Monday, September 12, 2016

फ़सव्या युक्तीवादाचा प्रतिवाद

mahadiks vidow के लिए चित्र परिणाम

सध्या काश्मिर वा अन्य विषयातून जे पुरोगामी वाद रंगवले जात आहेत, त्यात सातत्याने एक मुद्दा पुढे आणला जातो. किंबहूना तो मुद्दा नसून युक्तीवाद आहे. जो स्वातंत्र्यदिन वा त्याचा सोहळा मोदी सरकार वाजतगाजत साजरा करते आहे, त्या लढ्यातले रा. स्व. संघाचे योगदान किती व कोणते? ह्यात नवे काही नाही. गेली कित्येक वर्षे असा युक्तीवाद होत राहिला आहे आणि चालूच रहाणार आहे. कारण जेव्हा आपला मुद्दा पटवून देता येत नसतो, तेव्हा लोकांचा गोंधळ उडवून देणे; ही सोपी युक्ती वा रणनिती असते. तीच सध्या सार्वत्रिक पुरोगामी रणनिती झाली आहे. प्रत्येक विषयात व गोष्टीत लोकांच्या मनाचा गोंधळ उडवून देण्याचा कसोशीने प्रयत्न चालू असतो. त्यात पुरोगामी म्हणवून घेणार्‍या वेगवेगळ्या छटांचे लोक तितक्याच उत्साहात सहभागी होताना दिसतील. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांचा उल्लेख कुठे केला, की त्यांनीच संघावर बंदी घातल्याची आठवण करून दिली जाते. संघाने कुठे महात्मा गांधींचे नाव घेतले, की गांधीहत्येचे नाटक सुरू होते. त्यातही मजेची गोष्ट म्हणजे कम्युनिस्ट अशी ओळख असलेले लोकही त्याच उत्साहात सहभागी होत असतात. ह्या कम्युनिस्टांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कोणते, असा सवाल अन्य ‘स्वातंत्र्य सेनानी’ वा त्यांच्या साथीदारांना कधी पडत नाही. जोवर हिटलरने सोवियत युनियनवर हल्ला केला नव्हता, तोपर्यंत हिटलरच्या युद्धाला मुक्तीलढा ठरवणारे कम्युनिस्ट होते. पुढे बाजू पलटली तेव्हा ब्रिटीशाच्या पंगतीत जाऊन बसणारेही कम्युनिस्टच होते. मग ते कुठल्या स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आज सांगत असतात? पण तो सवाल कोणी पुरोगामी विचारणार नाही. कारण आज त्याच कम्युनिस्टांनी पुरोगामी मुखवटा पांघरलेला आहे. म्हणूनच या फ़सव्या युक्तीवादाचा समाचार घेणे अगत्याचे आहे.

सवाल इतिहासाचा विचारला जातो. पण आज आपण इतिहासात जगत नसून तेव्हाच्या पारतंत्र्याचाही काळ उरलेला नाही. आज जे स्वातंत्र्य आहे, त्याला जपण्याचा विषय समोर आहे व असतो. म्हणूनच आजच्या स्वातंत्र्याला कोण जपणार किंवा सुरक्षित करणार, याला प्राधान्य असते. थोडे इतिहासातही डोकावून बघण्यास हरकत नसावी. मुळात भारतीयांना स्वातंत्र्यलढा देण्याची पाळी कशामुळे आली? कारण देश व समाज पारतंत्र्यात होता. ब्रिटीशांनी इथे येऊन एक एक राज्य सत्ता उलथून पाडल्या आणि या खंडप्राय देशात आपली सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. तेव्हा हा देश स्वतंत्र होता काय? असेल तर तो विविध राज्ये व संस्थानात विभागला गेला होता. तिथे राज्य करणारे राजे नबाब सुलतान यांनी आपल्या समाजाचे स्वातंत्र्य वा अधिकार जपण्यासाठी कुठले योगदान केले? लढायची हिंमत नसल्याने त्यांनीच ब्रिटीशांपुढे नांगी टाकली आणि आपापले आलिशान जीवन सुरक्षित करण्यासाठी ब्रिटीशांची गुलामी पत्करली. हे राजे नबाब कोण होते? त्यांच्या पुर्वजांनीच आपापल्या मनगटी बळावर राज्ये सत्ता स्थापन केलेल्या होत्या. आपापली न्यायव्यवस्था व कायदाव्यवस्था स्थापन केलेली होती. त्याच्या वारस म्होरक्यांनी लढायची पाळी आली किंवा स्वातंत्र्य जपण्याची वेळ आली; तेव्हा शरणागती पत्करून आपापले सुखी चैनीचे जीवन अबाधित राखण्याच्या अटीवर ब्रिटीशांच्या गुलामीला मान्यता देऊन टाकली. त्यालाच पारतंत्र्य म्हण्तात ना? मग पारतंत्र्य कोणाच्या नाकर्तेपणामुळे भारतीयांच्या माथी आले होते? आधीच्या कर्तबगार राजे नबाबांच्या नाकर्त्या वारसदारांमुळे ही देशाची दुर्दशा झालेली होती. त्यांच्या नाकर्तेपणानेच देशात पारतंत्र्य आलेले होते. थोडक्यात पुर्वजांनी स्वातंत्र्य आणले वा स्वराज्य स्थापन केले, म्हणून त्यांचे वारस स्वातंत्र्य जपू व सुरक्षित ठेवू शकतात असे नाही. त्यावेळी ज्यांच्यात सामर्थ्य व धाडस असते, अशाच लोकांकडून स्वातंत्र्याची जपणूक होत असते.

