Monday, September 5, 2016

‘आप’त्तीजनक सापळा


kejri cartoon के लिए चित्र परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला काहीही काम करू देत नाहीत, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने करीत आलेले आहेत. वास्तविक ज्या अडचणी ते सांगत असतात, त्या नव्या नाहीत. दिल्ली हे राजधानीचे शहर असून तिथे पुर्ण दर्जाचे राज्य होऊ शकत नाही. म्हणूनच महापालिकेपेक्षा थोडे अधिकार जास्त असलेले सरकार, अशी त्या नगरराज्याची घटनात्मक व्यवस्था आहे. तिथे महापालिका आयुक्तासारखे निरंकुश अधिकार असलेला नायब राज्यपाल नेमला जातो. त्याच्या पुढे मुख्यमंत्र्याला मजल मारता येत नाही. यापुर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीचा कारभार करताना, त्या मर्यादित अधिकाराविषयी कधी तक्रारी केल्या नव्हत्या. कारण विधानसभा निवडणूका लढवतानाच आपल्याला मिळू शकणार्‍या अधिकाराची प्रत्येक पक्ष व नेत्याला पुर्ण कल्पना होती. म्हणूनच त्यासाठी मते मागताना वा सत्तेची अपेक्षा बाळगताना, केजरीवाल वा त्यांच्या पक्षाने मिळू शकणार्‍या सत्तेत काय चांगले काम करता येईल, त्याची मांडणी करायला हवी होती. पण कुठलाही अभ्यास करायचा नाही, कुठल्याही कामाची इच्छाही नाही, म्हटल्यावर तक्रार करण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. मग असलेली जबाबदारी पार पडण्यापेक्षा नसत्या गोष्टीत नाक खुपसण्याची गरज वाटू लागते. केजरीवाल व त्यांच्या आम आदमी पक्षाची तीच गत झाली आहे. म्हणून मग आपले नाकर्तेपण लपवण्यासाठी त्यांना सतत इतर कोणावर तरी दोषारोपाचे खापर फ़ोडण्याची कसरत करावी लागते. त्यामुळे अन्य पक्षांचे राजकारण बिघडत नसले, तरी त्यांना करायच्या कामात मात्र अनेक अडचणी येत रहातात. केजरीवाल टोळीसाठी हा खेळ होत असेल, पण ज्यांना काम करायचे आहे, त्यांना मात्र ही कटकट होऊन बसते. तेव्हा अशा अतिरेक्यांना धडा शिकवण्याचा काही उपाय शोधावा लागतो. त्यांना कुठल्या तरी सापळ्यात अडकवून नामोहरम करावे लागते. केजरीवाल सध्या त्याच ‘आप’त्ती सापडले आहेत.

आप सरकारमधील संदीप कुमार नावाचा महिलाकल्याण मंत्री इतक्या सहजासहजी वासनाकांडाच्या सापळ्यात फ़सलेला नाही. तो अतिशय काळजीपुर्वक रचलेला एक गुंतागुंतीचा सापळा असावा, याची शंका येते. म्हणूनच त्यात आपणही फ़सण्याची शक्यता दिसताच केजरीवाल यांनी तडकाफ़डकी संदीपचा बळी देऊन आपले हात झटकले आहेत. तितके शहाणपण नसल्याने त्यात आशुतोष नावाचा अतिशहाणा मात्र हकनाक फ़सला आहे. हे प्रकरण नवे नाही आणि त्या वासनाकांडाचे कॅमेराबद्ध चित्राणही नवे नक्कीच नाही. त्याची पुर्वकल्पना केजरीवाल यांनाही असलीच पाहिजे. पण जोवर त्याचा बोभाटा झाला नव्हता, तोपर्यंत केजरीवाल त्यावर पांघरूण घालत बसले होते. आजवर त्यांनी अशाच पद्धतीने आपल्या प्रतिस्पर्धी वा सहकार्‍यांना खेळवले आहे. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांच्याबद्दल एका स्वपक्षीय नेत्याशी केजरीवाल किती गलिच्छ भाषेत बोलले, त्याचे ध्वनिमुद्रण जगाने ऐकलेले आहे. जाहिरपणे यादव-भूषण यांच्याविषयी चांगले शब्द वापरणारे केजरीवाल, त्यांनाच मुद्रीत संभाषणात कमिने अशी शिवी सहजगत्या हासडताना आपण ऐकले आहे. तोच केजरीवाल यांचा खरा चेहरा होता. बाकी पारदर्शकतेचा कांगावा निव्वळ ढोंग होते. म्हणून सतत पारदर्शतेचाचा आग्रह धरणार्‍या या पक्षाच्या कुठल्याही बैठकीत मोबाईल कॅमेरा वा फ़ोन आणण्यास प्रतिबंध असतो. कारण आतमध्ये आम आदमी पक्षाचा जो हिडीस चेहरा आहे, त्याचे चित्रण वा मुद्रण होता कामा नये. त्यालाच ताज्या घटनेने छेद गेला आहे. केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्ष संघटनेचा अभद्र चेहरा लोकांपुढे आलेला आहे. तो येणार नाही, अशी खात्री असेपर्यंत केजरीवाल गप्प होते. पण मुखवटा फ़ाटण्याची खात्री झाल्यावर त्यांनी हात झटकले. मात्र हे सर्व योगायोगाने वा आपोआप घडलेले असू शकत नाही. कोणीतरी क्रमाक्रमाने त्या घटना घडवलेल्या असाव्यात.

