यमांना सोपवले गेल्याची खबर लागली, तेव्हा बडतर्फ़ीची घाई करण्यात आली. म्हणजे चोरी उघडकीस येण्याची पाळी आली, तेव्हा अंग झटकण्याची चतुराई करून केजरीवाल बिळात जाऊन लपले. या तिन्ही मंत्री व बारा आमदारांवर गुन्हे असतील, तर त्यांना पक्षाची उमेदवारी देणारा मुख्य आरोपी ठरतो. कारण आपला प्रत्येक उमेदवार तावून सुलाखून तपासलेला चारित्र्यवान असल्याची ग्वाही केजरीवाल यांनी दिलेली होती. आज त्यापैकी कोणाला बडतर्फ़ करून पळ काढण्यात पुरूषार्थ नाही, तर अट्टल गुन्हेगारी टोळीच्या बॉसला शोभणारी कृती आहे. सुदीपला बडतर्फ़ करून दडी मारलेल्या केजरीवाल यांनी, आपण पक्ष नव्हेतर एक माफ़िया टोळी चालवतो याचीच साक्ष त्यातून दिलेली आहे.

3 comments:

  1. हाहाहा भाऊ केजरीवाल बेमिसाल

    ReplyDelete
  2. भाऊ अत्यंत समर्पक लेख.
    केजरीवाल हे आता सांगत आहेत की मंत्र्याला मी ताबडतोब काढून टाकले या मध्ये केवळ गिर गया तो भी टांग उपर येवढेच नाहि तर या मिडिया, आण्णा आंदोलन व भारतात पुर्वीच्या विदेशी संचालीत सरकारच्या निर्मीत पुत्राचा (केजरीवाल ) व मिडियाचा कुटिल हेतू आहे. केवळ आरोप झाल्यानंतर अनेक मंत्र्याना आपने (केजरीवाल ने) काढून टाकले याचा गर्भीत अर्थ मोदी सरकारने पण केवळ त्यांच्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर काढून टाकावे हा आहे. जशजशा लोकसभा निवडणुका जवळ येतील तेव्हा भाजप प्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या मंत्र्यावर केवळ आरोप झाला तरी मिडिया व पुरोगामी कोल्हेकुई करतील व मंत्र्यांना काढुन टाकावे हा आहे. त्यावेळी माध्यमातून व भाजप इतर पक्ष व पुरोगामी एकच कोल्हेकुई करतील व भाजपची 5-7% मते सहज फिरवतील.

    तसेच आप म॔त्री अलगद सापळ्यात का अडकवलेले/जात आहेत/ दाखवत आहे. पण याचा खोलात जाऊन पोलखोल करणे आवश्यक आहे.

    आठवा पहिल्यांदा दिल्ली च्या निवडणुकीत सगळ्यात जास्त जागा मिळाल्यावर यानी सर्वात जास्त भ्रष्टाचार करणार्‍या काँग्रेसचा पाठिंब्यावर सरकार बनवले. व मिडियाने केजरीवालना डोक्यावर घेतले जणू काही भारताला एक आदर्श नेतृत्व मिळाले. त्याचवेळी इतर राज्यात झालेल्या निवडणुकीत विजयी होणार्‍या पक्षाना मिडिया विसरुन गेला. केजरीवालांचा विजय म्हणजे राजकीय क्षेत्रावर नविन तारा जन्मला असे दाखवले गेले परंतु हि एक पुढल्या लोकसभेतील मतदानाचे ध्रुवीकरणाची खेळी होती.

    म्हणजे किती खोलवर मोदिच्या / काँग्रेसइतर सरकार सत्तेवर येण्याचा अंदाज काँग्रस मुरब्बी नेत्रुत्वाला होता व त्याच्या विरोधात योजना तयार केली होती याचा अंदाज येतो.

    आण्णा व केजरीवाल आंदोलनातून लोकपाल बिल पास करुन लोकांना जणू असे वाटावे आता भ्रष्टाचार होणार नाही. मग हे मुर्ररबी नेते व सरंजामशाहा परत राज्यावर येतील असा होता.

    परंतु तेव्हा आणि आताही मोदि सरकार असताना व हे सर्व विषद होताना याची सखोल चाल व त्या मागील देशी विदेशी शक्ती या बाबत काही पोल खोल करताना तुमच्या व्यतिरिक्त कोणी दिसत नाही.

    आता व विदेशी सत्ताधारी असताना या बाबत मिडियाला कोण पैसा पुरवत होते व आहे याचा पोल खोल होत नाही. याची पाळेमुळे खोदुन काढणे आवश्यक आहे. निदान थोडेफार जरी जनतेला समजले तर याचा पोल खोल होइल व परत असे होण्यापासुन बंदोबस्त होइल. नाहितर असे अनेक केजरीवाल, कन्हैया वारंवार जन्म घेतील व लोकशाही च्या नावाखाली एकाच कुटुंबाची सरंजाम शाही किंवा त्रीशंकु सरकारची भ्रष्टाचारी लुट अशीच चालू राहील. यासाठी मिडियाची ओनरशीप व चीफ इन्व्हेस्टर याची सविस्तर माहिती चॅनेल वर वारवार डिस्प्ले करणे करणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. तसेच देशविघातक खटल्यात दावेदार वा चालवणाऱ्यांना अशा चॅनल वरिल चर्चा मध्ये सहभागी होण्यापासुन पायबंद घातला पाहिजे.
    AS

    ReplyDelete