ज्यांनी ब्रिटीश विरोधातल्या स्वातंत्र्याचा लढा दिला, त्यातले कितीजण ब्रिटीशपुर्व स्वातंत्र्याचे वारसदार होते? जवळपास कोणीच नाही असे दिसून येईल. १८५७ चे बंड ब्रिटीशांनी क्रुरपणे मोडून काढल्यावर देशभरच्या संस्थानिक राजे नबाबांनी शरणागती पत्करली होती आणि नव्या भारतीय पिढीतल्या सामान्य घरातील लोक स्वातंत्र्याचे नेतृत्व करायला पुढे आलेले होते. नेहरू, गांधी, टिळक वा पटेल इत्यादी कोणाचेही पुर्वज ब्रिटीशपुर्व स्वातंत्र्याचे वारसदार नव्हते. मग त्यांच्या लढ्याच्या वेळी नाकर्त्या वारसदारांनी असेच सवाल केलेले असू शकतात. त्यांनी विचारलेल्या अशाच सवालांनी तेव्हाचे स्वातंत्र्यवीर नामोहरम झाले असते, तर आज भारताला स्वातंत्र्य बघता आले नसते, की अनुभवता आले नसते. कारण सवाल स्वातंत्र्य मिळवणार्‍यांच्या वारसदारांचा नसतो, की वारश्याचा नसतो. प्रश्न असलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी वर्तमानात कोण झुंज देतो किंवा प्रयत्न करतो, त्याचा विषय असतो. आज स्वातंत्र्य जपण्यापेक्षा त्यालाच सुरूंग लावून या सार्वभौम देशाला विस्कटून टाकण्याच्या प्रयत्नाना तसे वारस हातभार लावणार असतील, तर त्यांना झुगारून लावण्याला प्राधान्य द्यावे लागते. ‘भारत तेरे टुकडे होगे’, अशा घोषणांसाठी कन्हैयाची पाठ थोपटायला राहुल गांधी विद्यापीठात जाणार असतील, तर तोच नेहरूंचा वारस नेहरूंनी आणलेल्या स्वातंत्र्यावर गदा आणत असतो. देशाच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्वाला असा नेहरूंचा वारसच धोका बनलेला असतो. त्याला बाजूला सारून देशाचे स्वातंत्र्य व काश्मिरची सुरक्षा करायला पुढे सरसावणारा कोल्हापूरचा संतोष महाडीक आजच्या स्वातंत्र्याचा सेनानी असतो. नेहरूंच्या नातसुन सोनियापेक्षा त्याच महाडिकची विधवा पत्नी स्वाती महाडिक स्वातंत्र्याची वारस असते. कारण पतीचे अर्धवट राहिलेले कार्य पुर्ण करायला चुलमुल सोडून ही महिला सैन्यात भरती व्हायला पुढे सरसावते.

ह्या कर्नल महाडीकचा किंवा त्याच्या पुर्वजांचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यातला सहभाग कोणता? असा सवाल विचारण्याची कोणाची हिंमत आहे काय? त्याच्या पत्नीला कोणी देशप्रेम शिकवण्याची गरज नसते. कारण देशप्रेम वारशाने मिळत नाही, की स्वातंत्र्याचाही वारसा कुठल्या घराण्यात जन्म घेतल्याने मिळत नसतो. ह्या गोष्टी उपजत असतात. त्याचा साक्षात्कार ज्यांना होतो, त्यांना कुणाच्या मान्यतेची गरज नसते, की कुठल्या आमंत्रणाची आवश्यकता नसते. प्रसंग व परिस्थिती उदभवते, तेव्हा त्यांच्या स्वातंत्र्याच्या उर्मी त्यांना क्रियाशील बनवत असतात. रणांगणात खेचून आणत असतात. कुठल्या पदाची वा अधिकारपदाची गरज नसते. सोनियांना देशाची सेवा करण्यासाठी पक्षाध्यक्ष होण्याचा अट्टाहास असतो आणि त्यासाठी खरा स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सीताराम केसरीला चपला मारून कार्यालयातून पळवून लावले जाते. ज्यांनी त्या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांची इतकी लज्जास्पद विटंबना केली, त्यांनी इतर कुणाला स्वातंत्र्यलढ्यातले योगदान विचारावे काय? आज संघाला असले प्रश्न विचारणार्‍यांनी आधी स्वातंत्र्यसेनानी सीताराम केसरीच्या अपमानाचा जबाब दिला पाहिजे. कारण विषय इतिहासजमा झालेल्या लढ्याचा नसून, त्या लढ्यातून साध्य झालेल्य बहूमोल स्वातंत्र्याच्या जपणूकीचा आहे. वर्तमानात त्याच स्वातंत्र्यावर संकट होऊन भिरभिरणार्‍यांना संपवण्याचा विषय अगत्याचा आहे. त्यात पुरोगामी चेहरेच देशद्रोहाच्या मुखवट्यात पुढे येणार असतील, तर त्यांच्या फ़सव्या युक्तीवादाचा प्रतिवाद करण्यापेक्षा त्यांना झुगारून देश व त्याचे स्वातंत्र्य जपावे लागेल. ते काम संघ वा अन्य कोणी करणार असेल, तर लोक त्यांची साथ देणारच. मोदींना म्हणूनच लोकांनी इतका पाठींबा दिला. कारण फ़सव्या युक्तीवादाला लोक फ़सायचे बंद झालेत. आजच्या लढ्यातले योगदान लोक ओळखू लागल्याचा तो परिणाम आहे.

2 comments:

 1. छानच भाऊ,इतिहास वाचाल तर वाचाल हे खरे आहे परंतु हे विषय काढुन राजकारण करून लोकांना जादाकाळ फसवता येत नाही हे अजुन या भंपक लोकांना कळत नाही संघ किंवा खांग्रेस व साथीदार यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यामुळे वर्तमान काळातील विकास किंवा रोजगार वाढ होणार नाही हे यांना कळत नाही असे नाही स्वतः चे अपयश लपवण्यासाठी हा घोळ घालण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे बरोबर उलटी बाजु मोदींची आहे ते फक्त विकास व रोज़गार वाढीवर बोलतायत यामुळे लोक त्यांच्या मागे आहेत व हे म्यूजियम मध्ये चाललेत

  ReplyDelete
 2. भाऊ एकदम सही. ..
  1990-91 नंतर काश्मीर मध्ये काश्मीरी पंडीताना आपल्याच प्रांतातून परागंदा व्हायला लागले.
  कमकुवत व सुमार नेतृत्वा मुळे हे झाले. तसेच सत्तालपंट पक्षकार्यकर्तां मुळे केवळ मागील पीढ्यतील पुण्याई वर व आडनावा वर देशाची आडवणुक झाली.
  आर्थिक व टेक्नॉलॉजी पारतंत्र्यातुन देश बाहेर पडु शकला नाही.
  त्यामुळे या खंडप्राय देशाला कायम स्वतंत्र असुन पारतंत्र्यात असल्या प्रमाणे रहायला लागत आहे.
  अमिताभ च्या डायलाॅग प्रमाणे "ये जीना भी कोइ जीना है लल्लु " अशी वेळ आणली आहे.
  मिडिया नेहमीच कणखर व भारत देशभक्त पक्षाच्या सरकार च्या विरोधात राहुन देश विकासक नेतृत्वाच्या विरोधात ऊभा राहुन. देशाची स्थिती कायम आराजक माजलेली ठेवली.
  विपुल नैसर्गिक साधन संपत्ती व हवामान असताना पण देश आथिर्क पारतंत्र्यातच ठेवला गेला.
  मोदी सारख्या कणखर विकासी अष्टपैलू नेतृत्वा पासुन वंचित ठेवले.
  यासाठी आपल्या सारखे हजारो जन जागृती करणारे विचारवंत संपूर्ण देशभर निर्माण होणे आवश्यक आहे.

  ReplyDelete