आधी अशी शक्यता कुठेही कोणी बोललेला नव्हता. पण तशी सीडी कोणी तरी केजरीवाल यांच्याकडे पोहोचती केली. त्यावर गाजावाजा होणार असल्याची चाहूलही केजरीवाल यांना लागू दिलेली नव्हती. म्हणून ते गप्प बसले. मग अकस्मात एका वाहिनीने त्यावर बातमी करणार असल्याची घोषणा केली आणि आपल्यालाही आताच कळल्याचे नाटक रंगवून केजरीवाल यांनी हात झटकले. पण त्यांचे सहकारीही पुर्णपणे अंधारात होते. म्हणूनच थक्क झाल्यासारखे आशुतोष यांनी बडतर्फ़ मंत्र्याचे वकीलपत्र घेऊन ब्लॉग लिहीला आणि संदीपचा गुन्हा कोणता म्हणून टाहो फ़ोडला. कुठल्या महिलेची तोपर्यंत तक्रार नव्हती आणि संदीपही आपण चित्रणात नसल्याची ग्वाही देत होता. केजरीवाल त्याला बडतर्फ़ केल्याची ग्वाही देत होते आणि संदीप राजिनामा दिल्याचा दावा करीत होता. सर्वच काही इतक्या वेगाने घडत चालले होते, की ‘आप’मधल्या मोठमोठ्या चतुर चाणक्यांनाही कसलाच अंदाज येत नव्हता. सीडी वाहिन्यांवर झळकली, तेव्हा त्यातला इसम कोण तेही आपण ओळखत नसल्याचा संदीपचा दावा होत. तर महिला कोण तेही कोणी सांगू शकत नव्हता. मग तोच संदीप आहे आणि त्याने महिलेचे शोषण केले असल्याच्या निष्कर्षाप्रत केजरीवाल अशा अल्पावधीत कसे पोहोचले? त्या दिसणार्‍या महिला व पुरूषाला केजरीवाल नक्कीच ओळखत असणार. किंवा त्या महिलेची तक्रार त्यांच्यापाशी आधीपासून आलेली असणार ना? म्हणजेच प्रकरण आधीपासून दाबलेले होते. पण ज्यांनी त्याचा बोभाटा करायचा ठरवलेले होते, त्यांना एकट्या संदीपचा बळी नको होता. तर त्यात संपुर्ण आम आदमी पक्षाला गुंतवायचे होते. म्हणूनच गाफ़ील पकडून एकामागून एक घटनाक्रम घडवायची योजना आधीपासून आखलेली होती. तसे नसेल तर गाजावाजा झाल्यावर अवघ्या ४८ तासात ही महिला शोधून तिला पोलिस ठाण्यापर्यंत तक्रार द्यायला कोणी हजर केले?

केजरीवाल व त्यांची संपुर्ण टोळीच खोटारडी वा भुरटे बदमाश असल्याचे जगाला दाखवून देण्याची एक परिपुर्ण योजनाच यामागे असल्याचे लपून रहात नाही. अशी योजना आखून राबवण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक आहे, ती कोणा सामान्य संस्था वा व्यक्तीपाशी असू शकत नाही. मात्र इतकी योजनाबद्ध कारवाई क्रमाक्रमाने घडवण्याचे सामर्थ्य गुप्तचर खात्याकडे असू शकते. दिर्घकाळ प्रत्येक गोष्टीत मोदींना दोषी ठरवणार्‍या केजरीवाल यांच्या पोरकटपणाला लगाम लावण्यासाठीच, असे काही घडवून आणलेले असू शकते. खरे तर त्यात नवे काहीच नाही. पक्षाच्या बारा आमदारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यापैकी अर्धे महिलांच्या शोषणाचे आणि लैंगिक स्वरूपाचे आहेत. खेरीज कुमार विश्वास यांचेही असेच एक प्रकरण उजेडात आले होते. अलिकडे ‘आप’च्या एका महिला कार्यकर्तीने असेच आरोप ठेवून आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे हे वासनाकांड खास वा नवे नाही. ही त्या पक्षाची प्रवृत्ती आहे. पण त्यातल्या कुणा एका नेत्याला गोवून संपवण्यापेक्षा त्यातून पक्षालाच बदनाम करण्याची खास योजना त्यात असू शकते. त्यामुळे केजरीवाल टोळी जितकी त्यापासून सुटायचा प्रयत्न करील, तितकी गुरफ़टत जाईल, अशा रितीने घटनाक्रम सुरू आहे. आधी प्रकरण दोन प्रौढांच्या सहमतीने झाल्याचा गवगवा झाला आणि त्याला आपचे नेते दुजोरा देत असताना, ती महिलाच पोलिस ठाण्यात येऊन धडकली. मग काय सर्वच्या सर्वच आपनेत्यांना तोंड लपवून बिळात दडी मारायची वेळ आली. पण ही सुरूवात आहे. गेल्या दिड वर्षात सत्ता हाती घेतल्यापासून केजरीवाल टोळीने किती दिवे लावले आणि कोणते गुन्हे केले; त्याची मालिकाच आता एकामागून एक बाहेर आणली गेली तर नवल वाटण्याचे कारण नाही. ऑगस्टा वेस्टलॅन्ड, नॅशनल हेराल्ड, इशरत जहान अशा उलटलेल्या कथानकाच्याच पद्धतीने आता केजरीवाल नावाची मालिका उलगडत जाणार आहे. प्रेक्षकांनी मनोरंजनासाठी सज्ज असावे.

1 comment: