Monday, September 26, 2016

युद्धविरोधी भूमिकेचे पोस्टमार्टेम



इब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ मानला जातो. कारण त्याने जगाच्या मानवी इतिहासाचे एक परिमाण आपल्या सिद्धांतातून मांडले आहे. कुठलेही राजघराणे, प्रस्थापित सत्ता, साधारण चार पिढ्यांनंतर रसातळाला जाते आणि त्याला त्याच्या संस्थापकांचीच चौथी पिढी कारणीभूत होते; असे खालदून म्हणतो. किंबहूना एखादी नवी राजसत्ता प्रस्थापित होत असतानाच, तिच्या विनाशाची बीजे त्यात पेरली जातात; असाही त्याचा दावा आहे. त्याची खालदूनने केलेली कारणमिमांसाही मोठी रोचक आहे. मानवी इतिहासातील अशा सत्तासंघर्षाचे विश्लेषण करताना त्याने ‘असाबिया’ म्हणजे विस्थापितांच्या टोळीनिष्ठेचा एक सिद्धांत मांडलेला आहे. असाबिया म्हणजे प्रस्थापित नागरी समाजाच्या बाहेर व मोकाट विस्थापित जीवन जगणार्‍या टोळी जीवनात जमावातील लोकांची परस्पर एकजीनसी निष्ठा. ज्या निष्ठेसाठी वा बांधिलकीसाठी आत्मसमर्पण करण्याची कटीबद्धता त्यांच्यात आढळून येते. अशा टोळीवादी बंधूभावाला खालदून ‘असाबिया’ म्हणतो. अशा टोळ्यांना प्रस्थापित नागरी समाजजीवनात स्थान नसते आणि त्या टोळ्यांवर अशा राजसत्तेची हुकूमतही चालत नसते. त्यांना प्रस्थापित समाजात स्थानही नसते. त्याचवेळी अशा टोळ्या प्रस्थापित नागर समाजाच्या जीवनमूल्यांचा कमालीचा द्वेष करीत असतात. म्हणूनच त्या टोळ्य़ा नेहमी प्रस्थापित नागरी समाज व त्याची जीवनमुल्ये व सत्ता उध्वस्त करण्यासाठी टपलेल्या असतात. प्रस्थापित समाजाला व त्यांच्या सत्तेला त्या टोळ्यांपासून कायम संरक्षणाची गरज भासत असते. कारण ह्या विस्थापित टोळ्या व त्यातले वंचित लोक, प्रस्थापिताला उध्वस्त करायला कायम धडपडत असतात.

जेव्हा त्यापैकी एखादी टोळी प्रस्थापित सत्तेला उध्वस्त करून राजसत्ता काबीज करते, तेव्हा कर्तव्य म्हणून तिला सत्ता पुढे राबवावीच लागते. मग जसजशी नवी टोळी वा तिचे म्होरके राजकीय सत्ता राबवू लागतात; तसतसे त्यांचेही नागरीकरण होत जाते. त्यांच्यातल्या असंस्कृत अपारंपारिक प्रवृत्ती मावळू लागतात. त्यांच्यातली लढायची इर्षा वा वृत्ती निष्क्रिय होत जाते आणि जी सत्ता मनगटाच्या ताकदीवर संपादन केली; तिच्याच रक्षणासाठी त्या सत्ताधार्‍यांना टोळीबाहेरचे लढवय्ये भाड्याने वेतनावर मिळवावे लागतात. असे वेतनदार भाडोत्री ‘लढवय्ये’ टोळीसारखे निष्ठावान नसतात. म्हणूनच बाहेरील टोळ्यांच्या लढण्याच्या क्षमतेसमोर हे भाडोत्री लढवय्ये कमी पडू लागतात. थोडक्यात जीवावरचा जुगार खेळायची तयारी असलेले टोळीवाले (परके, बाहेरचे, आक्रमक) आणि हाती असलेली सत्ता वाचवायच्या बचावात्मक पवित्र्यात असलेले प्रस्थापित सत्ताधारी व त्यांचे भाडोत्री लढवय्ये; यांच्यातला हा सत्तासंघर्ष होतच असतो. त्यात आपल्या रानटी क्रौर्यामुळे बहुधा टोळीवाल्यांचा विजय होतो. असाबियामुळे म्हणजे टोळीतील परस्परांसाठी जीव देण्याच्या प्रत्येकाच्या बांधिलकीमुळे त्यांची सरशी होत असते. त्यात मग आधीची प्रस्थापित सत्ता वा व्यवस्था उध्वस्त होऊन जाते. तिची जबाबदारी नव्या टोळीने उचलून सत्ता राबवली; तर मग सत्तांतर नव्हेतर राजकीय स्थित्यंतर होते. ती जबाबदारी त्या जेत्या टोळीने उचलली नाही तर पुन्हा आधीचीच खिळखिळी झालेली पराभूत सत्ता; नागरी समाजाची व्यवस्था डागडुजी करून कारभार चालवत रहाते. पण सत्ता म्हणून तिची शान व हुकूमत शिल्लक उरलेली नसते. ती नवनव्या आक्रमणाचा बळी होतच रहाते. थोडक्यात लुटमारीची शिकार होण्यापलिकडे मग त्या समाजव्यवस्थेला अर्थ नसतो. कारण असा समाज व त्याचे नेतृत्व, लढायची इच्छाच गमावून बसलेले असतात.

   असे का होते? तर आधीची सत्ता ज्या टोळीने प्रस्थापित केली, त्या टोळीत लढणार्‍यांमध्ये बंधूभावाची एक निष्ठा प्रखर असते. एकमेकांसाठी जीव देण्याच्या मनस्थितीने त्या टोळीतले सर्वजण लढायला सज्ज असतात. त्यात कोणी राजा वा गुलाम नसतो. पण टोळीचा नेता नायक असतो, त्याच्या निर्णयशक्तीला सर्व सहकारी मान्यता देऊन त्याच्या शब्दाचा मान राखत असतात. परंतू आपली ताकद आपल्या सहकार्‍यांच्या निष्ठा व पराक्रमात सामावलेली आहे, याचे भान ठेवून तो म्होरक्या वागत असल्याने त्यांच्यामध्ये समता, बंधूता नांदत असते. सहाजिकच त्या टोळीने प्रस्थापित सत्ता उध्वस्त करून नवी राजसत्ता उभी केल्यास; त्यात तोच टोळीनायक वा म्होरक्या राजा होतो. बाकीचे त्याला राजा मानतात. पण राजसत्ता राबवताना तो नवा सत्ताधीश आपल्या सहकार्‍यांना सन्मानाने व सहाध्यायी म्हणूनच वागवत असतो. सर्व समान खेळाडूंच्या संघातला अंतिम निर्णय घेणारा संघनायक, इतकीच त्या टोळीनायकाची महत्ता असते. त्यापेक्षा त्याचे सहकारी त्याला मोठा मानत नाहीत, की तो नवा ‘राजा’ही स्वत:ला महापुरूष मानत नाही. त्यामुळेच नवी सत्ता सुरळीत चालू शकते. हाती आलेली सत्ता टिकवण्याची ताकदही त्या नव्या राजा व त्याच्या सहकार्‍यांमध्ये असते. मात्र जसजशी ही टोळी नवे सत्ताधारी म्हणुन प्रस्थापित होऊन नागरी समाजात रुपांतरीत होऊ लागतात; तसतशी त्यांच्यातली लढण्याची व प्राण पणाला लावण्याची इर्षा व इच्छा मावळत जाते. सुखवस्तू जीवनाची चटक लागून त्यांच्यातला लढवय्या शिथील व उदासिन होत जातो. पण हाताशी साधनसंपत्ती आलेली असते. त्यातून मग वेतनावर लढणारे भाडोत्री सैनिक लढवय्ये जमा केले जातात वा सेना उभारल्या जातात. हा सगळा घटनाक्रम राजाच्या पुढल्या पिढीच्या समोर घडत असतो.

म्हणूनच सत्ता वा राजघराणे प्रस्थापित करणार्‍याच्या पुढल्या पिढीतला वारस आपल्या पित्याकडून नागरी सत्ता राबवण्याचे यशस्वी धडे घेतो. पण एकमेकांसाठी प्राण पणाला लावण्याची वृत्ती त्याला वारशात मिळत नसते. त्याचप्रमाणे पित्याच्या सहकार्‍यांच्या दुसर्‍या पिढीलाही समतेच्या मानसिकतेचा अनुभव येत नसतो. सहकार्‍यांना सरदार म्हणून मिळालेल्या सत्तेवर वाढणार्‍या त्यांच्या दुसर्‍या पिढीत त्यांचे हितसंबंध व स्वार्थ प्रस्थापित व्यवस्थेमध्ये गुंतलेले असतात. सहाजिकच मनगटशाहीने वा कर्तृत्वावर सत्ता हस्तगत करणे, हा विषय हळुहळू विस्मृतीमध्ये जात असतो. किंबहूना पुढल्या पिढीपासून लढण्याला कमीपणा मानले जाते. तसे तत्वज्ञान तयार केले जाते. लढणे म्हणजे रानटीपणा असे वैचारिक दावे सुरू होतात. आज भारताची दुर्दशा कशामुळे झाली आहे, त्याचे उत्तर या असाबियामध्ये आढळते. इब्न खालदूनच्या विवेचनात त्याचा उलगडा होऊ शकतो. मुळात सत्तेमुळे श्रीमंती संपन्नता येते आणि त्यासाठी लढाईने बाजी मारावी लागते. त्याखेरीज मिळालेली आयती सत्ता लढण्याला हिणकस ठरवते. आज भारतावर पाकिस्तान कसेही हल्ले करत असतानाही लढाई नको असे ज्यांना वाटते, त्यांना देश वा समाजाची फ़िकीर नाही. त्यांचे हित प्रस्थापित व्यवस्थेत आहे आणि लढाई युद्ध भडकले तर हातात असलेलेही गमावण्याच्या भयाने त्यांना पछाडलेले असते. सहाजिकच असे लोक लढण्याच्या विरोधात असतात. त्यापेक्षा पडेल ती किंमत मोजून शांतता विकत घेण्याचे समर्थक असतात. त्यासाठी तात्विक युक्तीवाद उभे करतात. कोठीवर फ़सलेल्या नव्या तरूणीला आधीपासून त्यात फ़सलेल्या मुलींनी हेच सुरक्षित भविष्य असल्याची ग्वाही द्यावी आणि प्रतिकारापासून परावृत्त करावे, तसे हे बौद्धिक युक्तीवाद युद्धाच्या विरोधात भूमिका मांडत असतात. कारण त्या मुलीच्या संघर्षात कोठी़च उध्वस्त झाली, तर यांना कोण वाली उरणार असतो?

1 comment: